Tuesday, March 17, 2020

शिखर शिंगणापूर येथील चैत्र यात्रा रद्द
प्रशासनाच्या आवाहनाला मंदिर ट्रस्टचा सकारात्मक प्रतिसाद

               सातारा, दि.17 (जिमाका) :  कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक चैत्र यात्रा रद्द करण्यात आली आहे.  कोरोनाचे संसर्गाचे संकट रोखण्यासाठी या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करुन भाविकांसह सर्वांनीच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी केले.
                     शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक यात्रेचा 25 मार्च ते 8 एप्रिल या कालावधी असून यात्रेसंदर्भात शिंगणापूर याठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती.  यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी बी.बी. महामुनी, माणचे तहसीलदार बाई माने, गटविकास अधिकारी गोरख शेलार, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, मानकरी भाविक उपस्थित होते.
                    शिंगणापूर यात्रेसाठी दरवर्षी 8 ते 10 लाख भाविक येत असतात. त्यामुळे कोरोना संसर्ग होवू नये यासाठी  प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी यात्रेसंदर्भात प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. श्रीमती जिरंगे म्हणाल्या, प्रशासन लाखो भाविकांच्या भावनांचा आदर करीत आहे, मात्र कोरोनाचे संकट ही आंतरराष्ट्रीय आपत्ती असल्याने त्यावर मात करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शिंगणापूर यात्रा रद्द करण्यात येत आहे.
                     यात्रा काळातील सर्व धार्मिक उत्सव संबंधित स्थानिक पुजारी, सेवाधारी यांनी करावेत अशा सूचना देवस्थान समिती व पुजारी मंडळींना दिल्या. याशिवाय यात्रेसाठी ध्वज आणणे तसेच कावडी आणण्यावर प्रतिबंध असल्याचे प्रांताधिकारी जिरंगे यांनी या बैठकीत स्पष्ट केले. यात्राकाळात एसटी मार्फत कोणतीही जादा बसवाहतूक केली जाणार नसून यात्रेच्या अनुषंगाने कोणत्याही सुविधा पुरविण्यात येणार नाहीत. कोरोनावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून भाविकांनी यात्राकाळात शिंगणापूरमध्ये गर्दी करू नये. असे आवाहन श्रीमती जिरंगे यांनी यावेळी केले.
                    शिंगणापूर यात्राकालावधीत गर्दी रोखण्यासाठी 144 कलमानुसार जमावबंदी आदेश लागू करण्यात येत असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी यांनी सांगितले. भाविकांना रोखण्यासाठी शिंगणापूरकडे येणाऱ्या विविध मार्गावर नाकाबंदी करण्यात येणार आहे. दरम्यान प्रशासकीय आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असून भाविकांनी शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन श्री. महामुनी यांनी केले.
                    कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या शिंगणापूर यात्रा बंदीच्या निर्णयास शिंगणापूर सरपंच अभय मेनकुदळे, उपसरपंच शंकर तांबवे, सर्व सदस्य, व्यावसायिक, सेवाधारी, देवस्थान समिती यासह कावडीधारक, ध्वज मानकरी, भाविकांनी पाठींबा दिला. यात्रेच्या दृष्टीने प्रशासन घेत असलेल्या निर्णयास सहकार्य करण्यात येईल, असे  ग्रामस्थ व भाविकांनी बैठकीमध्ये सांगितले. 
00000

कोरोंना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी गर्दी करु नये
नांदेड दि. 17 :- जिल्ह्यातील मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने नांदेड (अर्धापूर), हदगाव, किनवट, मुखेड, बिलोली, देगलूर येथील केंद्रावर तूर खरेदी व चणा नोंदणीची प्रक्रिया सुरु आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
गर्दी टाळण्याबाबत योग्य खबरदारी घेण्याच्यादृष्टीने खरेदी केंद्रावर एकावेळी पाचपेक्षा कमी व्यक्तीने प्रवेश करावा व इतरांनी केंद्राच्या बाहेर दोन ते तीन फुटाच्या अंतरावर थांबण्याची काळजी घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाले आहेत. शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...