Monday, March 7, 2022

 अनोळखी मयत महिलेचा शोध

 ·  ओळख पटल्यास संपर्क साधण्याचे आवाहन    

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- बंदाघाट येथील गोदावरी नदीपात्रात साधारणता 1 मार्च रोजी दुपारी 1.45 वा. एका अनोळखी मयत महिलेचा मृतदेह आढळला आहे. या महिलेचे वय साधारण 25 ते 30 वर्षाच्या दरम्यान आहे. या महिलेचा रंग सावळा असून अंगात काळ्या रंगाची ब्रा आहे. ही अनोळखी महिला मान, दोन्ही हात, आणि पोटापासून खालचा भाग कापलेल्या अवस्थेत आढळली आहे. पोलीस स्टेशन वजिराबाद नांदेड येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास सुरू आहे. या मयत महिलेच्या नातेवाईकांनी तिची ओळख पटत असल्यास त्यांनी वजिराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांचा मो. 8788797077, 9923696860 तर दूरध्वनी क्र. 02462-236500 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी केले आहे.

000000 

नांदेड जिल्ह्यात 4 व्यक्ती कोरोना बाधित

तर 5 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 865अहवालापैकी 4 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 778 एवढी झाली असून यातील 1 लाख 70 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 17 रुग्ण उपचार घेत असून यात 1 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 691 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, उमरी 1, निझामबाद 1 असे एकुण 4 कोरोना बाधित आढळले आहे. 

आज नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 4, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 असे एकुण 5 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 3, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 5, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 9 असे एकुण 17 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 82 हजार 410

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 62 हजार 618

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 778

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 70

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 691

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.36 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-10

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-17

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-1. 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

 जिल्हाधिकारी कार्यालयात पेन्शन अदालत  

नांदेड (जिमाका) दि. 7  :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 8 मार्च 2022  रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.    

जिल्ह्यामधील महसूल विभागातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडचणी निवारण्यासाठी 8 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत उपस्थित राहून तक्रारीचे निवेदने दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 नांदेड तालुक्यातील आठ गावातील 

गावठाणातील मिळकतीचे नकाशे होणार वितरीत 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- नांदेड तालुक्यातील वानेगाव, पोखर्णी, धनगरवाडी, गाडेगाव, कोर्टतीर्थ, वरखेड, थुगाव, दर्यापूर या गावातील गावठाणातील घराचे ड्रोनद्वारे गावठाण मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. या गावठाणातील मिळकतीचे सनदा (नकाशे) तयार झाली आहेत. या सनदा भूमि अभिलेख कार्यालयाकडून 10 ते 12 मार्च 2022 या कालावधीमध्ये त्या-त्या गावात वितरीत करण्यात येणार आहेत. गावातील नागरिकांनी गावात उपस्थित राहून विहित शासकीय शुल्क भरणा करुन ही सनदा (नकाशे) प्राप्त करुन घ्यावीत, असे आवाहन नांदेडचे उपअधिक्षक भूमि अभिलेख यांनी केले आहे.

00000

 महिला दिनानिमित्त योग प्रशिक्षण संपन्न 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नांदेड जिल्हा परिषद, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग व शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी योग प्रशिक्षणाचा कार्यक्रम येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात नुकताच घेण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी मार्गदर्शन केले. 

योग प्रशिक्षण डॉ. देशपांडे यांनी दिले. यावेळी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील, महिला व बालविकास अधिकारी श्रीमती रेखा काळम, शिक्षणाधिकारी श्रीमती सविता बिरगे, कौशल्य विकासचे सहायक आयुक्त श्रीमती रेणूका तम्मलवार, समन्वयक श्रीमती शितल चव्हाण, कर्मचारी आदी उपस्थित होते. कौशल्य विकास विभागाकडून प्रशिक्षण घेतलेले योगा थेरपी असिस्टंटचे सर्व प्रशिक्षणार्थी यांनीही यात सहभाग नोंदवला होता.

00000




 जागतिक महिला दिन साजरा करण्याच्या सूचना 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी जिल्ह्यात साजरा करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाने कोविड-19 संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचना व कोविड-19 च्या सुरक्षा उपाययोजनेच्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घेऊन जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध कार्यालयांना देण्यात आले आहेत.   

जागतिक महिला दिन साजरा करण्याबाबत शासन परित्रकाद्वारे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सूचना निर्गमीत केल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहलिसदार, जिल्हा व सत्र न्यायालय प्रबंधक, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलसचिव, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जि. प., जिल्हा महिला बालविकास अधिकारी जि.प., बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक जि. प., उपजिल्हाधिकारी (सामान्य) नांदेड यांना या सूचना निर्गमीत केली आहे. 

शासन परिपत्रकातील दिलेल्या सुचनेप्रमाणे मंगळवार 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजन करुन केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल शासन व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही पत्रात नमूद केले आहे.

00000

 

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...