Tuesday, June 8, 2021

 

महिलांनी आपल्या कामांबद्दल 

सदैव आत्मसन्मान बाळगणे गरजेचे

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

कार्यालयीन ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेबाबत कार्यशाळा संपन्न 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- कोणतीही जबाबदारी पार पाडताना आत्मसन्मान तेवढाच महत्वाचा असतो. जोपर्यंत आपण हाती घेतलेल्या कामाला आत्मसन्मानाची जोड देणार नाही तोपर्यंत आपल्यावर जी जबाबदारी सोपविली आहे किंवा आपण जे काम करतो त्याबद्दल इतराच्या मनामध्ये त्या कामाप्रती सन्मान वाढणार नाही, अशा शब्दात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी महिलांच्या योगदानाला अधोरेखित केले. प्रत्येक कार्यालयात महिलांसाठी प्रशस्त वातावरण असेल व त्यांच्या मनात सुरक्षिततेची खात्री होण्यासाठी कार्यालय प्रमुखांनी योग्य ती दक्षता घेतली पाहीजे. कार्यालयात काम करणाऱ्या महिलांचा व कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या महिलांचा कुठेही अवमान होणार नाही याचीही दक्षता कार्यालय प्रमुखावर आहे याचा विसर पडता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम-2013 व दि. 9 डिसेंबर 2013 च्या नियम अधिनियमातील तरतुदीनुसार प्रत्येक कार्यालय, आस्थापनेंतर्गत समिती गठीत करण्याबाबत आज कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झालेल्या या कार्यशाळेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन तथा अधिनियमातील जिल्हा अधिकारी दिपाली मोतीयाळे, महिला बाल विकास अधिकारी रेखा काळम, अप्पर पोलीस  अधिक्षक निलेश मोरे, उपजिल्हाधिकारी शरद मंडलिक, डॉ. उज्वला सदावर्ते, महिला बालसंरक्षण अधिकारी विद्या आळणे, सर्व विभाग प्रमुख प्रत्यक्ष उपस्थित होते. तर मुंबई बाल कल्याण समितीच्या ॲड. मनिषा तुळपुळे यांच्यासह तालुकास्तरावरील विभाग प्रमुखांनी या कार्यशाळेत ऑनलाईन सहभाग घेतला. 

कार्यालय, आस्थापनेच्या ठिकाणी अथवा इतरत्र जर एखाद्या महिलेला अन्यायाला सामोरे जावे लागत असेल तर या अधिनियमांतर्गत त्या महिलेला तात्काळ संरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे आहे. कार्यालय प्रमुख जर जबाबदार असतील तर त्या प्रत्येक कार्यालयात कोणत्याही महिलेवर अन्याय सहन करण्याची वेळ येत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. महिलांवरील अन्यायाच्या बऱ्याच तक्रारींची चौकशी केली असता असंख्य महिला कर्मचारी या आपल्यावर झालेल्या अथवा होत असलेल्या अन्यायाची माहिती देण्यास टाळाटाळ करतात. यापेक्षा महिलांनी जे असेल ते सत्य स्पष्टपणे सांगितल्यास त्यांची सुरक्षितता अधिक वाढेल, असेही वर्षा ठाकूर यांनी आजवर विविध तपासात निघालेल्या निष्कर्ष संदर्भ देऊन सांगितले. नांदेड जिल्हा प्रशासनातील कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांची भूमिका लक्षात घेता लवकरच आपण आपला जिल्हा सुरक्षित जिल्हा म्हणून ओळख निर्माण करुयात, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. 

जिल्ह्यातील महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी पोलीस अधिक्षक कार्यालयात भरोसा सेलची स्थापन करण्यात आली आहे. महिलांच्या तक्रारीवर दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून तेथे कार्यवाही केली जाते, असे अप्पर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी सांगितले. 

यावेळी मुंबई बाल कल्याण समितीच्या ॲड. मनिषा तूळपुळे यांनी अधिनियमातील सर्व नियमाचे विस्तृत मागदर्शन ऑनलाईनप्रणालीद्वारे केले. डॉ. उज्वला सदावर्ते यांनी सर्व कार्यालय प्रमुखांना या अधिनियमाबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच कार्यालयात काम करतांना महिलांनी आत्मविश्वास व सकारात्मकता ठेवून कर्तव्य पार पाडावे, असेही त्यांनी सांगितले. या कार्यशाळेचे संचलन महिला बाल विकास अधिकारी रेखा काळम यांनी केले.

00000



 

नांदेड जिल्ह्यात 116 व्यक्ती कोरोना बाधित

दोघांचा मृत्यू तर  124 कोरोना बाधित झाले बरे  

नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 526 अहवालापैकी  116 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 49 तर अँटिजेन तपासणीद्वारे 67 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 561 एवढी झाली असून यातील 87 हजार 490 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 654 रुग्ण उपचार घेत असून 14 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

दि. 7 जून रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे देगावचाळ नांदेड येथील 74 वर्षाच्या पुरुषाचा तर 8 जून रोजी भगवती कोविड रुग्णालय नांदेड येथे किनवट येथील 52 वर्षाच्या पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 893 एवढी आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 18, देगलूर 1, लोहा 2, परभणी 2, नांदेड ग्रामीण 8, हदगाव 3, माहूर 1, यवतमाळ 1, अर्धापूर 1, कंधार 1, मुखेड 3, हिंगोली 1, बिलोली 1, किनवट 4, उमरी 2 तर ॲन्टिजन तपासणीद्वारे  नांदेड मनपा 31, माहूर 2, परभणी 1, नांदेड ग्रामीण 15, मुखेड 4, हिंगोली 3, हदगाव 3, देगलूर 3, किनवट 4, लोहा 2 असे एकूण 116 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 124 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 2, हदगाव कोविड रुग्णालय 1, लोहा कोविड रुग्णालय 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 83, किनवट कोविड रुग्णालय 6, हिमायतनगर तालुक्यांतर्गत 1, मुखेड कोविड रुग्णालय 5, माहूर तालुक्यांतर्गत 1, खाजगी रुग्णालय 24  व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 654 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  24, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 34,  मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर  1, किनवट कोविड रुग्णालय 20, देगलूर कोविड रुग्णालय 7,  हदगाव कोविड रुग्णालय 6, लोहा कोविड रुग्णालय 2,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 354, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरण 156, खाजगी रुग्णालय 49 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 111, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 123 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 61 हजार 739

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 59 हजार 862

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 561

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 490

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 893

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.60 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-16

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-202

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 654

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-14                                   

00000

 

लसीकरणासाठी दोन्ही गटातील व्यक्तींना

दुसऱ्या डोससाठीच उपलब्धतेप्रमाणे मिळणार लस

जिल्ह्यातील 94 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 94 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. कोव्हॅक्सीनची लस ही 18 ते 44 व 45 वर्षावरील वयोगटातील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी देण्यात येणार आहे. दिनांक 9 जून रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 11 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर व सिडको या 10 केंद्रावर कोविशील्डचा 45 वर्षावरील व्यक्तींना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल. या केंद्रांना प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.

 

या व्यतिरिक्त कोव्हॅक्सीन ही लस दोन्ही गटासाठी श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर व सिडको अशा एकुण 11 केंद्रांवर प्रत्येकी 150 डोस याप्रमाणे उपलब्ध करुन दिली आहेत. या ठिकाणी 18 ते 44 व 45 वर्षांवरील दुसऱ्या डोससाठी दिली जाईल.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्डचे ही लस प्राधान्याने 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठीच दिली जाईल. येथे प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

 

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी अशा एकुण 16 केंद्रांवर कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध केली आहे. या प्रत्येक केंद्रांना प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले असून हे डोस 18 ते 44 व 45 वर्षांवरील व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठीच दिले जातील. जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणासाठी कोविशील्ड ही लस उपलध करुन देण्यात आली असून याठिकाणी 45 वर्षावरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी राहील. या सर्व 67 केंद्रांवर प्रत्येकी 100 याप्रमाणे डोस उपलब्ध करुन दिले आहे.

 

18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थींचे पहिल्या डोसचे लसीकरण तात्पुरते थांबविण्यात आले आहे. जिल्ह्यात 7 जून पर्यंत एकुण 4 लाख 45 हजार 932 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 8 जून पर्यंत कोविड-19 लसीचासाठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 4 लाख 27 हजार 330 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 40 हजार डोस याप्रमाणे एकुण 5 लाख 67 हजार 330 डोस प्राप्त झाले आहेत. कोविशील्डचे डोस 45 वर्षावरील व्यक्तींसाठी दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत. तर कोव्हॅक्सीनचे डोस हे 18 ते 44 वयोगट व 45 वर्षावरील (दुसरा डोस) वयोगटासाठी उपलब्ध आहे.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसकरीता cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. तसेच Appointment Session Site Confirm झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

खरीप हंगाम पेरणीपूर्व जनजागृती मोहिमेचा

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे हस्ते प्रारंभ

फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना थेट बांधावरून मार्गदर्शन

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रयोग, बीज प्रक्रिया, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतमात्रा देणे व रुंद वरंबा सरी पद्धतीनुसार सोयाबीन लागवड करणे हे तंत्रज्ञान शासनमान्य, कृषी विद्यापीठाने मान्यताप्राप्त केलेले आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उत्पादनात वाढ होत आहे. शेतकऱ्यांनी त्याचा जास्तीत जास्त वापर करून चांगले उत्पादन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची त्यांनी प्रशंसा केली.

 

राज्य शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने नांदेड तालुक्यातील तुप्पा येथे शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम पेरणीपूर्व जनजागृती मोहिमेचे आयोजन आज तुप्पा गावातील शेतकरी एकनाथ कदम यांच्या शेतात करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर बोलत होते. या जनजागृती मोहिमेच्या कार्यक्रमात सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी प्रयोग, बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक, जमीन सुपीकता निर्देशांकानुसार द्यावयाची खत मात्रा, दहा टक्के रासायनिक खतांची बचत करणे आणि बीबीएफ तंत्रज्ञानावर सोयाबीन लागवडीचे प्रात्यक्षिक घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना थेट बांधावरून मार्गदर्शन करण्यात आले.

 

या कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने सोयाबीन लागवडीचे तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो. अतिरिक्त पाण्याचा निचरा होऊन, फवारणी करणे सोपे जाते. तसेच पेरणीसोबतच एकाचवेळी बियाणे व खते देणे शक्य होते. खते ही बियाण्यापेक्षा खोल पडत असल्याने पिकास पुरेसे मिळतात व ते वाया जात नसल्याचे सांगितले.

 

कृषी सहायक वसंत जारीकोटे यांनी बियाणे उगवण क्षमता चाचणी करण्याच्या गोणपाट पद्धत, पेपर रोल पद्धत, व शीघ्र पद्धतीविषयी प्रात्यक्षिक रूपाने माहिती दिली. तसेच रासायनिक बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया, जैविक पद्धतीने बीज प्रक्रिया कशी करावी याविषयी माहिती दिली. या प्रत्यक्षिकासाठी कृषी सहायक अर्चना कास्टेवाड व चंद्रकांत भंडारे यांनी सहकार्य केले.

 

नांदेड कापूस संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अरविंद पांडागळे यांनी जमीन सुपीकता निर्देशांकानुसार खताची मात्रा कशी घ्यावी हे शेतकऱ्यांना समजावुन सांगून, दहा टक्के रासायनिक खतांमध्ये बचत करण्याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक उपविभागीय कृषी अधिकारी रविकुमार सुखदेव यांनी केले.

 

या कार्यक्रमासाठी, परिविक्षाधीन आयएएस अधिकारी श्री. कार्तीकी, कृषी विकास अधिकारी संतोष नादरे, नांदेडचे तालुका कृषी अधिकारी सिद्धेश्वर मोकळे, पोखर्णी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, नांदेडचे मंडळ कृषी अधिकारी सतीश सावंत, प्रगतशील शेतकरी आनंदराव तिडके, तुप्पाचे कृषी पर्यवेक्षक गोपाळ चामे, कृषी सहायक श्रीमती अर्चना कास्टेवाड, चंद्रकांत भंडारे, श्रीमती बर्डे यमुना, मोरलवार वैशाली, मगर उज्वला, तुप्पा गावच्या सरपंच सौ. मंदाकिनी यन्नावार, उपसरपंच प्रतिनिधी दत्ता कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव कदम, जय जवान जय किसान शेतकरी बचतगटाचे अध्यक्ष किशोर कदम, सदस्य माधव कदम, साईनाथ कदम, संजय कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 

या जनजागृती मोहिमेचे यशस्वीपणे आयोजन करण्यासाठी कृषी मित्र सुरेश कदम, हरी कदम, कृषी सहायक श्रीमती अर्चना कास्टेवाड आदींनी परिश्रम घेतले. जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांच्या हस्ते कृषी विभागातील कृषी अधिकारी, कर्मचारी व बचगटातील प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. शेवटी रवी पंडित यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

000000





महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...