Friday, February 28, 2025

 वृत्त क्रमांक 245

बालकांची विशेष आरोग्य तपासणी मोहिम सुरु

आज उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार राज्यस्तरीय उदघाटन
नांदेड दि. 28 फेब्रुवारी :- राज्य शासनाने संपूर्ण राज्यात “राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम" अंतर्गत विद्यार्थ्यांची विशेष तपासणी मोहिम या महत्वाकांक्षी अभियानाची घोषणा केलेली आहे. त्यानुसार या मोहिमेच्या शुभारंभ संपूर्ण राज्यामध्ये 1 मार्च 2025 रोजी इंदिरा गांधी मॉडेल स्कूल, औंध, पुणे येथून होणार आहे. या मोहिमेचे उदघाटन राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सकाळी 8.30 वाजता होणार आहे.
या उद्घाटन कार्यक्रमास राज्यातील प्रत्येक तालुक्यातील एक शाळा व जिल्हा स्तरावरील एक शाळा दूरभाष्य प्रणाली व्हीसीद्वारे सोहळ्यास मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्या अनुषंगाने नांदेड जिल्हयातील सर्व शासकीय, निमशासकिय शाळा, शासकीय अंगणवाडयामधील 0 ते 18 वर्षापर्यंतच्या बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणी दरम्यान आजारी आढळून आलेल्या बालकांवर त्वरीत निशुल्क उपचार व संदर्भ सेवा तसेच आवश्यकतेनुसार नंतर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
त्यानुसार आरबीएसके कार्यक्रमाच्या मोहिमेचे उद्घाटन 1 मार्च 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता प्राथमिक शाळा क्र.4 व माध्यमिक शाळा नांदेड वाघाळा महानगरपालीका जंगमवाडी नांदेड तसेच तालुकास्तरावरील शारदा भवन हायस्कूल अर्धापूर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थेरबन भोकर, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय बिलोली, मौलाना अबुल कलाम आझाद हायस्कूल देगलूर, ग्रीन फील्ड नॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज धर्माबाद, अनुसुचित जाती मुलाची शाळा हादगाव, जिल्हा परिषद नेहरू नगर हिमायत नगर, मनोविकास प्राथमिक शाळा, कंधार, सरस्वती विद्या मंदिर किनवट, जिल्हा परिषद शाळा लोहा, अनुसुचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकिय शाळा माहूर, श्री सरस्वती विद्या मंदिर मुदखेड, जिल्हा परिषद हायस्कूल मुखेड, लिटिल स्टेप इंग्लिश स्कूल नायगाव, व कस्तुरबा गांधी बालिका वि‌द्यालय उमरी इत्यादी शाळांत स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या हस्ते पार पडणार आहे.
00000

 वृत्त क्रमांक 244

साहित्यातून जगण्याची दिशा मिळते -जेष्ठ साहित्यिक श्रीकांत देशमुख

 वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी ग्रंथ वाचन आवश्यक

 शालेय शिक्षणापासून वाचन संस्कृती जोपासावी- ॲड.गंगाधर पटने 

नांदेड दि. 28 फेब्रुवारी :- मध्ययुगीन काळातील चक्रधर स्वामीच्या लीळाचरित्र आद्यग्रंथापासून मराठी साहित्यांची परंपरा आपल्याला लाभलेली आहे.जेष्ठ साहित्यिकांच्या साहित्यातूनच जीवनमूल्यांची शिकवण, आध्यात्मिक साहित्य, तत्वज्ञान यांचा वारसा आपल्याला लाभलेला आहे. यातून सहिष्णूता, जगण्याचे तत्वज्ञान आपल्याला मिळत आहे. स्वातंत्र्योत्तर काळात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यातून समाज सुधारणेचे बळ मिळालेले आहे. अशा महान संत, महात्म्याचे साहित्य प्रत्येकांनी आपल्या घरात ठेवले पाहिजे, ते प्रत्येकांनी वाचले पाहिजे यामुळे पुढील पिढी सुसंस्कृत निर्माण होईल, असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक श्रीकांत देशमुख यांनी केले. 

ग्रंथोत्सव 2024 चे आयोजन जिल्हा ग्रंथालयात करण्यात आले होते. यावेळी बोलत होते. यावेळी अध्यक्ष भगवंत क्षीरसागर,जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष तथा माजी.आ.ॲड.गंगाधर पटने, सहाय्यक ग्रंथालय संचालक, छत्रपती संभाजीनगर सुनील हुसे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगुंडे, प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी, संपादक डॉ. राम शेवडीकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. 

थोर साहित्यिकांचे विचार, साहित्य प्रत्येकांच्या घरात आवश्यक आहे. ग्रंथात परिवर्तन करण्याची शक्ती आहे. सामाजिक विकृतीचा अभ्यास जाणून घ्यायचा असेल तर ग्रंथ वाचले पाहिजे. ग्रंथाचे सामर्थ्य प्रचंड असून त्यांची जाणीव प्रत्येकाला असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्रीकांत देशमुख यांनी केले. 

वाचन संस्कृतीचे संवर्धन, वाचन संस्कृतीला बळ देणारा ग्रंथोत्सव आहे. आताच्या काळात एआय, सोशल मिडीया यामुळे वाचन संस्कृतीला खूप मोठे आवाहन आहेत. परंतु या आव्हानाच्या काळातळी वाचन संख्या दिवसेंदिवस वाढविणे हे आपले कर्तव्य आहे. सध्या साहित्य मराठी परिषदेवर सर्व पुस्तके उपलब्ध आहेत. लोकांच्या स्पर्धासाठी पुस्तके आसुसलेले आहेत. गावातील ग्रंथालयात असलेली पुस्तकांची माहिती सर्व नागरिकांना होण्यासाठी ग्रंथालयांनी धार्मिक कार्यक्रमात यांची माहिती सांगावी. सोशल मिडीयावर याबाबत प्रसार करावा.उठा जागे व्हा ग्रंथालय चळवळीत जागे व्हा, असे आवाहन सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी केले. 

वाचन संस्कृती शालेय स्तरापासून झाली पाहिजे. वाचनाबाबत शिक्षकांमध्ये जनजागृती असली पाहिजे. तर वाचन संस्कृती टिकेल असे मत माजी.आमदार ॲड.गंगाधर पटने यांनी व्यक्त केले. 

माणसाच्या जडणघडणीत ग्रंथाचे अन्यय साधारण महत्व आहे. ग्रंथ माणस घडवितात. ग्रंथ आहेत म्हणून आपण आहोत. ग्रंथालयात ज्ञानाच्या शाखा असून ते आपल्या आयुष्याचे मार्गदर्शक आहेत. संत परंपरा, शिकवण ग्रंथाच्या माध्यमातून मिळत असते असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. भगवंत क्षीरसागर यांनी केले. 

नांदेड ग्रंथोत्सवाला आज पासून सुरुवात झाली. 28 फेब्रुवारी व 1 मार्च दोन दिवस हा ग्रंथोत्सव होत आहे. सकाळी 8.30 ला उपजिल्हाधिकारी अजय शिंदे ज्येष्ठ पत्रकार राम शेवडीकर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथ दींडी काढण्यात आली. ग्रंथ पूजन करण्यात आले. ग्रंथदिंडी मध्ये विद्यार्थी विविध सांस्कृतिक मंडळे आणि भजनी मंडळे देखील सहभागी झाले होते. आयटीआय चौकातून निघालेली ही ग्रंथदिंडी लक्षवेधी ठरली होती.

शनिवारी पुस्तक प्रदर्शनाला भेट दया 

या ठिकाणी शुक्रवार व शनिवारी मोठया प्रमाणात पुस्तक प्रदर्शन लागले आहे. तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेडकरांनी या ग्रंथोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात  परिसवांद “मराठी भाषा सवंर्धन आणि घराघरातील प्रयत्न”चे आयोजन करण्यात येईल. दुपारच्या सत्रात “ग्रंथचळवळीतील दलित व ग्रामीण,बाल साहित्याचे योगदान” हा परिसवांद घेण्यात येणार आहे. समारोप अध्यक्ष माजी खासदार तथा साहित्यिक डॉ.व्यंकटेश काब्दे, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद नांदेड, संभाजीराव धुळगुंडे, माजी आमदार तथा अध्यक्ष जिल्हा ग्रंथालय संघाचे ॲड . गंगाधर पटने, निर्मल प्रकाशनचे प्रकाशक निर्मलकुमार सुर्यवंशी यांची उपस्थिती राहणार आहेत. नांदेड मधील नागरिकांनी या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा मोठ्या प्रमाणात पुस्तक खरेदी करावे व ग्रंथोत्सवाला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी केले आहे.

ग्रंथोत्सवात विविध नामांकित प्रकाशकांचे पुस्तक विक्री व प्रदर्शनी दालने राहणार आहेत. या महोत्सवाचे लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी यांनी केले आहे.कार्यक्रमचे सूत्रसंचलन ज्येष्ठ साहित्यिक नारायणराव शिंदे यांनी केले.

०००००












 वृत्त क्रमांक 243

गोरक्ष लोखंडे यांचा दौरा

 

नांदेड दि. 28 फेब्रुवारी : महाराष्ट‍्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे 1 ते 3 मार्च या कालावधीत नांदेड दौऱ्यावर येत आहेत.

 

1 मार्च रोजी त्यांचे आगमन होणार असून दुपारी 12 वा. जिल्हा समाज कल्याण अधिकारी  जिल्हा परिषद नांदेड यांच्या अंतर्गत असणाऱ्या आश्रमशाळांना ते भेटी देणार आहेत. 2 मार्चला सकाळी 11 वा. सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्या अधिनस्त असणाऱ्या वसतीगृहांना ते भेटी देणार आहेत. 3 मार्चला संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील तर सायं 6 वा. संविधानाच्या अमृत महोत्सव कार्यक्रमासाठी कुसूम सभागृह येथे ते उपस्थित राहतील. त्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृह येथे असेल.

0000

वृत्त क्रमांक 242

संडे ऑन सायकल रॅलीमध्ये

मोठया संख्येने सहभागी व्हावे 

नांदेड दि. 28 फेब्रुवारी : आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेडच्यावतीने फिट इंडिया मुव्हमेंट फिटनेस का डोस आधा घंटा रोज अंतर्गत संडे ऑन सायकल रॅलीचे आयोजन 2 मार्च,2025 रोजी करण्याबाबत केंद्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व जिल्हयामध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. 

त्यानुसार नांदेड जिल्हयात जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नांदेड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेडच्या वतीने दि.02 मार्च,2025 रोजी सकाळी 6.30 वा. फिट इंडिया मुव्हमेंट फिटनेस का डोस आधा घंटा रोज अंतर्गत संडे ऑन सायकल रॅलीचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, श्री गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयम मुख्य प्रवेशद्वार येथून करण्यात आले आहे. 

या रॅलीचा मार्ग स्टेडीयम मुख्य प्रवेशद्वार येथून सुरुवात होवून आयटीएम कॉलेज मार्गे-आयटीआय चौक- श्रीनगर- वर्कशॉप कॉर्नर मार्गे आनंदनग- वसंतराव नाईक पुतळा (नागार्जुना हॉटेल)- अण्णाभाऊ साठे चौक मार्गे- आयटीएम व श्री गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयम मुख्यद्वार नांदेड येथे समाप्त होईल. 

फिट इंडिया मुव्हमेंट फिटनेस का डोस आधा घंटा रोज यामुळे आपले शरीर निरोगी, तंदुरुस्त व बळकट राहण्यास मदत होईल याकरीता फिटनेस जनजागृती करणेकरीता जिल्हयातील खेळाडू मुले-मुली, शारीरिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रमुख, विविध क्रीडा संघटनेचे पदाधिकारी व विविधि विभागाचे अधिकारी/ कर्मचारी, नागरीक, महिला व क्रीडाप्रेमी यांनी या संडे ऑन सायकल रॅलीमध्ये आपल्या सायकलीसह मोठया संख्येने सहभागी व्हावे. व वेबसाईड (https://fitindia.gov.in/cyclothon.2024) यावर ऑनलाईनद्वारे आपली नोंदणी करावी. व अधिक माहितीकरीता श्री. बालाजी शिरसीकर (राज्य क्रीडा मार्गदर्शक) यांचेशी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेभंरे यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 241

परीक्षांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू 

नांदेड दि. 28 फेब्रुवारी : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या इयत्ता 10 व 12 वी परीक्षा सध्या सुरू असून शहरातील ज्या शाळांमध्ये या परीक्षा सुरू आहेत त्या परिसरात शांतता राखण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. शहरातील 8 शाळांमध्ये या परीक्षा होत असून सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 यावेळेत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या कालवधीत शांतता पाळावी व प्रतिबंधात्मक बाबी करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.  

000000

 वृत्त क्रमांक 240

तो मुलगा तुमचा तर नाही ना ?

संपर्क साधण्याचे प्रशासनाचे आवाहन   

नांदेड दि. 28 फेब्रुवारी : धनगरवाडी येथील लहूजी साळवे निराधार बालकाश्रमामध्ये 13 वर्षाच्या शिवा मारोती चव्हाण या बालकाला दाखल करण्यात आले आहे. त्याच्या पालकाचा अद्याप पत्ता नाही. त्यामुळे या बालकाच्या पालकत्वाचा दावा करणाऱ्या पालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.

 

बालगृहात दाखल झाल्यापासून शिवा मारोती चव्हाण याच्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही. या मुलाशी नाते असणाऱ्या कोणीही अधिकृतपणे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. पी. रंगारी यांनी केले आहे.

0000



 वृत्त क्रमांक 239

महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण

तीन जागांसाठी अर्ज करण्याचे आवाहन   


नांदेड दि. 28 फेब्रुवारी : महिला व बाल कल्याण विभागामार्फत स्थापन करण्यात येणाऱ्या महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण समितीवरील अध्यक्ष व दोन सदस्य यासाठी नियुक्ती करण्यास्तव नागरिकांमधून नामांकने मागविण्यात येत आहेत. 6 मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

या समितीचे अध्यक्ष व दोन सदस्य निवडायचे आहेत. त्यातील एक सदस्य विधी विभागाशी संबंधित असावा. दुसरा सदस्य हा एसी, एसटी, ओबीसी या पैकी एका गटातील असावा. तर अध्यक्ष पदासाठी सामाजिक कार्याचा पाच वर्षाचा अनुभव असावा. जिल्हास्तरावरील या समितीसाठी 6 मार्च 2025 पर्यंत जिल्हा माहिला व बालकल्याण विकास कार्यालय महात्मा फुले मार्केट मागे गणेशनगर रोड नांदेड यांच्याकडे अर्ज सादरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

0000

वृत्त क्रमांक 238

युवकांनी रोजगारासोबतच स्वयं रोजगार निर्मितीवर भर द्यावा – उपायुक्त विद्या शितोळे 

·         अभ्यासासोबत कौशल्य आत्मसात करणे आवश्यक
·         मेळाव्यात 386 विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड
                                                                                         
नांदेड दि. 28 फेब्रुवारी :- रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी मोठया प्रमाणात उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना त्यांच्या आयुष्याला दिशा देण्याची संधी मिळत आहे. युवकांनी या संधीचा आवश्य लाभ करुन घ्यावा. तसेच युवकांनी रोजगारासोबतच स्वयंरोजगार निर्मितीवरही भर द्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास विभाग छ. संभाजीनगरच्या उपायुक्त विद्या शितोळे यांनी केले.
 
आज यशवंत महाविद्यालयात रोजगार व स्वयंरोजगार विभागामार्फत पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे ॲड . उदयरावजी निंबाळकर, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठाचे संचालक डॉ. सुर्यप्रकाश जाधव, प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या सहायक आयुक्त रेणूका तम्मलवार, उपप्राचार्य कविता सोनकांबळे आदींची उपस्थिती होती.
 
या रोजगार मेळाव्यात पुणे, छ.संभाजीनगर येथील 12 कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या मेळाव्यात एकूण 620 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यापैकी प्राथमिक निवड झालेल्या उमेदवारांची संख्या 386 आहे. 100 दिवसांच्या कृती आराखड्यानुसार करावयाच्या कार्यवाहीत रोजगार व स्वयंरोजगार विभागामार्फत 100 रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळणार असून नाव मेळाव्यात नोंदणी केल्यानंतर मुलाखत कशी द्यावी, कसे बोलावे, संस्था किंवा कंपनीचे प्रतिनिधी काय प्रश्न विचारतात अशा अनेक गोष्टीचा अनुभव मिळणार आहे .
 
तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी रोजगार उपलब्ध होण्याची संधी देण्यात आली आहे. विद्यार्थी व विद्यार्थीनीनी स्वयंरोजगारासाठी विविध महामंडळे कार्यरत असून या महामंडळाच्या माध्यमातून उद्योग उभारणी करता येणार आहे. त्यामुळे युवकांनी आपण स्वयंरोजगार निर्माण करुन इतरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे माध्यम बनावे असेही आवाहन त्यांनी केले. तसेच यापुढील रोजगार मेळाव्यात विविध महामंडळे व योजनांचे स्टॉल लावण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त विद्या शितोळे यांनी दिली. यामुळे अनेक युवक-युवतींना रोजगार व शासकीय योजना संबंधी माहिती मिळण्यास मदत होईल.
 
पदवी किंवा पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या अनेक योजना असून उद्योग उभारणीसाठी उद्योग विभागामार्फत या योजनांसाठी मार्गदर्शन करण्यात येते. तसेच अनेक योजनांमध्ये लाभार्थ्यांना अनुदान मिळते. त्यामुळे युवकांनी रोजगाराच्या मागे न धावता स्वयंरोजगार उभारुन इतरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यावर भर द्यावा, असे आवाहन यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले .
 
यावेळी रोजगार स्वयंरोजगाराच्या सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठाचे संचालक डॉ. सुर्यप्रकाश जाधव यांचे मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन यशवंत महाविद्यालयाचे डॉ. शिवाजी सूर्यवंशी यांनी केले.
00000







वृत्त क्रमांक 237

संतांच्या शिकवणीतून मराठवाड्याला संघर्षशीलतेचा मंत्र मिळाला : अजित पवार 

 उमरज : कलशारोहण सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्र्यांची भेट 

नांदेड ( उमरज ता. कंधार ) दि. २८ फेबुवारी : स्वातंत्र्यपूर्व काळापासून मराठवाड्याला सहजासहजी काही भेटले नाही.तरीही मराठवाड्याने संघर्ष सोडला नाही.सहनशक्ती आणि संघर्षशीलता मराठवाड्याच्या संतांनी दिलेली शिकवण आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेड व परभणी जिल्ह्याच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत.नांदेड वरून हेलिकॉप्टरने जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील धाकटे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असणारे श्री.क्षेत्र उमरज येथील प्राचीन श्री. संत नामदेव महाराज संस्थान मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यानिमित्त 108 कुंडी विष्णूयाग यज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला होता. अडीचशे वर्षाची परंपरा आणि सात मठाधिपतीनी आत्तापर्यंत या ठिकाणी आध्यात्मिक कार्य केले आहे. यासाठी या परिसरातील हजारो भाविक उपस्थित झाले होते.आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त भाविकांशी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला.

यावेळी मंचावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार विक्रम काळे, तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथा प्रवक्ते देवकीनंदन जी ठाकूर महाराज,संत नामदेव महाराज संस्थान उंबरजचे श्री.संत महंत एकनाथ नामदेव महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आगमनानंतर येथील नामदेव महाराज समाधीचे व विठ्ठल रखुमाई मंदिराचे दर्शन घेतले. संस्थांच्यावतीने त्यांचे आगमनाप्रती स्वागत करताना खोबऱ्याच्या भव्य हाराने परंपरेनुसार स्वागत करण्यात आले.

यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यातील संत परंपरेचा गौरव केला. मराठवाड्याची भूमी संतांची ,कलावंतांची, शूरांची व विरांची असून मराठवाड्याला संघर्षाशिवाय सहजासहजी काही मिळाले नाही. मात्र संतांच्या शिकवणीतून संघर्षशीलता व संयम हे गुण या ठिकाणच्या मातीमध्ये आले आहे. संतांच्या शिकवणीतून सर्वधर्मसमभावाचा मंत्र बुलंद व्हावा. या ठिकाणचा आध्यात्मिक सोहळा सामाजिक एकोप्याची नांदी ठरावी, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या. नामदेव महाराज संस्थानच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यात येईल ,अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. 

संस्थांच्या ट्रस्टीने त्यांना काही निवेदन यावेळेस सादर केले. तत्पूर्वी त्यांनी मंदिर परिसरात भेट देऊन समाधी दर्शन घेतले. यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही संबोधित केले.

तत्पूर्वी, आज सकाळी नांदेड येथील श्री. गुरुगोविंद सिंह जी नांदेड विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले. या स्वागताला  प्रतापराव पाटील चिखलीकर, आ.बालाजी कल्याणकर आ.आनंद शंकर तिडके, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,महानगरपालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

त्यानंतर त्यांनी नांदेड येथील पवित्र श्री.हुजूर साहिब गुरूद्वारा अबचलनगर जाऊन दर्शन घेतले. गुरुद्वारा येथील ट्रस्टीमार्फत त्यांचे स्वागत करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उमरज येथून त्यांनी नांदेड कडे प्रयाण केले रात्री उशिरा ते नांदेड विमानतळावरून मुंबईला परत जाणार आहेत.

000000







नांदेड ग्रंथोत्सवाला आज पासून सुरुवात झाली. २८ फेब्रुवारी व १ मार्च दोन दिवस हा ग्रंथोत्सव होत आहे. सकाळी ८.३०ला ग्रंथ दींडी काढण्यात आली. या ठिकाणी मोठया प्रमाणात पुस्तक प्रदर्शन लागले आहे. तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेडकरांनी या ग्रंथोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.




































 






 नांदेड येथील पवित्र श्री.हुजूर साहिब गुरूद्वारा अबचलनगर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर्शन घेतले. ते नांदेड , परभणी जिल्हयाच्या एका दिवशीय दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या सोबत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार विक्रम काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.








  वृत्त क्रमांक 236

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर स्वागत 

नांदेड दि. 28 फेब्रुवारी :- महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे आज एक दिवसाच्या नांदेड, परभणी दौऱ्यासाठी श्री. गुरू गोविंद सिंघ जी विमानतळ नांदेड येथे आगमन झाले.

यावेळी त्यांचे आमदार विक्रम काळे, प्रतापराव पाटील चिखलीकर, आ.बालाजी कल्याणकर आ.आनंद शंकर तिडके, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,महानगरपालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्यासह मान्यवरांनी स्वागत केले. जिल्ह्यामधील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी ते नांदेड व परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत.

विमानतळावर त्यांनी स्वागत स्वीकारतानाच या ठिकाणी आलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या शिष्टमंडळाला भेट दिली त्यांचे निवेदन स्वीकारले.

00000



















वृत्त क्रमांक 36 8 मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा नांदेड दौरा  नांदेड, दि. 9 एप्रिल :-  राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे...