Saturday, August 10, 2019








पूर बाधितांच्या पुनर्वसनासाठी
निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


सांगली, दि. १०:  पूरबाधितांना सर्वतोपरी सहाय्य देवून त्यांचेपरिपूर्ण पुनर्वसन करण्यासाठी शासन निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सांगली येथे पुरग्रस्त भागांना भेट दिल्यावर आणि जिल्हा प्रशासनासोबत घेतलेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगीतले.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले की, पाणी ओसरेल तसे पाणीपुरवठा, विद्युत यंत्रणा, स्वच्छता या बाबी सुरळीत करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल. त्यासाठी अन्य महापालिकांमधील मनुष्यबळ व यंत्रणा सांगली जिल्ह्याला उपलब्ध करून देण्यात येईल. हवामानातील बदलाची वास्तविकता स्वीकारून अतिपावसाच्या क्षेत्रात कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन केंद्रे सक्षम करण्यात येतील.शासन अत्यंत गांभीर्याने पूरपरिस्थिती सांभाळत असून केंद्र शासनही संपूर्ण मदत करत आहे. एनडीआरएफ, सैन्यदल, नेव्ही यांना पाचारण करण्यात आले आहे. सद्या जिल्ह्यात ९५ बोटी कार्यरत असून विशाखापट्टणम येथून आणखी १५ बोटी मागविण्यात आलेल्या आहेत. बचाव कार्यासाठी मागितलेली सर्व साधनसामुग्री व यंत्रणा देशभरातून उपलब्ध करून देण्यात येत आहे. अलमट्टीतून विसर्गाबाबत कर्नाटक सरकारशी समन्वय सुरू असून दोन्ही राज्ये याबाबत एकमेकांना मदत करत आहेत.


मुख्यमंत्र्यांनी दिलेले निर्देश
सांगलीला कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन केंद्रासाठी आराखडा तयार करावा. पाणी ओसरल्यानंतर स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा राबवावी, स्थलांतरीतांना व जे लोक बाहेर येवू शकत नाहीत अशांना स्वच्छ अन्न, पाणी यांचा पुरवठा करावा. आवश्यकता असल्यास फिरती शौचालय अन्य  जिल्ह्यामधून मागवावेत. कमीत कमी ओळखपत्रांच्या आधारे बँकानी लोकांना पैसे उपलब्ध करून द्यावेत, जनावरांच्या नुकसानीसाठी कमीत कमी पुराव्याच्या आधारे मदत द्यावी.


पूरग्रस्त भागासाठी १५३ कोटीचा निधी देण्यात आला असून निवारा छावण्यांसाठी व जे छावण्यांमध्ये नाहीत अशासाठीही भत्ता देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.२००५ साली सांगलीत ३१ दिवसांत पडलेल्या पावसाच्या तुलनेत २०१९ मध्ये नऊ दिवसात तिप्पट पाऊस जादा पडलेला पाऊस व कोयना क्षेत्रात ५० टीएमसी धरण भरेल एवढा पडलेला पाऊस व झालेला विसर्ग यामुळे अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. सांगली जिल्ह्यात एकूण १०१ गावांमधून १ लाख ४३ हजार ६४१ व्यक्ती व ३५ हजार २४१ जनावरे यांचे तात्पुरते स्थलांतरण करावे लागले. सार्वजनिक बांधकाम कडील ४८४ कि.मी. चे रस्ते बाधीत झाले. महावितरणकडील २ हजार ६१५ रोहित्रांचे नुकसान, कृषीचे नजरअंदाजे नुकसान २७ हजार ४६७ हेक्टर जमिनीचे नजरअंदाजे नुकसान झाले आहे. जसजसे पाणी ओसरेल तसा नुकसानीचा अंदाज येईल. निकषाप्रमाणे नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येईल. या सर्व पार्श्वभूमीवर आवश्यक सर्व निधी देवून गावांच्या पुनर्वसन केले जाईल. यामध्ये शासनासोबत मदतीसाठी जे तयार असतील त्यांचीही मदत घेतली जाईल.पाणी ओसरल्यानंतर स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा राबवावीलागणार असल्याने त्यासाठी अन्य महानगरपालिकांमधून मनुष्यबळ व यंत्रणा उपलब्ध करून दिली जाईल असे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

       सांगली येथे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिराबाग कॉर्नर येथे भेट देवून बचाव कार्याची पाहणी केली व जनरल ऑफिसर कमांडिंग नवनीत कुमार यांच्याकडून माहिती घेतली. कच्छी भवन येथेही भेट देवून स्थलांतरीतांशी संवाद साधला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व यंत्रणासोबत बैठक घेवून आढावा घेतला.      
यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार, मदत व पुनर्वसन मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटीलव इतर मान्यवर उपस्थित होते.

सैन्यदलाच्या कामगिरीचा मला अभिमान

       बैठकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिराबाग कॉर्नर येथे भेट देऊन सैन्यदलामार्फत सुरू असणाऱ्या बचाव कार्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी सैन्यदलाच्या कामगिरीचा मला अभिमान असल्याची भावना जनरल ऑफिसर कमांडींग नवनीत कुमार यांच्याकडे व्यक्त केली.
       कच्छी भवन येथील स्थलांतरीतांना भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी या ठिकाणी सर्व सुविधा प्रशासनामार्फत उपलब्ध करून दिल्याची भावना स्थलांतरीतांनी श्री.फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली.

0000
वृ.वि.1944
                                                                                                10 ऑगस्ट 2019
पूर नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत

 मुंबई, दि. 10 : कोल्हापूर, सांगली या भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी धरण सुरक्षा लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.  यासाठी पूर नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत आहे.

            अलमट्टी धरणाच्या विसर्ग बाबत सांगली पूर नियंत्रण कक्ष व अलमटी धरण नियंत्रण कक्ष एकमेकांशी सतत संपर्कात असून अलमट्टी धरणातून सध्या 5 लाख 57 हजार क्सुसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. धरणात किमान पातळी राखण्याच्या आपल्या मागणीला त्यांनी प्रतिसाद देऊन संयुक्त पूर नियंत्रण करण्यास सहकार्य करत आहेत. याबाबत सचिव पातळीवर ही सतत संपर्क सुरु आहे. अशी माहिती पूर नियंत्रण कक्षातून दिली आहे.

पूरग्रस्त भागात इंधनाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पूर परिस्थिती असल्याने अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याबरोबर इंधनाचा पुरवठाही महत्वाचा आहे. यासाठी प्रशासनाकडून पोलिसांच्या मदतीने ग्रीन कॉरिडॉर करण्यात येत असून
इंधन व गॅसचे टँकर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पोहोचविण्यात येत आहेत.
0 0 0
वृ.वि.1945
                                                                                                10 ऑगस्ट 2019

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील मदत व पुनर्वसनाची सद्यस्थिती
कोकण विभागात पूर परिस्थिती नियंत्रणात

मुंबई, दि. 10 : कोकण विभागात मागील चार-पाच दिवसापूर्वी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या पाऊस बंद आहे. या भागातील पूर परिस्थिती नियंत्रणात असून त्यांना आवश्यक ते मदतकार्य करण्यात येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 500 व्यक्ती, रत्नागिरी जिल्ह्यातील 757 तर रायगड जिल्ह्यातील तीन हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले होते. सध्या नागरिक आपापल्या घरी जात आहेत. त्यांना अन्न धान्याचे वितरण व गरजेप्रमाणे वैद्यकीय सेवा पुरविली जात आहे. शेतीच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम सुरू केले आहे. शासकीय आर्थिक मदत वाटप करण्याचे काम सुरू करण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्यात सध्या दोन तात्पुरता निवारा कँम्प सुरू आहे. जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या सैन्य दलाच्या टीम अन्यत्र पाठविण्यात आल्या आहेत.
0 0 0
वृ.वि.1946
                                                                                                10 ऑगस्ट 2019

अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व एसटी फेऱ्या बंद
- विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांची माहिती

       कोल्हापूर, दि. 10: अतिवृष्टीमुळे सर्व मार्ग बंद झाल्याने कोल्हापूर, संभाजीनगर, इचलकरंजी, गडहिंग्लज, गारगोटी, मलकापूर, चंदगड, कुरुंदवाड, कागल, राधानगरी, गगनबावडा व आजरा या बाराही आगारातील सर्व एस.टी. फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.
        जिल्ह्यात अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे वाहतुकीचे सर्व मार्ग पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील येणाऱ्या सर्व आगारातील एसटी फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशी माहिती विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.
0000




वृ.वि.1943
                                                                                                10 ऑगस्ट 2019

कोल्हापूर, सांगलीमध्ये पाणी शुद्धीकरणासाठी 1 कोटी क्लोरीनच्या गोळ्या;
सर्पदंशावरील लस, लेप्टोवरील गोळ्यांचेही वितरण
आरोग्यमंत्री चार दिवसांपासून कोल्हापूर-सांगली मुक्कामी

            मुंबई, दि. 10: राज्यातील पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्याचे काम वैद्यकीय पथकांमार्फत करण्यात येत आहे. कोल्हापूर, सांगली भागात सुमारे 70 पेक्षा अधिक पथके तैनात करण्यात आली आहेत. पूरग्रस्तांना मदत करतानाचा संपूर्ण आरोग्य यंत्रणेच्या नियंत्रणासाठी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. कोल्हापूर, सांगली भागात सर्पदंशावरील लस, लेप्टोवरील गोळ्या आणि पाणी शुद्धीकरणासाठी 1 कोटी क्लोरीनच्या गोळ्यांचे वाटप केले जात आहे.

            आरोग्यमंत्री श्री. शिंदे बुधवारपासून कोल्हापूर मुक्कामी आहेत. पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या कामात सहकार्य करतानाच त्यांना आवश्यक ती वैद्यकीय मदतदेखील केली जात आहे. राज्यातील अन्य भागात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती आहे. तेथील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधेचाही आरोग्यमंत्री दैनंदिन आढावा घेत आहेत. राज्यभरात 325 वैद्यकीय पथके कार्यरत आहेत.

 यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले, राज्यातील अन्य भागापेक्षा कोल्हापूर, सांगली भागातील परिस्थिती बिकट आहे. या भागातील पाणी काहीसे कमी होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाचा भर स्वच्छता मोहीम आणि साथीच्या आजारांचा फैलाव होऊ नये यावर आहे.

            आरोग्य विभागामार्फत या दोन्ही जिल्ह्यांमध्ये 70 पेक्षा अधिक वैद्यकीय पथके कार्यरत केली आहेत. शिवाय रविवारी मुंबईहून 100 डॉक्टरांचे पथक, औषधांसह या दोन जिल्ह्यांमध्ये दाखल होणार आहे.  पुराच्या पाण्यामुळे सांगली आणि कोल्हापूर भागात मानवी वस्तीत साप शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्पदंशावरील लसीचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करण्यात आला आहे. कोल्हापूरमध्ये 12 हजार तर सांगलीमध्ये 5 हजार लसींचा पुरवठा करण्यात आला आहे.

            पुराच्या पाण्यामुळे होणारा लेप्टोचा संभाव्य धोका ओळखून त्याच्यावरील उपचाराच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले असून सांगलीमध्ये 8 लाख आणि कोल्हापूरमध्ये 12 लाख डॉक्सिसायक्लिन गोळ्या देण्यात आल्या आहेत. 30 लाख गोळ्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. साथरोगांचा उद्रेक होऊ नये यासाठी संनियंत्रण केले जात आहे.पूरग्रस्त भागात पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी एक कोटी क्लोरीनच्या गोळ्यांचे वाटप करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

०००००
अजय जाधव..१०.८.२०१९

वृ.वि.1941
                                                                                                10 ऑगस्ट 2019

कोल्हापूर सांगली महापुरात अडकलेल्या नागरिकांसाठी
जीव धोक्यात घालून हवाईदलाचे सहाय्य

मुंबई, दि. 10 : कोल्हापूर आणि सांगली येथील अभूतपूर्व अशा नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी भारतीय हवाई दल, नौदल तटरक्षकदल यांनी जीवाची बाजी लावून पूरग्रस्तांच्या सहाय्यासाठीचे विमाने व हेलीकॉपटर्स उतरवली आहेत.
            हवाईदल किंवा नौदलामार्फत लष्करी विमाने उतरवण्याआधी कोणत्याही नव्या हवाईपट्टीचीं सुरक्षिततेच्या दृष्टीने निरिक्षण केले जाते. मात्र कोल्हापूर सांगलीच्या महापुरामुळे पूर्वनिरीक्षण अशक्य होते. त्यामुळे अशा पूर्व निरीक्षणाशिवाय या महापुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी नौदल, हवाईदल व कोस्ट गार्डच्या वैमानिकांनी धावपट्टीवर विमान आणि हेलीकॉप्टर उतरवले आहेत.
            महापुरामुळे कोल्हापूरचा संपर्क केवळ हवाईमार्गेच साधता येऊ शकत होता.ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षणमंत्री श्री.राजनाथ सिंह यांना गंभीर परिस्थितीची जाणीव करुन देत हवाईदल, नौदल व तटरक्षक दलाच्या सहायाची विनंती केली होती. त्यानुसार अत्यंत गतिने देशभरातील विविध ठिकानाहून मनुष्यबळ आणि आवश्यक साधनसामग्री हवाई मार्गाने कोल्हापूर येथे पोहचवण्यात येत आहे. पावसामुळे हवामान खराब असताना अत्यंतकठीण अशा घटांना पार करत नव्या हवाईपट्टीवर स्वत:चा जीवधोक्यात घालून भारतीय नौदल, हवाईदल आणि तटरक्षक दलांनी अजोड अशी कामगिरी बजावली आहे.
            गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर विमानतळावर हवाईदल, नौदल, तटरक्षक दलाची विमाने मदत साहित्य घेऊन पोचत आहेत. बुधवारी हवाईदल व नौदलाची 11 विमाने/हेलिकॉप्टर तर गुरुवारी 14 विमाने/हेलिकॉप्टर कोल्हापूर विमानतळावर उतरली होती. शुक्रवारी 16 वेळा विमाने/हेलीकॉप्टर्स या विमानतळावर उतरली आहेत.
या हेलिकॉप्टर विमानाने कोल्हापूर, कराड, सातारा व सांगलीमध्ये मदत कार्य सुरू केले आहे. हवाईदल, नौदल व तटरक्षक दलाने गोवा, हुबळी, मुंबई, पुणे, भटींडा, भुवनेश्वर, विशाखापट्टणम येथून हवाई मार्गाने हेलिकॉप्टर व विमानातून विविध पथकांसह बोटी व इतर मदत सामग्री या दोन्ही जिल्ह्यांना पाठविली. त्यामुळे पुरात अडकलेल्या नागरिकांची तातडीने सुटका करणे व मदत साहित्य पोहोचविणे शक्य झाले.
मुंबई येथील कलिना व लायन गेट वरुन सांगलीतील महापुरात अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षा व सहाय्यासाठी 12 पथके ग्रीन कॉरिडॉर करुन अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करत सांगलीला पाठवण्यात आले.
स्थानिक जिल्हा प्रशासन महाराष्ट्र पोलीस, एनडीआरएफ, महाराष्ट्र सुरक्षा दल सुध्दा नागरिकांच्या मदत आणि सहाय्यासाठी मोलाची भूमिका बजावत आहे.
0 0 0


वृ.वि.1940
                                                                                                10 ऑगस्ट 2019

पुरग्रस्त मदत केंद्राबाबत विभागीय आयुक्तांनी केल्या सूचना

पुणे, दि. 10-पुणे विभागात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याच्या दृष्टीने विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात मदत केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.  आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी या केंद्राला भेट देऊन योग्य त्या सूचना केल्या. यावेळी पुरवठा शाखेच्या उपायुक्त तथा मदत कक्षाच्या समन्वयक नीलिमा धायगुडे, जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे उपस्थित होत्या.
सामाजिक संस्था, शासकीय कार्यालये तसेच वैयक्तिक स्वरुपात या मदत कक्षात पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स तसेच काडीपेटी बॉक्स प्राप्त झाले आहेत. संकलित झालेल्या पाण्याच्या बाटल्या व  बिस्किटचे पुडे आदी साहित्य वाहनांमध्ये भरून ही वाहने तात्काळ कोल्हापूर आणि सांगलीकडे रवाना करावीत, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

००००

वृ.वि.1939
                                                                                                10 ऑगस्ट 2019

आतापर्यंत सव्वाचार लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी
हलविण्यात प्रशासनाला यश
विशाखापट्टणमहून नेव्हीची 15पथके शिरोळकडे रवाना

मुंबई, दि. 10 : राज्यातील पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत राज्यातील 4 लाख 24 हजार 333 जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात प्रशासनाला यश आले आहे. शासनाचे आपत्ती नियंत्रण कक्ष, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर, नौदल, वायूदल, तटरक्षक दलाचे जवान कार्यरत आहेत. याशिवाय विशाखापट्टणमच्या 15 नौदलाचे पथक बोटींसह शिरोळकडे (जि. कोल्हापूर) रवाना होत असल्याची माहिती मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाने दिली.
स्थानिक प्रशासनाबरोबरच सांगली, कोल्हापूर येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे 23 तसेच नौदलाच्या 26, तटरक्षक दलाचे सांगलीमध्ये 2 व कोल्हापुरात 9 पथके, सैन्यदलाचे 8 पथके, राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे सांगलीमध्ये 2 तर कोल्हापुरात 1 अशी तीन पथके कार्यरत असून याशिवाय विशाखापट्टणमचे 15 नौदलाचे पथक बोटींसह शिरोळमध्ये (जि. कोल्हापूर) दुपारी पोहोचत आहेत.
आतापर्यंत कोल्हापूर येथील 2 लाख 33 हजार 150 तर सांगली येथील 1 लाख 44 हजार 987 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यश आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 74 बोटींद्वारे तर सांगली जिल्ह्यात 93 बोटींद्वारे मदतकार्य सुरू आहे.
नागरिकांना तात्पुरता निवारा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात 187 तर सांगली जिल्ह्यात 117 तात्पुरता निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. तेथील लोकांना स्वच्छ पाणी, जेवणाची व्यवस्था, औषधोपचार उपलब्ध करून दिले जात आहेत.  कोल्हापूरवसांगलीजिल्ह्यातील 43 हजार 922 जनावरांनासुरक्षितस्थळीहलविण्यातआलेआहे.
बाधित गावे व कुटुंबे
कोल्हापूर जिल्ह्यात पूरबाधित गावे-249, बाधित कुटुंबे-48 हजार 588 तर सांगली जिल्ह्यातील पूरबाधित गावे-108 व कुटुंबसंख्या-28 हजार 537 अशी आहे. या सर्व गावात प्रशासनाच्या पथकांबरोबर इतर सर्व आपत्ती निवारण दलांचे बचाव कार्य सुरू आहे.
पूरपरिस्थितीबद्दल राज्य शासनाने केंद्र शासनाशी तत्काळ संपर्क साधल्यामुळे सैन्य दलाची व तटरक्षक दलाची पथके कार्यरत झाली आहेत. मदत व पुनर्वसन विभागाचे आपत्ती नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत असून वेळोवेळी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनाबरोबर मदतीसंदर्भात संपर्कात आहे.
मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातील हेल्पलाईनवर आणि सोशल मीडियावर आलेल्या संदेशावर तत्काळ प्रतिसाद देऊन स्थानिक प्रशासनाला सूचना देऊन पूरग्रस्तांना मदत करण्यात येत आहे.
राज्यातील इतर बाधित गावे
सातारा-118 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-9221), ठाणे- 25 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-13104), पुणे- 108 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-13500), नाशिक-05 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-3894), पालघर-58 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-2000), रत्नागिरी- 12 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-687), रायगड-60 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-3000), सिंधुदुर्ग-18 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-490). असे एकूण कोल्हापूर शहरासह 69 बाधित तालुके तर 761 गावे आहेत. 
000

वृ.वि.1932
                                                                                                10 ऑगस्ट 2019

अलमट्टी धरणातून 5 लाख,कोयनेतून 77 हजार 987  तर
राधानगरीतून 7 हजार 112 क्युसेक विसर्ग
            कोल्हापूर, दि. 10 : अलमट्टी धरणातून 5 लाख क्युसेक विसर्ग सुरु आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित 4 दरवाजे खुले आहेत. त्यामधून 7 हजार 112 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी दिली आहे. आज सकाळी 7 वाजता कोयना धरणामधून 77 हजार 987 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.
            पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी  7 वाजता 52 फूट 2  इंच असून, एकूण 107 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आज अखेर 8.30 टीएमसी पाणीसाठा आहे. चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प, पाटगाव व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
           पंचगंगा नदीवरील- राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड,शिरोळ व शिंगणापूर. भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी,  सरकारी कोगे, खडक कोगे, शिरगाव व तारळे. कासारी नदीवरील- बाजारभोगाव, वालोली, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, यवलूज, कांटे, करंजफेन व पेंडाखळे. तुळशी नदीवरील- बीड, आरे, बाचणी, घुंगुरवाडी, कांचणवाडी व भाटणवाडी. वारणा नदीवरील- चिंचोली, माणगाव, कोडोली, चावरे, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, शिगांव, खोची व दानोळी. कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगाव, पाटणे, सुतारवाडी, वालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे. दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सिद्धनेर्ली, सुळकुड, बाचणी, क.वाळवे, तुरूंबे व सुळंबी. कुंभी नदीवरील- शेनवडे, कळे (खा), वेतवडे, मांडूकली, असळज, सांगशी व काताळी. वेदगंगा नदीवरील- कुरणी, सुरुपली, बस्तवडे, गारगोटी, म्हसवे, निळपण, वाघापूर, शेणगाव, चिखली, सुक्याचीवाडी, शेळोली, तांबाळे, पाटगाव, दासेवाडी, अन.फ, वाण्याचीवाडी. हिरण्यकेशी नदीवरील- साळगाव, ऐणापूर, गिजवणे, जरळी, खंदाळ, निलजी, हरळे, गजरगाव व दाबीळ. घटप्रभा नदीवरील- बिजूर भोगाली, पिळणी, हिंडगाव गवसे, कानडे सावर्डे, आडकूर, कानडेवाडी व तारेवाडी. ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, कोवाड, दुंडगे, कामेवाडी व ढोलगरवाडी. शाळी नदीवरील- येळावणे, कोळगाव व टेकोली.  धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे, पनोरे, गवसी, म्हसूर्ली व शेळोशी व चित्री नदीवरील कर्पेवाडी (करोली) असे एकूण 107 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या अलमट्टी धरणात 88.76 टीएमसी तर कोयना धरणात 103.19  टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
            जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 3.28  टीएमसी, वारणा 32.26 टीएमसी, दूधगंगा 23.15 टीएमसी, कासारी 2.52 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.53 टीएमसी, पाटगाव 3.72 टीएमसी, चिकोत्रा 1.40, चित्री 1.88 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा  1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, कोदे (ल. पा.) 0.21 टीएमसी असा आहे.
            बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 52.2 फूट, सुर्वे 49.7 फूट, रुई 80.5 फूट, इचलकरंजी 78 फूट, तेरवाड 82.6 फूट, शिरोळ 78 फूट, नृसिंहवाडी 78 फूट, राजापूर 62.8  फूट तर नजीकच्या सांगली  56.6 फूट आणि अंकली  61.8  फूट अशी आहे.
000000



वृ.वि.1933
                                                                                                10 ऑगस्ट 2019


विशाखापट्टणमहून नौदलाचे पथक आज शिरोळमध्ये
      कोल्हापूर दि. 10  : विशाखापट्टणमधून नौदलाचे 15 जणांचे पथक बोटीसह शिरोळमधील पूरग्रस्तांसाठी आज दुपारपर्यंत दाखल होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
            पंचगंगा नदीची पातळी सुमारे साडेतीन फुटांपेक्षा जास्त प्रमाणात कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे, असे सांगून जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले शिरोळमधील गावांसाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर, नौदल, तटरक्षकदलाच्या एकूण 45 बोटी आणि पथकांसह पूरग्रस्तांसाठी मदत पोहचवत आहेत. त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करत आहेत.
            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी काल नौदलाच्या अतिरिक्त बोटीसाठी पथकाची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी केंद्रशासनाशी संवाद साधून ही अतिरिक्त मदत मिळविली असून, त्यानुसार आज दुपारपर्यंत विशाखापट्टणम येथून नौदलाच्या अतिरिक्त 15 जणांचे पथक बोटीसह दाखल होत आहे. अलमपट्टीमधूनही विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरु आहे, त्यामुळे शिरोळमधील पूर परिस्थिती नियंत्रणात राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
0000


वृ.वि.1934
                                                                                                10 ऑगस्ट 2019

कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 2057.98मिमी पावसाची नोंद
आजरा तालुक्यात सर्वाधिक 168.25 मिमी तर
शिरोळमध्ये सर्वात कमी 8.57 मिमी पाऊस
कोल्हापूर, दि. 10 : जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 2057.98 मिमी तर गेल्या 24 तासात सरासरी 90.34 मिमी पावसाची नोंद झाली. यात आजरा तालुक्यात सर्वाधिक 168.25 मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 8.57 मिमी पावसाची नोंद झाली.
           
आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- 21.63 मिमी एकूण 743.67 मिमी, शिरोळ- 8.57 मिमी एकूण 523.86  मिमी, पन्हाळा- 91.57 एकूण 1985.86,  शाहूवाडी- 69.17 मिमी एकूण 2274.83, राधानगरी- 104.67 मिमी एकूण 2460.17 मिमी, गगनबावडा- 163.50 मिमी एकूण 4901.50मिमी, करवीर- 54.64 मिमी एकूण 1558.36 मिमी, कागल- 86.57 मिमी एकूण 1661.29 मिमी, गडहिंग्लज- 99.43 मिमी एकूण 1257.86 मिमी, भुदरगड- 110.20  मिमी एकूण 2179 मिमी, आजरा- 168.25 मिमी एकूण 2634 मिमी, चंदगड- 105.83 मिमी एकूण 2515.33 मिमी.
00000


वृ.वि.1935
                                                                                                10 ऑगस्ट 2019
महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र  मेंढी व शेळी विकास महामंडळाची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 20 लाखांची मदत
- पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांची घोषणा

मुंबई, दि. 10: राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खान्देश आदी भागात अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे नागरिकांना इतरत्र हलविले जात आहे. या नागरिकांना सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास  महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले  यांनी दोन्ही महामंडळातर्फे प्रत्येकी 10 लाख अशी एकूण 20 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याची घोषणा केली आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण आणि खान्देश येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले जात असून मदत व पुनर्वसनाकरिता  राज्य सरकार सर्वतोपरी कार्य करत आहे. पूरग्रस्त भागातील पशूंच्या आरोग्याची काळजी  घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत पशुवैद्यकीय डॉक्टरांची  पथके  पाठविली  असून  आवश्यक औषधांचा पुरवठा  करण्यात आला असल्याचेही श्री. जानकर यांनी सांगितले.
000




वृ.वि.1936
                                                                                                10 ऑगस्ट 2019

मुंबई उपनगर जिल्ह्यात आपत्ती मदत कक्ष स्थापन

मुंबई, दि.10: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात आपत्ती मदत कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली आहे.

3 ऑगस्टपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक ठिकाणी विशेषत: सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. या ठिकाणच्या बाधित लोकांचे स्थलांतर अन्य ठिकाणी करण्यात आले आहे. पूरग्रस्तांसाठी इच्छुक देणगीदार / मदत करू इच्छिणाऱ्या व्यक्ती / संस्था / संघटना यांचेकडून खाद्यपदार्थ, कपडे तसेच तत्सम साहित्य, प्रथमोपचार साहित्य, औषधे व इतर आवश्यक साहित्य स्वीकारण्याकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यात खालील ठिकाणी नैसर्गिक आपत्ती मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

1          जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगरप्रशासकीय इमारत, 10 वा मजला, शासकीय वसाहत, बांद्रा
(पूर्व), मुंबई-400051 दूरध्वनी - 022-26556799
2          उपविभागीय अधिकारी, मुंबई पूर्व उपनगर निळकंठ बिझनेस पार्क, ए विंग, तळ मजला, किरोळ रोड, विद्याविहार (प.), मुंबई-400086          दूरध्वनी 022-25111126
3          तहसिलदार, अंधेरी          डी.एन.रोड, भवन्स कॉलेज जवळ, अधेरी (प.), मुंबई-400058      दूरध्वनी 022-26231368
4         तहसिलदार, बोरीवली     डॉ.न.रा.करोडे मार्ग, नाटकवाला लेन, एस.व्ही.रोड, बोरीवली (प.), मुंबई-400092   दूरध्वनी 022-28075034
5          तहसिलदार, कुर्ला           टोपीवाला कॉलेज इमारत, 1 ला मजला, सरोजिनी नायडू रोड, मुलुंड (प.), मुंबई-400080            दूरध्वनी022-25602386

पूरग्रस्त लोकांना आवश्यक असणाऱ्या साहित्याची यादी वरील मदत कक्षात उपलब्ध आहेत. तरी पूरग्रस्तांसाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मदत करावी असे आवाहन जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांनी केले आहे.
00000


वृ.वि.1937
                                                                                                10 ऑगस्ट 2019


भारत निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणीचा कार्यक्रम
मतदार नोंदणीपासून वंचित नागरिकांनी नाव नोंदणी करावी - मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग

* अशासकीय संस्थांनी मतदार जागृती कार्यक्रम राबविणे स्वागतार्ह
* मतदार नोंदणीसाठी प्राधिकृत केल्याबाबत चुकीची प्रसिद्धी नको
* मतदार नोंदणी करा अधिकृत मतदार नोंदणी कार्यालयात जाऊन
* संकेतस्थळावर नोंदणीलाही प्रोत्साहन

मुंबई, दि. 10: मतदार नोंदणी कार्यक्रम ही बाब संपूर्णत: भारत निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. मतदार नोंदणीपासून वंचित असलेल्या पात्र नागरिकांनी मतदार नोंदणीसाठी आयोगाच्या संकेतस्थळाचा वापर करावा अथवा प्रत्यक्ष अधिकृत मतदार नोंदणी कार्यालयात येऊन अर्ज भरुन द्यावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी केले आहे.

            त्यांनी म्हटले आहे की, अशासकीय संस्था, विश्वस्त संस्था, नागरी सेवा संस्था आदींनी स्वेच्छेने मतदार जागृतीचे कार्यक्रम राबविणे स्वागतार्ह आहे. मात्र, असे कार्यक्रम राबविण्यासाठी भारत निवडणूक आयोग (ईसीआय) अथवा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कोणत्याही खासगी संस्थांना प्राधिकृत केलेले नसल्याने आयोगाच्या सहकार्याने असे कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची चुकीची प्रसिद्धी संबंधित संस्थांनी करता कामा नये. काही अशासकीय संस्था तसेच विश्वस्त संस्थांकडून भारत निवडणूक आयोग (इसीआय) अथवा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे नाव वापरून तसेच इसीआय तथा आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सहकार्याने असे कार्यक्रम केले जात असल्याची प्रसिध्दी दिली जाते आहे असे निदर्शनास आले आहे.

            त्यांनी स्पष्ट केले आहे की, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम,1950 अनुसार मतदार नोंदणीची जबाबदारी ही पूर्णत: भारत निवडणूक आयोगाची, पर्यायाने  मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या नियंत्रणाखालील मतदार नोंदणी अधिकारी यांची आहे. राज्यात आगामी विधानसभा निवडणूकीची पूर्व तयारी सुरु करण्यात आली आहे. या निवडणूकीमध्ये मतदारांचा सहभाग जास्तीत जास्त वाढावा या हेतूने प्रयत्न करण्यात येत आहेत. मतदार यादीमध्ये अद्याप नोंदणी न झालेल्या पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करून घ्यावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्यावतीने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. या कार्यक्रमाची सर्व जनतेला माहिती व्हावी यासाठी मोठया प्रमाणावर प्रसिद्धी मोहिम तसेच मतदारांच्या नोंदणीसाठी विशेष मोहिम हाती घेण्यात येत आहेत.
           
अनेक अशासकीय संस्था तसेच नागरी सेवा संस्था यांच्याकडून देखील त्यांच्या स्तरावरून मतदार जागृतीचे प्रयत्न करण्यात येत आहेत असे दिसून येत आहे. ही बाब स्वागतार्ह आहे. मात्र भारत निवडणूक आयोगाची अथवा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची अधिकृत संमती अथवा मान्यता न घेता, काही अशासकीय संस्था तसेच ट्रस्ट यांच्याकडून इसीआय अथवा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे नाव वापरून आणि सहकार्याने असे कार्यक्रम केले जात असल्याची प्रसिध्दी दिली जाते आहे असे निदर्शनास आले आहे. ही बाब आक्षेपार्ह आहे.

मतदार नोंदणी करा अधिकृत मतदार नोंदणी कार्यालयात जाऊन
संकेतस्थळावर नोंदणीलाही प्रोत्साहन

मतदार जागृतीचे कार्यक्रम कोणत्याही यंत्रणेमार्फत केले जात असले तरी मतदारांनी प्रत्यक्ष मतदार नोंदणी करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मतदार नोंदणीसाठीचे अधिकृत संकेत स्थळ www.nvsp.in या संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय तसेच तहसिलदार कार्यालय किंवा आपल्या विभागाकरिता नेमणूक करण्यात आलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या माध्यमातूनही मतदार नोंदणीचा अर्ज सादर करता येईल. मतदार नोंदणी न झालेल्या सर्व पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहनही श्री. सिंग यांनी केले आहे.
0000
सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.10.8.2019
000000



वृ.वि.1938
                                                                                                10 ऑगस्ट 2019

वन रक्षक भरती प्रक्रिया पुढे ढकलली
सुधारित तारखा नव्याने कळविणार-वन विभागाची माहिती

मुंबई दि. 10-वन विभागातील वनरक्षक भरती प्रक्रिया २०१९ अंतर्गत ऑनलाइन लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये पात्र उमेदवारांसाठी पुढील टप्प्यात कागदपत्रे तपासणे, शारीरिक मोजमाप, धाव चाचणी व लेखी परीक्षेतील गुण व धाव चाचणीतील गुण मिळून निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करणे तसेच २५/१६ कि.मी. (पुरुष/महिला) चालण्याची शारीरिक क्षमता चाचणी घेणे व नियुक्ती आदेश निर्गमित करणे हे टप्पे वनवृत्त स्तरावर प्रादेशिक निवड समितीमार्फत आयोजित करण्यात आले होते. उमेदवारांना याबाबत वेगवेगळ्या माध्यमातून कळविण्यातही आले होते. तथापि, राज्यातील पूर परिस्थिती आणि दळणवळणाची असुविधा लक्षात घेता वनरक्षक भरती प्रक्रियेतील पुढील टप्पे सद्यस्थितीत सुकर रितीने पार पाडणे शक्य नाही. त्यामुळे ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.निवड प्रक्रियेच्या सुधारित तारखा प्रादेशिक निवड समितीमार्फत नव्याने कळविण्यात येतील. तसेच याबाबतची माहिती www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, वनरक्षक भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेत पात्र सर्व उमेदवारांनी याबाबतची नोंद घ्यावी असे विकास गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन दुय्यम संवर्ग), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी कळविले आहे.
000


  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...