Friday, February 28, 2025

वृत्त क्रमांक 238

युवकांनी रोजगारासोबतच स्वयं रोजगार निर्मितीवर भर द्यावा – उपायुक्त विद्या शितोळे 

·         अभ्यासासोबत कौशल्य आत्मसात करणे आवश्यक
·         मेळाव्यात 386 विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड
                                                                                         
नांदेड दि. 28 फेब्रुवारी :- रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी मोठया प्रमाणात उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना त्यांच्या आयुष्याला दिशा देण्याची संधी मिळत आहे. युवकांनी या संधीचा आवश्य लाभ करुन घ्यावा. तसेच युवकांनी रोजगारासोबतच स्वयंरोजगार निर्मितीवरही भर द्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास विभाग छ. संभाजीनगरच्या उपायुक्त विद्या शितोळे यांनी केले.
 
आज यशवंत महाविद्यालयात रोजगार व स्वयंरोजगार विभागामार्फत पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे ॲड . उदयरावजी निंबाळकर, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठाचे संचालक डॉ. सुर्यप्रकाश जाधव, प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या सहायक आयुक्त रेणूका तम्मलवार, उपप्राचार्य कविता सोनकांबळे आदींची उपस्थिती होती.
 
या रोजगार मेळाव्यात पुणे, छ.संभाजीनगर येथील 12 कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या मेळाव्यात एकूण 620 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यापैकी प्राथमिक निवड झालेल्या उमेदवारांची संख्या 386 आहे. 100 दिवसांच्या कृती आराखड्यानुसार करावयाच्या कार्यवाहीत रोजगार व स्वयंरोजगार विभागामार्फत 100 रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळणार असून नाव मेळाव्यात नोंदणी केल्यानंतर मुलाखत कशी द्यावी, कसे बोलावे, संस्था किंवा कंपनीचे प्रतिनिधी काय प्रश्न विचारतात अशा अनेक गोष्टीचा अनुभव मिळणार आहे .
 
तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी रोजगार उपलब्ध होण्याची संधी देण्यात आली आहे. विद्यार्थी व विद्यार्थीनीनी स्वयंरोजगारासाठी विविध महामंडळे कार्यरत असून या महामंडळाच्या माध्यमातून उद्योग उभारणी करता येणार आहे. त्यामुळे युवकांनी आपण स्वयंरोजगार निर्माण करुन इतरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे माध्यम बनावे असेही आवाहन त्यांनी केले. तसेच यापुढील रोजगार मेळाव्यात विविध महामंडळे व योजनांचे स्टॉल लावण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त विद्या शितोळे यांनी दिली. यामुळे अनेक युवक-युवतींना रोजगार व शासकीय योजना संबंधी माहिती मिळण्यास मदत होईल.
 
पदवी किंवा पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या अनेक योजना असून उद्योग उभारणीसाठी उद्योग विभागामार्फत या योजनांसाठी मार्गदर्शन करण्यात येते. तसेच अनेक योजनांमध्ये लाभार्थ्यांना अनुदान मिळते. त्यामुळे युवकांनी रोजगाराच्या मागे न धावता स्वयंरोजगार उभारुन इतरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यावर भर द्यावा, असे आवाहन यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले .
 
यावेळी रोजगार स्वयंरोजगाराच्या सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठाचे संचालक डॉ. सुर्यप्रकाश जाधव यांचे मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन यशवंत महाविद्यालयाचे डॉ. शिवाजी सूर्यवंशी यांनी केले.
00000







No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 245 बालकांची विशेष आरोग्य तपासणी मोहिम सुरु आज उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार राज...