Thursday, September 29, 2022

 सोयाबीन पिकावरील कीड रोग व्यवस्थापन कार्यशाळेला उर्त्स्फुत प्रतिसाद  

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- सोयाबीन पिकावरील किडीचा प्रादुर्भाव झाल्यास शेतकऱ्यांनी आय.पी.एम तंत्रज्ञानाचा  वापर करून किडीचा प्रादुर्भाव कमी करावा, असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र पोखरणीचे शास्त्रज्ञ डॉ.संदीप जायेभाये यांनी केले.

 

कासारखेडा येथे राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबिन व विकास मूल्य साखळी प्रकल्पांतर्गत सोयाबिन पिकावरील शेतीशाळेचे आयोजन शेतकरी अश्विन व्यंकटराव शिंदे यांच्या शेतावर करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी  कृषी सहाय्यक वसंत जारीकोटे, रमेश धुतराज, अश्विन शिंदे, तानाजी शिंदे, योगाजी शिंदे, यांची उपस्थिती होती.

 

किडीच्या नियंत्रणासाठी जीवामृत, जैविक संघ, निबोळी अर्काचा वापर करावा.तसेच पक्षी थांबे, कामगंध सापळ्याचा वापर करणे गरज पडल्यास रासायनिक किटकनाशकाचा संतुलीत वापर करावा तसेच सोयाबिन पिकावरील  खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीन बीजोत्पादन करून खर्च कमी करावा.

 

मंडळ कृषी अधिकारी प्रकाश पाटील यांनी सांगितले की, सोयाबीन काढणी पश्चात तंत्रज्ञान, सोयाबिन प्रक्रिया, यावर मूल्यवर्धन करून अतिरिक्त नफा कसा मिळेल याविषयावर मार्गदर्शन केले.कृषी सहायक, सोयाबिन पिकांवरील मित्र कीड, शत्रु कीड, यांची ओळख सांगुन निरीक्षणे कशी घ्यावीत याविषयावर वसंत जारीरकोटे यांनी  मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कृषी पर्यवेक्षिका सुप्रिया शिंदे, तानाजी शिंदे, योगाजी देशमुख, भीमा हिंगोले, दशरथ आढाव, उमेश आढाव, रोहिदास कडेकर, शिवदास कडेकर, राजाराम शिंदे, व्यंकटराव शिंदे, भगवान पालेपवाड, सोनाजी आढाव यांनी परीश्रम घेतले.

00000

 

सुधारित वृत्त

 जिल्ह्यातील 7 हजार नवदुर्गानी

रोजगार मेळाव्यात जागविला आत्मविश्वास 

सुमारे 2 हजार मुलींची टाटा कंपनीने केली निवड 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- नांदेड सारख्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलींना रोजगारांची नवीन संधी उपलब्ध व्हावी, यादृष्टीने नांदेड येथे रोजगार मेळाव्याचे बुधवार 28 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. मुलींचा आत्मविश्वास द्विगुणित व्हावा या उद्देशाने नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या मुलींसाठीच्या या विशेष रोजगार मेळाव्यास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तब्बल 7 हजार मुलींनी आपली नाव नोंदणी केली. 

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्ताने हा विशेष उपक्रम घेण्यात आला. या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे, कौशल्य विकास विभागाचे आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी मार्गदर्शन केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे संचालक तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी टाटा कंपनी यांच्याशी समन्वय साधून अधिकाधिक मुलींना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नियोजन केले. येथील यशवंत महाविद्यालयात हा महामेळावा संपन्न झाला.

नारीशक्तीच्या या अनोख्या उत्सवास खासदार हेमंत पाटील, महापौर जयश्री पावडे, जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, आदी मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देवून सहभागी मुलींना धैर्यासह शुभेच्छा दिल्या. खास मुलींसाठी बैंगलोर स्थित टाटा कंपनीच्या कार्यालयाने यासाठी विशेष पुढाकार घेतला. या कंपनीच्या प्रतिनिधीनी बॅच निहाय नोंदणी झालेल्या मुलीशी संवाद साधत त्यांचा उत्साह द्विगुणित केला. या मेळाव्यात जिल्ह्यातील सुमारे दोन हजार मुलीची निवड झाली आहे. 

निवड झालेल्या मुलीसाठी टाटा कंपनीतर्फे 16 हजार रुपयाचे विद्यावेतन, तीन लाख रुपयांचा विमा, जेवण व राहण्याची सुविधा देण्यासह त्यांना 24 तास वैद्यकीय सुविधाही उपलब्ध केली जाणार असल्याचे टाटा कंपनीच्या प्रतिनिधीनी दिली. यासर्व निवड झालेल्या मुलींना बेंगलोर व होसूर याठिकाणीच्या  कंपनीसाठी निवड केली आहे. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, समाज कल्याणचे सहायक आयुक्त तेजस माळवदकर, कौशल्य विकासचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार, प्रा. गणेशचंद्र शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.   

00000





 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 3.90 मि.मी. पाऊस


नांदेड (जिमाका) दि.
 29 :- जिल्ह्यात गुरुवार 29 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 3.90 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 1045.60 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात गुरुवार 29 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणेकंसात एकूण पाऊस : नांदेड- 13.20 (1043), बिलोली-0.50 (1042.60), मुखेड- 2.80 (951.70), कंधार-00 (900.50), लोहा-4.80 (913.70), हदगाव-1.90 (927), भोकर-00 (1155.50), देगलूर-0.90 (865.70), किनवट-0.60 (1263.50), मुदखेड- 1 (1176.40), हिमायतनगर-00 (1282.70), माहूर- 00 (1117.60), धर्माबाद- 11.30 (1324.60), उमरी- 5.60(1211.70), अर्धापूर- 14.20 (966.10), नायगाव-6.90(923.60मिलीमीटर आहे.

0000

 आयुष्यमान ओळखपत्रासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम;

या मोहिमेचा लाभ घ्यावा

-         जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी

नांदेड (जिमाका) दि. 29 :- आयुष्यमान  भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक लाभार्थ्याना मिळावा यासाठी आयुष्यमान कार्ड तयार करण्याची विशेष मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. या योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी मूल सिद्ध पत्रिका, आधारकार्ड अथवा अन्य शासनमान्य मूळ ओळखपत्र घेऊन संलग्नीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्रांशी अथवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा UTIITSL केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेसी यांनी केले आहे.

याबाबत आयुष्यमान  भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने विषयी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा समन्वयक प्रधानमंत्री जन आरोग्य योजना डॉ. दिपेशकुमार शर्मा अंमलबजावणी साहाय संस्थेचे विभागीय प्रमुख शरद पवार तसेच इतर अधिकारी, कर्मचारी व अंगीकृत रुग्णालय प्रमुख यांची उपस्थिती होती.

या योजनेअंतर्गत लाभार्थी हे सामाजिक, आर्थिक जातीय जनगणना 2011 आधारित विशिष्ट निकषानुसार निवडलेले ठराविक निवडक लाभार्थी कुटुंब आहेत. याचा लाभ कमाल मर्यादा 5 लाख रु प्रति कुटुंब प्रति वर्षात घेता येणार आहे. यासाठी सामाजिक आर्थिक जातीय जनगणना 2011 आधारित विशिष्ट  निकषानुसार निवडलेल्या ठराविक निवडक लाभार्थी कुटुंबाच्या यादीत नाव असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे नाव यादीत आहे किंवा नाही हे शोधण्यासाठी www.mera.pmjay.gov.in या संकेत स्थळाला अथवा 14555 या टोल फ्री क्रमांकावर किंवा संलग्नीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्रांशी संपर्क साधावा. गावनिहाय तसेच वार्ड निहाय यादीसाठी www.aapkedwarayushman.pmjay.gov.in ह्या संकेतस्थळांना भेट द्यावी.

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध गंभीर आजारावर 34 विशेष श्रेणीत उपचार आहेत. त्यामध्ये 1038 उपचार पद्धती या खाजगी रुग्णालयात व 171 उपचार हे शासकीय रुग्णालायांतर्गत योजनेच्या नियमानुसार उपलब्ध तज्ञ सुविधांवर पूर्णपणे मोफत उपचाराचा लाभ मिळेल. यामध्ये सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, लहान मुलांचे कर्करोग, मानसिक आजारावरील उपचार आहेत. या  योजनेचा लाभ नांदेड जिल्ह्यातील  जवळपास 1 लाख 22 हजार 63 कुटुंबांना होणार आहे. नांदेडमध्ये आजपर्यंत 78 हजार 768  लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. काहीं समस्या असल्यास जिल्हा रुग्णालयातील प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जिल्हा समन्वयक डॉ. दिपेशकुमार शर्मा क्र- ९४२१८५०६७८ यांच्याशी संपर्क साधावा. आयुष्यमान कार्ड संलग्नीकृत रुग्णालयात मोफत तसेच आपले सरकार सेवा केंद्र किंवा UTIITSL केंद्र या ठिकाणी बनवून दिले जाते.

00000 

 औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ

निवडणूकीसाठी नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती

 

औरंगाबाद,दि. 29 :- (विमाका) :- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीसाठी नमूना-19 मधील अर्ज स्वीकारण्यासाठी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व पदनिर्देशीत अधिकारी मिळून 16 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली असल्याची माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज येथे दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयात मतदार नोंदणीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांची बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीस उपायुक्त (सा.प्र.) जगदीश मिनियार, उपायुक्त (पुनर्वसन) पांडुरंग कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त (मागासवर्गीय कक्ष) शिवाजी शिंदे यांच्यासह विविध राजकीय पक्ष व संघटनांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

1 ऑक्टोंबर 2022 रोजी मतदार नोंदणीची जाहिर सूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर नोंदणीला सुरूवात होणार आहे. 15ऑक्टोबर 2022 रोजी नोटिसीची प्रथम पूर्नप्रसिध्दी, 25 ऑक्टोंबर रोजी नोटीसीची द्वितीय पुर्नप्रसिध्दी केली जाणार आहे. 7 नोव्हेंबर नमूना 18 किंवा 19 द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याची अंतिम दिनांक. 19 नोव्हेंबर रोजी हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई,  23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर, 2022 दावे व हरकती स्वीकारले जाणार आहेत. 25 डिसेंबर, 2022 रोजी दावे व हरकती निकाली काढणे व पुरवणी यादी तयार करुन छपाई करण्यात येणार आहे. 30 डिसेंबर रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी केली जाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी यावेळी दिली.  भारताचा नागरिक असलेली प्रत्येक व्यक्ती ज्याचा औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघात सर्वसाधारण रहिवासी आहेत आणि 1 नोव्हेंबर, 2022 पूर्वी लगतच्या सहा वर्षापैंकी एकूण तीन वर्षे माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या शिक्षण संस्थेत अध्यापनाचे काम करीत असल्यास मतदार यादीत नाव नोंदविण्यास पात्र असेल असे सांगून निवडणूक अर्हता संदर्भात सविस्तरपणे माहिती श्री.केंद्रेकर यांनी यावेळी बैठकीत दिली.

******

 नांदेड जिल्ह्यात 171 गायवर्ग पशुधन लम्पी बाधित    

लाख 17 हजार 818 पशुधनाचे प्रागतिक लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- नांदेड जिल्ह्यात लम्पी बाधित पशुधनाची संख्या (गाय वर्ग) 171 एवढी झाली असून जिल्हा प्रशासनातर्फे लसीकरणावर अधिक भर दिला आहे. गुरुवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी संपूर्ण जिल्हाभर लसीकरणावर नियोजनबद्ध भर देऊन आज रोजी 30 हजार 100 एवढ्या पशुधनाचे लसीकरण करण्यात आले. आजवर जिल्ह्यात एकुण 3 लाख 17 हजार 818 पशुधनाचे प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे. 


लम्पी हा आजार गोठ्यातील अस्वच्छतापशुधनाच्या अंगावरील गोचिड व इतर किटकांमुळे होण्याचा संभव अधिक असतो. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामपातळीवर जाऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.

 

आजच्या घडीला नांदेड जिल्ह्यातील 45 गावे लम्पी बाधित आहेत. या 45 गावातील एकुण गाय वर्ग पशुधन हे 22 हजार 715 एवढे आहे. यातील 171 बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बाधित गावाच्या किमी परिघातील गावांची संख्या 283 एवढी आहे. एकुण गावे 328 झाली आहेत. या बाधित 45 गावांच्या किमी परिघातील 328 गावातील (बाधित 45 गावांसह) एकुण पशुधन संख्या ही 92 हजार 400 एवढी आहे. लम्पीमुळे मृत पशुधनाची संख्या 13 एवढी झाली आहे. उपलब्ध लस मात्रा लाख 78 हजार 250 एवढी असून पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या पशुची स्वच्छतागोठ्यातील स्वच्छता व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावीअसे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले आहे.

 

000000

 ते ही आपल्यातलेच आहेत या संवेदनेने

किन्नरांना समाजात सामावून घेण्याची गरज

- कुलगुरू डॉ. उद्धव भोसले

·       मिशन गौरी लघूपटाद्वारे युवकांमध्ये जाणीव जागृती

·       विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलात गौरीने साधला संवाद   

नांदेड (जिमाका) दि. 29 :- अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत आपल्यातलाच एक घटक जीवन जगण्यासाठी संघर्ष करतो. या घटकाला अर्थात किन्नरांना आपण सार्वजनिक ठिकाणी कधी सहानभूती तर कधी हेटाळणीही करतो. माणुस म्हणून त्यांचा जगणाचा अधिकार व घटनेने त्यांना आपल्यासारखेच मिळालेले अधिकार याचा आपण आदर करून त्यांनाही आपल्या प्रवाहात सामावून घेतले पाहिजे, असे अग्रही प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केले. या विद्यापिठाअंतर्गत किन्नरांना उच्च शिक्षणासाठी ज्या काही सुविधा लागतील त्या आम्ही आनंदाने उपलब्ध करून देऊ असेही त्यांनी अश्वासीत केले.

 

जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्यावतीने निर्मिती करण्यात आलेल्या मिशन गौरी या किन्नरांच्या विकास प्रवाहावर आधारित लघुपटाच्या सामुहिक अवलोकनानंतर ते बोलत होते. यावेळी  प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, संचालक प्रा. घनशाम येळणे, उद्योजक भानुदास पेंडकर, प्रा. गोणारकर, प्रा. सुहास पाठक, डॉ. शालिनी कदम, डॉ. स्मिता नायर, डॉ. सुलोचना जाधव, प्रा. लोणारकर, प्रा. बोधगिरे, प्रा. बाबुराव जाधव व संकुलातील विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

 

किन्नरांच्या जवळ समाज कधी जायला पाहत नाही. यामुळे त्यांच्या वेदनेचा, कष्टाचा, रोजच्या जगण्यातील आव्हानाचा आवाका सर्वसामान्यापर्यंत पोहचत नाही. ते सुद्धा आपल्यातलेच आहेत, त्यांनाही आपल्या सारखाच जगण्याचा अधिकार आहे, हे समाजापर्यंत बिंबवणे आवश्यक आहे. त्यांच्याप्रती असलेला संवेदनेचा धागा जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी मिशन गौरी या लघुपटामार्फत अत्यंत कुशलतेने हाताळल्याचे गौरउद्गार कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी काढले.   

 

एका बाजुला जगातील सर्वच विचारवंत विविध विषयावर आपली वैचारिक मांडणी करत आहेत. या मांडणीत शाश्वत विकास आणि पर्यावरणावर अधिक भर आपण पाहतो. पर्यावरणाचा जितका गांभीर्याने विचार करतो तेवढा समाजातील समतोल पर्यावरणाबाबतही आपण तेवढेच आग्रही असल्याचे प्रतिपादन प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्र सिंह बिसेन यांनी केले. सामाजिक पर्यावरणात किन्नरांच्या जगण्याच्या हक्कासह असे अनेक विषय आपण संवेदनेने जपले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, गौरी बकश, सेजल बकश यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर दिली. कार्यक्रमाचे संचलन संचालक प्रा. घनशाम येळणे यांनी केले.

00000    








  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...