Friday, June 16, 2023

 मरणोपरांत देहदान जीवनातील सर्वश्रेष्ठ दान 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत शरीररचना शास्त्र विभागात असलेले ओमप्रकाश रामचंद्रराव सावंत रा. आंबेकरनगर तरोडा (बु) नांदेड यांनी त्यांच्या वडीलांचा देहदान करण्याचा संकल्प केला. त्यांचे वडील कै. रामचंद्र ग्यानबाराव सावंत यांच्या मरणोपरांत त्यांचा देह 8 जून 2023 रोजी शरीररचनाशास्त्र विभागास सुपुर्द केला.

 

कै. रामचंद्र ग्यानबाराव सावंत यांनी शरीररचनाशास्त्र विभागात 11 जुलै 2012 रोजी मरणोत्तर देहदान संकल्पपत्र स्वेच्छेने सादर केले होते. मरणोपरांत आपला देह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यास उपयोगी येण्यासाठी कै. रामचंद्र ग्यानबाराव सावंत यांची इच्छा मरणोपरांत त्यांच्या मुलांनी व कुटुंबियानी पूर्ण केली आहे. या कार्यात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे, शरीररचनाशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अनुजा देशमुख, डॉ. एम. ए. रहेमान यांनी ओमप्रकाश रामचंद्रराव सावंत यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून देहदान संबधी मार्गदर्शन केले.

 

अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांनी ओमप्रकाश रामचंद्रराव सावंत यांना 13 जून 2023 रोजी देहदान प्रमाणपत्र देऊन आभार व्यक्त केले. यावेळी शरीररचनाशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अनुजा देशमुख, डॉ. एम. ए. रहेमान व डॉ. विशाल टेकाळे तसेच शरीरविकृतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. एम. ए .समीर व डॉ. सुवर्णकार उपस्थित होते. देहदान केलेल्या व्यक्तींचा आदर्श समोर ठेऊन देहदानाच्या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. वाकोडे यांनी केले.

0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...