Friday, March 19, 2021

 

 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी

नदीपात्र परिसरात कलम 144  

नांदेड (जिमाका) दि. 19 :-मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून शनिवार 20 मार्च 2021 पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत. 

याबंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरी नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 मार्च 2021 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 एप्रिल 2021 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे. 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड किंवा पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

0000

 

जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची

22 मार्चला बैठक, तक्रारी देण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 19 :- जिल्ह्यातील शासनाच्या कोणत्याही कार्यालयामध्ये चालू असलेल्या किंवा आजपर्यंत केल्या गेलेल्या भ्रष्टाचाराबाबत कोणाची काही तक्रार असल्यास अथवा एखाद्या कार्यालयामध्ये होत असलेल्या भ्रष्ट काराभाराबाबतची माहिती असल्यास त्याबाबत लेखी स्वरुपात तक्रार सोमवार 22 मार्च 2021 रोजी आयोजित जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या बैठकीत सादर करावी, असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी तथा जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष यांच्यावतीने करण्यात आले. 

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांचे निजी कक्षात सोमवार 22 मार्च 2021 रोजी दुपारी 3.30 वा. समितीची बैठक आयोजित केली आहे. कोणत्याही शासकीय, निमशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराच्याबाबतीत तक्रारीचे निवेदन लेखी स्वरुपात प्रत्यक्ष उपस्थित राहून सादर करावे लागेल. हे निवेदन अध्यक्ष, जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती नांदेड या नावाने सबळ पुराव्यासह दोन प्रतीत सादर करावे लागेल. 

या बैठकीसाठी सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार असल्यामुळे आपल्या निवेदनाची तातडीने दखल घेवून शासनाच्या नियमानुसार भ्रष्टाचार करणाऱ्या अथवा भ्रष्टाचारास वाव देणाऱ्या जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुध्द कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहनही जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीतर्फे करण्यात आले आहे.

00000

 

कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी

जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन यांच्या विविध मार्गदर्शक सूचना

नांदेड (जिमाका) दि. 19 :- राज्यात कोविड-19 संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्‍याने कोविड-19 विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आणि तातडीने काही उपाययोजना करण्यासाठी काही सूचनांचे काटेकोर पालन करण्याबाबत शासनाने निर्देशित केले आहे. यापुर्वी नांदेड जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात कोविड-19 संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पुढील प्रमाणे विविध मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. 

सर्व सिनेमागृहे (सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्‍लेक्‍सेस) ही खालील प्रतिबंधास अधिन राहून 50 टक्‍के क्षमतेच्‍या अधिन राहून सुरू राहतील. यात मास्क परिधान केल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही . (No Mask - No Entry) सर्व ठिकाणी तापमापीचा उपयोग करून शरीराच्या तापमानाची नोंद घेण्या यावी, जेणेकरून ताप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशव्दार तसेच इतर ठिकाणी पुरेशा प्रमाणात हँड सॅनिटायझर  ठेवणेत यावीत. सर्व आस्थापनामध्ये पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नियुक्त करावे, जेणेकरून सर्व अभ्यांगताबाबत मास्क परिधान केला जाईल, सामाजिक अंतर राखले जाईल याविषयी तपासणी केली जाईल. या आदेशाचा भंग केल्‍यास संबंधीत सिनेमागृह (सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्‍लेक्‍सेस ) ही कोवीड-19  विषाणू  संसर्ग केंद्र सरकारने आपत्‍ती म्‍हणून अधिसूचीत केले असे तोपर्यंत बंद राहतील. तसेच संबंधित आस्‍थापना मालक हे आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायद्याअंतर्गत दंड वसूल करणेस तसेच फौजदारी कारवाईस पात्र राहतील.  

सर्व शाँपीग मॉल्स यांना खालील नमूद प्रतिबंधाचे पालन करणे बंधनकारक असेल. मास्क परिधान केल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही (No Mask - No Entry). सर्व ठिकाणी तापमापीचा उपयोग करून शरीराच्या तापमानाची नोंद घेणेत यावी, जेणेकरून ताप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशव्दार तसेच इतर ठिकाणी पुरेशा प्रमाणात हँड सॅनिटायझर  ठेवणेत यावीत. सर्व आस्थापनामध्ये पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नियुक्त करावे, जेणेकरून सर्व अभ्यांगताबाबत मास्क परिधान केला जाईल, सामाजिक अंतर राखले जाईल याविषयी तपासणी केली जाईल. सर्व मॉल्सचे व्यवस्थापक यांनी संबंधित मॉल्समध्ये असलेले थियटर्स इतर कार्यरत आस्थापना यामध्येही घालणेत आलेल्या प्रतिबंधाचे सदर आस्थापना सुरू करणेपूर्वी तसेच सुरू असताना पालन करत आहेत याबाबत दक्षता घेणे. नांदेड जिल्‍ह्यातील सर्व दुकाने सकाळी 7 वा. ते सायंकाळी 5 वा. या कालावधीत कोरोना प्रतिबंधक सर्व उपाययोजनांचे पालन करून चालू राहतील, सदर निर्बंध औषधी दुकानांसाठी लागू राहणार नाहीत. सदर आदेशाचा भंग केल्यास, संबंधित शॉपिग मॉल्स ही कोव्हीड-19 विषाणु संसर्ग केंद्र सरकारने आपत्ती म्हणून अधिसूचित केले असे तोपर्यत बंद राहतील. तसेच संबंधित आस्थापना मालक हे आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत दंड वसूल करणेस तसेच फौजदारी कारवाईस पात्र राहतील. 

कोणतेही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम, सभा, मोर्चे, मिरवणूका,संमेलने तसेच यात्रा, उत्सव,उरुस त्यादीचे आयोजन करणेस परवानगी असणार नाही. सदर आदेशाचा भंग केल्यास, संबंधित कार्यक्रमाचे आयोजक, जागा मालक हे आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत दंड वसूल करणेस तसेच फौजदारी कारवाईस पात्र राहतील. तसेच संबंधित सभागृहे, इतर ठिकाणे ही कोव्हीड-19 विषाणु संसर्ग केंद्र सरकारने आपत्ती म्हणून अधिसूचित केले असे तोपर्यत बंद केली जातील. 

यापुर्वीच्या आदेशानुसार लग्नसमारंभ व इतर समारंभ हे 16 ते 31 मार्च 2021 या कालावधीत लॉन्‍स, मंगल कार्यालय, हॉल्‍स व अन्‍य तत्‍सम ठिकाणी लग्‍न समारंभ व इतर कार्यक्रम आयोजित करण्‍यास बंदी घालण्‍यात आली आहे. तसेच कोवीड-19 विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता संदर्भ क्र.7 नुसार जिल्‍ह्यातील सर्व प्रकारचे हॉटेल्‍स, परमीट रूम, बेकरी, स्‍वीट मार्ट, चॉट भांडार, ढाबे इ. बाबत आदेश पारीत करण्‍यात आले आहेत.    

अंत्‍यविधी / अंत्ययात्रा इत्यादी कार्यक्रमामध्ये सहभागी होणेस फक्त 20 नागरिकांना परवानगी असेल. स्थानिक प्राधिकरण यांनी या अटीचे पालन केले जात असलेबाबत खात्री करावी.   

गृह अलगीकरणास पुढील प्रतिबंधास अधिन राहून परवानगी असेल. गृह अलगिकरण झालेल्या नागरिक/ रुग्णांविषयीची माहिती संबंधित स्थानिक प्राधिकरण यांना कळविणे. तसेच तसेच गृह अलगीकरण व्यक्ती ही कोणत्याही वैद्यकीय व्यावसायिकाच्या (डॉक्टर ) यांचे देखरेखीखाली आहे याची देखील माहिती स्थानिक प्रशासनास देणे बंधनकारक असेल. कोव्हीड -19 रुग्ण असलेल्या ठिकाणी सुरवातीच्या दिवसापासून 14 दिवसापर्यत दर्शनी ठिकाणी फलक लावावा लागेल,जेणेकरून त्या ठिकाणी कोव्हीड-19 रुग्ण असलेची माहिती नागरिकांना होईल. कोव्हीड -19 + Ve रुग्णांच्या हातावर गृह अलगीकरण (Home Quarantine)  असा शिक्का मारणे. सदर कोव्हीड- 19 रुग्ण गृहअलगीकरण केलेल्या ठिकाणी संबंधित कुटुंबातील व्यक्तीनीही कमीत कमी संपर्क ठेवावा. तसेच मास्क परिधान केलेशिवाय सदर ठिकाणी प्रवेश केला जाणार नाही, याविषयी दक्षता घेण्यात यावी. गृह अलगीकरणाची कोणत्याही प्रकारचे उल्लंघन झालेस सदर कोव्हीड-19 रुग्ण किंवा अलगीकरण झालेले नागरिक यांना स्थानिक प्रशासनाने सुरु केलेल्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये (CCC) मध्ये स्थंलातरीत केले जाईल. 

सर्व कार्यालये / आस्थापना ( आरोग्य व इतर अत्यावश्यक असलेल्या आस्थापना वगळता) ही 50 टक्के  क्षमतेच्या  अधिन राहून सुरू राहतील. घरातून काम (Work from home)  करणेबाबत प्रोत्साहित करणे. सदर आदेशाचा भंग केल्यास, संबंधित कार्यालय/आस्थापना व्यवस्थापना ही कोव्हीड-19 विषाणु संसर्ग केंद्र सरकारने आपत्ती म्हणून अधिसूचित केले असेल तोपर्यत बंद राहतील. या ठिकाणी फक्त खालील प्रतिबंधास अनुसरून प्रवेश दिली जाईल याबाबत दक्षता घेणे. मास्क परिधान केल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही (No Mask - No Entry). सर्व ठिकाणी तापमापीचा उपयोग करून शरीराच्या तापमानाची नोंद घेणेत यावी, जेणेकरून ताप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशव्दार तसेच इतर ठिकाणी पुरेशा प्रमाणात हँड सॅनिटायझर  ठेवण्या यावीत. सर्व आस्थापनांच्यामध्ये पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नियुक्त करावे जेणेकरून सर्व अभ्यांगताबाबत मास्क परिधान केला जाईल. सामाजिक अंतर राखले जाईल याविषयी तपासणी केली जाईल. 

नांदेड जिल्‍ह्यातील सर्व मंदीर, मस्‍जीद, गुरूद्वारा, गिरीजाघर, बौध्‍दविहार व  इतर धार्मिक स्‍थळे व प्रार्थना स्‍थळे बाबत आदेश पारीत करण्‍यात आले आहेत. यापूर्वी वेळोवेळी परवानगी दिलेल्या व प्रतिबंधित केलेल्याबाबी / क्षेत्रे कायम राहतील आणि यापूर्वी दिलेले आदेश सदर आदेशास संलग्न राहतील आणि सदरचे आदेश दिनांक 31 मार्च 2021 पर्यंत अस्तित्वात राहतील. 

सदरील आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्‍यात येईल व कारवाई करण्‍यात येईल, असे आदेश 19 मार्च 2021 रोजी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले आहेत.

00000

 

नागरिकांनी खोट्या संदेशाला बळी पडू नये

महिला व बालविकास विभागाचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 19 :- महिला व बालविकास विभागाच्या जिजामाता / जिजाऊ या योजनेंतर्गत 1 मार्च 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत ज्या घरातील 21 ते 70 या वयोगटातील कर्त्याव्यक्तीचे निधन झाले आहे अशा विधवा महिलांना रुपये 50 हजार प्रति लाभार्थी मिळतील, अशी पोस्ट सोशल मिडीयाद्वारे व्हॉटस्ॲपवर व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही पोस्ट ही खोटी व बनावट असून अशा प्रकारची कोणतीही योजना महिला व बालविकास विभागामार्फत राबविली जात नसून या संदेशाला नागरीकांनी बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती आर. पी. काळम यांनी केले आहे.

00000

 

नांदेड जिल्ह्यात आज 697 व्यक्ती कोरोना बाधित

पाचजणांचा मृत्यू

जनतेने सुरक्षितता पाळण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 19 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 126 अहवालापैकी 697 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 405 तर अँटिजेन तपासणीद्वारे 292 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 29 हजार 842 एवढी झाली आहे. 

गुरुवार 18 मार्च 2021 शिवाजीनगर मालेगाव रोड नांदेड येथील 57 वर्षाच्या एका पुरुषाचा, स्वामी विवेकानंद नांदेड येथील 57 वर्षाच्या एक महिलेचा, सिडको नांदेड येथील 59 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर शुक्रवार 19 मार्च 2021 रोजी लोहा येथील 55 वर्षाच्या एका पुरुषाचा व मालेगाव रोड नांदेड येथील 50 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 632 एवढी झाली आहे. 

आजच्या 3 हजार 126 अहवालापैकी 2 हजार 295 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 29 हजार 842 एवढी झाली असून यातील 24 हजार 814 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 4 हजार 170 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 51 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड 15, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 173, माहूर तालुक्यांतर्गत 3, देगलूर कोविड रुग्णालय 1, हिमायतनगर तालुक्यांतर्गत 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 26, मुखेड कोविड रुग्णालय 7, धर्माबाद तालुक्यांतर्गत 3, खाजगी रुग्णालय 20 असे एकूण 249 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.15 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 218, अर्धापूर तालुक्यात 3, बिलोली 4, धर्माबाद 24, हिमायतनगर 22, लोहा 43, उमरी 1, नायगाव 7, हिंगोली 8, नांदेड ग्रामीण 6, भोकर 5, देगलूर 7, हदगाव 35, कंधार 3, मुदखेड 15, मुखेड 15, परभणी 3 एकूण 405 बाधित आढळले. 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 130, अर्धापूर तालुक्यात 9, धर्माबाद 5, किनवट 28, माहूर 5, मुखेड 9, उमरी 1, परभणी 1, नांदेड ग्रामीण 18, बिलोली 11, कंधार 11, लोहा 58, मुदखेड 1, नायगाव 3, यवतमाळ 2 असे एकूण 292 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 4 हजार 170 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 190, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 84, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 111, किनवट कोविड रुग्णालयात 24, मुखेड कोविड रुग्णालय 65, देगलूर कोविड रुग्णालय 14, हदगाव कोविड रुग्णालय 23, लोहा कोविड रुग्णालय 82, कंधार कोविड केअर सेंटर 8, उमरी कोविड केअर सेंटर 42, महसूल कोविड केअर सेंटर 101, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 2 हजार 318, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 748, खाजगी रुग्णालय 360 आहेत. 

शुक्रवार 18 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 15 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 63 हजार 212

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 28 हजार 520

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 29 हजार 842

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 24 हजार 814

एकुण मृत्यू संख्या-632

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.15 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-117

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-17

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-328

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-4 हजार 170

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-51.

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...