वृत्त क्र. 79
एकलव्य स्कूल प्रवेशासाठी 23 फेब्रुवारीला पूर्व परीक्षा
राज्यात 3 हजार 269 जागा
अर्जासाठी 5 फेब्रुवारी पर्यंत मुदत
नांदेड दि. 21 जानेवारी : राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्रातील एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत येत्या 23 फेब्रुवारी 2025 रोजी प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेद्वारे इयत्ता सहावीत 2 हजार 220 नवीन तर इयत्ता सातवी ते नववीच्या 1 हजार 49 रिक्त जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांना 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आलेली आहे.
किनवट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत या प्रवेश स्पर्धा परिक्षा किनवट तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक (कन्या) आश्रमशाळा बोधडी व एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कुल सहस्त्रकुंड या परिक्षा केंद्रावर रविवार 23 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत घेण्यात येणार आहे. या स्पर्धा परिक्षेसाठी विहीत नमुन्यातील प्रवेश अर्ज किनवट प्रकल्प कार्यालय व कार्यालया अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय, अनुदानीत आश्रमशाळा व एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कुल सहस्त्रकुंड येथे विनामुल्य प्रवेश अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. जास्तीत जास्त इच्छुक व पात्र अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यानी निर्धारीत मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मेघना कावली यांनी केले आहे.
दुर्गम आदिवासी भागातील मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी नाशिक, ठाणे, अमरावती, नागपुर या चार अपरआयुक्त कार्यक्षेत्रांमध्ये महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कुल सोसायटी (नाशिक) मार्फत सीबीएसई बोर्डाच्या 37 एकलव्य निवासी शाळा चालविल्या जातात. याठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, निवास, भोजन, गणवेश आदी सुविधा उपलब्ध करून दिले जातात. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सातवी, आठवी, नववीसाठी रिक्त जागांचा अनुशेष भरण्यात येणार आहे. तर प्रत्येक एकलव्य स्कूलमध्ये इयत्ता सहावीसाठी 30 मुले व 30 मुली अशी 60 प्रवेश क्षमता असणार आहे. या सर्व जागांवर प्रवेश पूर्वपरीक्षेद्वारे विद्यार्थ्यांची निश्चिती केली जाणार आहे.
दरम्यान, एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलच्या इयत्ता सहावीच्या 2 हजार 220 जागांवर विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश हे पूर्वपरीक्षेच्या माध्यमातून दिला जाणार आहे. त्यात मुलांच्या 1 हजार 110 तर मुलींच्या 1 हजार 110 जागांचा समावेश आहे. इयत्ता सातवीच्या 533, आठवीच्या 298 तर नववीच्या 218 रिक्त जागा प्रवेश पूर्वपरीक्षेद्वारे भरण्यात येणार आहे. तब्बल 1 हजार 609 मुलांना तर 1 हजार 660 मुलींना एकलव्य स्कुलमध्ये प्रवेश मिळणार आहे.
राज्यातील 37 एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलच्या 3 हजार 269 जागांवर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पूर्वपरीक्षेद्वारे प्रवेश देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची निवड गुणानुक्रमे व त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार होणार आहे. त्यामुळे जास्तीतजास्त पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी निर्धारित मुदतीत अर्ज करावेत. विभाग निहाय उपलब्ध जागा नाशिक 1257, नागपुर 1020, ठाणे 613, अमरावती 379 याप्रमाणे आहेत, असेही प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.
0000
No comments:
Post a Comment