Friday, September 2, 2016

तांडा विकासासाठी, रोजगाराच्या स्थानिक संधी निर्माण
करण्यासाठी प्रयत्न – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिंदे
शिकारातांडा येथे हृदय कार्यक्रमात शिंदे यांचा सत्कार
नांदेड, दि. 2 :- तांडा, वस्त्याचा विकास झाला पाहीजे. रस्ता, पाणी, वीज यासारख्या सुविधांसह रोजगाराच्या संधीही निर्माण व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले जातील, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुखेड तालुक्यातील शिकारातांडा येथे सांगितले. दुष्काळाच्या परिस्थितीत स्थलांतरित झालेल्या शिकारातांडावरील कुटुंबाना मंत्री श्री. शिंदे यांनी ठाणे येथे हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दुष्काळग्रस्त छावणीत व्यवस्था केली होती. त्यांच्या निवासाची आणि रोजगाराची व्यवस्था केली होती. त्या कुटुंबाना श्री. शिंदे यांनी थेट शिकारातांडा येथे भेट देऊन, काही मुलांना शिष्यवृत्तीचेही वाटप केले. यामुळे शिकारातांडावरील या कुटुंबानी आपुलकीने श्री. शिंदे यांच्या स्वागताची मोठी तयारी केली. शिकारातांडाच्यावतीने श्री. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
शिकारातांडा शिवारात झालेल्या या हृदय कार्यक्रमास खासदार राजन विचारे, आमदार डॅा. तुषार राठोड, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, उपविभागीय अधिकारी प्रवीण धरमकर, शिवसेनेचे पदाधिकारी भुजंग पाटील, मिलिंद देशमुख, भगवान राठोड आदींचीही उपस्थिती होती.
सुरवातीला शिकारातांडा आणि जुन्ना ग्रामपंचायतीच्यावतीने श्री. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. शिकारातांडाच्या सरपंच संगीताबाई इमरे, उपसरपंच रामेश्र्वर चिटगीरे, शिवाजी राठोड, उत्तम बनसोडे, वसंत संभुटवार आदींनी सत्कार केला.
याप्रसंगी बोलताना श्री. शिंदे म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीतील दौऱ्यानंतर आता यावर्षी पुन्हा पाहणीसाठी दौरा करण्यात येत आहे. लोकसहभाग, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी एकत्रित काम केले तर या भागाचा कायापालट होऊ शकतो हे या दौऱ्यातून दिसून आले. जलयुक्त शिवार अभियानात पावसाचा पडलेला थेंब शिवारात अडविला जाणार आहे.
शिकारातांडावासियांसोबत आता आपली कौटुंबिक नाते निर्माण झाल्याचे नमूद करून श्री. शिंदे म्हणाले की, रस्ता, पाणी, वीज या सुविधा तांडा-वस्त्यांना मिळाल्या पाहिजेत. या परिसरातील नागरिकांचे रोजगारासाठी स्थलांतर होऊ नये , अशी अपेक्षा आहे. त्यांना याच परिसरात काम मिळाले पाहिजे असा प्रयत्न असेल. तांडा विकास निधीच्या माध्यमातूनही या परिसरात सुविधा निर्माण करता येतील. तांड्यावरील मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शालेय साहित्य मिळावे असा उद्देश आहे. मुलांना शिक्षणामुळे समाजाच्या मुख्यप्रवाहात आली पाहिजेत यासाठी प्रयत्न करा, असेही त्यांनी सांगितले.
सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज व हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. श्री. संभूटवार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी भातू तांडा व शिकारातांडा येथे माँसाहेब मिनाताई ठाकरे शिष्यवृत्ती योजनेतील निधीचेही वितरण करण्यात आले. पाठ्यपुस्तक व शालेय साहित्यासाठी हा निधी देण्यात आला. यावेळी आमदार डॅा. राठोड यांचे समयोचित भाषण झाले. अनुसयाताई चव्हाण यांनी दुष्काळी परिस्थितीत ठाणे येथे मंत्री श्री. शिंदे यांनी संवेदनशीलतेने केलेल्या मदतीबाबत आपल्या भावना व अनुभव मांडले. श्री. शिंदे यांनी तांड्यावरील कुटुंबियांशीही आस्थेवाईक संवाद साधला.

000000
जलयुक्तच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे
मराठवाडा दुष्काळमुक्ती दृष्टीपथात – एकनाथ शिंदे
मांजरम, जुन्ना शिवारात जलपूजन संपन्न

नांदेड, दि. 2 :- जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविल्याचे परिणाम आता दृश्य स्वरुपात दिसू लागले आहेत. लोकप्रतिनिधी, लोकसहभाग आणि जिल्हा प्रशासनाने समन्वयाने केलेल्या कामांमुळे मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे उद्दीष्ट साध्य होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी नायगाव तालुक्यातील मांजरम येथे केले. मांजरम ते सांगवी या नाल्याच्या खोलीकरण, रुंदीकरण आणि सरळीकरणामुळे उपलब्ध झालेल्या जलसाठ्याचे जलपूजन श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. श्री. शिंदे यांनी नांदेड जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांसाठी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदनही केले. 
मौजे मांजरमच्या शिवारात झालेल्या या कार्यक्रमास खासदार राजन विचारे, मांजरमचे  सरपंच प्रकाश शिवारेड्डी, उपसरपंच गणपतराव गायकवाड यांच्यासह जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, उपविभागीय अधिकारी शरद पवार, डी. दानापुरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, तहसिलदार व्यंकटेश मुंडे, गटविकास अधिकारी एम. एस. चव्हाण, कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू, शिवसेनेचे पदाधिकारी भुजंग पाटील, मिलिंद देशमुख आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना श्री. शिंदे म्हणाले की,  गतवर्षी दुष्काळी परिस्थितीचा पाहणी दौरा केला होता. दुष्काळमुक्तीसाठीच जलयुक्त शिवार अभियानाची अंमलबजावणी सुरु झाली. आता या योजनेचा शेतकऱ्यांना चांगलाच फायदा झाल्याचे जाणवते. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी पाणी उपलब्धतेची शाश्वती या योजनेतून निर्माण झाली आहे. लोकसहभाग स्थानिक लोकप्रतिनिधी समन्वय आणि लोकसहभागामुळे या योजनेत नांदेड जिल्ह्यातही प्रभावी काम झाल्याचे दिसून येते आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांवर कायमस्वरुपी उपाय योजता आल्या पाहिजेत, अशी सरकारची भुमिका आहे. आता यामुळे भुजलस्तर उंचावण्यासाठी मदत होणार आहे. यावर्षी पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे सध्यातरी पाणी टंचाई भासणार नाही, पण यापुढेही पाणी टंचाई भासू नये यासाठीही सरकार प्रयत्न करत राहील. त्यासाठी जिल्हा प्रशासनालाही काम करावे लागेल.
यावेळी श्री. शिंदे यांनी मांजरम ते सांगवी या 29 किलोमीटर अंतराच्या नाल्याचे दहा किलोमीटरचे काम लोकसहभाग, स्वयंसेवी संस्था आणि जिल्हा प्रशासन यांनी प्रभावीपणे पुर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले. या नाल्यामध्ये आता 343.70 सघमी पाणीसाठा  होणार आहे. या जलयुक्त शिवार अभियानात समाविष्ट दोन गावांसाठीच्या या कामांमुळे अकरा गावांना फायदा होणार आहे.
सुरवातीला पाण्याचे विधीवत जलपूजन श्री. शिंदे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कुसूमताई चव्हाण कन्या विद्यामंदिराच्या मुलींनी स्वागत गीत सादर केले. राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील धनादेशांचे सुनिता आढाव, रमाबाई हनुमंते, पद्मिनी साखळे, बाबाराव कदम, मेहताबी शेख यांना वितरण करण्यात आले. यावेळी मांजरम, कुंटूर आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते. यानंतर श्री. शिंदे यांनी नजिकच्या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधला व पीक परिस्थिती जाणून घेतली. 

जुन्ना-बेरळी नाल्यावर श्री. शिंदे यांच्या हस्ते जलपूजन
नांदेड लघुपाटबंधारे उपविभागाच्यावतीने मुखेड तालुक्यातील जुन्ना शिवारातील जुन्ना-बेरळी नाल्यावर श्री. शिंदे यांच्या हस्ते जलपूजन संपन्न झाले. याप्रसंगी आमदार डॅा. तुषार राठोड यांच्यासह परिसरातील नागरिक तसेच जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, कार्यकारी अभियंता श्री. शाहू आदींची उपस्थिती होती.

00000
गणेश उत्सव मंडळांनी परवान्यासाठी
 ऑनलाईन नोंदणीकरण्याचे आवाहन
नांदेड, दि. 2 :-  गणेश  उत्सव मंडळांना  धर्मादाय  उपआयुक्त  कार्यालयमार्फत  शनिवार 3 सप्टेंबर 2016 पर्यंत  कार्यालयीन  वेळेत परवाना देण्याचे काम चालू आहे. ही परवानगी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करणे आवश्यक राहील. जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी ऑनलाईन  परवानगी  घेवूनच  वर्गणी गोळा करावी, असे आवाहन धर्मादाय उपआयुक्त कार्यालय नांदेड यांनी केले आहे.

000000
उत्पादन शुल्क विभागाची कार्यवाही 
अवैध दारु जप्त , 50 जणांविरुद्ध गुन्हे दाखल
  नांदेड, दि. 2 :- राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नांदेड जिल्ह्यातील अवैध धंदाचे उच्चाटन करण्यासाठी नुकतेच विशेष मोहिम राबवून दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत 50 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये  देशीदारु, गुळ मिश्रीत रसायन हातभट्टी, ताडीसह एक बजाज रिअर ॲटो असे अंदाजे 1 लाख 98 हजार 755 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त व्ही. जी. इंदिशे व औरंगाबाद विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार यांच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक जी. डी. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली  ही कार्यवाही करण्यात आली. यामध्ये निरीक्षक एस. एस. खंडेराय, डी. एन. चिलवंतकर, एस. व्ही. पाटील, श्री. घुगे, हिप्परगे, फुलारी, मंडलवार, घोरतळे, त्रिमुखे, गोणारकर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.    

000000
जिल्हा बँकेच्या उर्जीतावस्थेसाठी सर्वतोपरी सहकार्य
- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिंदे
नांदेड, दि. 2 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम ) मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सदिच्छा भेट दिली. यावेळी बँकेचे अध्यक्ष तथा आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हा बँकेच्या अडचणी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठक घेण्यात येईल , असे मंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, बँकेचे संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय कदम आदींची उपस्थिती होती. बँकेचे अध्यक्ष आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी बँकेविषयी माहिती दिली. बँकेला उर्जीतावस्था आणण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलतांना मंत्री शिंदे म्हणाले की , शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी जिल्हा बँकेची भुमिका महत्वपूर्ण असते. सहकार क्षेत्राच्या विकासातही बँकांचे मोठे योगदान आहे. जिल्हा बँका सर्वसामान्यांना मदत करण्याच्या भावनेने काम करीत आहे म्हणून राज्य शासनाकडून अडचणीत असलेल्या बँकांचे प्रलंबीत प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही सांगितले.  
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिंदे यांनी घेतले गुरुद्वारात दर्शन
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिंदे यांनी आज नांदेड दौऱ्यात सुप्रसिद्ध हजूरसाहेब सचखंड गुरुद्वारास येथे भेट देवून दर्शन घेतले. यावेळी त्यांचा पारंपारिक पद्धतीने केसरी चोला, पगडी, शिरोपा देवून सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार राजन विचारे, आमदार अमित गोडा हे उपस्थित होते. हजूरसाहेब सचखंड गुरुद्वाराचे अधीक्षक डी. पी. सिंघ, सरदार ठाणसिंघ यांनी मंत्री श्री. शिंदे यांचा गुरुद्वाराचे प्रतिमा देवून सत्कार केला.  

000000
स्थानिकांशी हितगूज साधण्यासाठी
नांदेड जिल्ह्याचा दोन दिवसीय दौरा
-       सार्वजनिक बांधकाम मंत्री शिंदे
नांदेड, दि. 2 :- सरकारच्या योजना जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आणि स्थानिक नागरिकांशी या योजनांबाबत हितगूज करण्यासाठी नांदेड जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्याचे नियोजन करण्यात आल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.
मंत्री श्री. शिंदे व खासदार राजन विचारे, आमदार सर्व श्री बालाजी किनीकर, शांताराम मोरे, अमित घोडा आदींचे या दिवशी नांदेड दौऱ्यासाठी आज येथे आगमन झाले. त्याअनुषंगाने शासकीय विश्रामगृह येथे दौरा नियोजनाची जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन मंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी आमदार हेमंत पाटील व शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, आदींचीही उपस्थिती होती.
बैठकीत जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी जिल्ह्यातील विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, पोलीस अधिक्षक संजय ऐनपुरे, अधीक्षक अभियंता बी. एस. स्वामी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे आदींचीही उपस्थिती होती.
या बैठकीत बोलतांना मंत्री श्री. शिंदे म्हणाले की, यापुर्वी दुष्काळी परिस्थितीत पाहणीसाठी दौरा करण्यात आला होता. आता परिस्थिती बदली असून पावसामुळे समाधानाचे वातावरण आहे. तरीही स्थानीक लोकांशी संवाद साधून योजनांच्या अंमलबजावणीबाबत अपेक्षा जाणून घेण्यासाठी आता दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.  शासनाने  घेतलेले विविध निर्णय, निश्चित केलेले उद्दीष्टे लोकांपर्यंत पोहचली पाहिजेत, अशी अपेक्षा आहे. त्याअनुषंगाने स्थानिकांशी संवाद साधण्यात येणार आहे. जास्तीतजास्त योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचाव्यात , त्याचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहचला पाहिजे हा या दौऱ्याचा उद्देश आहे.
बैठकीस सुरुवातीला मंत्री महोदय आणि सर्व आमदारांचे यथोचित स्वागत करण्यात आले. आमदार हेमंत पाटील यांनी जिल्ह्यात प्रशासन सकारात्मक दृष्टिकोनातून काम करीत असल्याचे कौतूक उद्गगार काढले.
बैठकीत भोकरसाठी आमदार बालाजी किनीकर, किनवटसाठी आमदार शांताराम मोरे, नायगाव आमदार अमित घोडा, नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तरसाठी आमदार हेमंत पाटील, कंधारसाठी आमदार प्रताप पाटील चिखलीकर, हदगावसाठी  आमदार नागेश पाटील आष्टीकर आणि देगलूरसाठी आमदार सुभाष साबणे हे दौरा करतील असे नियोजन करण्यात आले.
या सर्व दौऱ्यातील पाहणीवरुन उद्या शनिवार 3 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत नियोजन भवन येथे बैठक घेण्याचेही निश्चित करण्यात आले.

000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...