Monday, October 21, 2024

 आजचे महत्त्वाचे विशेष वृत्त 966

विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीसाठी

आजपासून नामनिर्देशन प्रक्रियेची सुरुवात

* सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामांकन दाखल करता येणार

* नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर 

नांदेड दि. 21 ऑक्टोबर : नांदेड जिल्ह्यातील विधानसभेच्या नऊ जागांसाठी तसेच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उद्यापासून नामांकन भरणे सुरू होणार आहे. निवडणूक आयोगाने या संदर्भातील सूचना जारी केली असून उद्या 8 ठिकाणी त्या-त्या ठिकाणच्या निवडणूक निर्णय अधिकारी  कार्यालयामध्ये तर नांदेड उत्तर व लोकसभा पोटनिवडणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

अधिसूचना जाहीर झाल्यामुळे उद्यापासून विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवार 22 ऑक्टोबर पासून मंगळवार 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.

निर्धारित केलेल्या ठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामांकन भरण्याची प्रक्रिया सुरू राहील. त्यामुळे या काळात तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीच्या प्रक्रियेतील कर्मचारी व उमेदवार व त्यांच्या चार प्रतिनिधींशिवाय अन्य कोणालाही प्रवेश असणार नाही. प्रत्येक ठिकाणी कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. 

उमेदवार व त्यांच्या समर्थकांना 100 मीटर अंतरावरून वाहनाशिवाय आतमध्ये प्रवेश करावा लागणार आहे. याशिवाय उमेदवार अधिक चार अशाच लोकांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कक्षामध्ये प्रवेश मिळणार आहे.

नामनिर्देशनपत्राची छाननी 30 ऑक्टोबरला बुधवारी 11 वा. सुरू होणार आहे. 4 नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येईल तर 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 

कुठे स्विकारले जाणार अर्ज 

16-नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षापुढील दालनामध्ये लोकसभेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत अर्ज स्वीकारणार आहेत.

83-किनवट विधानसभा मतदारसंघासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय किनवट येथे किनवटच्या निवडणूक निर्णय अधिकारी मेघना कावली (भा.प्र.से.) अर्ज स्वीकारणार आहेत.

84-हदगाव विधानसभा मतदारसंघासाठी तहसीलदार हदगाव यांच्या दालनात हदगावचे निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कांबळे अर्ज स्वीकारणार आहेत.

85-भोकर विधानसभा मतदारसंघासाठी उपविभागीय कार्यालय भोकर येथे दुसऱ्या माळ्यावरील कार्यालयामध्ये अर्ज दाखल करता येणार आहे. याठिकाणी भोकरचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण मंगेशेट्टी अर्ज स्वीकारणार आहेत.

 86-नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या कॅबिनेट हॉलमध्ये नांदेड उत्तरचे निवडणूक निर्णय अधिकारी ललित कुमार वराडे अर्ज स्वीकारतील.

87-नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय नांदेड येथील बैठक कक्षामध्ये नांदेड दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ हे अर्ज स्वीकारतील.

88-लोहा मतदारसंघासाठी लोहा येथील तहसिल कार्यालयाच्या महसूल हॉलमध्ये लोहाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार या अर्ज स्वीकारतील.

 89-नायगाव विधानसभा मतदारसंघासाठी तहसिल कार्यालयातील तहसिलदार यांच्या दालनामध्ये नायगावच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती दाभाडे या अर्ज स्वीकारतील.

90-देगलूर (अ.जा) विधानसभा मतदारसंघासाठी देगलूर तहसिलदार यांच्या बैठक हॉलमध्ये देगलूरच्या  निवडणूक निर्णय अधिकारी क्रांती डोंबे या अर्ज स्वीकारतील.

91-मुखेड विधानसभा मतदारसंघासाठी तहसिल कार्यालयात मुखेडचे निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील हे अर्ज स्वीकारतील.

असा आहे कार्यक्रम :

अधिसूचना जाहीर             : 22 ऑक्टोबर

नामांकनाची अंतीम तारीख : 29 ऑक्टोबर

नामांकनाची छाणणी          : 30 ऑक्टोबर

नामांकन मागे अंतीम तारीख : 4 नोव्हेंबर

मतदान तारीख.                   : 20 नोव्हेंबर

मतमोजणी तारीख.              : 23 नोव्हेंबर 2024.

000000

वृत्त क्र. 965

जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात मतदान जनजागृती 

नांदेड दि. 21 ऑक्टोबर :- नांदेड येथील सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालयात आज विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 या अनुषंगाने नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ स्वीपकक्षा मार्फत मतदार जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य डॉ. निरंजन कौर होत्या. 

या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शकामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सामाजिकशास्त्र संकुल विभागाचे संचालक प्रा.डॉ. घनश्याम येळणे तसेच  087 दक्षिण नांदेड स्वीप कक्षातील सदस्य प्रा.डॉ. व्ही.एल.तरोडे, लेफ्टनंट प्रा.डॉ. के.वाय.इंगळे, प्रा.डॉ. डी.एम. बडूरे, राजेश कुलकर्णी, बालासाहेब कच्छवे, अजय आठवले व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. व्ही.एल.तरोडे यांनी केले. त्यांनी स्वीप कक्ष स्थापने मागची भूमिका व कक्षाच्या माध्यमातून पार पडल्या जाणाऱ्या जबाबदारी या विषयाची माहिती उपस्थितांना दिली. 

या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. घनश्याम येळणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मतदानाची लोकशाही शासन व्यवस्थेच्या यशस्वीतेसाठी असणारी उपयुक्तता व त्याचप्रमाणे सर्व सामान्य व्यक्तींचा मतदान प्रक्रियेमध्ये असणारे योगदान हे अनेक उदाहरणांच्या माध्यमातून सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करीत असताना अनेक छोट्या छोट्या उदाहरणांचा आधार घेऊन लोकशाही शासन व्यवस्थेत असणारे मतदानाचे महत्त्व प्रतिपादित केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्रा.डॉ. निरंजन कौर यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये मतदान जागृतीसाठी आम्ही अधिकाधिक प्रयत्न करू व त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करू असे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील प्रा. डॉ. गोपाळ बडगिरे यांनी मांडले. तर शेवटच्या सत्रात बाळासाहेब कच्छवे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांकडून सामूहिक मतदानाची शपथ घेतली.

00000





वृत्त क्र. 964

केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा येथील विद्यार्थ्यांनी मतदान करून घेण्याचा केला निर्धार

नांदेड दि. 21 ऑक्टोबर :- विधानसभा निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबर 2024 ला मतदान होणार आहे. यासाठी  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार संकल्पपत्र घेण्याचे आवाहन केले आहे.  

त्याचा प्रतिसाद म्हणून लोहा 88 विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार व तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल परळीकर, गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली  जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा येथील  वर्ग पहिली ते सातवीच्या 158 विद्यार्थ्यांना संकल्पपत्र देण्यात आले. त्यात आई-वडिलांना मतदान करण्यासाठी भावनिक आवाहन केले आहे. तसेच पालकांचा ठराव म्हणून आम्ही मतदान करणारच तसेच शेजारी आणि मित्रमंडळी यांना सुद्धा  मतदान करण्यास प्रेरित करणार असल्याचे नमूद करून त्यावर आई-वडिलांची स्वाक्षरी आहे. 

हा उपक्रम  यशस्वी करण्यासाठी शाळेचे  मुख्याध्यापक रवी ढगे, व्यंकटराव मुगावे, श्रीमती रेवती दमकोंडवार,  देवबा होळकर, श्रीमती जयश्री बारोळे, माधुरी मलदोडे, सुप्रिया लांडगे, श्याम पाटील मारतळेकर  व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000



 वृत्त क्र. 963

शरीररचना शास्त्र विभागामार्फत वैद्यकिय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन


नांदेड दि. 20 ऑक्टोबर : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णपुरी येथे 18 ऑक्टोबर रोजी दरवर्षीप्रमाणे प्रथम वर्ष एम.बी.बी.एस. 2024 मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याना व पालकांना संबोधित व मार्गदर्शन करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. सुधिर देशमुख यांच्या DEAN'S ADDRESS या कार्याक्रमाचे आयोजन शरीररचना शास्त्र विभागामार्फत नुकतेच करण्यात आले होते. 

या कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. सुधिर देशमुख, उपअधिष्ठाता डॉ. हेमंत गोडबोले, प्राध्यापक व स्त्री रोग विभागाचे विभागप्रमुख डॉ. एस. आर. वाकोडे, प्राध्यापक व सूक्ष्मजीवशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. संजय मोरे, प्राध्यापक व शरीर विकृती शास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. मोहम्मद अब्दुल समीर, शरीररचना शास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. वैशाली इनामदार, सहयोगी प्राध्यापक व शरीररचना शास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. अनिसुर रहेमान, प्राध्यापक व शरीरक्रिया शास्त्र विभागाचे डॉ. वंदना दुधमल, जीवरसायन शास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. गणेश मनुरकर, जनऔषध शास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. इस्माईल इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती.   

अधिष्ठाता डॉ. सुधिर देशमुख साहेब यांनी प्रथम वर्ष एम.बी.बी.एस. 2024 मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याना व पालकांना संबोधित व मार्गदर्शन केले. त्यांनी अगोदर नव्याने प्रवेशित केलेल्या विध्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. त्यांनी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत माहिती दिली. वैद्यकीयक्षेत्रात नवीन घडत असलेल्या संशोधनाबाबत अवगत केले. विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात संशोधनाद्वारे भारताचे नाव जागतिक स्तरावर नेण्याचे आवाहन केले. आपल्या भारत देशाला जगासमोर एक महाशक्ती म्हणून पुढे येण्यासाठी मदत होईल, असेही त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. 

या कार्यक्रमाची सुरुवात व सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक शरीररचना शास्त्र विभागाचे डॉ. महेश शिंदे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी मूर्ती पूजन करून व तसेच दीपप्रज्वलन व वृक्षाला पाणी घालून करण्यात आले. या संस्थेबद्दल थोडक्यात माहिती व कार्यक्रमाची प्रस्तावना शरीररचना शास्त्र विभागाचे सध्याचे विभाग प्रमुख डॉ. अनिसुर रहेमान यांनी केले. RAGGING संदर्भात थोडक्यात माहिती डॉ. गणेश मनुरकर यांनी दिली. नाशिक विद्यापीठ अंतर्गत प्रवेश व परीक्षा संदर्भाची माहिती डॉ. सुधा करडखेडकर यांनी दिली. डॉ. वंदना दुधमल यांनी परीक्षेसंदर्भात तसेच मुलांची हजेरी व शिस्ती संदर्भात मार्गदर्शन केले. डॉ. इस्माईल इनामदार यांनी NMC (राष्ट्रीय वैध्यकीय आयोग) व प्रथम वर्षीय एम.बी.बी.एस. CURRICULUM (अभ्यासक्रम ) याबद्दल थोडक्यात माहिती दिली. 

या कार्यक्रमात इतर प्राध्यापक वर्ग तसेच विद्यशाखेचे कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमांचे आयोजन शरीररचनाशास्त्र विभागाद्वारे करण्यात आले होते. शेवटी आभार शरीररचना शास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. पूर्वा कर्डिले यांनी केले.
0000



आज महत्त्वाचे
लक्षवेध/तातडीचे

विधानसभा / लोकसभा मतदान व मतमोजणी पासेसबाबत

नांदेड विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान व मतमोजणीसाठी ज्या माध्यम प्रतिनिधीना ( फक्त प्रिन्ट व सॅटेलाईट न्यूज चॅनेल्सचे प्रतिनिधी ) प्राधिकार पत्र हवे असतील त्यांनी तीन अधिक तीन अशी एकूण  सहा छायाचित्र देणे आवश्यक आहे.

तसेच यासोबत विहित नमुना देण्यात येत आहे. त्या विहित नमुन्यात प्राधिकार पत्र द्यावयाच्या व्यक्तीचे नाव, पदनाम, व संबंधित वृत्त संस्थेचे नाव व पत्ता आहे. मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत नमूद करावे . छायाचित्राच्या झेरॉक्स प्रति स्वीकारल्या जाणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी .सदर माहिती संपादकाच्या लेटरहेडवर सही व शिक्का भरून आज कार्यालयास २१ ऑक्टोंबर २०२४ रोजी सोमवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत कार्यालयात जमा करावेत.त्यानंतर आलेल्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही. सर्व पासेस मुंबई येथून निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून तयार होत असल्याने आजची डेडलाईन सर्वांनी पाळणे अनिवार्य आहे.

(कृपया पोर्टल, युट्युब चॅनेल, वेबसाईट, व अन्य समाज माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांनी प्रवेशिकासाठी आग्रही असू नये. मर्यादित पासेस बनवायच्या असल्याने, कृपया सहकार्य करावे.)

प्रवीण टाके
 जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...