Monday, November 26, 2018


संविधान दिनानिमित्त रॅलीस
जिल्हाधिकारी यांचे हस्ते झेंडी दाखवून शुभारंभ   
नांदेड दि. 26 :- भारतीय संविधानाबाबत जनजागृती आणि नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी यासाठी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत आयोजित संविधान रॅलीस जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी हिरवी झेंडी दाखवून महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्यापासून मार्गस्थ केले.
यावेळी महापौर शिलाताई भवरे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. ही रॅली महात्मा ज्योतीबा फुले यांचा पुतळा ते शिवाजीनगर, कलामंदिर, मुथा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन करुन रॅलीचा समारोप करण्यात आला.
प्रारंभी मान्यवरांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या रॅलीत विविध विद्यालय, महाविद्यालय विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी, एनसीसी, स्कॉऊट विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते, समता दुत आदींचा सहभाग होता.  
000000
   


जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा
 
        नांदेड,दि. 26:- दि. 26 नोव्हेंबर, 2018 रोजी संविधान दिन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला असून या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य) श्रीमती अनुराधा ढालकरी तसेच जिल्हा नियोजन अधिकारी श्री. थोरात व जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व तहसीलदार आणि नायब तहसीलदार तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांनी केली. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली परिशिष्ट -1 उद्देशिकेचे वाचन करण्यात आले .
****

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144 लागू
नांदेड, दि. 26 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 27 नोव्हेंबर 2018 पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 26 डिसेंबर 2018 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.
हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.
0000000


गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत धर्मगुरु,
सामाजिक संस्था, मदरसांनी सहभागी व्हावे
नांदेड दि. 26 :- जागतिक आरोग्‍य संघटनेच्‍या निष्‍कर्षानुसार भारतात मिझेल्‍स अर्थात गोवरामुळे बालमृत्‍यूदरात वाढ होते. तसेच रूबेला संसर्गाने जन्‍मजात आजार होतात. बालमृत्‍यू दराचे वाढलेले प्रमाण कमी करण्‍यासाठी व रूबेला संसर्गाने होणारी जन्‍मजात विकलांगता नियंत्रीत करण्‍यासाठी केंद्र शासनाने दिलेल्‍या सूचनानुसार राज्‍यात सार्वजनिक आरोग्‍य विभागामार्फत मिझेल्‍स-रूबेला लसीकरण मोहिम राबविण्‍यात येत आहे.
ही मोहिम राज्‍यात दिनांक 27 नोव्‍हेंबर 2018 पासून सुरू होणार असून 4 आठवडे चालणार आहे. मिझेल्‍स व रूबेला लसीकरण मोहिमेचे महत्‍व लक्षात घेता जिल्‍ह्यातील सर्व मदरसांमधील सर्व वयोगटातील विद्यार्थ्‍यांना प्राथमिक व माध्‍यमिक शाळांमधील विद्यार्थ्‍यांप्रमाणे लसीकरण होणे आवश्‍यक आहे. त्‍यामुळे या मोहिमेत 15 वर्षाखालील सर्व मदरसामध्‍ये राहून शिक्षण घेणा-या सर्व विद्यार्थ्‍यांचे लसीकरण होणे शक्‍य होईल याकरिता जिल्‍ह्यातील मुस्‍लीम धर्मगुरू, सा‍माजिक संस्‍था आणि सर्व मदरसांना सदर मोहिमेत सहभागी होण्‍यासाठी आवाहन करण्‍यात येत आहे.
000000


 नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अपचलनगर
साहिब मंडळ निवडणुक 2018 साठी अंतिम मतदार यादी प्रसिध्‍द
नांदेड दि. 26 :- नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्‍या तीन सदस्‍यांना निवडून देण्‍यासाठी घ्‍यावयाच्‍या निवडणूकीसाठी तयार करण्‍यात आलेली प्रारुप मतदार यादी 25 ऑगस्ट 2018 च्या अधिसूचनेनुसार 27 ऑगस्‍ट 2018 रोजी मतदार क्षेत्र औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्‍मानाबाद, नांदेड, बीड लातूर हे संपुर्ण जिल्‍हे व चंद्रपुर जिल्‍ह्यातील राजूरा, कोरपना व जीवती हे तालुके (तत्‍कालीन हैद्राबाद निजाम संस्‍थानाचा महाराष्‍ट्रातील भाग) येथे प्रसिध्‍द करुन 28 ऑगस्ट 2018 ते दिनांक 26 नोव्हेंबर 2018 कालावधीत प्रारुप मतदार यादीवर हरकती व दावे स्विकारण्‍यात आले.
प्रारुप मतदार यादीवर प्राप्‍त आक्षेपांवर सुनावण्‍या घेण्‍यात आल्‍या. नांदेड जिल्‍ह्यातील नांदेड तालुक्‍यातील 01 मतदाराच्‍या नांवात दुरुस्‍ती, एका मतदाराचे नाव वगळणे तसेच तहसिलदार नांदेड यांच्‍या अहवालानुसार नांदेड तालुक्याच्या प्रारुप मतदार यादीतून नऊ मतदारांची नावे मुदखेड तालुक्याच्या अंतिम मतदार यादीत समाविष्‍ट करण्‍यात आली. 52 मतदारांच्‍या नावाशी संबंधी विधानसभा मतदारसंघाचे क्रमांक, यादी भाग क्रमांक, नावातील दुरुस्‍ती करण्‍यात आली. ज्‍या व्‍यक्‍तींनी मतदार नोंदणी अर्ज भरले आहेत परंतू  प्रारुप मतदार यादीत नावे समाविष्‍ट झाली नव्‍हती अशा 37 मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्‍ट करण्‍यात आली. नांदेड तालुक्‍यातील प्रारुप मतदार यादीत दुबार नावे असलेले / एक पेक्षा जास्‍त नावे असलेले 2 हजार 352 मतदारांची नावे अंतिम मतदार यादीतून वगळणे इत्‍यादी बदल करण्‍यात आले आहेत. 
तहसिलदार, मुदखेड यांच्‍या अहवालानुसार नांदेड जिल्‍ह्यातील मुदखेड तालुक्‍यातील तीन मतदारांनी मतदार नोंदणी अर्ज भरले आहेत परंतू प्रारुप मतदार यादीत ज्‍याची नावे समाविष्‍ट झाली नव्‍हती. अशा 3 मतदारांची नावे अंतिम मतदार यादीमध्‍ये समाविष्‍ट करणे, तहसिलदार, माजलगाव यांच्‍या अहवालानुसार बीड जिल्‍ह्यातील माजलगाव तालुक्‍यात एक मतदाराच्‍या नावात दुरुस्‍ती करणे,  तहसिलदार मंठा यांच्‍या अहवालानुसार जालना जिल्‍ह्यातील मंठा तालुक्‍यातील तीन मतदारांनी मतदार नोंदणी अर्ज भरले आहेत परंतू प्रारुप मतदार यादीत ज्‍यांची नावे समाविष्‍ट झाली नव्‍हती अशा तीन मतदारांची नावे अंतिम मतदार यादीमध्‍ये समाविष्‍ट करण्‍यात आली. प्रारुप मतदार यादीवरील प्राप्‍त आक्षेप अर्जावर सुनावणी घेवून जालना जिल्‍ह्यातील मंठा तालुक्‍यातील प्रारुप मतदार यादीतील 7 मतदारांची नावे अंतिम मतदार यादीतून वगळणे इत्‍यादी बदल करण्‍यात आला आहे.   
औरंगाबाद विभागीय आयुक्‍त यांचेकडे 5 ते 19 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीत जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी दिलेल्‍या निर्णयाविरुध्‍द एक अपील अर्ज दाखल झाला. त्‍यावर विभागीय आयुक्‍त यांनी 26 ऑक्टोंबर 2018 रोजी जिल्‍हाधिकारी नांदेड यांचे आदेश कायम ठेवण्‍याबाबत आदेश पारीत केले.  
या सर्व कायदेशीर बाबी पार पडल्‍यानंतर जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्‍या तीन सदस्‍यांच्‍या निवडणूकीसाठी 22 नोव्‍हेंबर 2018 रोजी अंतिम मतदार यादी या मतदार क्षेत्रातील सर्व जिल्‍हाधिकारी कार्यालये व गुरुव्‍दारा सचखंड बोर्ड नांदेड च्‍या सुचना फलकावर डकवून प्रसिध्‍द केली आहे. तसेच या जिल्‍ह्यातील सर्व संबंधित तहसिल कार्यालयाच्‍या नोटीस बोर्डावर त्‍या-त्‍या तालुक्‍याची अंतिम मतदार यादी व संदर्भीय अधिसूचनेची प्रत डकवून प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे. अंतिम मतदार यादी व अधिसूचना नांदेड जिल्‍ह्याच्‍या संकेतस्‍थळावर (वेब साईटवर) प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे. असे जिल्‍हाधिकारी नांदेड यांच्‍यावतीने कळविले आहे.
0000000



प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा नांदेड दौरा
नांदेड दि. 26 :- भारत सरकार प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हे मंगळवार 27 नोव्हेंबर 2018 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
मंगळवार 27 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 9.05 वा. दिल्ली विमानतळ येथून विमानाने सकाळी 11 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 11.05 वा. नांदेड विमानतळ येथून हेलिकॉप्टरने निजामाबाद तेलंगणाकडे प्रयाण करतील.
000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...