Tuesday, August 8, 2017

विकास योजना शेवटच्या घटकांपर्यत
पोहचविण्यासाठी प्रयत्नशील रहावे  
- विभागीय आयुक्त डॉ. भापकर
नांदेड दि. 8 :- केंद्र व  राज्य शासनाच्या विविध विकास योजना नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. त्याचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिले.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या प्रगती आढावा बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. भापकर अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, सहसंचालक (नगरपरिषद प्रशासन) श्रीमती मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) बी. एम. कांबळे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.  
बैठकीत डॉ. भापकर म्हणाले की, श्रीक्षेत्र माहूरगड पर्यटन विकासाच्या सुधारीत आराखड्यानुसार विविध विकास कामांना वेळापत्रकानुसार गती दयावी. याबाबत दर पंधरा दिवसांना आढावा घेतला जाईल. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने विविध योजना हाती घेतल्या आहेत. शेतकऱ्यांना पिक कर्ज त्वरीत उपलब्ध करुन दयावीत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांना निराशेतून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना मदत करण्यासाठी प्रयत्न करावेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गाळ मुक्त धरण व गाळ युक्त शिवार योजनेतील कामे पुर्ण करावीत. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे शेती पुरक विविध योजनेची कामे हाती घ्यावीत. निसर्गाकडून पाऊस चांगला पडुन, पिके चांगली रहावीत अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. याद्वारे इयत्ता पहिली ते बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी शाळांनी गुणवत्ता विकास कार्यक्रमाकडे अधीक लक्ष दयावे. अवैध वाळु उपसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करुन त्यांच्यावर हद्दपारीच्या केसेस दाखल कराव्यात. आगामी मनपा निवडणुक काळात विविध विभागांनी जबाबदारीने निटनिटके काम करावीत, असे निर्देश दिले.
पुढे डॉ. भापकर म्हणाले की, पर्जन्यमान कमी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील विज पंपाची विज बंद करु नये. मागेल त्याला शेततळे योजनेतील उद्दीष्टानुसार विविध गावे दत्तक घेऊन कामे पुर्ण करावीत. आवश्यकता असेल त्याठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा.  शासन निर्णयानुसार 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोंबर या कालावधीत ग्रामसभा घेऊन मनरेगाची कामे निश्चित करावीत. यासाठी विविध यंत्रणेची मदत घ्यावी. ग्रामसंपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात यावीत. ऑनलाईन नोंदणी करुन ग्रामसभेतून मनरेगाची कामे वाटप करावीत. विभागीय आयुक्त कार्यालयाच्याकडून प्रत्येक महिन्याला जिल्हास्तरावर विविध विभागाचा आढावा घेतला जाईल. यासाठी प्रत्येक विभागाने कामे चांगली करावीत. कार्यालय व परिसर स्वच्छ राहील यासाठी कार्यालय प्रमुखांनी प्रयत्न करावेत. प्रत्येक गावात व शहरात उत्तम गोष्टी असतात त्यासाठी  गाव, शहर स्वच्छ सुंदर राहील याकडे लक्ष दयावे. ग्रामपातळीवर सेवाभावी संस्थेद्वारे अनेक कार्यक्रमांद्वारे चांगली कामे करता येतील, अशा सुचना डॉ. भापकर यांनी यावेळी दिल्या.
मनरेगा, शेततळी, पिकाची परिस्थिती, पर्जन्यमान, जलसंधारण, फळबाग, रेशीम उद्योग उत्पादन वाढीसाठी प्रयत्न, मत्सबीज उत्पादन, रस्ते दुरुस्ती, राष्ट्रीय महामार्ग, लोहमार्गाची संयुक्त मोजणी, पिक कर्ज वाटप, पिक विमा आदी विषयांवर सविस्तर आढावा घेऊन अचुक कार्यवाही करण्याचे निर्देश डॉ. भापकर यांनी यावेळी दिले.
सुरुवातील जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी विविध विकास कामांची माहिती दिली. शेवटी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आभार मानले.

0000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...