Friday, September 30, 2016

विधानपरिषद उपसभापती माणिकराव ठाकरे यांचा नांदेड दौरा
             नांदेड दि. 30 :- महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.   
             शनिवार 1 ऑक्टोंबर 2016 रोजी औरंगाबाद येथून शासकीय मोटारीने जालना मार्गे शासकीय विश्रामगृह नांदेड येथे सायंकाळी 7.45 वा. आगमन व राखीव.  सायंकाळी 7.55 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने व्हीआयपी रोड नांदेडकडे प्रयाण. रात्री 8 वा. इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट (आयटीएम) नांदेड येथील कार्यक्रमास उपस्थिती. त्यानंतर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव व मुक्काम.  
रविवार 2 ऑक्टोंबर 2016 रोजी सकाळी 9 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून शासकीय मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण करतील.   
000000
जिल्ह्यात पावसाच्या पुनरागमनामुळे  
प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
नांदेड दि. 30 :- मराठवाडयात काही ठिकाणी मध्‍यम ते मोठया स्‍वरुपात पाऊस पडण्‍याची  आणि  मेघगर्जनेसह या क्षेत्रात वीजा कोसळण्‍याची शक्‍यता भारतीय हवामान खाते यांनी दिल्‍यामुळे जिल्‍हयात सतर्कता व दक्षता बाळगावी असा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला आहे.
संततधार पावसामुळे गोदावरी नदीत पाण्याची आवक वाढल्यास शंकराराव चव्‍हाण विष्‍णुपुरी प्रकल्‍प असर्जन नांदेडसह इतर प्रमुख बांधा-यातुन 95 ते 100 टक्के जलसाठा निर्माण झाल्‍यास अतिरिक्‍त पाणी वेळोवेळी विसर्गाच्या रुपाने पुढे सोडावे लागण्याची दाट शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे या कालावधीत नदी-नाल्‍या काठच्‍या नागरीकांना सतर्क रहावे. असेही सूचित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी पूर नियंत्रण कक्ष सिंचन भवन नांदेड येथे 24 तास कार्यान्वित करण्यात आला असून त्‍याचा दुरध्‍वनी क्रमांक    02462- 263870 असा आहे.
याशिवाय अत्यावश्यक बाबींसाठी तातडीच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाशी तसेच पुढील दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधावा. हे क्रमांक असे जिल्हाधिकारी कार्यालय  नियंत्रण कक्ष- 02462-235077, नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक (टोल फ्री)- 1077, महानगरपालिका नियंत्रण कक्ष- 02462 234461, पोलीस नियंत्रण कक्ष- 02462 234720, आरोग्य विभाग- 02462 236699, नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक (टोल फ्री)- 108. आपत्तकालीन परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी या दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधता येईल, असेही  निवासी  उपजिल्हाधिकारी  तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी जयराज कारभारी यांनी कळवले आहे.

00000
धर्मादाय रुग्णालय आरोग्य योजनेचा
जास्तीत जास्त रुग्णांना लाभ द्या - अलोने
नांदेड दि. 30 :- धर्मादाय रुग्णालयांमध्ये मोफत व सवलतीच्या दराने खाटा राखून ठेवण्याच्या योजनेगरीब आणि निर्धन अशा रुग्णांना उपचार घेता यावेत यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत, असे निर्देश सहायक धर्मादाय आयुक्त मंजुषा अलोने यांनी दिले. धर्मादाय रुग्णालय योजनेबाबत रुग्णालयांच्या प्रतिनिधींच्या  उपस्थितीत गुरूवार 29 सप्टेंबर रोजी बैठक संपन्न झाली. त्यावेळी श्रीमती अलोने यांनी हे निर्देश दिले.
धर्मादाय रुग्णालय म्हणून नांदेड शहरात रयत रुग्णालय, सोमेश कॅालनी.  डॉ. वाडेकर यांचे हॅास्पीटल, शिवाजी पुतळ्याजवळ तसेच डॅा. भालेराव यांचे जिजामाता हॅास्पीटल गुरद्वारा रोड ही तीन रुग्णालये कार्यरत आहेत. या रुग्णालयांकडे उपलब्ध खाटांपैकी गरीबासाठी आणि निर्धनांसाठी प्रत्येकी दहा टक्के खाटा आरक्षित आहेत.
संबंधित रुग्णालयात दाखल होणाऱ्या निर्धन आणि गरीब रुग्णांबाबतचा अहवाल नियमित देण्यात यावा, असेही निर्देश बैठकीत देण्यात आले. रुग्णालयांनी या योजनेबाबत रुग्णालयाच्या दर्शनी भागात तसेच रेल्वे स्टेशन, बसस्थानक यांच्यासह विविध शासकीय कार्यालये आदी ठिकाणी या योजनेची माहिती देणारे फलक प्रदर्शित करावेत, माहिती देण्यासाठी रुग्णमित्र नियुक्त करण्यात यावेत. या रुग्णांना सर्व सेवा उपलब्ध करून द्याव्यात, निर्धन रुग्णांना पुर्णपणे मोफत तर गरीब रुग्णांना उपचारात 50 टक्क्यापर्यंत सवलत द्यावी. गरीब व निर्धन असलेल्यांना पुराव्यांची सक्ती न करता जिल्हाधिकारी  किंवा अधीनस्त अधिकाऱ्यांकडून प्राप्त पत्रांच्या आधारे दाखल करून घ्यावे, अशाही सूचना देण्यात आल्या. गरीब व निर्धन रुग्ण त्यांचेकडे  पुरेसे पुरावे  नसल्यास  पिवळे  रेशन  कार्ड  दाखवून  धर्मादाय रुग्णालयात उपचार घेऊ शकतात.
धर्मादाय रुग्णालयात निर्धन आणि गरीब रुग्णांना द्यावयाच्या आरोग्य सुविधांबाबत अधिक माहिती किंवा नोंदणीसाठी संबंधित रुग्णालय, जिल्हा शल्यचिकित्सक, धर्मादाय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

0000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...