Tuesday, November 30, 2021

 नगरपंचायतीच्या निवडणुका पारदर्शक पार पाडाव्यात

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 


·         जिल्‍हा संनियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- नायगाव, अर्धापूर, माहूर नगरपंचायत निवडणूक पारदर्शक, मुक्‍त व निर्भय वातावरणात तसेच सुरळीत पार पाडाव्यात यासाठी आवश्‍यक त्‍या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. या निवडणूकीच्‍या पार्श्‍वभूमीवर आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी डॉ. इटनकर यांच्या अध्‍यक्षतेखाली जिल्‍हा संनियंत्रण समितीची बैठक आज संपन्‍न झाली. यावेळी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, जिल्‍हा प्रशासन अधिकारी शैलेश फडसे तसेच समितीचे इतर सदस्‍य उपस्थित होते. 

राज्‍य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यातील नायगाव, अर्धापूर व माहूर नगरपंचायतीसाठी निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. यानुसार जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 30 नोव्हेंबर 2021 रोजी निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध केला आहे.

या बैठकीत कायदा व सुव्‍यवस्‍था राखण्यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेसह संवेदशील, नक्षलग्रस्‍त आदी भागांसाठी विशेष व्‍यवस्‍था करणे. आर्थिक बळाचा दुरूपयोग टाळणे. मतदारांवर प्रभाव टाकण्‍यासाठी देण्‍यात येणाऱ्या वस्‍तूंच्‍या, मदय, पैसा आदीच्‍या वाटपावर अंकुश ठेवणे. राज्‍य निवडणूक आयोगाचे आदेशानुसार प्रत्‍येक उमेदवार व राजकीय पक्ष यांनी खर्चाबाबतची व्‍यवस्थित माहिती वेळेवर सादर करणे. रोख रक्‍कमांच्‍या मोठया व्‍यवहारावर सर्व संबंधित ठिकाणी जसे विमानतळ, रेल्‍वेस्‍थानक हॉटेल्‍स, फार्म हाऊस यांच्‍यावर नजर ठेवणे अशा सर्व व्‍यवहार व हालचालीवर जसे तारण, वित्तिय, हवाला दलाल यांच्‍यावर लक्ष ठेवणे. बँकामार्फत होणाऱ्या मोठया व संशयास्‍पद आर्थिक व्‍यवहारावर लक्ष ठेवणे. निवडणुकांमध्‍ये गैरव्‍यवहारांसाठी वापरण्‍यात येणारा पैसा हा सहकारी बँका तसेच पतपेढयांमार्फत जास्‍त प्रमाणात उपलब्‍ध होतो. यावर तहसिलदार यांच्‍या अध्‍यक्षतेखालील समितीने वेळीच योग्‍य ती कार्यवाही करावी. आयोगाच्या आदेशाप्रमाणे पेडन्‍यूज, पेडसोशल कमिटी, सोशल मिडिया व इंटरनेट इत्‍यादींवर लक्ष ठेवणे याबाबत निर्देश देण्यात आले. त्‍यासाठी पथके स्‍थापन करून उपाययोजना करण्‍यात येणार आहेत. यात व्हिडीओ सर्व्‍हेलियन्‍स पथक, भरारी पथक, चेक पोस्‍टसाठी पथक, एमसीसी पथक, तक्रार निवारण कक्षाचा समावेश आहे.

00000

 नांदेड जिल्ह्यात शाळा 13 डिसेंबर पासून सुरू 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथी व शहरी भागातील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग 1 डिसेंबर 2021 पासून सुरु करण्यात येणार होते. नांदेड जिल्ह्यात लसीकरणासाठी विशेष मोहिम 12 डिसेंबर 2021 पर्यंत राबवून लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढल्याचा आढावा घेऊन 13 डिसेंबर 2021 पासून ग्रामीण भागातील इयत्ता 1 ली ते 4 थी व शहरी भागातील इयत्ता 1 ली ते 7 वीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. 

शासन निर्णयानुसार सर्व शिक्षकांचे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा  परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी याबाबत आढावा घेऊन शाळा सुरु करण्याबाबतच्या आवश्यक त्या सूचना संबंधितांना करण्याचे निर्देश दिले.   

जिल्ह्यात कोविड-19 लसीकरणाची स्थिती व कोविड-19 चा नवीन व्हेरिएंट ओ-मायक्रॉनची भिती सर्वत्र निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील लसीकरणाची स्थिती पाहता शासन परिपत्रकानुसार शाळा सुरु करण्यासाठी उचित होणार नाही. साथरोग अधिनियम 1897 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, महसूल, वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पूनर्वसन विभाग मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार ज्या वर्गाची शाळा सद्यस्थितीत सुरु आहे ती पूर्वी प्रमाणेच सुरु राहतील. परंतू शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरातील 18 वर्षावरील सर्व व्यक्तींचे प्रथम किंवा द्वितीय डोस झाल्याचे प्रमाणपत्र घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत प्रत्यक्ष प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच 13 डिसेंबर पासून इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांच्या घरातील 18 वर्षावरील सर्व व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झाल्याची खात्री शालेय प्रशासनाने करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.

00000

 नांदेड जिल्ह्यात 4 व्यक्ती कोरोना बाधित,

एकाचा मृत्यू तर 3 कोरोना बाधित झाले बरे  

नांदेड (जिमाका) दि. 30 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 158 अहवालापैकी 4 अहवाल कोरोना बाधित आले आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 490 एवढी झाली असून यातील 87 हजार 812 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 24 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.  

आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 664 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, नांदेड ग्रामीण 1 असे एकुण 4 बाधित आढळले. आज जिल्ह्यातील 3 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 3, व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.  

आज 24 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, नांदेड मनपा अंतर्गंत गृह विलगीकरण 18, खाजगी रुग्णालयात 3 व्यक्ती उपचार घेत आहेत.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 74 हजार 557

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 70 हजार 607

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 490

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 812

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 654

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-00

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-24

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2.  

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 नांदेड जिल्ह्याच्या आरोग्यासाठी जिल्हा प्रशासनाचे

लसीकरणासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू 

·  आजपासून निवडक पेट्रोल पंपावरही प्रायोगिक लसीकरण

·  कायदेशीर दंड व कारवाईवरही दिला जाणार भर 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- जिल्ह्यात कोविड-19 प्रसार होऊ नये व संभाव्य विषाणुच्या प्रसाराबाबत ज्या काही धोक्याच्या सूचना येत आहेत त्यातून जिल्ह्याला सावरण्यासाठी लसीकरण आणि कोविड रोखण्यासाठी निर्धारीत केलेले प्रत्येकाचे वर्तन यावर अधिक भर दिला जाईल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले. कोविड-19 लसीकरण, कायदेशीर दंड, संभाव्य कोरोना विषाणू आणि व्यवस्थापन याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत ते बोलत होते. 

नव्या विषाणूबाबत जगभर चिंता व्यक्त केली जात आहे. शास्त्रज्ञांतर्फे याचा अधिक प्रसार होऊ नये यासाठी नागरिकांना वारंवार आवाहन केले जात आहे. याचबरोबर कोरोनाच्या घातक आघातापासून रोखण्यासाठी लसीकरणावरही भर दिला जात आहे. तथापि अजूनही नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नसून फारसे गांभीर्याने याकडे पाहत नसल्याचे आढळले आहे. यापुढे नागरिकांना आवाहन करण्यासमवेत आवश्यकता जिथे-जिथे भासेल त्या-त्या ठिकाणी रुपये 50 हजार रक्कमेच्या आर्थिक दंडापासून कायदेशीर कारवाई करण्यासाठी गावपातळीपासून, तालुकापातळी पर्यंत व जिल्हापातळीवरही विविध अधिकाऱ्यांना शासन निर्देशानुसार अधिकार देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 

शाळा सुरू होण्याबाबत प्रत्येकाच्या मनात औत्सुक्य असणे स्वाभाविक आहे. तथापि ज्या घरातील विद्यार्थी शाळेसाठी येणार आहेत त्या घरातील प्रत्येक सदस्यांचे लसीकरण झालेले असणे क्रमप्राप्त असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्याध्यापकांनी व संबंधित शिक्षकांनी त्या-त्या सदस्यांच्या प्रमाणपत्राची खात्री केल्याशिवाय प्रवेशाबाबत निर्णय करता कामा नये, असेही जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. दवाखान्यात प्रवेश करताना संबंधित डॉक्टरांनी रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांकडे लसीकरणाचे प्रमाणपत्र आहे किंवा कसे हेही तपासून घेतले पाहिजे. हे निर्णय कटू जरी वाटत असले तरी सर्वांच्या आरोग्याचे हित सामुहिक लसीकरण व मास्कसह निर्देशीत केलेली पंचसूत्री याच्या वर्तणातूनच साध्य होणार आहे. हे लक्षात घेता ज्या व्यक्तींनी अद्याप लसीकरण केलेले नाही त्यांनी पुढाकार घेऊन लसीकरणाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. 

बैठकीतही झाली सर्व अधिकाऱ्यांच्या लसीकरण प्रमाणपत्राची तपासणी 

या आढावा बैठकीसाठी सर्व विभाग प्रमुख व संबंधित अधिकारी उपस्थित होते. प्रत्येक अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राची जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्वत: तपासणी करुन कायदेशीर दंडक याचा प्रत्यय दिला. ज्या कर्मचाऱ्यांनी लसीकरण पूर्ण केलेले नाही त्या शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नोव्हेंबर 2021 महिन्यांचा लसीकरण होईपर्यंत पगारही का करु नये असा त्यांनी सूचक इशारा दिला.

000000




 राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांचा दौरा कार्यक्रम   

नांदेड (जिमाका) दि. 30 :- राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश सुर्यकांत ढवळे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. 

मंगळवार 30 नोव्हेंबर रोजी औरंगाबाद येथून रेल्वेने नांदेड येथे रात्री 11 वा. आगमन व शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण, शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम.   

बुधवार 1 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यत जिल्हाधिकारी कार्यालय येथे अप्पर जिल्हाधिकारी तथा जिल्हा तक्रार निवारण अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे समवेत Aepds अंतर्गत नियतन उचल वाटपाचा आढावा. दुपारी 2 ते 4 वाजेपर्यत जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षणाधिकारी यांचे समवेत शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत नियतन, उचल व वाटपाचा आढावा. सायं. 4 ते 6.30 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्य कार्यकारी व प्रकल्प अधिकारी शहरी व ग्रामीण यांचे समवेत महिला व बाल विकास सेवा योजना अंतर्गत नियतन उचल वाटपाचा आढावा. सायं. 6.30 वा. शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व मुक्काम. 

गुरुवार 2 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 ते सायं. 6 पर्यत शासकीय धान्य गोदामे, स्वस्त धान्य दुकाने, शालेय पोषण आहार पुरवठा दार गोदामे आणि महिला व बाल विकास सेवा योजना पुरवठादार गोदामांना भेटी तसेच अंगणवाडी, स्वस्त धान्य दुकाने व शाळांना भेटी. सायं. 6 वा. शासकीय विश्राम गृहाकडे प्रयाण व मुक्काम. 

शुक्रवार 3 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10.30 ते 5.30 वाजेपर्यंत शासकीय धान्य गोदामे, स्वस्त धान्य दुकाने, शालेय पोषण आहार पुरवठादार गोदामे आणि महिला व बाल विकास सेवा योजना पुरवठादार गोदामांना भेटी तसेच अंगणवाडी, स्वस्त धान्य दुकाने व शाळांना भेटी. सायंकाळी 6 वा. वाहनाने लातूरकडे प्रयाण करतील.

000000

 शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील पीक स्पर्धा 

नांदेड (जिमाका) दि. 30 :-  शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे. अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी व स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी पीक स्पर्धा आयोजित केली आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ या सहा पिकांचा रब्बी हंगाम पीक स्पर्धेमध्ये समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे. 

शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे व प्रोत्साहन मिळण्यासाठी राज्य, जिल्हा, विभाग व तालुका पातळीवर पिकस्पर्धाचे आयोजन करण्यासाठी कार्यपध्दतीमध्ये शासन निर्णयानुसार सुधारणा केली आहे. पिक स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे संबंधित पिकाखालील किमान दहा आर. (०.१० हेक्टर) सलग क्षेत्रावर लागवड करणे आवश्यक आहे. पिकस्पर्धेसाठी तालुका हा घटक निश्चित केला आहे. ज्या पिकाखालील संबधित तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र एक हजार हेक्टर किंवा त्याहून अधिक आहे, अशा पिकांसाठी पिकस्पर्धा आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धा सर्वसाधारण व आदिवासी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोजित केली जाणार आहे. पिकस्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान 10 स्पर्धक तर आदिवासी गटातील किमान ५ स्पर्धकांचा सहभाग आवश्यक आहे.  स्पर्धेत भाग घेण्यासाठी  तीनशे रुपये प्रति शेतकरी पिक याप्रमाणे प्रवेश शुल्क आकारले आहे. तालुका पातळीवरील स्पर्धेच्या निकालावरून पुढे जिल्हा, विभाग व राज्यपातळीवरील बक्षिसे जाहीर केली जाणार आहेत. 

एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकासाठी स्पर्धेत भाग घेऊ शकेल. पुर्वी जिल्हा व राज्यपातळीवर सरसकट सर्वाना भाग घेता येत नव्हता. जिल्हा व राज्यपातळीवर वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत होते. आता सर्व पातळीवर एकदाच थेट सहभाग घेता येणार आहे. त्यासाठी एकदाच तीनशे रुपये प्रति शेतकरी प्रति पिक प्रवेश शुल्क भरून पिककापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादकतेच्या आकडेवारीनुसार त्याची तालुका, जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर निवड केली जाणार आहे. याशिवाय पारितोषिकाच्या रक्कमेमध्ये भरीव वाढ करण्यात आली आहे.

स्पर्धापातळी  सर्वसाधारण आणि आदिवासीगटासाठी बक्षिस रुपये पुढील प्रमाणे आहे. तालुकापातळीसाठी पहिले बक्षिस 5 हजार, दुसरे 3 हजार तर तिसरे 2 हजार आहे. जिल्हा पातळीसाठी पहिले बक्षिस 10 हजार, दुसरे 7 हजार तर तिसरे 5 हजार आहे. विभाग पातळीसाठी पहिले बक्षिस 25 हजार, दुसरे 20 हजार तर तिसरे 15 हजार आहे. राज्य पातळीसाठी पहिले बक्षिस 50 हजार, दुसरे 40 हजार तर तिसरे 30 हजार याप्रमाणे आहे, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 पात्र वैद्यकीय व्यावसायिकांनी युझरआयडी प्राप्त करुन घ्यावा  

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 30 :-  आधार क्रमांकाचा वापर करुन फेसलेस शिकाऊ अनुज्ञप्ती सेवेचा लाभ घेण्याची तरतुद शासनाने केली असून अर्जदारास घरबसल्या शिकाऊ अनुज्ञप्ती (परवाना) चाचणी देण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. चाचणीत उत्तीर्ण होऊन घर बसल्या शिकाऊ अनुज्ञप्तीची प्रिंट घेता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही.    

मोटार वाहन कायदा व अनुषंगिक नियमात नमूद अनुज्ञप्ती विषयक कामांसाठी आवश्यक नमुना-1 (अ) हे मेडीकल प्रमाणपत्र पात्र डॉक्टरांमार्फत (नोंदणीकृत एमबीबीएस वैद्यकीय व्यावसायिक किंवा त्यावरील अर्हता प्राप्त) ऑनलाईन पद्धतीने देण्याची सुविधा राष्ट्रीय सूचना केंद्रामार्फत विकसित केली आहे. अर्जदारांची तपासणी संबंधीत डॉक्टरांमार्फत करुन नमुना-1 (अ) अपलोड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पात्र डॉक्टरांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून परिवहन कार्यालयामार्फत युजर आयडी प्राप्त घेण्याबाबत कळविले होते. अद्यापपर्यत फक्त 5 वैद्यकीय व्यावसायिकांनी युझर आयडी प्राप्त केले आहेत.  तरी सर्व संबंधित वैद्यकीय व्यवसायिकांनी आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रतीसह अनुज्ञप्ती विभाग प्रादेशिक परिवहन कार्यालयात संपर्क साधून युझर आयडी प्राप्त करुन पुढील कार्यवाही करावी, असे आवाहन नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.

000000

 

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

नांदेड (जिमाका) दि. 30 :-  नांदेड जिल्ह्यात 1 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 15 डिसेंबर 2021 मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात बुधवार 1 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते बुधवार 15 डिसेंबर 2021 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...