Saturday, April 29, 2017

पालकमंत्री अर्जून खोतकर यांचा दौरा
नांदेड दि. 29 :-  राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जून खोतकर हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार 30 एप्रिल 2017 रोजी वसमत येथून सायं. 7.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. रात्री 8 वा. नांदेड-वाघाळा महानगर पालिकेतील शिवसेना पक्षाच्या नगरसेवकांची बैठक, स्थळ- शासकीय विश्रामगृह नांदेड.  
सोमवार 1 मे 2017 रोजी सकाळी 7.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून वजिराबाद पोलीस कवायत मैदानाकडे प्रयाण. सकाळी 8 वा. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वजवंदनाच्या मुख्य शासकीय समारंभास उपस्थिती. स्थळ- पोलीस कवायत मैदान नांदेड. सकाळी 9.30 वा. सचखंड  हुजूर  साहिब  गुरुद्वारा  येथे  दर्शनासाठी  भेट. सकाळी 10.30 वा. शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रकाश कोडगे यांच्या निवासस्थानी स्नेह भेट. सकाळी 11 वा. संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना ओळखपत्राचे वितरण, स्थळ- क्षत्रिय समाज रेणुका माता मंदिरासमोर गाडीपुरा नांदेड. सकाळी 11.30 वा. नांदेड मनपाअंतर्गत प्रभाग क्र. 3 सांगवी येथील रस्त्याचे लोकार्पण, स्थळ- एम.जी.एम. कॉलेज समोर नांदेड. दुपारी 12.30 वा.  पिंपळगाव ता. हदगावकडे प्रयाण. दुपारी 1.45 वा. पिपळगाव येथे अखंड श्री दत्तनाम सप्ताह कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3 वा. पिंपळगाव येथून नांदेड मार्गे मोटारीने जालनाकडे प्रयाण करतील.

000000
जनतेचे जीवनमान उंचाविण्यासाठी योजनांची
प्रभावी अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी डोंगरे
मनरेगा, जलयुक्त, पाणीटंचाई उपायांबाबत सर्वंकष आढावा
नांदेड दि. 29 :- विकासाच्या योजना या थेट नागरिकांच्या जीवनाशी निगडीत असतात. त्यामागे मोठा विचार-धोरण असते. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेचे जीवनमान उंचाविण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी आज येथे दिले. जिल्ह्यातील मनरेगा अंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना, जलयुक्त शिवार अभियानातील कामांचा तसेच पाणी टंचाईवरील उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी डोंगरे बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण नियोजन भवनातील कॅबिनेट सभागृहात बैठक संपन्न झाली. बैठकीत योजनांमधील विविध बाबी, टंचाई उपाययोजनांचा जिल्हाधिकारी डोंगरे यांनी तपशीलवार व सर्वंकष आढावा घेतला.
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, सहायक जिल्हाधिकारी तथा किनवट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॅा. राजेंद्र भारूड, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, लघू सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मनरेगांतर्गत सहायक प्रकल्प अधिकारी आदींची उपस्थिती होती.  
बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डोंगरे म्हणाले की, एखाद्या गावात होणाऱ्या विकास कामाच्या मागे अनेक यंत्रणांच्या समन्वय महत्त्वाचा ठरतो. विकासाच्या योजना या जनतेच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या असतात. त्या राबविण्यामागे विचार तसेच धोरण असते. त्यातून नागरिकांचे जीवनमान उंचवावे, अशी अपेक्षा असते. त्यामुळे विविध यंत्रणांनी समन्वय राखला तरच अशा योजना लोकांपर्यंत पोहचतात, यशस्वी होतात. त्यामुळे महसूल असो वा अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित यंत्रणा, या सर्वांनी समन्वयाने प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरते. योजनांच्या अंमलबजावणीत अनेक घटकाचे योगदान महत्त्वाचे असते. त्यामुळे या घटकांना दीशा देण्यासाठी, योग्यवेळी योग्य नेतृत्त्व देण्याचे प्रयत्नही अधिकाऱ्यांनी करावेत, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेतील विविध स्वरुपांची कामे, त्यांचे प्रस्ताव ग्रामसभेतून निवडणे, तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता आणि वेळेत कामे पुर्ण करण्याबाबतही निर्देश देण्यात आले. जलयुक्त शिवार अभियानातील गावांचा समावेश आणि करण्यात आलेल्या कामांचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. पाणीटंचाई उपाय योजना आणि त्यातील विविध मुद्यांवर सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाटील, उपजिल्हाधिकारी श्री. कांबळे तसेच उपस्थित उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांनी सहभाग घेतला.

000000
महाराष्ट्र दिनी मुंबईतील ट्रान्सफॉर्म महाराष्ट्रमध्ये
एसजीजीएसचे 100 विद्यार्थी सहभागी होणार
नांदेड, दि. 29 :- यंदाचा 58 वा महाराष्ट्र दिन ट्रान्सफॉर्म महाराष्ट्रदिवस म्हणूनही साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक विकासात योगदान देणाऱ्या युवा पिढीशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमामध्ये नांदेड येथील श्रीगुरुगोबिंद सिंघजी अभियांत्रीकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी (एसजीजीएस) मधील शंभर विद्यार्थ्यांना आमंत्रित केले गेले आहे. ही बाब नांदेडसाठी आणि आमच्या संस्थेसाठी अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रीया संस्थेचे संचालक डॅा. एल. एम. वाघमारे यांनी व्यक्त केली आहे.
राज्याच्या विकासाबाबत आजच्या युवकांच्या कल्पना जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून साकारलेल्या कार्यक्रमाचा समारोप सोहळा वरळी येथील एनएससीआय येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातील जवळपास आठ हजार युवक सहभागी होणार असून आपल्या ट्रान्सफॉर्म महाराष्ट्राबाबतच्या संकल्पना सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला रतन टाटा, मेजर जनरल अनुज माथुर, अक्षय कुमार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आपल्या देशाची खरी संपदा असलेल्या तरूणाईशी, विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांशी महाराष्ट्र दिनी राज्यापुढील महत्त्वाच्या समस्यांवर चिंतन करण्याचे त्यातून समस्यांची उकल करण्याचे आणि त्यावर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र हा उपक्रम हाती घेतला आहे, असे मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी निधी कामदार यांनी सांगितले.
ट्रान्सफॉर्म महाराष्ट्रसाठी डिसेंबर महिन्यात राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्रातील 11 सामाजिक-आर्थिक क्षेत्रातील बदल घडविण्यासाठी युवकांनी आपल्या संकल्पना/उपाय सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार राज्यभरातील जवळपास 11,500 विद्यार्थ्यांकडून 2500 प्रवेश आले. तर तब्बल 6 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. आता महाराष्ट्र दिनी आयोजित कार्यक्रमात प्रत्येक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट संकल्पना सादर करणाऱ्या युवकांना सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.
ट्रान्सफॉर्म महाराष्ट्रमध्ये एनोव्हेशन एक्झिबिशन
ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कॅप्टन अमोल यादव यांनी साकारलेले स्वदेशी विमान एनोव्हेशन एक्झिबिशनमध्ये असणार आहे. शिवाय वेगवेगळ्या युवकांनी केलेले इनोव्हेशनही या एक्झिबिशनमध्ये पहायला मिळतील. याबरोबरच पर्यटन, कौशल्य विकास, सांस्कृतिक कार्य, गृह, शिक्षण, माहिती व जनसंपर्क, समृद्धी महामार्ग, एमएमआरडीए-मेट्रो रेल, महाराष्ट्र ट्रान्स हार्बर लिंक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ-स्टार्ट अप योजना, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, कृषी, पाणीपुरवठा आणि स्वच्छता असे विभाग सहभागी होण्याबरोबरच महाराष्ट्र विकासासंबंधित बुथ, स्टॉल्स, प्रदर्शने मांडणार आहेत. आजच्या युवकांनी राज्याच्या विकासाच्या केलेल्या प्रारुपाचाही या प्रदर्शनामध्ये समावेश असणार आहे.
ट्रान्सफॉर्म महाराष्ट्रमध्ये सहभागी होणारीएसजीजीएस-नांदेडची टीम
टीम H20 - रोहित जंगले, उज्वदीप पाटील, मयूर पाटील, शिवरंजनी कदम, पराग नगराळे, ज्ञानेश्वर काळे या विद्यार्थ्यांच्या दुष्काळावर मात करण्यासाठीच्या संकल्पनेला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. त्यांना प्रा. मिलिंद वाईकर, प्रा. मिलिंद राजूरकर यांनी मार्गदर्शन केले.
टीम सूर्या- अजिंक्य धारिया, शिवानी सानितीकर, शांतनू बदमोरे, ऐश्वर्या कुलकर्णी, करिष्मा इस्मयील या विद्यार्थ्यांच्या दुष्काळावर मात करण्यासाठीच्या संकल्पनेला चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. त्यांना प्रा. माणिक रोडगे, प्रा. डी. एस. मेहता व प्रा. विनोद तुन्गीकर यांनी मार्गदर्शन केले.
टीम परिवर्तन- सागर उज्जैनकर वैभव पाटेवार, धनश्री घुगे, सुप्रतिक देशपांडे, सिद्धेश्वर रेवतकर, मयुरी लकशेटे या विद्यार्थ्यांच्या "भविष्याची गरज ओळखून ग्रामीण शिक्षणातील आवश्यक बदल" या संकल्पनेला चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्यांना प्रा. अरुण पाटील यांनी मार्गदर्शन केले.
ट्रान्सफॉर्म महाराष्ट्रची काही वैशिष्ट्ये
  • राज्याच्या विकासासंबंधित संकल्पना जाणून घेण्यासाठी ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र अभियान
  • गेल्या 26 डिसेंबर 2016 रोजी या अभियानाची सुरुवात
  • 1 मे रोजीच्या कार्यक्रमात आठ हजाराहून अधिक युवक सहभागी होणार
  • 6 लाखांहून अधिक ऑनलाईन व्होटर्सनी ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र अभियानात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.
ट्रान्सफॉर्म महाराष्ट्रमधील नाविन्यपूर्ण प्रदर्शन NSCI वरळी येथे जनतेसाठी सकाळी 9 पासून खुले असणार असून अधिकाधिक नागरिकांनी तेथे भेट द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी निधी कामदार यांनी केले आहे.

000000
दहावीच्या कला प्राविण्य गुणांसाठी
आणखी पाच संस्थांच्या प्रमाणपत्राना मान्यता
नांदेड दि. 29 :-  शास्त्रीय कला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोक कला प्रकारात सहभागी होणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याकरीता निवडण्यात आलेल्या संस्थांच्या यादीमध्ये आणखी पाच संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर विभागीय मंडळाचे सचिव यांनी दिली आहे.
मार्च 2017 पासून दहावीच्या परीक्षेमध्ये कला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या‍ विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार वाढीव गुणाची सवलत देण्यासाठी शास्त्रीय संगीत, नृत्य व वादन तसेच लोककला क्षेत्रातील संस्थांची प्रमाणपत्र देण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
इयत्ता 11 वीच्या प्रवेशपत्रासाठी या शासनमान्य असणाऱ्या पाच संस्थांमधील विद्यार्थ्यांना कला क्षेत्रातील राखीव जागांवर सन 2016-17 या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्यात येत होता. या पाच संस्थांचा आता विद्यार्थ्यांना सवलतीच्या वाढीव गुण देण्याकरीता निवड करण्यात आलेल्या संस्थांच्या यादीमध्ये समावेश करण्यात येत आहे. या संस्था पुढीलप्रमाणे अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय, सरफोजी राजे भोसले डान्स रिसर्च इन्स्टिटयूट, नालंदा नृत्त्य कला महाविद्यालय, श्री वल्लभ संगितालय आणि पुणे भारत गायन समाज. या वाढीव गुणांकरीता प्रमाण देण्याची कार्यपद्धती 1 मार्च 2017 च्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याचे मंडळाने म्हटले आहे.

00000
धर्माबाद आयटीआयमध्ये शिल्पनिदेशकांच्या
नेमणुकीसाठी 2 मे रोजी मुलाखती
नांदेड दि. 29 :-  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धर्माबाद येथे शिल्पकारागीर योजनेअंतर्गत शिल्पनिदेशकांचे पदे अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात निव्वळ तासिका तत्वावर तत्वाभ्यास व प्रात्यक्षिक शिकविण्यासाठी नेमणूक करावयाची आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी मंगळवार 2 मे 2017 रोजी मुलाखतीसाठी मुळ व छायांकित कागदपत्राच्या प्रतीसह सकाळी 11.30 वा. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धर्माबाद येथे उपस्थित रहावे, असे आवाहन प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था धर्माबाद यांनी केले आहे. 
ज्या व्यवसायासाठी शिल्पनिदेशकाचे पद निव्वळ तासिका तत्वावर भरावयाची आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. यांत्रिक कृषित्र, अभियांत्रिकी चित्रकला निदेशक, संधाता व जोडारी या व्यवसायाकरीता शैक्षणिक अर्हता ही संबंधित व्यवसायामधील मेकॅनिकल अभियांत्रिकी किमान द्वितीय श्रेणीत पदवी, पदविका व एक / दोन वर्षाचा अनुभव किंवा संबंधीत व्यवसायातील आयटीआय प्रमाणपत्र एनसीव्हीटी, एटीएस परीक्षा उत्तीर्ण व तीन वर्षाचा असणे आवश्यक आहे. सीटीआय उत्तीर्ण उमेदवारास व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेले शिल्पनिदेशक, गटनिदेशक यांना प्राधान्य देण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना शासन निर्णयानुसार अटी मान्य असल्याचे लेखी हमीपत्र दिल्यानंतरच तासिका तत्वारील नियुक्ती मिळेल.
या संस्थेस यापुर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी मंगळवार 2 मे 2017 रोजी संस्थेत उपस्थित रहावे. तसेच त्यानंतर आलेल्या संबंधीत उमेदवारांचा विचार केला जाणार नाही, असेही प्रसिद्धी पत्रकात औद्योगिक प्रशिक्षण संस्था धर्माबादचे प्राचार्य यांनी सांगितले आहे.

000000

लेख

करा..पालन राष्ट्रध्वजसंहितेचे , राष्ट्रभिमान प्रतीकाचे 
            भारताचा राष्ट्रध्वज हा भारतीय लोकांच्या आशा आणि आकांक्षाचे प्रतिनिधत्व करतो. भारतीय राष्ट्रध्वज आपल्या राष्ट्राबद्दलच्या अभिमानाचं प्रतीक आहे. हा तिरंगा गेल्या सहा दशकांहून अधिक काळ पूर्ण तेजाने फडकत राहण्यासाठी कित्येक लोक सशस्त्र बलांच्या जवानांसह त्याचे रक्षण करण्याकरिता उदारपणाने आपले प्राण पणाला लावत आहेत. भारतीय ध्वजसंहितेची थोडक्यात माहिती येथे देण्यात येत आहे.
        जनतेतील सदस्य, खाजगी संघटना, शैक्षणिक संस्था इत्यादींनी ध्वजारोहण करणे, राष्ट्रध्वजाचा उपयोग करणे कलम एक 2.1 बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम 1950 आणि राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971 आणि या विषयावर अधिनियमित केलेला इतर कोणताही कायदा यात तरतूद केलेल्या मर्यादांव्यतिरिक्त उपरोक्त अधिनियमांच्या तरतुदी विचारात घेता सर्वसाधारण जनतेतील सदस्य, खाजगी संघटना, शैक्षणिक संस्था इत्यादीनी (एक) बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम, 1950 चा भंग करुन वाणिज्यिक प्रयोजनासाठी ध्वजाचा वापर करता कामा नये. (दोन) एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला मानवंदना देण्यासाठी ध्वज खाली आणू नये. याव्यतिरिक्त राष्ट्रध्वज लावण्यावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत. (तीन) ज्या प्रसंगी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सरकारी इमारतींवरील ध्वज अर्ध्यांवर उतरविण्यात येतो त्या प्रसंगाखेरीज ध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येणार नाही. (चार) खाजगी अंत्यसंस्कारासह जे कोणतेही असेल अशा कोणत्याही स्वरुपातील आच्छादन म्हणून ध्वजाचा वापर करता येणार नाही. (पाच) ध्वजाच्या कोणत्याही प्रकारच्या पोषाखाचा अथवा गणवेशाचा भाग म्हणून वापर करता येणार नाही किंवा त्याचे उशा, हातरुमाल, हातपुसणे यावर किंवा कोणत्याही पोशाख साहित्यावर भरतकाम करता येणार नाही किवां छपाई करता येणार नाही. (सहा) ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहिता येणार नाहीत. (सात) ध्वजाचा कोणतीही वस्तू घेण्याचे, देण्याचे बांधण्याचे किंवा वाहुन नेण्याचे साधन म्हणून वापर करता येणार नाही. परंतु विशेष प्रसंगी आणि प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन यासारख्या राष्ट्रीय दिनी तो साजरे करण्याचा एक भाग म्हणून ध्वज फडकविण्यापूर्वी ध्वजाच्या आतील भागात फुलांच्या पाकळया ठेवण्यास कोणतीही हरकत असणार नाही. (आठ) एखाद्या पुतळयाचे अनावरण करण्यासारख्या प्रसंगी ध्वजाचा वापर करण्यात येईल तेव्हा तो सुस्पष्टपणे व वेगळा दिसेल अशाप्रकारे लावण्यात यावा आणि त्याचा पुतळा किंवा स्मारकाचे आवरण म्हणून वापर करता येणार नाही. (नऊ) ध्वजाचा वक्त्याचा टेबल (डेस्क) झाकण्यासाठी वापर करता येणार नाही किंवा वक्त्याच्या व्यासपीठावर आच्छादन म्हणून वापर करता येणार नाही. (दहा) ध्वजाचा जाणीवपूर्वक भूमीशी किंवा जमिनीशी स्पर्श होऊ देऊ नये किंवा तो पाण्यावरुन फरफटत नेऊ नये. (अकरा) ध्वजाचा मोटार वाहन, रेल्वे गाडी, जहाज किंवा विमान यांच्या छतावर, बाजूंवर किंवा पाठीमागच्या बाजूस आच्छादता येणार नाही. (बारा) ध्वजाचा एखाद्या इमारतीचे आच्छादन म्हणून वापर करता येणार नाही आणि (तेरा) ध्वजाचा 'केसरी' रंगाचा पट्टा खालच्या बाजूस येईल अशाप्रकारे जाणीवपूर्वक ध्वज लावता येणार नाही.
        बोधचिन्ह व नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम 1950 राष्ट्रध्वजाचा उपयोग करणे- कलम 2 या अधिनियमामध्ये, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर (अ) 'बोधचिन्ह' याचा अर्थ अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेले असे कोणतेही बोधचिन्ह, मुद्रा, ध्वज, अधिचिन्ह, कुलचिन्ह किंवा चित्र प्रतिरुपण असा आहे. कलम 3 त्या त्या काळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरी, केंद्र शासन विहित करील अशी प्रकरणे व अशी परिस्थिती खेरीजकरुन एरव्ही कोणत्याही व्यक्तीला अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेले कोणतेही नाव किंवा बोधचिन्ह किंवा त्याची कोणतीही आभासी प्रतिकृती यांचा, केंद्र शासनाच्या किंवा शासनाने यासंबंधात प्राधिकृत केलेल्या कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणताही व्यापार, व्यवसाय, आजिविका किंवा पेशा यांच्या प्रयोजनार्थ अथवा कोणत्याही स्वामित्व हक्काच्या शिर्षकात अथवा कोणत्याही व्यापार चिन्हात किंवा चिन्हाकृतीत वापर करता येणार नाही किंवा वापर चालू ठेवता येणार नाही. टीप-भारताचा राष्ट्रीय ध्वज हा या अधिनियमाच्या अनुसूचीमध्ये बोधचिन्हे म्हणून विनिर्दिष्ट करण्यात आला आहे.
        राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971 कलम 2 जो कोणी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा कोणत्याही अन्य ठिकाणी लोकांच्या देखत भारतीय राष्ट्रध्वज किंवा त्याचा कोणताही भाग जाळील, छिन्नविच्छिन्न करील, विरुप करील, त्याचे पावित्र्य विटाळील, तो विद्रूप करील, नष्ट करील, पायाखाली तुडवील किंवा अन्यथा त्याची बेअदबी करील (मग ती तोंडी किंवा लेखी शब्दाद्वारे असो वा कृतीद्वारे असो) त्याला तीन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा होतील. स्पष्टीकरण 1-कायदेशीर मार्गाने भारतीय राष्ट्रध्वजात बदल घडवून आणण्याच्या हेतूने, भारतीय राष्ट्रध्वजाबाबत किंवा शासनाच्या कोणत्याही उपाययोजनांबाबत नापसंती दर्शविणारे अभिप्राय व्यक्त करण्याने किंवा त्यावर टीकाटिप्पणी करण्याने या कलमान्वये कोणताही अपराध घडणार नाही. स्पष्टीकरण 2- 'भारतीय राष्ट्रध्वज' या शब्दप्रयोगात कोणत्याही पदार्थापासून तयार केलेले किंवा कोणत्याही पदार्थावर चितारलेले भारतीय राष्ट्रध्वजाचे किंवा त्याच्या कोणत्याही भागाचे अगर भागांचे चित्र, रंगीत चित्र, रेखाटन किंवा छायाचित्र अथवा अन्य दृश्य प्रतिरुपण अंतर्भूत आहे. स्पष्टीकरण 3- 'सार्वजनिक ठिकाण' या शब्दप्रयोगाचा अर्थ जनतेने वापरावी म्हणून योजलेली किंवा जेथे त्यांना प्रवेश असेल अशी कोणतीही जागा असा आहे व त्यात कोणत्याही सार्वजनिक वाहनाचा अंतर्भाव आहे.  2.2 राज्यातील सदस्य खाजगी संघटना किंवा शैक्षणिक संस्था यांना राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा व सन्मान राखून सर्व प्रसंगांच्या व समारंभाच्या दिवशी किंवा अन्यथा राष्ट्रध्वज फडकविता, लावता येईल. (एक) ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्यात येतो अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून आणि तो स्पष्टपणे दिसेल अशा रीतीने लावला पाहिजे. (दोन) फाटलेला अथवा चुरगळलेला ध्वज लावण्यात येऊ नये. (तीन) ध्वज अन्य कोणत्याही ध्वजासोबत किंवा ध्वजांसोबत एकाच वेळी एकाच काठीवर फडकवू नये. (चार) या संहितेच्या भाग तीनच्या कलम नऊमध्ये अंतर्भूत केलेल्या तरतूदीव्यतिरिक्त कोणत्याही वाहनांवर ध्वज लावण्यात येऊ नये. (पाच) जेव्हा एखाद्या वक्त्याच्या व्यासपीठावर ध्वज लावावयाचा असेल तेंव्हा वक्त्याचे तोंड श्रोत्याकडे असताना त्याच्या उजव्या बाजूकडे ध्वज लावण्यात यावा किंवा वक्त्याच्या पाठीमागे लावताना तो भिंतीवर वक्त्याच्या पाठीमागे वरच्या बाजूला लावावा. (सहा) जेव्हा ध्वज भिंतीवर सपाट व आडवा लावण्यात आला असेल तर ध्वजातील केशरी रंगाचा पट्टा सर्वात वर असावा. जर ध्वज उभा लावण्यात आला असेल तर ध्वजाची केशरी रंगाची बाजू त्यांच्या (ध्वजाच्या ) उजव्या बाजूस असावी (म्हणजे ध्वजाकडे तोंड करुन उभ्या असलेल्या व्यक्तीच्या डाव्या बाजूस असावी) (सात) राष्ट्रध्वज या संहितेच्या भाग एकमध्ये विहित केलेल्या प्रमाण विनिर्देशांशी शक्य तेवढया प्रमाणात अनुरुप असावा. (आठ) राष्ट्रध्वजाच्या वरच्या बाजूला किंवा राष्ट्रध्वजाच्या वर किंवा त्याच्या बरोबरीने अन्य कोणत्याही ध्वज किंवा पताका लावू नये तसेच ध्वज ज्या काठीवर फडकत ठेवला असेल त्या काठीवर किंवा त्या काठीच्या वरच्या टोकावर फुले किंवा हार यांसह कोणतीही वस्तू ठेवू नये अथवा बोधचिन्ह लावू नये. (नऊ) ध्वजाचा अन्य कोणत्याही प्रकारे तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा शोभेसाठी उपयोग करुन नये. (दहा) कागदापासून तयार केलेला ध्वज जनतेला महत्त्वपूर्ण अशा राष्ट्रीय, सांस्कृतिक व क्रीडाविषयक कार्यक्रमांच्या वेळी लावता येईल तथापि असे कागदी ध्वज अशा कार्यक्रमानंतर जमिनीवर टाकू नयेत किंवा फेकू नयेत. ध्वजाची प्रतिष्ठा राखून शक्यतोवर खाजगीरीत्या त्याची विल्हेवाट लावावी. (अकरा) जेव्हा ध्वज मोकळया जागेत लावावयाचा असेल तेव्हा हवामानाची स्थिती विचारात न घेता शक्यतोवर तो सूर्यादयापासून सूर्यास्तपर्यंत लावण्यात यावा. (बारा) ध्वज फाटेल अशा कोणत्याही पध्दतीने तो लावू नये किंवा बांधू नये. (तेरा) ध्वज फाटला असेल किंवा मळाल्यामुळे खराब झाला असेल तर तो विशेषत: जाळून किंवा त्याची प्रतिष्ठा राखली जाईल अशा अन्य कोणत्याही पध्दतीने खाजगीरीत्या संबंधच्या संबंध नष्ट करावा.
        ध्वज लावण्याची योग्य पध्दत : 3.5 ज्या ज्या ठिकाणी ध्वज लावण्यात येईल अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून तो स्पष्टपणे दिसेल अशारीतीने लावला पाहिजे. 3.6 जेथे कोणत्याही सरकारी इमारतींवर ध्वज लावण्याची प्रथा आहे तेथे त्या इमारतींवर रविवार व सुट्टीचे दिवस धरुन सर्व दिवशी ध्वज लावण्यात येईल आणि या संहितेमध्ये तरतूद केली असेल ती खेरीजकरुन हवामान कसेही असले तरी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ध्वज लावण्यात येईल. अशा इमारतींवर रात्रीसुध्दा ध्वज लावता येईल. मात्र काही अगदी विशेष प्रसंगीच तो रात्री लावावा. 3.7 ध्वजारोहणाचे वेळी ध्वज नेहमी झर्रकन वर चढवावा आणि उतरविताना मात्र तो सावकाशपणे व विधीपूर्वक उतरविण्यात यावा. ध्वजरोहण व ध्वजावतरण जेव्हा बिगुलाच्या प्रसंगोचित सुरांवर करावयाचे असेल अशा वेळी ध्वज चढविण्याची आणि उतरविण्याची क्रिया त्या सुरांच्या बरोबरच झाली पाहिजे. 3.8 जेव्हा खिडकीची कड, सज्जा अगर इमारतीचा पुढील भाग अशा ठिकाणी आडव्या किंवा तिरक्या बसविलेल्या काठीवरुन ध्वज फडकविण्यात येतो तेव्हा ध्वजाची केशरी रंगाची बाजू काठीच्या वरच्या टोकाकडे असावी. 3.9 जर ध्वज इतर प्रकारे म्हणजे भिंतीवर सपाट व आडवा लावण्यात आला असेल तर ध्वंजातील केशरी रंगाचा पट्टा सर्वात वर असावा जर ध्वज उभा लावण्यात आला असेल तर ध्वजाची केशरी रंगाची बाजू (ध्वजाच्या) उजव्या बाजूस असावी म्हणजे ध्वजाकडे तोंड करुन उभ्या असलेल्या व्यक्तींच्या डाव्या बाजूस असावी. 3.10 एखाद्या व्यासपीठावर ध्वज लावावयाचा असेल तेव्हा वक्त्याचे तोंड श्रोत्यांकडे असताना त्याच्या उजवीकडे काठीवर ध्वज लावण्यात यावा अथवा वक्त्याच्या पाठीमागे लावताना तो भिंतीवर वक्त्याच्या वरच्या बाजूस लावावा. 3.11 पुतळयाच्या अनावरणासारख्या प्रसंगी ध्वज लावताना तो स्पष्ट दिसेल अशा वेगळया जागी लावण्यात यावा. टीप-पुतळयाचे अगर स्मारकाचे आच्छादन म्हणून ध्वजाचा वापर करु नये. 3.12 ध्वज मोटारीवर लावावयाचा असेल तर तो मोटारीच्या बॉनेटवर मध्यभागी किंवा मोटारीच्या समोरील उजव्या बाजूस मजबूतपणे बसवलेल्या सळईवर लावण्यात यावा. 3.13 मिरवणुकीत अथवा संचलनाच्या वेळी ध्वज फडकत न्यावयाचा असेल तर तो चालणाऱ्यांच्या उजव्या म्हणजेच खुद्द ध्वजाच्या उजव्या बाजूस असावा अगर अशा प्रसंगी इतर आणखी ध्वजांची रांग असेल तर तो त्या रांगेच्या मध्यभागी पुढे ठेवावा.
        ध्वजाचा चुकीचा वापर : 3.14 फाटलेल्या अथवा चुरगळलेल्या ध्वज लावता कामा नये. 3.15 एखाद्या व्यक्तीस अगर वस्तूस मानवंदना करण्यासाठी ध्वज खाली आणू नये. 3.16 दुसरा कोणताही ध्वज अगर पताका राष्ट्रध्वजाच्या वरच्या बाजूस अगर राष्ट्रध्वजावर आणि पुढे नमूद केलेले काही अपवाद सोडल्यास त्याच्या बरोबरीने लावू नये. तसेच ध्वज ज्या काठीवर फडकत असेल त्या काठीवर किंवा त्या काठीच्या वरच्या टोकावर फुले किंवा हार घालू नयेत अथवा बोधचिन्ह लावू  नये. 3.17 ध्वजाची तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा शोभेसाठी कोणत्याही प्रकारे उपयोग करु नये. 3.18 वक्त्याचे टेबल             झाकण्यासाठी अथवा व्यासपीठावर आच्छादन वा पडदा म्हणून राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.  3.19 ध्वजाचा केशरी रंगाचा पट्टा खाली येईल अशा रीतीने ध्वज लावू नये. 3.20 ध्वजाचा जमिनीस स्पर्श होऊ नये अथवा तो पाण्यावरुन फरफटत नेण्यात येऊ नये. 3.21 ध्वज फाटेल अशा पध्दतीने लावू नये अथवा बांधू नये.
        गैरवापर : 3.22 ध्वजाचा कोणत्याही स्वरुपात आच्छादन म्हणून वापर करता कामा नये. सरकारमार्फत अथवा सेनादलांमार्फत तसेच केंद्रीय निमलष्करी दले यांच्यामार्फत काढण्यात येणाऱ्या अंत्ययात्रांचे प्रसंग यास अपवाद असतील, असे प्रसंग पुढे दिले आहेत. 3.23 ध्वजाचा वाहन अथवा रेल्वेगाडी अगर जहाज यांच्या झडपांवर, छतांवर, बाजूंवर अथवा पाठीमागच्या बाजूस आच्छादन म्हणून वापर करता कामा नये.3.24 ध्वज फाटेल किंवा तो मलिन होईल अशा प्रकारे वापरु नये किंवा ठेवू नये.  3.25 ध्वज फाटला असेल अथवा मळल्यामुळे खराब झाला असेल तर तो कोठेतरी फेकून देऊ नये अथवा त्याचा अवमान होईल अशा रीतीने त्याची विल्हेवाट लावू नये. अशा परिस्थितीत ध्वज खाजगीरित्या शक्य तर जाळून किंवा त्याचा मान राखला जाईल अशा इतर प्रकाराने सबधच्या सबध नष्ट करावा. 3.26 ध्वजाचा इमारतीचे आच्छादन म्हणून वापर करु नये. 3.27 ध्वजाचा पोषाखाचा अथवा इतर कोणत्याही प्रकारच्या गणवेशाचा भाग म्हणून वापर करु नये तसेच त्याचे उशा, हातरुमाल यावर भरतकाम करुन नये. अगर त्याची हात पुसण्याचे रुमाल किंवा पेटया यांवर छपाई करु नये. 3.28 ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहू नयेत. 3.29 ध्वजाचा जाहिरातीच्या कोणत्याही स्वरुपात वापर करु नये अथवा ध्वजस्तंभाचा जाहिरात लावण्यासाठी म्हणूनही वापर करुन नये. 3.30 ध्वजाचा काही घेण्यासाठी, देण्यासाठी बांधण्यासाठी अगर वाहून नेण्यासाठी साधन म्हणून ध्वजाचा वापर करु नये. विशेष प्रसंग आणि राष्ट्रीय दिन साजरा करण्याचा एक भाग म्हणून प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन यासारख्या राष्ट्रीय सणांच्या दिवशी राष्ट्रवध्वज फडकविण्यापूर्वी राष्ट्रध्वजाच्या आतील भागात फुलांच्या पाकळया ठेवण्यात कोणतीही हरकत असणार नाही. 
-         संकलन जिल्हा माहिती कार्यालय नांदेड
*******


    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...