Tuesday, August 5, 2025

वृत्त क्रमांक 816

 

उत्तराखंड येथे गेलेले नांदेड जिल्ह्यातील सर्व यात्रेकरू सुखरुप

 

नांदेड दि. 5 ऑगस्ट :- उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे आज ऑगस्ट 2025 रोजी परिस्थिती गंभीर आहे. उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली येथे ढगफुटी झाली असून ज्यामुळे खीरगंगा नदीला मोठा पूर आला आहे. अनेक घरांचे नुकसान झाले आहे आणि काही ठिकाणी भूस्खलन देखील झाले आहे.  उत्तराखंडमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अनेक ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. ज्यामुळे भूस्खलन आणि पूर आले आहेत. नांदेड जिल्ह्यातून बिलोली तालुक्यातील मौ. डोणगाव येथील 11 जण केदारनाथ बद्रीनाथ यात्रेसाठी ऑगस्ट रोजी नांदेड येथून निघाले होते त्यांचा संपर्क झाला  आहे.  ते सर्व सद्यस्थितीत घटनास्थळापासून 150 किमी दूर असून सर्व 11 जण सुखरूप असल्याचे जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्रास सचिन पत्तेवार यांनी कळविले आहे. 

 

त्या अकरा जणांची नावे पुढील प्रमाणे आहेत. सचिन पत्तेवार वय 25,शिवचंद्र सुकाळे वय 30,शिवा कुरे वय 32,स्वप्निल पत्तेवार वय 25,शिवा ढोबळे वय 28,धनंजय ढोबळे वय 26,नागनाथ मुंके वय 28,देवानंद गौण्डगे वय 24,अमोल कुरे वय 28,सोमनाथ चंदापुरे वय 29, देवानंद चंदापुरे वय 27.  

 

उत्तरकाशी येथे घडलेल्या परिस्थितीवर नांदेड जिल्ह्याचे  पालकमंत्री अतुल सावे हे लक्ष ठेवून असून आवश्यकते नुसार कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी यांना केल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील अजून कुणी उत्तराखंड येथे अडकून पडले असेल तर त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित तालुक्यातील तहसीलदार यांच्याकडे किंवा जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे (02462) 235077 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्रमांक 815 

शिवाजी महाराज पुतळा ते महात्‍मा गांधी पुतळा रस्ता एकेरी मार्ग   

 

नांदेड दि. 5  ऑगस्ट :- नांदेड शहरातील महात्‍मा गांधी पुतळा ते शिवाजी महाराज पुतळा हा रस्‍ता दुहेरी मार्ग असून या रस्‍त्‍याचे काम होईपर्यंत हा मार्ग एकेरी वाहतुकीसाठी चालु राहणार आहे. महात्‍मा गांधी पुतळा ते शिवाजी महाराज पुतळा मार्ग वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतुकीस पर्यायी मार्ग म्हणून महात्‍मा गांधी पुतळा ते सोनु कार्नरमुथा चौक ते शिवाजी महाराज पुतळा असा राहील.

 

मोटार वाहन कायदा 1999 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधीत विभागांना उपाय योजना करुन 5 ते 30 ऑगस्ट 2025 या कालावधीत अधिसुचनेत नमुद केलेल्‍या पर्यायी मार्गाने सर्व प्रकारची वाहने वळविण्‍यास मान्‍यता दिली आहे.

 

पोलीस अधिक्षक नांदेड यांनी कायदा व सुव्‍यस्‍थेच्‍या अनुषंगाने आवश्‍यक त्या उपाय योजना करावी. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांनी रस्‍ता वाहतुक प्रतिबंध व पर्यायी रस्‍त्‍यासाठी आवश्‍यक असलेले बोर्डचिन्‍ह लावणे इत्‍यादी बाबतची कार्यवाही करावी, असेही अधिसुचनेत स्पष्ट केले आहे.

0000

वृत्त क्रमांक 814

नांदेड त‍हसिल अंतर्गत विशेष सहाय योजनेतील डिबीटी न झालेल्‍या लाभार्थ्‍यांसाठी उद्या विशेष शिबिर 

नांदेड,५ ऑगस्ट:- नांदेड त‍हसिल अंतर्गत विशेष सहाय योजनेतील डीबीटी न झालेल्‍या लाभार्थ्‍याची डीबीटी करुन घेण्यासाठी लाभार्थ्‍यांचे आधार कार्डशी बँक खातेशी लिंक करणे, आधारकार्ड पुनर्जीवित करणे, मोबाईल लिंक करणे बाबत गुरुवार 07 ऑगस्ट 2025 रोजी विशेष कँम्‍प / मोहीम राबविण्‍यात येणार आहे. 

नांदेड ग्रामीण अंतर्गत विशेष सहाय योजनेतील लाभार्थ्‍यांना कँम्‍प तरोडा बु येथील मंडळ अधिकारी कार्यालय (शिवाजी हायस्कूल जवळ) येथे घेण्‍यात येणार असून त्‍या ठिकाणी नांदेड शहर, नांदेड ग्रामीण, तरोडा बु, नाळेश्‍वर, लिंबगांव मंडळातील लाभार्थ्‍यांनी उपस्थित राहावे, तसेच वसरणी मंडळ अधिकारी कार्यालय(डेअरी काॅर्नर ) येथे  वसरणी, वाजेगांव, तुप्‍पा, विष्‍णुपुरी या मंडळातील असे एकूण 146 लाभार्थ्‍यांचे डीबीटी करुन घेण्‍यात येणार आहे. या कामासाठी ब्रँच पोस्‍ट मास्‍टर व आधार किट संचालक, महसूल सेवक यांचे सहकार्य घेऊन सकाळी 10 ते कार्यालयीन वेळेत करून घेण्यात  येणार आहे.

ज्‍या लाभार्थ्‍यांची डीबीटी झाली नाही त्‍यांनी आधार कार्ड, पोस्‍ट खाते, अंपग असतील तर अपंगत्‍वाचे प्रमाणपत्र घेऊन कँम्‍प चे ठिकाणी उपस्थित राहुन डीबीटी करुन घ्‍यावे, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.

००००००

वृत्त क्रमांक 813

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा  

नांदेड दि. 5  ऑगस्ट :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुधवार 6 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई येथुन विमानाने दुपारी 1.20 वा. श्री गुरू गोविंदसिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन. त्यानंतर मोटारीने प्रयाण. दुपारी 1.30 वा. माजी खासदार भास्करराव पाटील-खतगावकर यांचे निवासस्थान साई निवास महात्मा फुले हायस्कुलजवळ यशवंत कॉलेजरोड बाबानगर नांदेड येथे आगमन. दुपारी 1.30 वा. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी संचालिका कै. सौ. स्नेहलता भास्करराव पाटील खतगावकर यांच्या दु:खद निधनानिमित्त सात्वंनपर भेट. त्यानंतर दुपारी 2.25 वा. श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन. दुपारी 2.30 वा. हेलिकॉप्टरने बीडकडे प्रयाण करतील. 

000

 वृत्त क्रमांक 812 

समाजातील खऱ्या गरजू लाभार्थ्यांना शोधून लाभ द्या - महेश ढवळे

 

दिव्यांग, तृतीयपंथी व समाजातील वंचित घटकांना शिधापत्रिका वाटप

 

नांदेड दि. 5  ऑगस्ट :  समाजातील खऱ्या लाभार्थ्यांना शोधून त्यांना योजनांचा लाभ मिळवून द्या. तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे प्रतिपादन राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी केले.

 

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनच्या कॅबिनेट सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जगदीश बारदेवाड, लेखाधिकारी निळकंठ पांचगे, डॉ. सान्वी जेठवाणी, जिल्ह्यातील दिव्यांग, तृतीयपंथी आदीची उपस्थिती होती.

 

समाजातील खरे गरजू लाभार्थी ओळखून त्यांना लाभ मिळवून द्यावा. ज्यांचे उत्पन्न जास्त आहे असे लोक लाभ घेत असतील तर अशा लोकांना शोधा त्यांच्यावर कारवाई करता येईल असेही अध्यक्ष श्री. ढवळे यांनी सांगितले. आज समाजातील वंचित घटकांचा शोध घेवून त्यांना लाभ देण्याची कार्यवाही केली यांचे समाधान व्यक्त करुन त्यांनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.

 

दिव्यांग, तृतीयपंथी यांच्यासह समाजातील वंचित घटकांना शिधापत्रिका वाटप

 

नांदेड तालुक्यातील 17 व अर्धापूर तालुक्यातील 8 दिव्यांग, तृतीयपंथी यांच्यासह वंचित घटकातील लाभार्थ्यांना, ज्यांना आतापर्यंत कधीच लाभ मिळाला नव्हता अशा लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात शिधापत्रिका अध्यक्ष महेश ढवळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या.

 

यामध्ये देविदास गंधकावड, बिजली शहानूर बक्श, इरम फरीदा बकश या तृतीयपंथी व मुन्नी शेख हुजूर, गोदावरी राऊत, पुंडलिक कोडिंबा मामीलवाड, शिवनंदाबाई नागोराव जोगदंड, वसीम खान, चंदाप्रकाश पाटणी, समरीन बेगम, वंदना आदित्य पाटील, शशिकला मारोती स्वामी, फहरीन बेगन, नसरीन बेगम, मुख्तार चाँद, मोहम्मद हाजी, मौहमद बाकर ईस्माईल यांना तर अर्धापूर तालुक्यातील सय्यद शाहीन सय्यद मुजीब, शेख सुलतान शेख शबीर, सुमन चांदु खरुकर, सुनिता रामकिशन सरवदे, प्रिती बाळू लोणे, रेखा काशिनाथ वाघमारे, शिवकन्या परमेश्वर कपाटे, प्रमिला दिलीप कांबळे यांना शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या.

00000













 वृत्त क्रमांक 811

क्रीडांगण व व्यायामशाळा विकासासाठी योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

६ ते १४ ऑगस्टपर्यंत अर्ज वाटप व प्रस्ताव स्वीकारणार

नांदेड, दि. ५ ऑगस्ट :–राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन व प्रचार-प्रसार यासाठी पोषक वातावरण निर्मिती करण्याच्या उद्देशाने सन २०१२ पासून राज्य क्रीडा धोरण राबवले जात आहे. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांचेमार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता क्रीडांगण विकास  व व्यायामशाळा विकास योजना अंतर्गत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

क्रीडांगण विकास योजनेत एकूण १३ बाबींचा समावेश असून, विविध सुविधा उभारणीसाठी संस्थांना व्यायामशाळा विकास योजनेत व्यायामशाळेचे बांधकाम, अद्ययावत साहित्य खरेदी किंवा खुली जिम उभारणी यासाठी साहित्य/अनुदान देण्यात येणार आहे.

सदर योजनेसाठी विहित नमुन्यातील अर्ज ६ ते १४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत (सुटीचे दिवस वगळून) जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड येथील क्रीडा अधिकारी कार्यालयात उपलब्ध होतील व तेथेच स्वीकारले जातील.

अर्ज मागविण्याच्या वेळी संस्थेचे दोन्ही नोंदणी प्रमाणपत्रांची सत्यप्रती किंवा संस्थेच्या लेटरहेडवर अर्ज मागणी पत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतरच अर्ज वितरित करण्यात येतील, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

०००००

वृत्त क्रमांक 810

विविध ८६ पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षेचे यशस्वी आयोजन

१७ हजारांहून अधिक अर्ज, ११ हजारांहून अधिक उमेदवारांची परीक्षा

नांदेड, दि.५ ऑगस्ट :–डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपूरी, नांदेड येथे वर्ग-४ मधील विविध ८६ रिक्त पदांच्या भरतीसाठी २५ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली.

या भरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्रातील विविध भागांतून १७,१४६ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते, त्यापैकी ११,८६८ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षेत सहभाग घेतला. परीक्षेसाठी मुंबई, पुणे, संभाजीनगर, नागपूर, अमरावती, नांदेड या प्रमुख शहरांतील एकूण ११ परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

परीक्षेचे आयोजन अत्यंत पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. प्रत्येक परीक्षा केंद्रावर जामर यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे व निरीक्षक नेमण्यात आले होते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न होता परीक्षा शांततेत पार पडली.

या भरती प्रक्रियेतील पुढील टप्प्यांबाबत व परीक्षेचा निकाल महाविद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. बी. देशमुख यांनी दिली.

०००००

 वृत्त क्रमांक 809

आधुनिक तंत्रज्ञानाचे न्यू एज कोर्सेस आता देगलूरमध्ये उपलब्ध

सोलार टेक्निशियन कोर्ससाठी प्रवेश सुरू; दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी

नांदेड, दि. ५ ऑगस्ट:– कौशल्य, रोजगार, नाविन्यता व उद्योजकता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या न्यू एज कोर्सेस योजनेंतर्गत देगलूर येथील अक्का महादेवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सोलार टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) या नवीन अभ्यासक्रमाची सुरूवात झाली आहे.

या कोर्ससाठी एकूण दोन युनिट असून एकूण ४० जागा उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक पात्रता ही किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सदर कोर्स आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअर घडवण्याची सुवर्णसंधी देतो.

विद्यार्थ्यांनी या कोर्ससाठी वेळेत नोंदणी करून प्रवेश घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य, अक्का महादेवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देगलूर, जि. नांदेड यांनी केले आहे.

००००

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...