Friday, September 2, 2016

स्थानिकांशी हितगूज साधण्यासाठी
नांदेड जिल्ह्याचा दोन दिवसीय दौरा
-       सार्वजनिक बांधकाम मंत्री शिंदे
नांदेड, दि. 2 :- सरकारच्या योजना जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आणि स्थानिक नागरिकांशी या योजनांबाबत हितगूज करण्यासाठी नांदेड जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्याचे नियोजन करण्यात आल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.
मंत्री श्री. शिंदे व खासदार राजन विचारे, आमदार सर्व श्री बालाजी किनीकर, शांताराम मोरे, अमित घोडा आदींचे या दिवशी नांदेड दौऱ्यासाठी आज येथे आगमन झाले. त्याअनुषंगाने शासकीय विश्रामगृह येथे दौरा नियोजनाची जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन मंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी आमदार हेमंत पाटील व शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, आदींचीही उपस्थिती होती.
बैठकीत जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी जिल्ह्यातील विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, पोलीस अधिक्षक संजय ऐनपुरे, अधीक्षक अभियंता बी. एस. स्वामी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे आदींचीही उपस्थिती होती.
या बैठकीत बोलतांना मंत्री श्री. शिंदे म्हणाले की, यापुर्वी दुष्काळी परिस्थितीत पाहणीसाठी दौरा करण्यात आला होता. आता परिस्थिती बदली असून पावसामुळे समाधानाचे वातावरण आहे. तरीही स्थानीक लोकांशी संवाद साधून योजनांच्या अंमलबजावणीबाबत अपेक्षा जाणून घेण्यासाठी आता दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.  शासनाने  घेतलेले विविध निर्णय, निश्चित केलेले उद्दीष्टे लोकांपर्यंत पोहचली पाहिजेत, अशी अपेक्षा आहे. त्याअनुषंगाने स्थानिकांशी संवाद साधण्यात येणार आहे. जास्तीतजास्त योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचाव्यात , त्याचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहचला पाहिजे हा या दौऱ्याचा उद्देश आहे.
बैठकीस सुरुवातीला मंत्री महोदय आणि सर्व आमदारांचे यथोचित स्वागत करण्यात आले. आमदार हेमंत पाटील यांनी जिल्ह्यात प्रशासन सकारात्मक दृष्टिकोनातून काम करीत असल्याचे कौतूक उद्गगार काढले.
बैठकीत भोकरसाठी आमदार बालाजी किनीकर, किनवटसाठी आमदार शांताराम मोरे, नायगाव आमदार अमित घोडा, नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तरसाठी आमदार हेमंत पाटील, कंधारसाठी आमदार प्रताप पाटील चिखलीकर, हदगावसाठी  आमदार नागेश पाटील आष्टीकर आणि देगलूरसाठी आमदार सुभाष साबणे हे दौरा करतील असे नियोजन करण्यात आले.
या सर्व दौऱ्यातील पाहणीवरुन उद्या शनिवार 3 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत नियोजन भवन येथे बैठक घेण्याचेही निश्चित करण्यात आले.

000000

No comments:

Post a Comment

 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...