Wednesday, April 11, 2018


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नांदेड दौरा
नांदेड, दि. 11 :-  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवार 12 एप्रिल 2018 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.  
गुरुवार 12 एप्रिल 2018 रोजी उमरखेड हेलिपॅड जि. यवतमाळ येथून हेलिकॉप्टरने दुपारी 4 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. त्यानंतर सायं 4.05 वा. विमानाने मुंबई प्रयाण करतील.
000000


कर्जमाफी योजनेला 14 एप्रिलपर्यंत मुदतवाढ
वंचित शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड , ‍दि. 11 :- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ऑनलाईन अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी अर्ज करण्याची मुदत आता 14 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. तरी  अशा शेतकऱ्यांनी अर्ज करुन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी   केले. 
तसेच मुद्दल व व्याजासह दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठीही एकवेळ समझोता (वन टाईम सेंटलमेट) योजनेंतर्गतही पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरण्याचा कालावधी 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे.
या योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यात 1 लाख 34 हजार 998 शेतकऱ्यांच्या खात्यावर 697 कोटी रुपये जमा करण्यात आली आहेत. राज्य सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने 31 मार्च 2018 रोजी शासन निर्णय निर्गमित केला असून या आदेशाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आपले सरकार या सेवा केंद्रावर किंवा https://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर स्वत: नोंदणी करुन युजर आयडी व पासवर्डच्या आधारे ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. आपले सरकार पोर्टलवर माहिती भरुन ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा नि:शुल्क आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000


सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी
कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
नांदेड दि. 11 :- जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवार व आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या तरुण वर्गाला आर्थिक सहाय्य पुरविण्याच्या दृष्टिने "छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत" अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या. मुंबई यांच्यावतीने वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज तीन योजना राबविण्यात येत आहेत. 
 या कर्ज योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया www.mahaswayam.in या वेबसाईटवर उद्योजकता निवडून नोंदणीत युजर आयडी व पासवर्ड तयार करावा. ओटीपी व्हेरिफिकेशन नंतर एसएमएसद्वारे युजर आयडी व पासवर्ड टाकून प्रवेश करुन पुढील माहिती भरावी. त्यानंतर एलओआय प्रमाणपत्र तयार होईल त्याची प्रिंट काढून प्रपोजलसह बँकेस भेटावे. बँक कर्ज देण्यास सहमत असल्यास कर्ज मंजुरीपत्र अपलोड करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वर्कशॉप रोड नांदेड (02462-251674) येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक संचालक कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.
000000


शैक्षणिक कामांच्या प्रमाणपत्रासाठी
सेतु केंद्रामार्फत अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड , ‍दि. 11 :- दहावी व बारावी निकालानंतर विविध प्रमाणपत्रासाठी अर्जदारांची गर्दी होते. त्यामुळे शैक्षणिक कामांच्या प्रमाणपत्रासाठी सेतु सुविधा केंद्रामार्फत अर्ज करण्याचे आवाहन तहसिलदार किरण अंबेकर यांनी केले आहे.  
नांदेड तहसिल कार्यालयामार्फत सन 2017-18 मध्ये विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यात उत्पन्न प्रमाणपत्र 26 हजार 209, जातीचे प्रमाणपत्र 7 हजार 632, नॉन क्रिमीलीअर 3 हजार 505, अल्पभुधारक- 206 ही प्रमाणपत्र निर्गमीत करण्यात आली. यापैकी उत्पन्न, रहिवास व अल्पभूधारक प्रमाणपत्र ऑनलाईन प्रणालीद्वारे निर्गमीत करण्यात आली असून जातीचे व नॉन क्रिमीलीअर प्रमाणपत्र ऑनलाईन निर्गमीत करण्यात येणार आहे. परिपुर्ण अर्ज दाखल झाल्यानंतर दोन दिवसात प्रमाणपत्र वितरीत करण्यात येते. त्यामुळे अर्जदाराच्या फेऱ्या बंद होऊन सेतू सुविधा केंद्रातच प्रमाणपत्र प्राप्त होते, असेही प्रसिद्धी पत्रकात तहसिलदार नांदेड यांनी म्हटले आहे.
000000


कोणताही पात्र लाभार्थी
धान्य मिळण्यापासून वंचित राहणार नाही
- अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट
मुंबई, दि. 11 : रास्तभाव दुकानांमधून धान्य घेणाऱ्या कोणत्याही पात्र लाभार्थ्यांना धान्य मिळण्यापासून वंचित राहणार नाही, असे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी स्पष्ट केले.
श्री. बापट यांनी सांगितले , कोणताही पात्र लाभार्थी धान्य मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी संबधितांना सूचना दिल्या आहेत. यानुसार, रास्तभाव दुकानातील पॉस PoSमशीनद्वारे कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याचे आधार ऑथेंटिकेशन झाले तरी त्या कुटुंबाला धान्य वितरण होणार आहे. आधार ऑथेंटिकेशन नाही झाले तर eKYC करुन घेतल्यास धान्य वितरण होणार आहे. आधार सिडींग नसलेल्या सदस्यांचे eKYC करुन धान्य वितरण होईल. हे तीनही पर्याय शक्य नसल्यास  Route Nominee  च्या आधार ऑथेंटिकेशन च्या आधारे धान्य वितरण करता येणार आहे.
शिधापत्रिकेवरील डेटा पॉस (PoS) मशीनवर उपलब्ध नसल्यास शिधापत्रिका,  आधार नोंदणीची प्रत, शासकीय ओळखपत्र/बँकेचे फोटो पासबुक इत्यादी विभागाच्या वेबसाईटवरील घोषित कागदपत्रे शिधापत्रिकेवरील प्रत्येक सदस्यांकडून प्राप्त करुन घेऊन धान्य वितरण करण्यात येईल. परंतु हा पर्याय एकदाच वापरता येणार आहे.
जिल्हाधिकारी/नियंत्रक  शिधावाटप अधिकारी, मुंबई यांनी  "NO NETWORK  FPS"  घोषित केले असल्यास पर्यायी व्यवस्था होईपर्यंत धान्य वितरण करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन कोणत्याही पात्र लाभार्थ्यांना धान्य मिळण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
००००



लोकराज्यच्या महामानवाला अभिवादनया विशेषांकाचे
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते प्रकाशन
नांदेड दि. 11 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य या मासिकाच्या  एप्रिल 2018 च्या महामानवाला अभिवादनया विशेषांकाचे प्रकाशन  नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते आज झाले.यावेळी मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. तोटावार, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर, मुख्याधिकारी पी. डी. गंगनर, नगररचनाचे के. पी. पाटील आदि उपस्थित होते.
         श्री. डोंगरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल 2018 रोजीच्या 127 व्या जयंती निमित्त  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तत्व, विचार व आचरणावर प्रकाशित करण्यात आलेल्या लोकराज्य च्या विशेषांकाचे कौतूक करुन हा अंक ख-या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तत्वाला मानवंदना असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर यांनी स्वागत केले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल 2018 रोजीच्या 127 व्या जयंतीनिमित्त माहिती व जनसंपर्क विभागामार्फत  प्रकाशित करण्यात आलेल्या महामानवाला अभिवादन या विशेषांकाची माहिती दिली.
      या विशेषांकातील सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची पत्रकार मधू कांबळे यांनी घेतलेली मुलाखत, राजषी शाहू आणि डॉ. आंबेडकर (डॉ. जयसिंगराव पवार ) ,परिवर्तनाचे अग्रदूत (डॉ. शैलेंद्र लेंडे ), जलनीतीचे उद्गाते  (अविनाश आ. चौगुले ), ऊर्जाशक्तीला चालना (डॉ. जी. एस. कांबळे), उत्कृष्ट संसदपटू आणि शिस्तप्रिय प्रशासक (डॉ. संभाजी खराट ), बाबासाहेबांची जयंती कधी आणि कोणी सुरु केली ?  महामानवाचा स्मृतिगंध  ( मिलिंद मानकर ), ग्रंथकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (डॉ. संदेश वाघ), बुद्विवादीची प्रेरक शक्ती (प्रा. डॉ. म. सु. पगारे), शिक्षणाची मुहुर्तमेढ (दत्ता गायकवाड ), शांततामय सहजीवनाचे हमीपत्र (डॉ. अक्रम ह.पठाण ), महामानवाचा जीवनपट,  समतेचा उद्गाता (प्रा. नागसेन भीमरावजी ताकसांडे ), प्रेरणा , ऊर्जा आणि स्फूर्ती देणारी तीर्थस्थळे (डॉ. बबन जोगदंड ), सुरक्षेचा प्रहरी (डॉ. विजय खरे ), ज्येष्ठ विचारवंत डॉ.गंगाधर पानतावणे यांच्यावरील  दलित साहित्याचा आधारवड (यशवंत भंडारे ), आदि लेख वाचनीय आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी सदरचा अंक खरेदी करण्याचे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय नांदेड मार्फत करण्यात येत आहे. यावेळी विजय होकर्णे, आरेवार आदि उपस्थित होते.
0000000


सामाजिक समता आणि 21 वे शतक
या विषयावर शुक्रवारी व्याख्यान  
नांदेड दि. 11 :-  "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह" निमित्त सामाजिक समता आणि एकविसावे शतक या विषयावर सुप्रसिद्ध विचारवंत देविदास फुलारी याचे व्याख्यान शुक्रवार 13 एप्रिल 2018 रोजी सामाजिक न्याय भवन नांदेड येथे सकाळी 11 वा. आयोजित करण्यात आले आहे. जिल्हा जात पडताळणी समितीचे प्रादेशिक उपायुक्त जे. एम. शेख हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. या कार्यक्रमास नांदेडकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
00000


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन
जयंती दिनापर्यंत विविध उपक्रम
नांदेड दि. 11 :-  राज्यात "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह" हा रविवार 8 एप्रिल ते शनिवार 14 एप्रिल 2018 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. त्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने शासन निर्णय निर्गमीत केला आहे. त्यानुसार या सप्ताहात विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला समता, स्वातंत्र्य व बंधुत्व या त्रयीने समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य घटनेच्या कलम 46 मध्ये घटनेने समाजातील दुर्बल वंचितांबाबत राज्याची जबाबदारी अत्यंत दुरदर्शीपणाने व गांभीर्याने नमूद केलेली आहे. कलम 46 मध्ये राज्य हे दुर्बलतर जनवर्ग आणि विशेषत: अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन करील आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे संरक्षण करील, असे नमूद करण्यात आले आहे. या निर्देशाचे अनुषंगाने अनुसूचित जाती व सर्व प्रकारचे पीडीत शोषित असलेल्यांना सामाजिक न्याय , आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्याअनुषंगाने अनुसूचित जाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय म्हणून विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच त्याचे उद्देश साध्य व्हावेत. याकरीता राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
या समता सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश आहेत. ज्यामध्ये महत्वाच्या ठिकाणी तसेच अनुसूचित जाती वस्त्यामध्ये स्वच्छता अभियान. समाज प्रबोधनपर विविध विषयावर व्याख्यान अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी शनिवार 14 एप्रिल 2018 रोजी जिल्हास्तरावर मानवंदनेचा शासकीय कार्यक्रम आयोजित करुन या सप्ताहाची सांगता होईल.
000000


जिल्हा युवा पुरस्कारासाठी
अर्ज सादर करण्याचे आवाहन
नांदेड,दि. 11 :- एक युवक व युवती तसेच एक नोंदणीकृत संस्थेला देण्यात येणार नांदेड जिल्हा युवा पुरस्कार 2017-18 साठी अर्ज शुक्रवार 20 एप्रिल 2018 पर्यंत कार्यालयीन वेळेत मागविण्यात येत आहेत. संबंधितांनी विहित नुन्यातील अर्ज 13 ते 20 एप्रिल पर्यंत क्रीडा कार्यालयातून प्राप्त करुन घ्यावीत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
जिल्ह्यातील युवक व युवतींनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवामध्ये समाज कार्याचे जागर होवून त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी जिल्हास्तरावर युवा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कारासाठी करावयाचा अर्ज व अधिक माहितीसाठी www.sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे किंवा जिल्हा क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.
000000


जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी   
अर्ज सादर करण्याचे आवाहन
               नांदेड,दि. 11 :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्हा क्रीडा पुरस्काराचे प्रस्ताव शुक्रवार 13 ते 20 एप्रिल 2018 या कालावधीत कार्यालयीन वेळेत मागविण्यात येत आहेत. विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड येथे प्राप्त होतील, असे आावाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
               जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता, गुणवंत खेळाडू पुरस्कार-2 (एक महिला व एक पुरुष) यांचे कार्य / योगदानाचे मुल्यमापन करुन त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्हा क्रीडा पुरस्कार 2017-18 वितरण करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा क्रीडा पुरस्कार समिती नांदेड यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.
               पुरस्कारासाठी अर्जदाराचे राज्यात सलग 15 वर्षे वास्तव्य असले पाहिजे. संबंधीत जिल्ह्यात क्रीडा मार्गदर्शक म्हणून सतत दहा वर्षे महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य असले पाहिजे. क्रीडा संघटक, कार्यकर्त्यांने सतत दहा वर्षे महाराष्ट्रात क्रीडा विकासासाठी भरीव योगदान दिले असले पाहिजे. वयाची 30 वर्ष पुर्ण असणे आवश्यक असून गुणांकनासाठी जिल्ह्यातील खेळाडुंची कामगिरी ग्राह्य धरली जाईल. खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगतपूर्ण 5 वर्षापैकी 2 वर्षे त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धामध्ये प्रतिनिधीत्व केले असले पाहिजे. तसेच या पुरस्काराबाबत अधिक माहितीसाठी शालेय व क्रीडा विभागाचा शासन निर्णय 1 ऑक्टोंबर 2012 www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...