Friday, August 31, 2018


महसूल दिन उत्साहात संपन्न

शासनाच्या विविध योजनांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करुन
नागरिकांपर्यंत योजना पोहचवाव्यात
--- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे  


नांदेड दि. 31 :-   महसूल विभाग हा महत्वाचा भाग असून सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करुन नागरिकांपर्यंत योजना पोहचवाव्यात. तसेच समन्वय ठेवून कामे करावीत, असेही जिल्हाधिकारी डोंगरे यांनी सांगितले.
  विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील म्हणाले की, विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून लोकांच्या कल्याणाकरिता प्रयत्न करावेत. ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती देण्यात यावी. या महत्वपूर्ण योजना तळागाळापर्यंत पोहचाव्यात व त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असेही विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.  
जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्यावतीने महसूल दिन डॉ. शंकरराव चव्‍हाण प्रेक्षागृह नांदेड येथे आज उत्साहात संपन्न झाला. महसूल दिन कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेड परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे हे उपस्थित होते. मनपा आयुक्त लहुराज माळी, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
       
  यावेळी जिल्ह्यातील 27 सेवानिवृत्‍त अधिकारी, कर्मचारी यांचा शाल व श्रीफळ देऊन सपत्‍नीक सत्‍कार करण्‍यात आला. महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्‍या एकुण 12 गुणवंत पाल्‍यांना डिक्शनरी व प्रशिस्‍तीपत्र देऊन सन्‍मान करण्‍यात आला. तसेच जिल्‍हयातील एकूण 55 उत्‍कृष्‍ट अधिकारी कर्मचारी यांचा प्रशिस्‍तीपत्र देऊन गौरव करण्‍यात आला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक निवासी उपजिल्‍हाधिकारी संतोष वेणीकर यांनी  केले.
           सुत्रसंचलन नायब तहसिलदार मुगाजी काकडे स्‍वामी यांनी केले. कार्यक्रमास जिल्‍हयातील महसूल अधिकारी, कर्मचारी बहुसंख्‍येने उपस्थित होते. शेवटी तहसिलदार अरविंद नर्सीकर यांनी आभार मानले.
            याप्रसंगी महसूल दर्पण या त्रैमासिकाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.  
****


वेतन पडताळणी पथकाचा दौरा
नांदेड, दि. 31 :- वेतन पडताळणी  पथकाचा माहे सप्टेंबर 2018 चा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आयोजित केला आहे, असे सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी कळविले आहे. 
हे पथक बुधवार 26 सप्टेंबर 2018 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड येथे गुरुवार 27 सप्टेंबर ते शनिवार 29 सप्टेंबर 2018 काळात जिल्हा व तालुकास्तरावरील इतर कार्यालयाची वेतन पडताळणी करील. त्यासाठी हे पथक या कालावधीत कोषागार कार्यालय नांदेड येथे उपस्थित राहील. ज्या कर्मचाऱ्यांचे दि. 1 जानेवारी 2006 रोजीची वेतन पडताळणी अद्याप झालेली नाही त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी केले आहे.
00000


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश
नांदेड, दि. 31 :- जिल्ह्यात बुधवार 29 ऑगस्ट 2018 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 29 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 12 सप्टेंबर 2018 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
000000


लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन
नांदेड, दि. 31 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सोमवार 3 सप्टेंबर 2018 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे. यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्या‍त आले आहे.
या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.
न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे. 
लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या पुढील महिण्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.         
00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...