Tuesday, December 11, 2018


अल्पसंख्यांक हक्क दिन 18 डिसेंबरला

नांदेड, दि. 11 :- महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाकडून मंगळवार 18 डिसेंबर 2018 हा दिवस अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून साजरा करण्याबाबत निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.
अल्पसंख्यांक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणवी, माहिती देण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावेत. जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये अशासकीय समाजसेवी संस्थांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी गट व विद्यार्थी यांच्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. यामध्ये भित्तीपत्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, या कार्यक्रमातील विजेत्यांना पारितोषिके, व्याख्यानमाला, चर्चासत्र, परिसंवाद आदींचा समावेश असावा, असे जिल्हाधिकारी नांदेड कार्यालयाकडून निर्देशीत करण्यात आले.
00000


आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांचा
गुरुवारी भरती मेळावा

नांदेड दि. 11 :-  औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे ऑगस्ट 2018 या सत्रात शिकाऊ उमेदवाराची भरती करण्याकरीता औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे 13 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या उमेदवारांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे सभागृहात उपस्थित रहावे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण उमेदवारांनी apprenticeship.gov.in या पोर्टलवर नोंदणी करावी. पात्र उमेदवारांनी मुळ कागदपत्रासह उपस्थित राहून या संधीचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य जी. जी. पाटनुरकर यांनी केले आहे.
000000



राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत
सहा बालकांची मुंबईत हृदय शस्त्रक्रिया होणार

नांदेड दि. 11 :- राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हृदय शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथे सहा बालकांना पाठविण्यात आले आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड यांनी कळविले आहे.
या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी व शाळातील बालकांची 45 आरोग्य पथकामार्फत दरवर्षी आरोग्य तपासणी करण्यात येते. या वार्षात शुन्य ते 18 वयोगटातील 7 लाख 68 हजार 746 बालकांपैकी 6 लाख 47 हजार 312 बालकांची नोव्हेंबर 2018 अखेरपर्यंत आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत 3 हजार 496 बालकांना ग्रामीण / उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड आदी ठिकाणी निदान व उपचार करण्यात आले.
जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विठ्ठल मेकाने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ ए. पी. वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
मागील तीन वर्षात 213 बालके हृदयरोगाची आढळून आली असून त्यापैकी 178 बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. सन 2018-19 या वर्षामध्ये 27 बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे तर उर्वरित 35 बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया मार्च 2019 पर्यंत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मागील तीन वर्षात 754 बालके इतर शस्त्रक्रियेची आढळून आलेली असून त्यापैकी 628 बालकांच्या इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. सन 2018-19 या वर्षात 77 बालकांच्या इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...