Saturday, August 10, 2019

सण उत्सवातुन सामाजिक सलोखा वाढवावा - जिल्हाधिकारी अरुण डोंगरे


 नांदेड दि. 10 :- बकरी ईद (ईद-उल-झुआ) सण शांततेत, उत्सवातुन सामाजिक सलोखा वाढीस लागेल यापद्धतीने साजरे करावेत, असे आवाहन जिल्हास्तरीय शांतता समितीचे अध्यक्ष तथाजिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आज संपन्न झाली. बकरी ईद (ईद-उल-झुआ), रक्षाबंधन, नारळी पोर्णिमेच्या अनुषंगाने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन श्री. डोंगरे बोलत होते.
यावेळी महापौर सौ. दिक्षा धबाले, मनपा आयुक्त लहुराज माळी, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक दत्तराम राठोड, नांदेड शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, नांदेडचे तहसिलदार किरण अंबेकर यांच्यासह शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले की, इदगाहच्या ठिकाणी साफसफाई, पिण्याचे पाण्याची व्यवस्था करावी. बकरी ईद सण कालावधीत शांतता अबाधीत रहावी म्हणून जिल्ह्यातील यंत्रणांनी आवश्यक त्या खबरदारीच्‍या उपाय योजना कराव्यात, अशा सुचना जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी संबंधीत यंत्रणेला दिल्या.
पोलीस अधीक्षक श्री जाधव म्हणाले, जिल्ह्यात हा उत्सव शांततेत पार पाडून कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत असते. तसेच सर्वांनी कायद्याचे पालन करावे. कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाकडे माहिती तात्काळ कळवावी, असेही आवाहन श्री. जाधव यांनी केले.  
यावेळी बकरी ईदच्या दिवशी इदगाहची साफसफाई, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अग्नीशमनदल आणि रुग्वाहिनी सुसज्ज ठेवणे, मोकाट जनावरांचा बंदोबस्त, रस्त्याची दुरुस्ती, टाकाऊ भागाची विल्‍हेवाटाची व्यवस्था, वैद्यकीय सेवा, संपर्क अधिकाऱ्यांच्‍या नियुक्‍त्‍या, नियंत्रण कक्ष आदी विविध उपाय योजनांबाबत सूचना देण्यात आल्या.  
उपस्थित शांतता समितीतील सदस्यांनी विविध उपयुक्त अशा सुचना मांडल्या. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी केले तर आभार अपर पोलीस अधीक्षक दत्तराम राठोड यांनी मानले.
00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...