Saturday, January 23, 2021

 

 55 कोरोना बाधितांची भर तर

40 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 23 :- शनिवार 23 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 55 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 46 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 9 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 40 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 2 हजार 629 अहवालापैकी 2 हजार 528 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 254 एवढी झाली असून यातील 21 हजार 139 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 330 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 7 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 582 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 4, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 18, माहूर तालुक्यांतर्गत 1, लोहा तालुक्यांतर्गत 1, किनवट कोविड रुग्णालय 1, देगलूर कोविड रुग्णालय 2, कंधार तालुक्यांतर्गत 6, खाजगी रुग्णालय 7 असे एकूण 40 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.98 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 32, बिलोली तालुक्यात 1, हिमायतनगर 2, मुखेड 1, नांदेड ग्रामीण 5, हदगाव 1, लोहा 1, परभणी 3 असे एकुण 46 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 4, कंधार तालुक्यात 1, उमरी 1, हदगाव 1, किनवट 2 असे एकुण 9 बाधित आढळले.   

जिल्ह्यात 330 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 16, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 18, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 20, मुखेड कोविड रुग्णालय 14, महसूल कोविड केअर सेंटर 10, किनवट कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 4, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 185, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 38, खाजगी रुग्णालय 23 आहेत.   

शनिवार 23 जानेवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 167, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 77 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 813

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 74 हजार 308

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 254

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 21 हजार 139

एकुण मृत्यू संख्या-582

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.98 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-34

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-12 

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-396

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-330

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-7.          

00000

 

राष्‍ट्रीय मतदार दिनानिमित्त आकाशवाणीवर

निवडणूक विषयक प्रश्‍नमंजुषा कार्यक्रम

नांदेड (जिमाका) दि. 23 :- राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सोमवार 25 जानेवारी रोजी आकाशवाणीवर निवडणूक विषयक प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन सकाळी 7 ते रात्री 9 वा. यावेळेत केले आहे. या कार्यक्रमात निवडणूक विषयक विविध प्रश्‍न विचारले जाणार असून विजेत्‍यांना उत्तेजनार्थ बक्षिसे  देण्‍यात येणार आहे. या प्रश्‍नमंजुषेच्‍या कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.   

मा. भारत निवडणुक आयोगाच्‍या निर्देशानुसार सोमवार 25 जानेवारी 2021 रोजी राष्‍ट्रीय मतदार दिवस नांदेड जिल्ह्यात साजरा करण्‍यात येणार असून त्‍याचे नियोजनही करण्‍यात आले आहे. या राष्‍ट्रीय मतदार दिवसाच्‍या अनुषंगाने मा. मुख्‍य निवडणूक अधिकारी महाराष्‍ट्र राज्‍य यांच्या कार्यालयाच्‍यावतीने मतदार जनजागृतीसाठी प्रश्‍नमंजुषेचा कार्यक्रम 25 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वा. या कालावधीत Radio City 91.1, Radio Mirchi 98.3, Fever 104, All India Radio, Big FM 93.5 या रेडीओ चॅनलवर प्रसारीत होणार आहे.

00000

 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील

मुख्य रोडवर प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड (जिमाका) दि. 23 :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड व पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे मान्यवरांचे हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा राष्ट्रीय कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टिकोनातून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोरील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा गांधी पुतळा पर्यंतच्या परिसरातील मुख्य रोडवर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सोमवार 25 जानेवारी 2021 रोजी (24 जानेवारीच्या मध्यरात्री पासून) ते मंगळवार 26 जानेवारी 2021 रोजी मध्यरात्रीपर्यंत उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चे, रॅली इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध केले आहे.

000000

 

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 चा   

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ

नांदेड (जिमाका) दि. 23  :- केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागांची महत्वकांक्षी असलेल्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 (pmkvy 3.0) या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी करण्यात येणार आहे. या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात देशभरातील 8 लाख उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार असून यासाठी 948.90 कोटी रुपयाची तरतुद करण्यात आली आहे. 

नांदेड येथील प्रधानमंत्री कौशल्य केंद्र (pmkk) एमपावर प्रगती, किड्स किंगडम शाळेच्या जवळ नांदूसा रोड खुरगाव  येथे सीसीटीव्ही स्थापना तंत्रज्ञ, फील्ड टेक्निशियन आणि इतर होम अप्लायन्सेस, मेकअप कलाकार (CCTV  Installation Technician. Field Technician And Other Home Appliances. Makeup Artists) या तीन अभ्यासक्रमासाठी विनामुल्य कौशल्य प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात येणार असून नांदेड जिल्ह्यासाठी 522 प्रशिक्षणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाचे सहायक आयुक्त रेणुका तम्मलवाड यांनी दिली.

00000

 

प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री

अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन

नांदेड (जिमाका) दि. 23  :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार 26 जानेवारी 2021 रोजी नांदेड वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय पोलीस कवायत मैदान येथे सकाळी 9.15 वा. राष्ट्रध्वज वंदन व संचलनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

कोविड-19 चा प्रादुर्भाव असल्याकारणाने सर्व निमंत्रितांनी मास्क घालुनच कार्यक्रमास उपस्थित रहावे. तसेच सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी होण्यापुर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्यादृष्टिने सोबत कोणतेही बँग किंवा तत्सम वस्तू आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 पुर्वी किंवा 10 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे. 

दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ, आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृह विभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितानी घ्यावी, असेही आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय जनजागरण समितीने केले आहे.

000000

 

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते

धर्माबाद तालुका क्रीडा संकुलाचा आज लोकार्पण सोहळा

नांदेड (जिमाका) दि. 23 :- क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत तालुका क्रीडा संकुल धर्माबादचा लोकार्पण सोहळा सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते रविवार 24 जानेवारी 2021 रोजी तालुका क्रीडा संकुल मैदान धर्माबाद येथे सकाळी 11 संपन्न होणार आहे. यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार तथा तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष राजेश पवार, नगरपरिषद अध्यक्षा श्रीमती अफजल बेगम अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.    

धर्माबाद तालुका क्रीडा संकुल लालबहादुर शास्त्री महाविद्यालय, धर्माबादची 1 हे. 60 आर. जागा प्राप्त करुन देण्यात आली होती. याकरीता शासनामार्फत 100 लाख मंजुर करण्यात आले होते. या रक्कमेतून तालुका क्रीडा संकुल समितीच्या मान्यतेने सार्वजनिक बांधकाम विभाग भोकरमार्फत बॅडमिंटन इनडोअर हॉल (अद्यावत वुडन कोर्ट, विद्युत व्यवस्थेसह), दोनशे मीटर धावनपथ व विविध खेळाची क्रीडांगणे (कबड्डी, खो-खो व व्हॉलीबॉल ) या राष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यामुळे तालुक्यातील शालेय खेळाडू, ज्येष्ठ नागरीक व क्रीडाप्रेमी यांना विविध खेळाचे सराव करण्याची संधी उपलब्ध होवुन तालुक्याच्या क्रीडा सुविधेच्या वैभवात भर पडणार आहे. 

हे क्रीडा संकुल पुर्ण करुन घेण्यासाठी तहसिलदार दत्तात्रय शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांचे मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा अधिकारी किशोर पाठक, गुरुदिपसिंघ संधु, प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती शीवकांता देशमुख, अनिल बंदेल, सा.बां.विभागाचे कनिष्ठ अभियंता मनुरक, तालुका क्रीडा संयोजक अहमद लडडा, श्री. वाघमारे, श्री. शब्बीर आदी परीश्रम घेत आहेत. 

तालुका क्रीडा संकुल लोकार्पण सोहळा कार्यक्रमासाठी तालुक्यातील खेळाडू, ज्येष्ठ नागरीक, क्रीडाप्रेमी व इतर यांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थीत राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी व तालुका क्रीडा संकुल समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

000000

 

पूर्णा प्रकल्पावर 2 वर्षापासून कालवा स्वच्छता अभियान राबविणाऱ्या

मानवलोक संस्थेचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केला गौरव 

नांदेड (जिमाका) दि. 23 :-  कालव्यांची डागडुजी हा शासनस्तरावर दिवसेंदिवस आव्हानात्मक बनत चालला  आहे. हा प्रश्न सामाजिक बांधिलकी व सेवाभावातून सोडविण्यासाठी मागील दोन वर्षांपासून कालवा स्वच्छता अभियानाद्वारे सोडविणाऱ्या मानवलोक सेवाभावी संस्थेचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत गौरव केला. जलसंपदा विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मानवलोक संस्थेने त्यांच्याकडील सात जेसीबी व इतर अत्यावश्यक यंत्रसामुग्री सेवाभावातून कामासाठी उपलब्ध करुन दिली. केवळ कालवे दुरुस्त नाहीत म्हणून शेतकरी पाण्यापासून वंचित राहू नयेत ही भूमिका मानवलोकने जपून या कामात पुढाकार घेतल्याचे या संस्थेचे कार्यवाहक अनिकेत लोहिया यांनी सांगितले.  

00000



 

सिंचन प्रकल्प भरल्यानंतर

पाणी प्रश्नांप्रती तेवढीच जागरुकता अत्यावश्यक

-         पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड (जिमाका) दि. 23 :- समन्यायी पाणी वाटप हा दिवसेंदिवस अत्यंत आव्हानात्मक विषय बनत चालला असून उपलब्ध असलेल्या पाण्याचा काटेकोर वापर ही काळाची गरज आहे. मराठवाड्यातील धरणे भरायला आता पाचपेक्षा अधिक वर्षांचा कालावधी लागत आहे. पाणी नसतांना पाण्याप्रती सर्व जागरुक होतात मात्र एकदा धरणे भरली की त्यावर्षी पाण्याच्या समन्यायी वाटप व पाणीप्रश्नांबाबत कोणी बोलत नाही, अशी खंत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज बोलून दाखविली. जे पाणी दुष्काळ सदृश्य परस्थितीनंतर उपलब्ध होत असेल तर त्याच्या इतर उपयोगासमवेत कालव्याद्वारे शेताच्या बांधापर्यंत पोहचणाऱ्या पाण्यासाठीही सर्वांनी तेवढेच दक्ष असले पाहिजे, या शब्दात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पाणी प्रश्नाप्रती गांभीर्य सर्वांच्या लक्षात आणून दिले. 

नांदेड जिल्ह्याला वरदान ठरलेल्या उर्ध्व पैनगंगा प्रकल्प, पूर्णा प्रकल्प, मानार प्रकल्प, शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाच्या पाणी नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे आज संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी आंबुलगेकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार रावसाहेब अंतापुरकर, आमदार राजेश पवार, आमदार मोहन हंबर्डे, आमदार श्यामसुंदर शिंदे, गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजूभैय्या  नवघरे, राष्ट्रीय साखर संघ नवी दिल्लीचे अध्यक्ष जयप्रकाश दंडेगावकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार, अधीक्षक अभियंता उप्पलवार, भाऊराव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके, मारोतराव कवळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.  

पाण्याची जेंव्हा शंभर टक्के उपलब्धता असते तेंव्हा कॅनलची दुरुस्ती, कॅनलमधील गाळ या साऱ्याबाबी अपेक्षित जरी असल्या तरी धरणातील पाणी नियोजन केलेल्या कॅनलद्वारे शेवटच्या बांधापर्यंत पोहचले पाहिजे. या पाण्याचा होणारा अपव्यय जर टाळायचा असेल तर या सर्व कामात काटेकोरपणा आला पाहिजे. डागडुजीविना कॅनल जर योग्य स्थितीत नसतील अथवा त्यात झाडी झुडपी वाढून कॅनल खराब झाले असतील तर वेळेच्या आत पाणी वाटपाच्या पाळ्या लक्षात घेऊन पूर्वीपासूनच याची डागडुजी प्राधान्याने हाती घ्यायला हवी असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट करुन विविध प्रकल्पातील पाण्याचे रोटेशन हे नियोजन केल्याप्रमाणे पोहचलेच पाहिजे,असे निर्देश जलसंपदा विभागाला दिले.

याबैठकीत आमदार बालाजी कल्याणकर, आमदार रावसाहेब अंतापुरकर, आमदार राजेश पवार, आमदार मोहन हंबर्डे, आमदार श्यामसुंदर शिंदे, गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजूभैय्या  नवघरे, राष्ट्रीय साखर संघ नवी दिल्लीचे अध्यक्ष जयप्रकाश दंडेगावकर यांनी कालव्याद्वारे पाणी वाटप होतांना येणाऱ्या अनेक अडचणी निदर्शनास आणून दिल्या. 

या बैठकीत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला. पूर्णा प्रकल्पांतर्गत येलदरी व सिध्देश्वर दोन धरणे असून या वर्षी धरणात 980.73 दलघमी (100 टक्के) पाणी आले. यातून प्रकल्पात आलेला गाळ व बाष्पीभवन 228.25 दलघमी वजा करता 662.48 दलघमी पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. पिण्यासाठी परभणी, हिंगोली, जिंतूर, वसमत, औंढा नागनाथ ही शहरे व ग्रामीण भागासाठी 78.78 दलघमी पाणी आरक्षीत केले आहे. सिंचनासाठी 583.69 दलघमी पाणी उपलब्ध असून या पाण्यातून सुमारे 55 हजार हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात 3 पाणी पाळया व उन्हाळी हंगामात 4 पाणी पाळयाचे नियोजन केले आहे. त्याच्या तारखा पुढील प्रमाणे आहेत. 25 नोव्हेंबर, 2020 (पूर्ण), 27 डिसेंबर,2020 (पूर्ण), 25 जानेवारी, 2021, 1 मार्च, 2021,27 मार्च 2021, 23 एप्रिल 2021, 19 मे 2021 या तारखेमध्ये आपत्कालीन परिस्थितीत बदल होऊ शकतो. 

निम्न मानार प्रकल्प हा तीन वर्षानंतर पहिल्यांदाच या प्रकल्पात 100 टक्के (123.49 दलघमी) पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यातून प्रकल्पातील बाष्पीभवन व गाळ 24.88 दलघमी वजा करता 98.61 दलघमी पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. पिण्यासाठी नायगाव, कंधार या तालुक्यातील ग्रामीण भागासाठी 4.61 दलघमी पाणी आरक्षीत केले आहे. त्यामुळे सिंचनासाठी 94.00 दलघमी पाणी उपलब्ध झाले असून या पाण्यातून सुमारे 23 हजार हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात तीन तर उन्हाळी हंगामात तीन आवर्तन दिले जाणार आहे. त्याच्या तारखा अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहेत. 25 नोव्हेंबर 2020 (पूर्ण), 30 डिसेंबर 2020 (पूर्ण), 24 जानेवारी 2021, 1 मार्च 2021, 1 एप्रिल 2021, 1 मे 2021 या तारखेमध्ये आपत्कालीन परस्थितीत बदल होऊ शकतो. 

उर्ध्व पैनगंगा याप्रकल्पात यावर्षी 964.10 दलघमी (100 टक्के) पाणी उपलब्ध झाले आहे. यातून प्रकल्पातील गाळ व बाष्पीभवन 176.32 दलघमी वजा जाता 787.78 दलघमी पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. पिण्यासाठी उमरखेड, अर्धापूर, कळमनुरी तसेच नांदेड, हिंगोली व यवतमाळ जिल्हयातील ग्रामीण भागासाठी 77.15 दलघमी पाणी आरक्षीत केले आहे. त्यामुळे सिंचनासाठी 710.64 दलघमी पाणी उपलब्ध झाले असून या पाण्यातून 86 हजार हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात 3 पाणी पाळया व उन्हाळी हंगामात 4 पाणी पाळयांचे नियोजन केले आहे. त्याच्या तारखा अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहेत;  27 नोव्हेंबर 2020 (पूर्ण), 31 डिसेंबर 2020 (पूर्ण), 27 जानेवारी 2021, 1 मार्च 2021, 27 मार्च 2021, 23 एप्रिल 2021 19 मे 2021 या तारखेमध्ये आपत्कालीन परस्थितीत बदल होऊ शकतो. 

शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पात 100 टक्के (80.79 दलघमी) पाणी उपलब्ध आहे. यावर्षी पहिल्यांदाच अंतेश्वर बॅरेज भरले असून त्यातून 21.0 दलघमी व दिग्रस बंधाऱ्यातून 24.0 दलघमी पाणी उपलब्ध होणार आहे. असे एकूण 125.95 दलघमी पाणी उपलब्ध होणार आहे. यातून बाष्पीभवन 16.32 दलघमी वजा करता 109.63 दलघमी पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. पिण्यासाठी नांदेड महानगरपालिका, एमआयडीसी व ग्रामीण भागासाठी 38.55  दलघमी पाणी आरक्षीत केले आहे. त्यामुळे सिंचनासाठी 71.08 दलघमी पाणी उपलब्ध झाले असून सुमारे 13 हजार हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात तीन पाणी पाळया दिल्या जाणार आहेत. त्याच्या तारखा अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहेत. 27 नोव्हेंबर 2020 (पूर्ण), 7 जानेवारी 2021 (चालू), 7 फेब्रुवारी 2021 या तारखेमध्ये आपत्कालीन परस्थितीत बदल होऊ शकतो.

0000




 

 प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन

साकारण्यासाठी केंद्राने सहयोग द्यावा

-         पालकमंत्री अशोक चव्हाण

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी केला महाराष्ट्र शासनाचा गौरव 

नांदेड (जिमाका) दि. 23 :-खेड्यापाड्यात विखरुन असलेल्या समाजातील प्रत्येक वंचित घटकांपर्यंत सामाजिक योजना पोहचाव्यात यासाठी शासन तत्पर आहे. सामाजिक न्यायाच्यादृष्टिने जिल्हास्तरावर न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सामाजिक न्याय भवनही उभारले आहे. याच भवनात दिव्यांगांना त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व शासकिय योजनांचा लाभ घेता यावा यादृष्टिने नांदेड येथे एक स्वतंत्र कक्ष निर्माण करु अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. 

सामाजिक न्याय व अधिकारिता विभागाच्यावतीने एडिप व राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत आज कौठा येथील ओम गार्डन येथे दिव्यांग व वरिष्ठ नागरिकांसाठी मोफत सहाय्यक उपकरण वितरण समारंभात ते बोलत होते. या समारंभास केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता मंत्री थावरचंद गेहलोत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती दिली. तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार राजेश पवार, आमदार श्यामसुंदर शिंदे, महापौर मोहिनी येवनकर यांची विशेष उपस्थिती होती. 

दिव्यांगांचे प्रश्न आव्हानात्मक जरी असले तरी आपले दिव्यांग बांधव यांच्यात तसुभरही आत्मविश्वासाची कमतरता नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्यात कसलीही कमतरता नसून ते समर्थ आहेत, मेहनती आहेत. शासनाकडे माय-बाप सरकार म्हणून त्यांच्यात जे काही नैसर्गिक व्यंग आले असेल त्यातून सावरण्याकरिता त्यांच्या जर अपेक्षा, काही मागण्या असतील तर त्या आपण प्राधान्याने पूर्ण केल्या पाहिजेत. त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे, या शब्दात त्यांनी समारंभास उपस्थित असलेल्या दिव्यांगांना आपल्या कर्तव्य तत्परतेची ग्वाही दिली. राज्य शासनातर्फे महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्यामार्फत अनेक योजना आहेत. या योजना आपण घटनेच्या तरतुदीतून व त्यांच्या घटनादत्त अधिकार म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचवित आहोत. यात अधिक सुसूत्रता येण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र असे दिव्यांग भवन उभारण्यासाठी केंद्र सरकारने राज्य शासनाला सोबत घेवून पुढाकार घ्यावा, अशी विनंती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांना केली. 

सर्वांना सोबत घेऊन विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. समाजातील वंचित व दिव्यांगांना डावलून विकास होऊ शकत नाही. नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांच्या या समारंभासाठी माझी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची मनोमन इच्छा होती. मात्र कोविड-19 च्या कारणाने मला उपस्थित राहता आले नाही याबद्दल त्यांनी मनमोकळेपणाने खंतही बोलून दाखविली. केंद्र सरकारने हाती घेतलेल्या विविध योजनांचा त्यांनी आढावा मांडून राष्ट्रीय मानसिक स्वास्थ पुनर्रवास केंद्र आकाराला येत असल्याचे त्यांनी सांगितले. आजवर दिव्यांगांच्या मर्यादित श्रेणी असल्यामुळे काही दिव्यांगांना शासकिय योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित रहावे लागत होते. आता दिव्यांगांच्या 21 श्रेणी केल्यामुळे सर्वच घटकांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करुन घेता येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र शासनातर्फे दिव्यांगाच्या विविध योजनांचे अतिशय चांगले कार्य सुरु असल्याबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या भाषणात गौरव केला. 

यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचेही समायोचित भाषण झाले. दिव्यांगांच्या योजना व साहित्य वाटपापासून कोणी वंचित राहिले असेल तर त्यांच्यापर्यंत आम्ही पोहचू असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांनी यावेळी जिल्ह्यातील सामाजिक विकासाच्या विविध योजनांची माहिती व त्याच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात जिल्हा परिषदेचे समाज कल्याण विभागाचे सभापती अ‍ॅड. रामराव नाईक यांनी केंद्रीय मंत्री गेहलोत यांच्याकडे जिल्ह्याच्या दिव्यांग लोककल्याण विकासासाठी आर्थीक तरतुदीत वाढ करावी अशी मागणी केली.

00000








वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...