Tuesday, January 21, 2025

  वृत्त क्र. 84

पंडित दिनदयाल उपाध्याय 

रोजगार मेळाव्यात 50 उमेदवारांची अंतिम निवड  

नांदेड दि. 21 जानेवारी : रोजगार इच्छुक युवक-युवतींना  रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत बाबानगर नांदेड येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन आज करण्यात आले होते. यामेळाव्यात 8 कंपन्यांनी 931 रिक्त पदांसाठी आपला सहभाग नोंदविला होता. मेळाव्यात 148 उमेदवार उपस्थित होते यात 152 उमेदवारांची प्राथमिक तर  50 उमेदवारांची ‍ अंतिम निवड करण्यात आली.

हा मेळावा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या उपायुक्त श्रीमती विद्या शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी गणवीर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या रोजगार मेळाव्यात  8 कंपन्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. शासन आपल्या दारी याप्रमाणे कंपन्या आपल्या दारी असे सूत्र अंगीकारुन  जास्तीत जास्त रोजगार इच्छुक उमेदवारांना रोजगार प्राप्त करुन देण्याचे  आवाहन  उपायुक्त श्रीमती शितोळे यांनी केले. प्रस्ताविकात कौशल्य विकास विभागाच्या योजनांची तसेच ईस्राईलमध्ये असलेल्या रोजगाराबाबतच्या संधीचा लाभ युवकांनी घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले. मेळाव्याच्या सुरूवातीला दिप प्रज्वलन करून सावित्रीबाई फुले यांच्या ‍प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

000

 वृत्त क्र. 83

नांदेड येथे राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे शानदार उद्घाटन 

नांदेड, दि.२१ जानेवारी : आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, जिल्हा क्रीडा परिषद, नांदेड व महाराष्ट्र बुध्दीबळ असोसिएशन, नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने 20 ते 24 जानेवारी, 2025 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड येथे संपन्न होत असून या स्पर्धेचे उदघाटन आज दि. 21 जानेवारी,2025 रोजी दु. 2.00 वा. संपन्न झाले. 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अभिजीत राऊत (जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा क्रीडा परिषद, नांदेड) हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन श्रीमती अलंकृता ल. कश्यप-बगाटे, जिल्हा कोषागार अधिकारी, जयकुमार टेंभरे, जिल्हा क्रीडा अधिकारी,निखील (निरीक्षक, एस.जी.एफ.आय.),दिनकर हंबर्डे, सचिव नांदेड जिल्हा बुद्धिबळ संघटना, प्रवीण ठाकरे (पंच प्रमुख) आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी प्रस्ताविकात जयकुमार टेंभरे यांनी म्हणले की, या राष्ट्रीय स्पर्धेकरीता भारतातील विविध 31 राज्यातून खेळाडू मुले-मुली, क्रीडा मार्गदर्शक व संघ व्यवस्थापक उपस्थीत झाले असून त्याची निवास व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल क्रीडा वसतिगृह,नांदेड व जत्थेदार गुरुद्वारा लंगर साहब, नांदेड येथे करण्यात आली आहे. तसेच ही स्पर्धा एकूण 06 फे-यामध्ये होणार असल्याचे सांगीतले.

अध्यक्षीय भाषनात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी बुध्दीबळ हा खेळ बौध्दीक विकास घडवुन आणतो व आपल्या पुर्वजापासुन म्हणजेच राजे-महाराजेयांचेकडून खेळत आलेला खेळ आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंनी भविष्यात निश्चितच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळ खेळून आपल्या देशाचे नांव लौकीक करतील अशी आशा बाळगून उपस्थित सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच या राष्ट्रीय स्पर्धेकरीता आमदार आनंद तिडके यांनी उपस्थित राहून सदिच्छा भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेकरीता पंच म्हणुन अमरीश जोशी (छत्रपती संभाजीनगर), शार्दुल तापसे (सातारा),  भुपेंद्र पटेल (अहमदाबाद, गुजरात), पल्लवी कदम (अंबेजोगाई, बीड) सुचिता हंबर्डे (नांदेड), गगनदिपसिंघ रंधावा (नांदेड), शिषीर इंदुरकर (नागपूर), नथ्‍थु सोमवंशी (जळगांव), चैतन्य गोरवे (परभणी) सिध्दार्थ हटकर (नांदेड),प्रशांत सुर्यवंशी (नांदेड), श्रीमती ऋतुजा कुलकर्णी (नांदेड) आदी काम करीत आहेत. 

स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रा.इम्तियाज खान यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.राहुल श्रीरामवार यांनी केले.

सदर स्पर्धा यशस्वी करणेसाठी जयकुमर टेंभरे, जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडजकर, श्रीमती शिवकांता देशमुख, निळकंठ श्रावण (क्रीडा मार्गदर्शक, हिंगोली), राहुल श्रीरामवार (क्रीडा अधिकारी) विपुल दापके (क्रीडा अधिकारी), वरिष्ठ लिपीक संतोष कनकावार, कनिष्ठ लिपीक दत्तकुमार धुतडे, संजय चव्हाण,आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, वैभव दोमकोंडवार, ज्ञानेश्वर सोनसळे, सुशिल कुरुडे, कपील सोनकांबळे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, शेख इकरम, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, यश कांबळे व बुध्दिबळ असोसिएशनचे पदाधिकारी व खेळाडू आदिनी सहकार्य करीत आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी कळविले आहे.

0000








 वृत्त क्र. 82          

बिलोली येथे रेती साठ्याचा आज लिलाव 

नांदेड दि. 21 जानेवारी : जप्त केलेल्या रेतीसाठ्याचा जाहिर लिलाव 22 जानेवारी रोजी बिलोली तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 11 वा. होणार आहे. उपविभागीय अधिकारी बिलोली यांच्या अध्यक्षतेखाली होणार हा रेतीसाठा सन 2024-25 या वर्षात जप्त केलेला आहे. हा रेतीसाठा 17.05 ब्रास एवढा असून या लिलावात भाग घेणाऱ्या इच्छुकांनी आपल्या ओळखपत्रासह वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन तहसिलदार बिलोली यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र. 81

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  

नांदेड दि. 21 जानेवारी : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी ध्वजारोहणाचा राष्ट्रीय कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.

या आदेशान्वये नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा गांधी पुतळा ते महावीर चौकापर्यंतच्या परिसरातील मुख्य रोडवर 22 जानेवारी रोजी 00.00 वाजेपासून ते 27 जानेवारी 2025 रोजीचे 24 वाजेपर्यंत उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चे, रॅली, रास्ता रोको आंदोलने इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध केले आहे. 

000

 वृत्त क्र. 80

दहावी-बारावी परीक्षेचे प्रवेशपत्र नव्याने ऑनलाईन उपलब्ध   

नांदेड दि. 21 जानेवारी : फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) नव्याने 23 जानेवारी पासून तर इयत्ता दहावी परीक्षेचे प्रवेशपत्र 20 जानेवारीपासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळेचे प्राचार्य-शिक्षक, विद्यार्थी, पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षण मंडळाचे सचिन देविदास कुलाळ यांनी केले आहे. 

मंडळाने उपलब्ध करून दिलेल्या इयत्ता 12 वी प्रवेश पत्रांवर (हॉलतिकीट) जातीचा प्रवर्ग या कॉलमची छपाई करण्यात आली होती. याबाबत लोकभावनेचा आदर करून मंडळाने दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रवेशपत्रांवरील (हॉल तिकीट) सदरचा जातीचा प्रवर्ग कॉलम रद्द केला असून विद्यार्थ्यांची परीक्षेविषयक इतर माहिती आहे तशीच राहणार आहे. नव्याने तयार केलेली प्रवेशपत्रे (हॉलतिकीट) गुरूवार 23 जानेवारी पासून ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in यासंकेतस्थळावर Admit Card या लिंकद्वारे डाऊनलोड करता येणार आहेत.

तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावरील (हॉल तिकीट) जातीचा प्रवर्ग हा कॉलम रद्द करण्यात आला आहे. ही प्रवेशपत्र (हॉल तिकीट) ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सोमवार 20 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपासून Admit Card या लिंकद्वारे डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

डाऊनलोड संदर्भातील उर्वरित इतर सूचना व विद्यार्थ्यांची परीक्षाविषयक माहिती आहे तशीच कायम राहील. यात कोणताही बदल होणार नाही याची सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, विद्यार्थी-पालकांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन शिक्षण मंडळाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

00000

 

  वृत्त क्र. 79

एकलव्य स्कूल प्रवेशासाठी 23 फेब्रुवारीला पूर्व परीक्षा 

 राज्यात 3 हजार 269 जागा 

अर्जासाठी 5 फेब्रुवारी पर्यंत मुदत

नांदेड दि. 21 जानेवारी :  राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्रातील एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत येत्या 23 फेब्रुवारी 2025 रोजी प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेद्वारे इयत्ता सहावीत 2 हजार 220 नवीन तर इयत्ता सातवी ते नववीच्या 1 हजार 49 रिक्त जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांना 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आलेली आहे.

किनवट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत या प्रवेश स्पर्धा परिक्षा किनवट तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक (कन्या) आश्रमशाळा बोधडी व एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कुल सहस्त्रकुंड या परिक्षा केंद्रावर रविवार 23 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत घेण्यात येणार आहे. या स्पर्धा परिक्षेसाठी विहीत नमुन्यातील प्रवेश अर्ज किनवट प्रकल्प कार्यालय व कार्यालया अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय, अनुदानीत आश्रमशाळा व एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कुल सहस्त्रकुंड येथे विनामुल्य प्रवेश अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. जास्तीत जास्त इच्छुक व पात्र अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यानी निर्धारीत मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मेघना कावली यांनी केले आहे.  

दुर्गम आदिवासी भागातील मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी नाशिक, ठाणे, अमरावती, नागपुर या चार अपरआयुक्त कार्यक्षेत्रांमध्ये महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कुल सोसायटी (नाशिक) मार्फत सीबीएसई बोर्डाच्या 37 एकलव्य निवासी शाळा चालविल्या जातात. याठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, निवास, भोजन, गणवेश आदी सुविधा उपलब्ध करून दिले जातात. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सातवी, आठवी, नववीसाठी रिक्त जागांचा अनुशेष भरण्यात येणार आहे. तर प्रत्येक एकलव्य स्कूलमध्ये इयत्ता सहावीसाठी 30 मुले व 30 मुली अशी 60 प्रवेश क्षमता असणार आहे. या सर्व जागांवर प्रवेश पूर्वपरीक्षेद्वारे विद्यार्थ्यांची निश्चिती केली जाणार आहे.

दरम्यान, एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलच्या इयत्ता सहावीच्या 2 हजार 220 जागांवर विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश हे पूर्वपरीक्षेच्या माध्यमातून दिला जाणार आहे. त्यात मुलांच्या 1 हजार 110 तर मुलींच्या 1 हजार 110 जागांचा समावेश आहे. इयत्ता सातवीच्या 533, आठवीच्या 298 तर नववीच्या 218 रिक्त जागा प्रवेश पूर्वपरीक्षेद्वारे भरण्यात येणार आहे. तब्बल 1 हजार 609 मुलांना तर 1 हजार 660 मुलींना एकलव्य स्कुलमध्ये प्रवेश मिळणार आहे. 

राज्यातील 37 एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलच्या 3 हजार 269 जागांवर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पूर्वपरीक्षेद्वारे प्रवेश देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची निवड गुणानुक्रमे व त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार होणार आहे. त्यामुळे जास्तीतजास्त पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी निर्धारित मुदतीत अर्ज करावेत. विभाग निहाय उपलब्ध जागा नाशिक 1257, नागपुर 1020, ठाणे 613, अमरावती 379 याप्रमाणे आहेत, असेही प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.

0000

 वृत्त क्र. 78

निवृत्तीवेतनधारकांसाठी    

सोमवारी पेन्शन अदालत

नांदेड दि. 21 जानेवारी : महालेखापाल यांच्या अधिनस्त अधिकारी-कर्मचाऱ्यांच्याद्वारे निवृत्तीवेतनधारकासाठी व निवृत्तीवेतनविषयक एजी कार्यालयात होणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यात येणार आहे. यादृष्टिने पेन्शन अदालतीचे आयोजन सोमवार 27 जानेवारी 2025 रोजी नियोजन भवन नांदेड येथे करण्यात आले आहे. 

कार्यालयातील लेखा विषयक कामकाज करणारे कर्मचारी-सेवानिवृत्तीवेतनधारकांनी आपल्यास्तरावर अवगत करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्र. 77

मिनी ट्रॅक्टर व उपसाधने पुरवठा योजना  

नांदेड दि. 21 जानेवारी : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील इच्छूक पात्र बचतगटांनी ऑनलाईन अर्ज http://mini.mahasamajkalyan.in या संकेत स्थळावर भरुन त्याची सत्यप्रत 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत समाज कल्याण सहायक आयुक्त नांदेड या कार्यालयात सादर करावी, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.  या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णयान्वये 8 मार्च 2017 रोजी निश्चित करण्यात आल्या आहेत. हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. 

0000

 वृत्त क्रमांक 76

जिल्हा क्षयरोग केंद्राच्यावतीने युवा दिन उत्साहात संपन्न

नांदेड दि. 21 जानेवारी : राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात सध्या 100 दिवसीय टीबी मुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे. हा कार्यक्रम 7 डिसेंबर पासू सुरू झााला असून तो 24 मार्च  पर्यंत राबविण्यात येत आहे. या अभियानाचा जास्तीतजास्त संशयित क्षयरुग्णांची तपासणी करून क्षयरुग्णांना उपचारावर आणून क्षयमुक्त करणे हा मुख्य उद्देश आहे.

या अभियानाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने विविध स्पर्धा जिल्हा क्षयरोग केंद्र नांदेडतर्फे राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताचे औचित्य साधून घेण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पेरके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, आर.एम. ओ. डॉ. बुट्टे, वैद्यकीय अधिकारी डॉ.मिरदुडे, डॉ.अमृत चव्हाण, श्री गुरुगोविंदसिंगजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य श्रीमती बोथीकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना मानचिन्ह प्रशस्तीपत्र तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्यांना सहभागाबाबतचे प्रमाणपत्र प्रदान केले. याप्रसंगी वरील मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे संपन्न झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिरुद्ध भावसार तर आभार जितेंद्र दवणे यांनी मानले.

000000




  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...