Friday, June 16, 2023

 मरणोपरांत देहदान जीवनातील सर्वश्रेष्ठ दान 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत शरीररचना शास्त्र विभागात असलेले ओमप्रकाश रामचंद्रराव सावंत रा. आंबेकरनगर तरोडा (बु) नांदेड यांनी त्यांच्या वडीलांचा देहदान करण्याचा संकल्प केला. त्यांचे वडील कै. रामचंद्र ग्यानबाराव सावंत यांच्या मरणोपरांत त्यांचा देह 8 जून 2023 रोजी शरीररचनाशास्त्र विभागास सुपुर्द केला.

 

कै. रामचंद्र ग्यानबाराव सावंत यांनी शरीररचनाशास्त्र विभागात 11 जुलै 2012 रोजी मरणोत्तर देहदान संकल्पपत्र स्वेच्छेने सादर केले होते. मरणोपरांत आपला देह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यास उपयोगी येण्यासाठी कै. रामचंद्र ग्यानबाराव सावंत यांची इच्छा मरणोपरांत त्यांच्या मुलांनी व कुटुंबियानी पूर्ण केली आहे. या कार्यात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे, शरीररचनाशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अनुजा देशमुख, डॉ. एम. ए. रहेमान यांनी ओमप्रकाश रामचंद्रराव सावंत यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून देहदान संबधी मार्गदर्शन केले.

 

अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांनी ओमप्रकाश रामचंद्रराव सावंत यांना 13 जून 2023 रोजी देहदान प्रमाणपत्र देऊन आभार व्यक्त केले. यावेळी शरीररचनाशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अनुजा देशमुख, डॉ. एम. ए. रहेमान व डॉ. विशाल टेकाळे तसेच शरीरविकृतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. एम. ए .समीर व डॉ. सुवर्णकार उपस्थित होते. देहदान केलेल्या व्यक्तींचा आदर्श समोर ठेऊन देहदानाच्या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. वाकोडे यांनी केले.

0000

 किनवट जवळील आदिवासी सावरगावने

अनुभवली शासन आपल्या दारीची प्रचिती

 

·    शासन सोबत असल्याची निर्माण झाली भावना

-  आदिवासी ग्रामस्थ सुरज कदम 

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- नांदेड जिल्ह्यातील शासन आपल्या दारी या उपक्रमानिमित्त तेलंगणाच्या काठावर असलेल्या किनवट पासून कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या देगलूर तालुक्यापर्यंत अनेक महसूल मंडळातील गावे शासन आपल्या दारी उपक्रमाची अनुभुती घेत आहेत. आज किनवट तालुक्यातील जलधारा मंडळातील सावरगाव येथे हा उपक्रम पार पडला. सर्व घरे आदिवासी असलेले हे सावरगाव आज तालुक्यातील शासकीय विभागाच्या प्रतिनिधींनी गजबजून गेले. ज्या निष्ठेने लोककल्याणकारी भूमिका घेऊन शासन शेवटच्या टोकावर असलेल्या माणसाच्या भल्यासाठी योजना राबविते त्याची खरी प्रचिती शासन आपल्या दारी योजनेतून आली अशी प्रतिक्रिया आदिवासी बांधव सुरज कदम यांनी दिली.

 

किनवट तालुक्यात 9 मंडळे असून प्रत्येक भागात शासन आपल्या दारीचा विश्वासार्ह दुवा पोहचावा यासाठी आम्ही नियोजन केले आहे. यातील 5 मंडळाच्या ठिकाणी प्राथमिक स्तरावरील शासन आपल्या दारीचे उपक्रम पार पडले आहेत. यातून पात्र लाभार्थ्यांचीही निवड झाली आहे. या उपक्रमामुळे प्रशासनालाही एक दिशा मिळाली असून आदिवासी भागातील लाभधारकांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच या अभिनव उपक्रमाचे मोठे यश असल्याची प्रतिक्रिया किनवट येथील सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांनी दिली.

 

येथील ग्रामीण भागात पांदण रस्ते, शेतासाठी जाणारे रस्ते, जमीन विषयक फेरफार, निराधार योजना, पीएम किसान योजना याबाबत या भागातील लोकांना अधिक उत्सुकता आहे. याचबरोबर केंद्र शासनासह राज्य शासनाच्या योजना त्या-त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचाव्यात यासाठी महसूल, कृषि विभाग, पंचायत समितीमधील संबंधित कर्मचारी तत्पर झाले आहेत.

00000











शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक क्लबफुट दिवस संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 16 :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागातर्फे 14 जून रोजी जागतिक क्लबफुट (जन्मजात वाकडे पाय असलेले व्यंग) दिनानिमित्त बाहयरुग्ण विभागात कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ.एस.आर.वाकोडे यांच्या हस्ते झाले.

यावेळी क्लबफुट (जन्मजात वाकडे पाय असलेले व्यंग) असलेल्या 350 बालकांवर उपचार करण्यात आलेल्या बालकांना शैक्षणिक साहित्य देवून अधिष्ठाता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. क्लबफुट आजारामध्ये जन्म:तच बाळाचे पाय वाकडे असतील तर हा एक जन्मदोष असतो. याला क्लब फुट असे देखील म्हणतात. हा दोष असल्याने बाळाचे पाय आत किंवा बाहेरच्या बाजूस वळत नाहीत. काही बाळांमध्ये ही समस्या केवळ एकाच पायात दिसते तर अनेक बाळांमध्ये ही समस्या दोन्ही पायांत दिसू शकते. जर वेळीच हा दोष दूर करण्यासाठी प्रयत्न केले गेले नाही तर मुल मोठे झाल्यावर त्याला खूप समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्याला चालताना सुध्दा समस्या सुध्दा निर्माण होऊ शकते. सर्जरीच्या सहाय्याने हा जन्मदोष दूर करता येऊ शकतो. या आजारासंबंधी समस्या व उपचाराबाबत यावेळी मार्गदर्शन केले.

सन 2014 पासून क्लब फुट असलेल्या बालकांसाठी हा कार्यक्रम अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागातर्फे राबविल्या जात आहे. आतापर्यंत शेकडो बालकांवर या कार्यक्रमांतर्गत उपचार व शस्त्रक्रिया करुन त्यांचे अपंगत्व दूर करण्यात आले आहे. या कार्यक्रमास डॉ.जी.एस. मनुरकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ.अंबुलगेकर, प्राध्यापक व विभाग प्रमुख, अस्थिरोग विभाग, नियोजन अधिकारी डोळे व क्लबफुटचे प्रतिनिधी मार्टिना मॅडम, अफ्रेड व बालकांचे पालक उपस्थित होते.
00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...