Tuesday, March 7, 2017

ग्राहक मार्गदर्शन शिबिरात
ग्राहकोपयोगी विषयांवर मार्गदर्शन
     नांदेड दि. 7 :-  जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने ग्राहक संरक्षण उपक्रमांतर्गत भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्राहकांसाठीच्या मार्गदर्शन शिबिरात  ग्राहकांना दुध, अन्नपदार्थ यामध्ये असलेली भेसळ, वजनमापातील फरक, ग्राहकांची फसवणूक झाल्यास तक्रारींचे निराकरण, हुशार गुंतवणुकदार कसे बनावे, दुरसंचार सेवा, बांधकाम, व्यावसायिकांविरुद्धच्या तक्रारी याबाबत विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. तहलिसदार कार्यालय नांदेड येथे बहुउद्देशीय सभागृहात शिबीर संपन्न झाले.
याप्रसंगी ग्राहक संरक्षण मंचाचे अध्‍यक्ष श्री. बिडवई, तहसिलदार किरण अंबेकर, सहायक पुरवठा अधिकारी सौ. संतोषी देवकुळे, श्री. कमटलवार, उद्योजक हर्षद शहा, श्री. पाळेकर, श्री. पांचाळ, श्री .येसगे, श्रीमती वाखरडकर, श्रीमती माढेकर आदींची उपस्थिती होती.
शिबिरात ग्राहकांना दुध, अन्‍नपदार्थ यामध्‍ये असलेली भेसळ कशी ओळखावी, वजनमापातील फरक, ग्राहकांची फसवणुक झाल्‍यास तक्रारींचे निराकरण, हुशार गुंतवणुकदार कसे बनावे, दुरसंचार सेवा, बांधकाम, व्‍यावसायिकाविरुध्‍दच्‍या तक्रारींच्या कार्यवाही बाबत मार्गर्शन करण्यात आले. भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्‍था मुंबई या संस्‍थेचे सहसचिव दिनेश भंडारे त्‍यांचे सहकारी श्रीमती आनंदिता कौर, श्री. दिक्षीत, प्राची मयेकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच ग्रकोपयोगी गोष्‍टींवर उपस्थिताचे शंका समाधान केले. तक्रारींचे योग्‍य प्रकारे निराकरण करणे, त्‍याचप्रमाणे लहान बचत सुरु करुन पुढे हुशार गुंतवणुकदार कसे बनावे याचेही मार्गदर्शन करण्‍यात आले.
फसवणक झाल्‍यास तक्रार कुठे व कशी करावी, ग्राहक न्‍यायालय, माहितीचा अधिकार, शैक्षणिक व आर्थीक नियोजन, विमा, बँक, प्रवासाची साधने, मालमत्‍ता, दुरसंचार सेवा, विद्युत उपकरणे इत्‍यादी ठिकाणी होणाऱ्या फसवणुकीमध्‍ये दाद कुठे व कशी मागावी याबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली. सुरवातील तहसिलदार श्री. अंबेकर यांनी प्रास्ताविक केले. शिबिरास ग्राहक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000
स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी बौध्दिक,
मानिसकदृष्टया सक्षम राहणे आवश्यक - कारभारी
नांदेड दि. 7 :- सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बौध्दिकदृष्टया सक्षम होण्यासोबतच मानिसक दृष्टया सक्षम असणे काळाची गरज आहे. कारण स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी केवळ बौध्दिक परिपूर्णताच असल्याचे चालणार नसून संघर्षाची परिस्थिती, परीक्षेचा निकाल, आर्थिक सामाजिक परिस्थिती या सर्व बांबीना सक्षमपणे तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांनी मानसिकदृष्टयासुध्दा कणखर राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी केले ते जिल्हाधिकारी कार्यालय,सेतू समिती,नांदेड वाघाळा शहर मनपा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे वतीने आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराचे उद् घाटक  म्हणून बोलत होते.
            डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे पार पडलेल्या या शिबिरामध्ये व्याख्याते म्हणून अकलूज येथील बँक अधिकारी रुपेश जैन यांचे C-SAT वर्तमानपत्रातील बातम्यांचे विश्लेषण या विषयांवर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रंसगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी बालाजी चंदेल,शैलेश झरकर, मनपाचे ओंकार स्वामी यांची उपस्थिती होती
            व्याख्यात्याचे ग्रामगीता देऊन जयराज कारभारी यांनी स्वागत केल्यानंतर इतनी शक्ती हमे देना दाता या प्रेरणा गीताने शिबिरास सुरुवात करण्यात आली.
            आपल्या व्याख्यानातून रुपेश जैन यांनी महाराष्ट्र  सेवा आयोगाव्दारा विद्यार्थ्यांची अभियोग्यता (कल) चाचणी तपासण्यासाठी तो विद्यार्थी वेगवेगळया परिस्थितीला कसा प्रतिसाद देतो आणि अशा स्थितीत त्याला दिलेली जबाबदारी कशी पार पाडतो याची विश्लेषण करण्याची प्रक्रिया श्री जैन यांनी विद्यार्थ्यासमोर विभिन्न वैशिष्टयासह मांडली. C-SAT हा पेपर व्यक्तीच्या स्वभावाचे विविध पैलू अभ्यासणारा पेपर असून व्यक्तीच्या ठायी आवश्यक सर्व क्षमतांचा आढावा घेण्याचा प्रयत्न आयोग करीत असतो. श्री जैन यांनी याप्रसंगी स्पर्धा परीक्षेसाठी वर्तमानपत्रातील कोणत्या बातम्या वाचाव्या,कोणत्या सोडून दयाव्यात हे सोदाहरण विद्यार्थ्यांना सांगितले. सरतेशेवटी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची समर्पक अशी उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्याख्यात्यांचा परिचय जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी तर सूत्रसंचालन आरती कोकुलवार यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अजय वटटमवार,कोंडिबा गाडेवाड, बाळू पावडे, रघु श्रीरामवार, सोपान यनगुलवाड, लक्ष्मण शेनेवाड, विठ्ठ यनगुलवाड, अभिजित पवार यांनी सहकार्य केले.

000000
समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेअंतर्गत
मनरेगा सप्ताह ; आज, उद्या ग्रामसभा
विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांची संकल्पना
नांदेड दि. 7 :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व त्याअंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना औरंगाबाद विभागात प्रभावी व परिणामकारकरित्या राबविण्यात येणार आहे. त्यासाठी 12 मार्च 2017 पर्यंत मनरेगा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. औरंगाबाद विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी याबाबत निर्देश दिले आहेत.
या सप्ताहात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बुधवार 8 मार्च रोजी महिलांची विशेष ग्रामसभा व त्यानंतर गुरुवार 9 मार्च रोजी सर्वसाधारण विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे. या ग्रामसभाद्वारे समृध्‍द महाराष्‍ट्र जनकल्‍याण योजनेच्‍या सर्व लाभार्थ्‍यांची निवड करण्‍यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने तयारीही सुरु केल्याची माहिती मग्रारोहयो जिल्‍हा कार्यक्रम समन्‍वय अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी दिली आहे.
प्रत्‍येक ग्रामपंचायतीच्‍या ग्रामसभेसाठी तालुक्‍यातील वर्ग एक, दोन व तीन ( उपअभियंता, वनपरिक्षेत्र अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, लागवड अधिकारी, शाखा अभियंता, कनिष्‍ठ अभियंता, मंडळ अधिकारी, कक्ष अधिकारी, विस्‍तार अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, वनपाल, सहाय्यक लागवड अधिकारी, कृषी अधिकारी इत्यादी ) कर्मचाऱ्यांची संपर्क अधिकारी म्‍हणून नियुक्‍ती करण्‍यात येत आहे.  हे संबधीत संपर्क अधिकारी 8 व 9 मार्च 2017 रोजी होणा-या ग्रामसभेस उपस्थित राहणार आहेत.
या ग्रामसभेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची माहिती देणे. समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना अंतर्गत 11 कामांची माहिती देणे. ग्रामपंचायत अंतर्गत जॉब कार्ड मिळण्यापासून वंचित राहिलेल्या कुटुंबांना जॉब कार्ड देणे. उपलब्ध जॉब कार्डचे नुतनीकरण करणे. योजनेअंतर्गत सन 2016-17 व सन 2017-18 मध्ये घ्यावयाच्या कामांची निवड करणे. या दोन्ही वर्षांकरीता वैयक्तिक लाभाच्या कामांसाठी लाभार्थी निवड करणे ज्यामध्ये सिंचन विहीर , वैयक्तिक शौचालय, शेततळे, फळबाग लागवड, शेळी-गुरे-कुक्कुटपालन शेड, शौषखड्डे, व्हर्मी / नाडेप कंपोस्टींग, वृक्ष लागवड आणि सार्वजनिक स्वरुपाच्या ग्रामसभलीकरण अंतर्गत कामांची निवड करणे. निवडलेल्या लाभार्थी कामे व या दोन्ही वर्षांकरीता वार्षिक कृती आराखड्यास मान्यता घेणे. आवश्यकता असल्यास शासन नियमानुसार अतिरिक्त ग्रामरोजगार सेवकांची ग्रामसभेतून निवड करणे असे विषय ग्रामसभेसमोर ठेवले जाणार आहेत.
ग्रामसभेत समृध्‍द महाराष्‍ट्र जनकल्‍याण योजनेच्‍या लाभार्थ्‍यांची नियमानुसार निवड होईल. यासाठी  तलाठी, ग्रामसेवक/ ग्राम विकास अधिकारी, कृषी सहाय्यक यांना सूचना देण्यात आल्या. ग्रामसभांचा विहित नमुन्यातील अहवाल गट विकास अधिकारी यांच्याकडे एकत्रित केला जाणार आहे. 

0000000
उष्माघात प्रतिबंध आराखड्याबाबत बैठक संपन्न
वाढत्या तपमानाबाबत नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
नांदेड दि. 7 :- तपमानातील बदलाबाबतची पूर्व सूचना आणि उष्माघात होऊ नये यासाठी वेळीच  प्रतिबंधात्मक उपाय केल्यास उष्माघात व त्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या प्रश्नांवर मात करता येते. त्यादृष्टिने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आज येथे देण्यात आली. नांदेड जिल्ह्यासह राज्यातील सहा जिल्हे उष्माघात-प्रवण म्हणून सूचित करण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने पूर्वतयारी म्हणून उष्माघात प्रतिबंधक आराखड्या विषयीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी या बैठकीत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एच. आर. गुटुंरकर यांनी ही माहिती दिली.
बैठकीस मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सुमती ठाकरे, पोलीस उपअक्षीक विश्वनाथ नांदेडकर तसेच वैद्यकीय अधिकारी आदींची उपस्थिती होती.
नांदेडसह राज्यातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव आणि भंडारा या सहा जिल्ह्यांची आरोग्य विभागाने उष्माघात-प्रवण म्हणून निवड केली आहे. गतवर्षी पासून नांदेड जिल्ह्यात या उष्माघात प्रतिबंधक आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येते. त्यानुसार उष्माघाताबाबत जनजागरण आणि आरोग्य विभागातील विविध घटकांना उष्माघाताच्या अनुषंगाने प्रथमोपचार आदींबाबत प्रशिक्षण कार्यवाही सुरु झाली आहे. जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयात तसेच ग्रामीण रुग्णालयात उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत रुग्ण वाहिकेचा फिरते पथक म्हणून वापर करण्यात येणार आहे. मनपा क्षेत्रात महापालिका आरोग्य विभाग प्रतिबंधक आराखड्याची कार्यवाही करणार आहे. जिल्ह्यात उष्माघात उपचारासाठी आवश्यक औषधे उपलब्ध असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. 
उष्माघाताबाबत जनतेने सतर्क राहून वाढत्या तपमानाच्या परिस्थितीत घ्यावयाची काळजी विविध माध्यमातून पोहचविण्यात येत असल्याची माहितीही देण्यात आली.

0000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...