19 ते 21 जानेवारी या कालावधीत बचत गटातील
महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तुचे भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा
नांदेड (जिमाका) दि. 17 :- महिला आर्थिक विकास महामंडळातर्गत महिला सशक्तीकरण कार्यक्रम व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त 19 ते 21 जानेवारी 2024 या तीन दिवसांच्या कालावधीत लोकमान्य मंगल कार्यालय, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली गेट जवळ, नांदेड येथे बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुचे भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास नागरिकांनी भेट देवून बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहन माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी अनंत खेत्रे यांनी केले आहे.
या भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्यात 35-40 विविध प्रकारच्या पदार्थाचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. या मेळाव्यात विविध विषयावर व्याख्यान, महिला प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात येणार आहे. बचत गटातील महिलांचा सन्मान केला जाणार आहे. या मेळाव्यात महिला बचत गटांनी बनविलेल्या जात्यावरील सर्व प्रकारच्या डाळी, तांदळाचे पापड, घर सजावटीच्या वस्तू, बांबूपासून तयार केलेल्या वस्तू, रेडीमेड कपडे व विविध प्रकारचे कपडे, तूप, लोणचे तसेच नाविण्यपूर्ण पदार्थ व इतर बऱ्याच वस्तू व पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
00000