Saturday, April 29, 2017

लेख

करा..पालन राष्ट्रध्वजसंहितेचे , राष्ट्रभिमान प्रतीकाचे 
            भारताचा राष्ट्रध्वज हा भारतीय लोकांच्या आशा आणि आकांक्षाचे प्रतिनिधत्व करतो. भारतीय राष्ट्रध्वज आपल्या राष्ट्राबद्दलच्या अभिमानाचं प्रतीक आहे. हा तिरंगा गेल्या सहा दशकांहून अधिक काळ पूर्ण तेजाने फडकत राहण्यासाठी कित्येक लोक सशस्त्र बलांच्या जवानांसह त्याचे रक्षण करण्याकरिता उदारपणाने आपले प्राण पणाला लावत आहेत. भारतीय ध्वजसंहितेची थोडक्यात माहिती येथे देण्यात येत आहे.
        जनतेतील सदस्य, खाजगी संघटना, शैक्षणिक संस्था इत्यादींनी ध्वजारोहण करणे, राष्ट्रध्वजाचा उपयोग करणे कलम एक 2.1 बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम 1950 आणि राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971 आणि या विषयावर अधिनियमित केलेला इतर कोणताही कायदा यात तरतूद केलेल्या मर्यादांव्यतिरिक्त उपरोक्त अधिनियमांच्या तरतुदी विचारात घेता सर्वसाधारण जनतेतील सदस्य, खाजगी संघटना, शैक्षणिक संस्था इत्यादीनी (एक) बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम, 1950 चा भंग करुन वाणिज्यिक प्रयोजनासाठी ध्वजाचा वापर करता कामा नये. (दोन) एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला मानवंदना देण्यासाठी ध्वज खाली आणू नये. याव्यतिरिक्त राष्ट्रध्वज लावण्यावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत. (तीन) ज्या प्रसंगी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सरकारी इमारतींवरील ध्वज अर्ध्यांवर उतरविण्यात येतो त्या प्रसंगाखेरीज ध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येणार नाही. (चार) खाजगी अंत्यसंस्कारासह जे कोणतेही असेल अशा कोणत्याही स्वरुपातील आच्छादन म्हणून ध्वजाचा वापर करता येणार नाही. (पाच) ध्वजाच्या कोणत्याही प्रकारच्या पोषाखाचा अथवा गणवेशाचा भाग म्हणून वापर करता येणार नाही किंवा त्याचे उशा, हातरुमाल, हातपुसणे यावर किंवा कोणत्याही पोशाख साहित्यावर भरतकाम करता येणार नाही किवां छपाई करता येणार नाही. (सहा) ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहिता येणार नाहीत. (सात) ध्वजाचा कोणतीही वस्तू घेण्याचे, देण्याचे बांधण्याचे किंवा वाहुन नेण्याचे साधन म्हणून वापर करता येणार नाही. परंतु विशेष प्रसंगी आणि प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन यासारख्या राष्ट्रीय दिनी तो साजरे करण्याचा एक भाग म्हणून ध्वज फडकविण्यापूर्वी ध्वजाच्या आतील भागात फुलांच्या पाकळया ठेवण्यास कोणतीही हरकत असणार नाही. (आठ) एखाद्या पुतळयाचे अनावरण करण्यासारख्या प्रसंगी ध्वजाचा वापर करण्यात येईल तेव्हा तो सुस्पष्टपणे व वेगळा दिसेल अशाप्रकारे लावण्यात यावा आणि त्याचा पुतळा किंवा स्मारकाचे आवरण म्हणून वापर करता येणार नाही. (नऊ) ध्वजाचा वक्त्याचा टेबल (डेस्क) झाकण्यासाठी वापर करता येणार नाही किंवा वक्त्याच्या व्यासपीठावर आच्छादन म्हणून वापर करता येणार नाही. (दहा) ध्वजाचा जाणीवपूर्वक भूमीशी किंवा जमिनीशी स्पर्श होऊ देऊ नये किंवा तो पाण्यावरुन फरफटत नेऊ नये. (अकरा) ध्वजाचा मोटार वाहन, रेल्वे गाडी, जहाज किंवा विमान यांच्या छतावर, बाजूंवर किंवा पाठीमागच्या बाजूस आच्छादता येणार नाही. (बारा) ध्वजाचा एखाद्या इमारतीचे आच्छादन म्हणून वापर करता येणार नाही आणि (तेरा) ध्वजाचा 'केसरी' रंगाचा पट्टा खालच्या बाजूस येईल अशाप्रकारे जाणीवपूर्वक ध्वज लावता येणार नाही.
        बोधचिन्ह व नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम 1950 राष्ट्रध्वजाचा उपयोग करणे- कलम 2 या अधिनियमामध्ये, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर (अ) 'बोधचिन्ह' याचा अर्थ अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेले असे कोणतेही बोधचिन्ह, मुद्रा, ध्वज, अधिचिन्ह, कुलचिन्ह किंवा चित्र प्रतिरुपण असा आहे. कलम 3 त्या त्या काळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरी, केंद्र शासन विहित करील अशी प्रकरणे व अशी परिस्थिती खेरीजकरुन एरव्ही कोणत्याही व्यक्तीला अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेले कोणतेही नाव किंवा बोधचिन्ह किंवा त्याची कोणतीही आभासी प्रतिकृती यांचा, केंद्र शासनाच्या किंवा शासनाने यासंबंधात प्राधिकृत केलेल्या कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणताही व्यापार, व्यवसाय, आजिविका किंवा पेशा यांच्या प्रयोजनार्थ अथवा कोणत्याही स्वामित्व हक्काच्या शिर्षकात अथवा कोणत्याही व्यापार चिन्हात किंवा चिन्हाकृतीत वापर करता येणार नाही किंवा वापर चालू ठेवता येणार नाही. टीप-भारताचा राष्ट्रीय ध्वज हा या अधिनियमाच्या अनुसूचीमध्ये बोधचिन्हे म्हणून विनिर्दिष्ट करण्यात आला आहे.
        राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971 कलम 2 जो कोणी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा कोणत्याही अन्य ठिकाणी लोकांच्या देखत भारतीय राष्ट्रध्वज किंवा त्याचा कोणताही भाग जाळील, छिन्नविच्छिन्न करील, विरुप करील, त्याचे पावित्र्य विटाळील, तो विद्रूप करील, नष्ट करील, पायाखाली तुडवील किंवा अन्यथा त्याची बेअदबी करील (मग ती तोंडी किंवा लेखी शब्दाद्वारे असो वा कृतीद्वारे असो) त्याला तीन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा होतील. स्पष्टीकरण 1-कायदेशीर मार्गाने भारतीय राष्ट्रध्वजात बदल घडवून आणण्याच्या हेतूने, भारतीय राष्ट्रध्वजाबाबत किंवा शासनाच्या कोणत्याही उपाययोजनांबाबत नापसंती दर्शविणारे अभिप्राय व्यक्त करण्याने किंवा त्यावर टीकाटिप्पणी करण्याने या कलमान्वये कोणताही अपराध घडणार नाही. स्पष्टीकरण 2- 'भारतीय राष्ट्रध्वज' या शब्दप्रयोगात कोणत्याही पदार्थापासून तयार केलेले किंवा कोणत्याही पदार्थावर चितारलेले भारतीय राष्ट्रध्वजाचे किंवा त्याच्या कोणत्याही भागाचे अगर भागांचे चित्र, रंगीत चित्र, रेखाटन किंवा छायाचित्र अथवा अन्य दृश्य प्रतिरुपण अंतर्भूत आहे. स्पष्टीकरण 3- 'सार्वजनिक ठिकाण' या शब्दप्रयोगाचा अर्थ जनतेने वापरावी म्हणून योजलेली किंवा जेथे त्यांना प्रवेश असेल अशी कोणतीही जागा असा आहे व त्यात कोणत्याही सार्वजनिक वाहनाचा अंतर्भाव आहे.  2.2 राज्यातील सदस्य खाजगी संघटना किंवा शैक्षणिक संस्था यांना राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा व सन्मान राखून सर्व प्रसंगांच्या व समारंभाच्या दिवशी किंवा अन्यथा राष्ट्रध्वज फडकविता, लावता येईल. (एक) ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्यात येतो अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून आणि तो स्पष्टपणे दिसेल अशा रीतीने लावला पाहिजे. (दोन) फाटलेला अथवा चुरगळलेला ध्वज लावण्यात येऊ नये. (तीन) ध्वज अन्य कोणत्याही ध्वजासोबत किंवा ध्वजांसोबत एकाच वेळी एकाच काठीवर फडकवू नये. (चार) या संहितेच्या भाग तीनच्या कलम नऊमध्ये अंतर्भूत केलेल्या तरतूदीव्यतिरिक्त कोणत्याही वाहनांवर ध्वज लावण्यात येऊ नये. (पाच) जेव्हा एखाद्या वक्त्याच्या व्यासपीठावर ध्वज लावावयाचा असेल तेंव्हा वक्त्याचे तोंड श्रोत्याकडे असताना त्याच्या उजव्या बाजूकडे ध्वज लावण्यात यावा किंवा वक्त्याच्या पाठीमागे लावताना तो भिंतीवर वक्त्याच्या पाठीमागे वरच्या बाजूला लावावा. (सहा) जेव्हा ध्वज भिंतीवर सपाट व आडवा लावण्यात आला असेल तर ध्वजातील केशरी रंगाचा पट्टा सर्वात वर असावा. जर ध्वज उभा लावण्यात आला असेल तर ध्वजाची केशरी रंगाची बाजू त्यांच्या (ध्वजाच्या ) उजव्या बाजूस असावी (म्हणजे ध्वजाकडे तोंड करुन उभ्या असलेल्या व्यक्तीच्या डाव्या बाजूस असावी) (सात) राष्ट्रध्वज या संहितेच्या भाग एकमध्ये विहित केलेल्या प्रमाण विनिर्देशांशी शक्य तेवढया प्रमाणात अनुरुप असावा. (आठ) राष्ट्रध्वजाच्या वरच्या बाजूला किंवा राष्ट्रध्वजाच्या वर किंवा त्याच्या बरोबरीने अन्य कोणत्याही ध्वज किंवा पताका लावू नये तसेच ध्वज ज्या काठीवर फडकत ठेवला असेल त्या काठीवर किंवा त्या काठीच्या वरच्या टोकावर फुले किंवा हार यांसह कोणतीही वस्तू ठेवू नये अथवा बोधचिन्ह लावू नये. (नऊ) ध्वजाचा अन्य कोणत्याही प्रकारे तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा शोभेसाठी उपयोग करुन नये. (दहा) कागदापासून तयार केलेला ध्वज जनतेला महत्त्वपूर्ण अशा राष्ट्रीय, सांस्कृतिक व क्रीडाविषयक कार्यक्रमांच्या वेळी लावता येईल तथापि असे कागदी ध्वज अशा कार्यक्रमानंतर जमिनीवर टाकू नयेत किंवा फेकू नयेत. ध्वजाची प्रतिष्ठा राखून शक्यतोवर खाजगीरीत्या त्याची विल्हेवाट लावावी. (अकरा) जेव्हा ध्वज मोकळया जागेत लावावयाचा असेल तेव्हा हवामानाची स्थिती विचारात न घेता शक्यतोवर तो सूर्यादयापासून सूर्यास्तपर्यंत लावण्यात यावा. (बारा) ध्वज फाटेल अशा कोणत्याही पध्दतीने तो लावू नये किंवा बांधू नये. (तेरा) ध्वज फाटला असेल किंवा मळाल्यामुळे खराब झाला असेल तर तो विशेषत: जाळून किंवा त्याची प्रतिष्ठा राखली जाईल अशा अन्य कोणत्याही पध्दतीने खाजगीरीत्या संबंधच्या संबंध नष्ट करावा.
        ध्वज लावण्याची योग्य पध्दत : 3.5 ज्या ज्या ठिकाणी ध्वज लावण्यात येईल अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून तो स्पष्टपणे दिसेल अशारीतीने लावला पाहिजे. 3.6 जेथे कोणत्याही सरकारी इमारतींवर ध्वज लावण्याची प्रथा आहे तेथे त्या इमारतींवर रविवार व सुट्टीचे दिवस धरुन सर्व दिवशी ध्वज लावण्यात येईल आणि या संहितेमध्ये तरतूद केली असेल ती खेरीजकरुन हवामान कसेही असले तरी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ध्वज लावण्यात येईल. अशा इमारतींवर रात्रीसुध्दा ध्वज लावता येईल. मात्र काही अगदी विशेष प्रसंगीच तो रात्री लावावा. 3.7 ध्वजारोहणाचे वेळी ध्वज नेहमी झर्रकन वर चढवावा आणि उतरविताना मात्र तो सावकाशपणे व विधीपूर्वक उतरविण्यात यावा. ध्वजरोहण व ध्वजावतरण जेव्हा बिगुलाच्या प्रसंगोचित सुरांवर करावयाचे असेल अशा वेळी ध्वज चढविण्याची आणि उतरविण्याची क्रिया त्या सुरांच्या बरोबरच झाली पाहिजे. 3.8 जेव्हा खिडकीची कड, सज्जा अगर इमारतीचा पुढील भाग अशा ठिकाणी आडव्या किंवा तिरक्या बसविलेल्या काठीवरुन ध्वज फडकविण्यात येतो तेव्हा ध्वजाची केशरी रंगाची बाजू काठीच्या वरच्या टोकाकडे असावी. 3.9 जर ध्वज इतर प्रकारे म्हणजे भिंतीवर सपाट व आडवा लावण्यात आला असेल तर ध्वंजातील केशरी रंगाचा पट्टा सर्वात वर असावा जर ध्वज उभा लावण्यात आला असेल तर ध्वजाची केशरी रंगाची बाजू (ध्वजाच्या) उजव्या बाजूस असावी म्हणजे ध्वजाकडे तोंड करुन उभ्या असलेल्या व्यक्तींच्या डाव्या बाजूस असावी. 3.10 एखाद्या व्यासपीठावर ध्वज लावावयाचा असेल तेव्हा वक्त्याचे तोंड श्रोत्यांकडे असताना त्याच्या उजवीकडे काठीवर ध्वज लावण्यात यावा अथवा वक्त्याच्या पाठीमागे लावताना तो भिंतीवर वक्त्याच्या वरच्या बाजूस लावावा. 3.11 पुतळयाच्या अनावरणासारख्या प्रसंगी ध्वज लावताना तो स्पष्ट दिसेल अशा वेगळया जागी लावण्यात यावा. टीप-पुतळयाचे अगर स्मारकाचे आच्छादन म्हणून ध्वजाचा वापर करु नये. 3.12 ध्वज मोटारीवर लावावयाचा असेल तर तो मोटारीच्या बॉनेटवर मध्यभागी किंवा मोटारीच्या समोरील उजव्या बाजूस मजबूतपणे बसवलेल्या सळईवर लावण्यात यावा. 3.13 मिरवणुकीत अथवा संचलनाच्या वेळी ध्वज फडकत न्यावयाचा असेल तर तो चालणाऱ्यांच्या उजव्या म्हणजेच खुद्द ध्वजाच्या उजव्या बाजूस असावा अगर अशा प्रसंगी इतर आणखी ध्वजांची रांग असेल तर तो त्या रांगेच्या मध्यभागी पुढे ठेवावा.
        ध्वजाचा चुकीचा वापर : 3.14 फाटलेल्या अथवा चुरगळलेल्या ध्वज लावता कामा नये. 3.15 एखाद्या व्यक्तीस अगर वस्तूस मानवंदना करण्यासाठी ध्वज खाली आणू नये. 3.16 दुसरा कोणताही ध्वज अगर पताका राष्ट्रध्वजाच्या वरच्या बाजूस अगर राष्ट्रध्वजावर आणि पुढे नमूद केलेले काही अपवाद सोडल्यास त्याच्या बरोबरीने लावू नये. तसेच ध्वज ज्या काठीवर फडकत असेल त्या काठीवर किंवा त्या काठीच्या वरच्या टोकावर फुले किंवा हार घालू नयेत अथवा बोधचिन्ह लावू  नये. 3.17 ध्वजाची तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा शोभेसाठी कोणत्याही प्रकारे उपयोग करु नये. 3.18 वक्त्याचे टेबल             झाकण्यासाठी अथवा व्यासपीठावर आच्छादन वा पडदा म्हणून राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.  3.19 ध्वजाचा केशरी रंगाचा पट्टा खाली येईल अशा रीतीने ध्वज लावू नये. 3.20 ध्वजाचा जमिनीस स्पर्श होऊ नये अथवा तो पाण्यावरुन फरफटत नेण्यात येऊ नये. 3.21 ध्वज फाटेल अशा पध्दतीने लावू नये अथवा बांधू नये.
        गैरवापर : 3.22 ध्वजाचा कोणत्याही स्वरुपात आच्छादन म्हणून वापर करता कामा नये. सरकारमार्फत अथवा सेनादलांमार्फत तसेच केंद्रीय निमलष्करी दले यांच्यामार्फत काढण्यात येणाऱ्या अंत्ययात्रांचे प्रसंग यास अपवाद असतील, असे प्रसंग पुढे दिले आहेत. 3.23 ध्वजाचा वाहन अथवा रेल्वेगाडी अगर जहाज यांच्या झडपांवर, छतांवर, बाजूंवर अथवा पाठीमागच्या बाजूस आच्छादन म्हणून वापर करता कामा नये.3.24 ध्वज फाटेल किंवा तो मलिन होईल अशा प्रकारे वापरु नये किंवा ठेवू नये.  3.25 ध्वज फाटला असेल अथवा मळल्यामुळे खराब झाला असेल तर तो कोठेतरी फेकून देऊ नये अथवा त्याचा अवमान होईल अशा रीतीने त्याची विल्हेवाट लावू नये. अशा परिस्थितीत ध्वज खाजगीरित्या शक्य तर जाळून किंवा त्याचा मान राखला जाईल अशा इतर प्रकाराने सबधच्या सबध नष्ट करावा. 3.26 ध्वजाचा इमारतीचे आच्छादन म्हणून वापर करु नये. 3.27 ध्वजाचा पोषाखाचा अथवा इतर कोणत्याही प्रकारच्या गणवेशाचा भाग म्हणून वापर करु नये तसेच त्याचे उशा, हातरुमाल यावर भरतकाम करुन नये. अगर त्याची हात पुसण्याचे रुमाल किंवा पेटया यांवर छपाई करु नये. 3.28 ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहू नयेत. 3.29 ध्वजाचा जाहिरातीच्या कोणत्याही स्वरुपात वापर करु नये अथवा ध्वजस्तंभाचा जाहिरात लावण्यासाठी म्हणूनही वापर करुन नये. 3.30 ध्वजाचा काही घेण्यासाठी, देण्यासाठी बांधण्यासाठी अगर वाहून नेण्यासाठी साधन म्हणून ध्वजाचा वापर करु नये. विशेष प्रसंग आणि राष्ट्रीय दिन साजरा करण्याचा एक भाग म्हणून प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन यासारख्या राष्ट्रीय सणांच्या दिवशी राष्ट्रवध्वज फडकविण्यापूर्वी राष्ट्रध्वजाच्या आतील भागात फुलांच्या पाकळया ठेवण्यात कोणतीही हरकत असणार नाही. 
-         संकलन जिल्हा माहिती कार्यालय नांदेड
*******


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...