Monday, September 28, 2020

सिगरेट, बिडी व इतर तंबाखूजन्य

पदार्थाच्या खुल्या विक्रीवर बंदी

नांदेड (जिमाका) दि. 28 :- कोविड-19 साथरोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून कलम 7 पोटकलम 2 अनुसार सिगारेट, बिडी व इतर तंबाखूजन्य पदार्थ्यांची खुल्या किंवा सुट्ट्या विक्रीवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. अशा खुल्या विक्रीद्वारे समाज हिताच्या व सार्वजनिक आरोग्य हिताच्या दृष्टीने आवश्यक असा संवैधानिक इशारा दिला जात नाही.  खुल्या विक्रीतून आरोग्यास घातक असा इशारा ग्राहकांपर्यंत पोहचत नाही. यामुळे हा निर्णय घेतला आहे. यापुढे पाकिटाशिवाय खुल्या विक्रीवर पूर्णता बंदी राहील असे जिल्हाधिकारी डॉक्टर विपन इटनकर यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 


 

कोविड-नॉन कोविड रुग्‍णांसाठी

एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित

नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्ह्यातील कोविड-नॉन कोविड रुग्‍णांसाठी वापरण्यात येणाऱ्या 16 ते 64 स्‍लाईस क्षमतेच्‍या मशिन्‍ससाठी एचआरसीटी  चाचणीचे दर शासनाने निश्चित केले आहेत. याबाबत जिल्हादंडाधिकारी  डॉ. विपीन इटनकर यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे. 

कोविड / नॉन कोविड रुग्‍णांसाठी सीटी स्‍कॅन सारख्‍या तपासण्‍यांची आवश्‍यकता भासत आहेत.  तपासणीसाठी खाजगी रुग्‍णालये किंवा सीटी स्‍कॅन तपासणी सुविधा उपलब्‍ध असलेल्‍या तपासणी केंद्राकडून अवाजवी रक्‍कम आकारण्‍याबाबतच्‍या तक्रारी जनतेकडून, लोकप्रतिनिधीकडून शासनाकडे प्राप्‍त झाल्‍या आहेत. त्यामध्ये नमुद तरतुदींचे काटेकोरपणे पालन करणे आवश्‍यक आहे. 

मशिनच्‍या क्षमतेनुसार एचआरसीटी चाचणी तपासणीसाठी कमाल दर मर्यादा पुढीलप्रमाणे निश्चित करण्‍यात आली आहे. यात 1 ते 16 स्लाईस सीटीसाठी  2 हजार रुपये, मल्टी डिटेक्टर सीटी मशीनच्या 16 ते 64 स्लाईससाठी 2 हजार 500 रुपये तर 64 स्लाईसपेक्षा अधिक मल्टी डिटेक्टर सीटी मशीनसाठी 3 हजार रुपये दर निश्चित केला आहे. या कमाल रकमेत सी.टी.स्‍कॅन तपासणी, तपासणी अहवाल सी.टी.फिल्‍म, पी.पी.ई किट, डिसइन्‍फेक्‍टंट, सॅनिटायझेशन चार्जेस व जीएसटी या सर्वांचा समावेश आहे.

 

एचआरसीटी चेस्ट नियमित व तातडीच्‍या तपासणीसाठी वरील समान दर लागू रहातील. 24 सप्टेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित होण्‍याच्‍या दिनांकापुर्वी जर कोणत्‍याही रुग्‍णालय, तपासणी केंद्राचे एचआरसीटी -चेस्ट तपासणी दर वरील दरापेक्षा कमी असल्‍यास, कमी असलेले दर तपासणीसाठी लागू राहतील. एचआरसीटी चेस्ट तपासणी केल्‍यानंतर अहवालावर कोणत्‍या सीटी मशीनव्‍दारे तपासणी केली आहे ते नमुद करणे बंधनकारक असेल. सद्यस्थितीत कोणत्‍याही डॉक्‍टरच्‍या प्रिस्‍क्रीप्‍शन्‍स शिवाय एचआरसीटी करण्‍याची मागणी नागरीकांकडून करण्‍यात येते. या तपासणीमध्‍ये किरणोत्‍सर्जनव्‍दारे तपासणी असल्‍याने जोखीम असते यासाठी नोंदणीकृत डॉक्‍टरांच्‍या प्रिस्‍क्रीप्‍शन्‍स शिवाय ही तपासणी करु नये. 

एचआरसीटी चेस्ट तपासणी करणाऱ्या रेडीओलॉजिस्‍टने संपुर्ण तपासणी अहवाल देणे आवश्‍यक राहील. (Apart from lung, mediastinum and bones) ज्‍या रुग्‍णांकडे आरोग्‍य विमा योजना आहे किंवा एखाद्या रुग्‍णालयाने किंवा कार्पोरेट, खाजगी आस्‍थापनेने जर एचआरसीटी तपासणी केंद्राशी सामंजस्‍य करार केलेला असेल त्‍यासाठी उपरोक्‍त दर लागु राहणार नाहीत. अन्‍यथा सर्व रुग्‍णालये, तपासणी केंद्रांनी एचआरसीटी चेस्ट तपासणीसाठी निश्चित केलेले दर (मशिनच्‍या प्रकारानुसार) दर्शनी भागात लावणे तसेच निश्चित दरानुसार दर आकारणी करण्‍याबाबत हॉस्‍पीटल व्‍यवस्‍थापनाला सूचना देणे बंधनकारक राहील. एचआरसीटी चेस्ट तपासणीसाठी निश्चित केलेल्‍या दरापेक्षा अधिक दर आकारणी केल्‍यास संबंधितांवर कारवाई करण्‍यासाठी राज्‍यस्‍तरावर मुख्‍य कार्यकारी अधिकारी राज्‍य आरोग्‍य हमी सोसायटी व जिल्‍हास्‍तरावर (महानगरपालिका क्षेत्र वगळून) संबंधित जिल्‍हाधिकारी व संबंधित महानगरपालिका क्षेत्रात संबंधित महानगरपालिका आयुक्‍त नमूद केलेल्‍या कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्‍यास सक्षम प्राधिकारी राहतील. हे दर आकारणी साथरोग कायद्याची अंमलबजावणी असेपर्यंत चालू राहतील, असेही जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी परीपत्रकान्वये कळविले आहे.

000000

 

263 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

154 बाधितांची भर तर चार जणांचा मृत्यू

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :-सोमवार 28 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 263 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 154 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 74 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 80 बाधित आले.

 

आजच्या एकुण 670 अहवालापैकी 494 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 15 हजार 226 एवढी झाली असून यातील 11 हजार 490 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 274 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 50 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

 

या अहवालात एकुण चार रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. रविवार 27 सप्टेंबर रोजी पोर्णिमानगर नांदेड येथील 54 वर्षाच्या एका महिलेचा, कंधार येथील 90 वर्षाच्या एका पुरुषाचा, नांदेड येथील 55 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे तर सोमवार 28 सप्टेंबर रोजी उमरी येथील 52 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 394 झाली आहे.

 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड 14, बिलोली कोविड केअर सेंटर 7, धर्माबाद कोविड केअर सेंटर 7, मुखेड कोविड केअर सेंटर 16, लोहा कोविड केअर सेंटर 7, खाजगी रुग्णालय 25, अर्धापूर कोविड केअर सेंटर 3, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड 14, किनवट कोविड केअर सेंटर 8, माहूर कोविड केअर सेंटर 5, नायगाव कोविड केअर सेंटर 12, एनआरआय / पंजाब भवन/ महसूल भवन / होमआयसोलेशन 142, उमरी कोविड केअर सेंटर 3 असे 263 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 42, माहूर तालुक्यात 1, किनवट तालुक्यात 4, कंधार तालुक्यात 3, नायगाव तालुक्यात 2, हिंगोली 3, नांदेड ग्रामीण 1, हदगाव तालुक्यात 11, उमरी तालुक्यात 1, मुखेड तालुक्यात 4, परभणी 2, असे एकुण 74 बाधित आढळले.

 

तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 55, अर्धापूर तालुक्यात 1, धर्माबाद तालुक्यात 3, किनवट तालुक्यात 8, भोकर तालुक्यात 3, देगलूर तालुक्यात 3, माहूर तालुक्यात 1, लोहा तालुक्यात 1, नायगाव तालुक्यात 4, हिंगोली 1 असे एकूण 80 बाधित आढळले.

 

जिल्ह्यात 3 हजार 274 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 249, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन, होम आयशोलेशन एकत्रित 1 हजार 754, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 79, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवीन इमारत) 47, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 21, नायगाव कोविड केअर सेंटर 57, बिलोली कोविड केअर सेंटर 21, मुखेड कोविड केअर सेंटर 143, देगलूर जैनब रुग्णालय कोविड केअर सेंटर 73, लोहा कोविड केअर सेंटर 42, हदगाव कोविड केअर सेंटर 39, भोकर कोविड केअर सेंटर 34, कंधार कोविड केअर सेंटर 29, बारड कोविड केअर सेंटर 12, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 83, मुदखेड कोविड केअर सेटर 35, माहूर कोविड केअर सेंटर येथे 16, किनवट कोविड केअर सेंटर येथे 98, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 48, उमरी कोविड केअर सेंटर 61, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 24, खाजगी रुग्णालयात 301 बाधित, हैद्राबाद येथे संदर्भित 1, औरंगाबाद 2, निजामाबाद 1, लातूर 2, अकोला 1, आदिलाबाद येथे संदर्भित 1 झाले आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 81 हजार 174,

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 61 हजार 719,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 15 हजार 226,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 11 हजार 490,

एकूण मृत्यू संख्या- 394,

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 77.83 टक्के.

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-13

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 02,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 1 हजार 846,

आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 274,

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 50.

 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...