Wednesday, May 6, 2020


स्थानिक गुन्हे शाखेने 34 लाख रुपयाचा गुटखा पकडला

 नांदेड दि. 6 :-  एका ट्रकमध्ये कर्नाटक राज्यातील हूमनाबाद येथून हिमायतनगर येथे गुटखा विक्रीसाठी जाणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर त्यांचे टिमने बुधवार 6 मे रोजी सकाळी 5.30 ते 6 यादरम्यान दुध डेअरी वसरणी चौक येथे सापळा रचला होता. सापळया दरम्यान ट्रक क्रमांक एमएच 26 बीई 4064 या ट्रकला पकडून तपासणी केली असता या ट्रकमध्ये पोलीसांची दिशाभूल करण्यासाठी वरील बाजूस कांदा भरुन त्याखाली गुटखा लपविण्यात आला होता. या ट्रकमध्ये सागर पान मसाला कंपनीचा 34 लाख रुपयाचा 60 बोरीगुटखा 12 लाख रुपये किंमतीच ट्रक अस एकूण 46 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
लॉकडाऊन काळात कोणीही चोरटया मार्गाने अथवा इतर मार्गाने कोणत्याही प्रकारची मद्य विक्री गुटखा विक्री करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांना सुचना दिल्या आहेत. त्यानुसार ही कार्यवाही पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्यासह सपोउपनि चव्हाण, पोहेकॉ / भानुदास वडजे, दशरथ जांभळीकर, पदमा कांबळे, तानाजी येळगे, बालाजी मुंडे बजरंग बोडके यांनी पार पाडली आहे.
राज्यात मोठया प्रमाणात कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रसार होत आहे. त्यासाठी शासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात दिनांक 14 मार्च, 2020 पासून साथरोग प्रतिबंध अधिनियम ,1897 लागू करण्यात आलेला आहे. दिनांक 14 मार्च, 2020 च्या अधिसूचनेन्वये यासंदर्भातील नियमावली प्रसिध्द करण्यात आली असून दिनांक 17 एप्रिल 2020 च्या आदेशान्वये एकत्रित सुधारीत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात मार्च महिन्यापासून शासनाने लॉकडाऊन घोषीत केलेला आहे. सदर लॉकडाऊन काळात देशी, विदेशी दारु विक्रीचे दुकानांना  विक्री करण्यास प्रतिबंध केलेला आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे पोलीस अधीक्षक नांदेड कार्यालयाने दिली आहे.
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...