Sunday, January 17, 2021

 

34 कोरोना बाधितांची भर तर  

40 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 17 :- रविवार 17 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 34 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 12 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 22 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 40 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 517 अहवालापैकी 478 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 76 एवढी झाली असून यातील 20 हजार 963 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 332 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 15 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 579 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.    

 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 11, धर्माबाद तालुक्यांतर्गत 1, देगलूर तालुक्यांतर्गत 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 6, लोहा तालुक्यांतर्गत 1, कंधार तालुक्यांतर्गत 11, खाजगी रुग्णालय 5 असे एकूण 40 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.95 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 11, हदगाव तालुक्यात 1 असे एकुण 12 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 9, मुदखेड तालुक्यात 1, किनवट 1, मुखेड 5, बिलोली 6  असे एकुण 22 बाधित आढळले.   

जिल्ह्यात 332 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 23, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 24, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 19, मुखेड कोविड रुग्णालय 11, हदगाव कोविड रुग्णालय 1, महसूल कोविड केअर सेंटर 30, किनवट कोविड रुग्णालय 3, देगलूर कोविड रुग्णालय 6, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 139, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 49, खाजगी रुग्णालय 27 आहेत.   

रविवार 17 जानेवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 162, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 73 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 95 हजार 604

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 69 हजार 353

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 76

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 963

एकुण मृत्यू संख्या-579

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.95 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-2 

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-394

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-332

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-15.           

00000

 गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी

शेतातील उभी पर्हाटी नष्ट करून फरदड टाळावी 

नांदेड (जिमाका) दि. 17 :-  कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी व पुढील वर्षी होणारा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना हाती घ्याव्यात. सध्या कापूस पीक हंगाम संपुष्टात आला असून फरदडीमुळे कापूस बोंडअळीचे जीवनचक्र अखंडितपणे सुरू राहते. तसेच कापूस पिकाची काढणी केल्यानंतर कच्चा कापूस दीर्घकाळासाठी  साठवलेल्या ठिकाणी कापसामध्ये राहिलेल्या गुलाबी बोंडअळीला खाद्य मिळाल्याने पुढील हंगामात या किडींचा प्रादुर्भाव वाढतो. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र  खंडित करून पुढील हंगामातील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता फरदड निर्मूलन मोहीम राबविणे अतिशय गरजेचे आहे. प्रत्येक कापूस उत्पादक गावातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपले शेत व गाव फरदडमुक्त होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत व  जानेवारी महिना अखेर सर्व शेतातील गावातील कापसाचे पीक काढून नष्ट करावे. तसेच फरदड कापूस न घेणे बाबत निर्धार करावा. कापूस निर्मूलन मोहीम अंतर्गत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे व विविध माध्यमाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. 

जानेवारी 2021 अखेर सर्व गावातील कापूस पीक शेतातून पूर्णपणे काढून टाकावे व फरदड घेऊ नये गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र संपुष्टात आणण्यासाठी 5  ते 6 महिने कापूस पिकाखालील क्षेत्र हे कापूस पीक विरहित ठेवणे गरजेचे आहे. गुलाबी बोंडअळीला डिसेंबर नंतर खाद्य उपलब्ध न झाल्यास ती सुप्तावस्थेत जाते परंतु फरदडीमुळेअळीला  खाद्य उपलब्ध होते व त्यामुळे गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र अखंडितपणे सुरू राहते व पुढील हंगामात या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. फरदडीपासून थोडेफार उत्पादन जरी मिळत असले तरी गुलाबी बोंडअळीमुळे येणा-या   हंगामात होणा-या नुकसानीचा विचार करून   प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड न घेता पर्हाट्या रोटावेटर किंवा श्रेडर यासारख्या यंत्राद्वारे छोटे छोटे तुकडे करून जमिनीत गाडाव्यात.कापूस वेचणी संपल्यानंतर शेतात शेळ्या, मेंढ्या किंवा इतर जनावरे चरण्यासाठी सोडावीत जेणेकरून प्रादुर्भावग्रस्त पाती व बोंडे खाल्ल्याने बोंडअळीचा प्रादुर्भाव पुढील हंगामात कमी होईल. कापूस पिकाच्या पर्हाट्यामध्ये किडींच्या सुप्तावस्था राहत असल्याने अशा पर्हाट्या, कीडग्रस्त बोंडे, पालापाचोळा नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे, त्याची साठवणूक करू नये. ज्या ठिकाणी कापूस दीर्घकाळ साठवून ठेवला जातो अशा ठिकाणी कामगंध सापळे, प्रकाश सापळे लावून पतंग नष्ट करावेत.या ठिकाणी निर्माण झालेला कचरा,सरकी, अळ्या व कोष नष्ट करावेत. 

या संपूर्ण बाबींचा वापर करून शेतकरी बांधवांनी फरदडमुक्तीचे धोरणाचा अवलंब करून  व पुढील हंगामातील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करून सहकार्य करावे‌. कापूस पिकाचा हंगाम संपुष्टात आल्याने कापूस पिकाचे क्षेत्रात सिंचनाची सोय उपलब्ध असलेल्या ठिकाणी उन्हाळी ज्वारी उन्हाळी भुईमूग उन्हाळी सोयाबीन भाजीपाला चारा पिके टरबूज खरबूज इत्यादी पिके घ्यावेत व कुठल्याही परिस्थितीत कापूस पिकाचे फरदड घेण्याचे टाळावे संपूर्ण तालुका शंभर टक्के फरदडमुक्त होण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी उपाययोजना हाती घ्याव्यात जेणेकरून गुलाबी बोंड अळीचा भविष्यातील प्रादुर्भाव टाळता येईल. 

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे सर, उपविभागिय कृषी अधिकारी नांदेड, रविकुमार सुखदेव यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांच्या मदतीने व शेतकऱ्यांच्या सहकार्याने तालुक्यात फरदडमुक्तीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

000000

 




 

ग्रामपंचायतींच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होणार मतमोजणी

मतमोजणी परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 17 :-जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील 907 ग्रामपंचायतीसाठी पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी सोमवार 18 जानेवारी 2021 रोजी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी सकाळी 10 वाजेपासून सुरु होणार आहे. याअनुषंगाने जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक असलेली सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. मतमोजणी केंद्र परिसरात निवडणूक कामाव्यतिरिक्त इतर व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. मतमोजणीच्या ठिकाणी जर त्याच दिवशी आठवडी बाजार असतील तर ते बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.   

नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायतीची मतमोजणी ही माहिती व तंत्रज्ञान इमारत स्थापत्य अभियंत्रिकी विभाग शासकिय तंत्रनिकेतन कॉलेज नांदेड येथे होणार आहे. तर अर्धापूर तालुक्यासाठी- तहसिल कार्यालय अर्धापूर. भोकर- तळमजला तहसिल कार्यालय भोकर. मुदखेड- तहसिल कार्यालय मुदखेड. हदगाव- मागासवर्गीय शासकिय मुलींचे वसतीगृह तामसा रोड हदगाव. हिमायतनगर- तहसिल कार्यालय हिमायतनगर. किनवट- औद्योगिक प्रशिक्षण संस्था तळमजला किनवट. माहूर- तहसिल कार्यालय माहूर येथील सभागृह. धर्माबाद- शासकीय तंत्रप्रशाला आयटीआय बासर रोड धर्माबाद. उमरी- तहसिल कार्यालय उमरी. बिलोली- तहसिल कार्यालय बिलोली. नायगाव- तहसिल कार्यालय नायगाव. देगलूर- प्रशासकीय इमारत पंचायत समिती सभागृह देगलूर. मुखेड- तहसिल कार्यालय मुखेड. कंधार- श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पानभोसी रोड कंधार तर लोहा तालुक्यातील ग्रामपंचायतीची मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था लातूर रोड लोहा येथे मतमोजणी होईल. ही मतमोजणी सकाळी 10 वाजेपासून सुरु होऊन मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत सुरु राहिल.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...