Saturday, October 15, 2022

 महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी

प्रोत्साहनपर अनुदानाच्या पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी जाहीर

▪️उर्वरीत पात्र शेतकऱ्यांची यादी लवकरच होणार प्राप्त
▪️आधार प्रमाणिकरण करण्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 15:- महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी जिल्ह्यातील सुमारे 59 हजार 413 शेतकऱ्यांची माहिती शासनास ऑनलाईन पाठविण्यात आली. यापैकी पहिल्या टप्प्यात योजनेसाठी मुदती कर्ज परतफेड करणाऱ्या 8 हजार 889 शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठविण्यात आला आहे. सर्व संबंधित पात्र शेतकऱ्यांनी प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र, ई-सेवा केंद्र अथवा संबंधित बँकेच्या शाखेत जाऊन आधार प्रमाणिकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
इतर पात्र शेतकऱ्यांचा विशिष्ट क्रमांकासह याद्या येत्या काही दिवसात प्राप्त होणार आहेत. ही प्रक्रिया संपूर्ण संगणिकृत असल्याने पात्र शेतकऱ्यांनी गोंधळून न जाता आपल्या मोबाईलवर विशिष्ट क्रमांक प्राप्त झाल्यानंतर संबंधित बँक, आपले सेवा केंद्र येथे जाऊन आधार प्रमाणिकरण करून घेण्याची प्रक्रिया पार पाडावी, असेही जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
0000000

 जिल्ह्यातील 1066 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा

4 लाख 11 हजार 896 पशुधनाचे लसीकरण

नांदेड (जिमाका) दि. 15 :- लम्पीच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनामार्फत व्यापक लसीकरणावर भर देण्यात आला आहे. आजच्या घडीला 4 लाख 11 हजार 896 पशुधनाचे लसीकरण पुर्ण झाले आहे. 1066 गायवर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे तर आज पर्यंत 45 पशुधन लम्पी आजारामुळे मृत पावले आहेत. लम्पी चर्म रोगाने मृत झालेल्या जनावराच्या 20 पशुपालकांना शासनाच्या निकषानुसार अर्थसहाय्य देण्यात आले आहे. या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे हे अर्थसहाय्य जमा करण्यात आले आहेत. इतर प्रकरणाचे प्रस्ताव जसे येत आहेत त्याप्रमाणे निकषानुसार प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी दिली.
लम्पी हा आजार गोठ्यातील अस्वच्छता, पशुधनाच्या अंगावरील गोचिड व इतर किटकांमुळे होण्याचा संभव अधिक असतो. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामपातळीवर जाऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.
आजच्या घडीला नांदेड जिल्ह्यातील 120 गावे लम्पी बाधित आहेत. या 120 गावातील एकुण गाय वर्ग पशुधन हे 51 हजार 735 एवढे आहे. यातील 1066 बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बाधित गावाच्या 5 किमी परिघातील गावांची संख्या 600 एवढी आहे. एकुण गावे 720 झाली आहेत. या बाधित 120 गावांच्या 5 किमी परिघातील 720 गावातील (बाधित 120 गावांसह) एकुण पशुधन संख्या ही 1 लाख 87 हजार 700 एवढी आहे. लम्पीमुळे मृत पशुधनाची संख्या 45 एवढी झाली आहे. पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या पशुची स्वच्छता, गोठ्यातील स्वच्छता व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
0000

 25  टक्के आगाऊ नुकसान भरपाई तातडीने

देण्याचे जिल्हाधिकारी यांचे विमा कंपनीला निर्देश

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्य़ामध्ये अतिवृष्टी मुळे 50 टक्के पेक्षा अधिक नुकसान दिसून आलेले आहे. त्यामुळे नुकसानीच्या 25 टक्के आगाऊ रक्कम तातडीने सोयाबीन, कापुस, ज्वारी व तूर या पिकाचा विमा भरलेल्या जिल्ह्य़ातील सर्व शेतक-यांच्या खात्यात जमा करावी असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी युनायटेड इन्शुरन्स कंपनीला दिले. जिल्हा स्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यासंदर्भात कंपनी स्तरावर कार्यवाही सुरू असल्याचे त्यांच्या प्रतिनिधीने सांगितले.

0000

14.10.2022.

 लेख :


वाचन संस्कृतीचे बदलते स्वरूप

 

एकविसावे शतक परिवर्तनाचे शतक असे म्हटले जाते. यात प्रत्येकाच्या  कामाच्या स्वरूपात त्याच्या राहणीमानात बदल घडून येत आहेत. प्रत्येकाच्या  आवडी निवडीमध्ये बदल होणे स्वाभाविक आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे  माणसाची वाचनाची आवड कमी होत आहे. याला केवळ टिव्ही वाहिन्याचा, सोशल मिडीया प्रकर्षाने कारणीभूत दिसतो.

 

 एकीकडे तरूणांना परिक्षेला नेमूण दिलेली पुस्तके वाचण्याचासुध्दा कंटाळा येतो तर दुसरीकडे मात्र व्यक्तिमत्व विकास, करिअरशी संबंधित वाचक वर्ग वाढतो आहे .याचा अर्थ असा की वाचन संस्कृती बदलते आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात आवश्यक असणारी पुस्तके विकत घेतली जातात.  करिअर ओरियटेड पुस्तकांचा ओढा हा तरुण पिढीला आकर्षित करीत आहे. एखादी  कांदबरी किंवा कथाचे पुस्तक विकत घेतल्यास ते एकदा वाचून झाल्यानंतर पुन्हा वाचनाची आवड होत नाही तर पाककला, स्वास्थ संवर्धन, मनाची एकाग्रता हे पुस्तके वाचकांच्या पसंतीस उतरताना दिसतात.

 

तरुणांचा ओढा एखाद्या जीमला जाण्याकडे ज्याप्रमाणे आहे, तो ओढा वाचनाच्या सवयीकडे दिसत नाही. वाचकांना विविध पर्याय उपलब्ध आहेत. एखादे आवडीचे पुस्तक नेहमीसाठी जवळ राहावे म्हणून आर्वजून विकत घेवून त्यांची साठवणूक करण्याचा एक विशिष्ट वर्ग आहे. यामुळे पूर्वीपेक्षा आज पुस्तके विकत घेण्याचे प्रमाण वाढले असल्याचे पुस्तक विक्रेते सांगतात.

 

भारतामध्ये साधारण 10 तासामध्ये 42 मिनिटे लोक वाचतात असे एक सर्वेक्षणावरून निदर्शणास आले आहे. वाचन वर्ग वाढविण्यासाठी घरपोच ग्रंथालय हा उपक्रम पुणे येथे सुरू करण्यात आला आहे. पुस्तके घरपोच उपलब्‍ध होत असल्याने वाचकांना ग्रंथालयात जाऊन पुस्तक घेवून येण्याचा त्रास कमी झाला. यामुळे घरपोच पुस्तके उपलब्ध झाल्याने वाचकवर्ग वाढण्यास मदत होताना दिसते.

 

सोशल मीडियाचा वाढता प्रभाव

सोशल मीडियाचा वाढता प्रभाव जनमानसावर मोठ्या प्रमाणात झालेला आहे. माहितीचे सर्व साधने सोशल मीडियावर उपलब्ध असल्याने ट्विटर, फेसबुक, इस्टाग्राम, युट्युब या सर्व साधणावर माहिती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. यामुळे आजचा तरूण वर्ग आपली वाचनाची आवड मोबईलव्दारे पूर्ण करू लागला आहे.

 

देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या 15 ऑक्टोबर हा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे लेखन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार करण्याची दूरदृष्टी, शक्तीशाली कृती करण्याची प्रेरणा आणि चेतना देण्याचे काम करीत आहेत. मुळातच विद्यार्थ्यांमध्ये व समाजाच्या इतर घटकांमध्ये वाचनाची आवड, ओढ व प्रेरणा निर्माण व्हावी, तसेच विद्यार्थ्यांना आयुष्यात वाचनाचे महत्त्व पटावे, या दृष्टिने वाचन प्रेरणा दिन महत्वाचा आहे. वाचन संस्कृतीचा विकास व प्रसार ज्ञानसंपन्न आणि माहिती समृद्ध समाज घडण्यासाठी आणि भाषाविकास यासाठी आवश्यक आहे. मुळातच वाचन संस्कृती ही व्यक्तिमत्व विकास घडविण्याचे काम करीत असते.

 

श्वेता पोटुडे-राऊत

माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड

 शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीसाठी

22 ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ


नांदेड (जिमाका) दि. 15 :-राज्याच्या काही भागात उशिराच्या मान्सूनमुळे काही शेतकऱ्यांना अद्यापही आपली ई-पीक पाहणी पूर्ण करता आलेली नाही. याचा विचार करुन जमाबंदी आयुक्त पुणे यांच्या मान्यतेने मोबाईल ॲपद्वारे शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीची कालमर्यादा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे खरीप हंगाम 2022 च्या शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीची कालमर्यादा 22 ऑक्टोंबर 2022 पर्यंत वाढचिण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच तलाठी स्तरावरील ई-पीक पाहणीचा कालावधी 23 ऑक्टोंबर ते 15 नोव्हेंबर 2022 असा करण्यात येत आहे. खरीप हंगाम 2022 ची ई-पीक पाहणी करण्यासाठी ही अंतिम मुदतवाढ आहे.

 

जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, कृषि सहाय्यक तसेच मंडळ कृषि अधिकारी आणि सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन राज्य समन्वय, ई-पीक पाहणी प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय तथा उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांनी केले आहे.   

 

राज्यव्यापी केलेल्या ई-पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे या कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. सध्या खरीप 2022 हंगामाची पीक पाहणीची कार्यवाही सुरू आहे. खरीप हंगाम 2022 च्या ई-पीक पाहणीच्या नोंदणीसाठी ई-पीक पाहणीचे 2.0.4 हे अपडेटेड व्हर्जन गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध करून दिले आहे. खरीप हंगाम 2022 ची ई-पीक पाहणी प्रत्यक्ष मोबाईल ॲपद्वारे करण्यासाठी 15 ऑक्टोंबर 2022 पर्यंत मुदत देण्यात आली होती.

0000

 समस्याग्रस्त व पीडित महिलांसाठी

17 ऑक्टोंबर रोजी महिला लोकशाही दिन 

 

नांदेड, (जिमाका) दि. 15:-  समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार 17 ऑक्टोंबर 2022 रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

 

दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 17 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमूद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...