Wednesday, May 31, 2017

दाभड बावरीनगर, पुर्णा येथील महाविहार-स्मारक
कामांना गती द्या - समाजिक न्याय मंत्री बडोले
               
नांदेड दि. 31 :- दाभड बावरीनगर येथील महाविहार तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आणि परभणी जिल्ह्यातील पुर्णा येथील बोधीसत्व डॉ. बी. आर. आंबेडकर स्मारक व बुद्धविहार यांच्या कामांना गती देण्यात यावी व ही कामे वेळेत दर्जेदार पद्धतीने पुर्ण करण्यात यावीत, असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे दिले.
            या कामांबाबतचा आढावा महिनाभरानंतर मुंबईत मंत्रालयात घेण्यात येईल, असेही त्यांनी या आढावा बैठकीत सांगितले. मंत्री श्री. बडोले यांच्या अध्यक्षतेखाली येथील मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृहात ही आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, परभणीचे जिल्हाधिकारी पी शिवाशंकर, दाभड बावरीनगर महाविहार समितीचे कार्याध्यक्ष डॉ. एस. पी. गायकवाड, पुर्णा येथील स्मारक व बुद्धविहार समितीचे अध्यक्ष भदन्त उपगुप्त महाथेरो, नांदेडचे उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, समाज कल्याण विभाग लातूरचे प्रादेशिक उपायुक्त एल. आय. वाघमारे, नांदेडचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजेंद्र रजपूत, परभणीचे कार्यकारी अभियंता एस. जी. देशपांडे, परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी पी. ए. बिरादार, नांदेडचे तहसिलदार किरण अंबेकर, पुर्णाचे तहसिलदार पी. एम. माचेवाड, परभणीचे समाज कल्याण अधिकारी व्ही. जी. सुर्यवंशी, नांदेडचे समाज कल्याण अधिकारी एन.बी. शेख, वास्तुरचनाकार विद्यासागर ठोमके आदींची उपस्थिती होती.
            मंत्री श्री. बडोले यांनी बावरीनगर येथील कामांचा संबंधित यंत्रणांकडून तपशीलवार आढावा घेतला. ते म्हणाले की, या कामांची गती अपेक्षेप्रमाणे नाही. त्यामुळे कामांचा दर्जा राखतांनाच ती वेळेत पुर्ण करण्याबाबत प्रयत्न करण्यात यावेत. याबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात यावा. नांदेड व परभणीतील या दोन्ही कामांबाबत महिनाभरानंतर मुंबई मंत्रालयस्तरावर  बैठक घेण्यात येईल. यावेळी श्री. बडोले यांनी प्रशासकीय मान्यता तसेच तांत्रिक मान्यतांबाबत संबंधित यंत्रणांनाही निर्देशीत केले.
            यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकारी श्री. डोंगरे , परभणीचे जिल्हाधिकारी श्री. शिवाशंकर यांनीही सहभाग घेतला. उपविभागीय अधिकारी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. बैठकीस समितींचे सदस्य, अधिकारी आदींची उपस्थिती होती.

00000000
खते, बियाण्यांबाबत गुणनियंत्रण सप्ताहाचे आयोजन
ई-पॉश मशिनद्वारे खताची विक्री होणार  
          
      नांदेड दि. 31 :- रासायनिक खत विक्रीसाठी थेट लाभ हस्तांतरण ( डीबीटी ) गुरुवार 1 जून 2017 पासून नांदेड जिल्हयात राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने नियोजन करण्यासाठी जिल्हा परिषदेचे कृषि पशुसंवर्धन समितीचे सभापती रेड्डी दत्तात्रय लक्ष्मण यांचे अध्यक्षतेखाली  रासायनिक खत उत्पादक कंपनी प्रतिनिधी, तसेच तालुकास्तरीय कृषि अधिकारी यांची  मंगळवार 30 मे रोजी बैठक घेण्यात आली.
            राज्याचे कृषि आयुक्त यांनी आवाहन केल्यानुसार कापूस पिकावरील शेंदरी बोंडअळीचे एकात्मीक व्यस्थापन कशा प्रकारे करावे याचे प्रसिध्दी पत्रकाचे अनावरण सभापती रेड्डी दत्तात्रय लक्ष्मण यांनी केले तसेच मोनसॅन्टो कंपनीचे प्रतापसिंह काळे कपाशीवरील शेंदरी बोंडअळीबाबत माहिती नियंत्रण याबाबतची माहिती दिली.
            सभापती रेड्डी यांनी जिल्हयात शेतकऱ्यांना बियाणे, खते उपलब्धतेबाबत अडचण येणार नाहीत. तसेच दर्जेदार बियाणे वेळेत उपलब्ध होतील याची दक्षता घेण्याबाबत सूचना दिल्या. त्याचप्रमाणे e-Pos मशिनद्वारे खताची विक्री करण्यात यावी मशिनबाबत अडचण भावल्यास तात्काळ संबंधित तालुक्याचे कृषि अधिकारी तसेच तालुक्यातील नियुक्त खत कंपनी प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधावा. बियाणे खताची खरेदी अधिकृत विक्रेत्याकडूनच करावी. बियाणे खरेदी करताना रितसर पावती घेण्यात यावी. तसेच बोगस बियाणे कमी किंमतीत मिळवून शेतकऱ्यांना विक्रीचे प्रकार आढळल्यास तात्काळ भरारी पथकाच्या ताब्यात देण्यात यावे,  असे आवाहन केले.
            या  बैठकीत ई-पॉश मश बदल मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे. मशिनचा खर्च देखील कंपन्याच करणार आहेत. विक्रीच्या नोंदीत पारदर्शकता येईल. शेतकऱ्यांच्या नावाखाली कंपन्यांकडून खत विक्रीत होणारी अनागोंदी थांबविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. खत विक्रीची अचूक नोंद ठेवण्यापूरता वापर पॉस मशिनचा होणार आहे. या मशिनचा संबंध आर्थिक व्यवहाराशी राहणार नाही. शेतकऱ्याला खताची विक्री उधारीत केली असो की , रोखीने केलेली असो फक्त वाटपाचीच नोंद पॉस मशिनवर होणार आहे. या मशिनवर नोंद शेतकऱ्यांचा अंगठा घेतल्यास कंपनीला अनुदान मिळणारच नाही, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी दिली.   
            कृषि विकास अधिकारी श्री. मोरे यांनी जिल्हयात 1 ते 15 जून या कालावधीत गुणनियंत्रण पंधरवाडयाचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये बियाणे, खते औषधी नमुने घेऊन तपासणीस पाठविणे, भरारी पथकामार्फत विक्री केंद्र तपासणी करणे तसेच ई-पॉश मशिनद्वारे खताची विक्री करणे शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्धता, दर्जा याबाबत अडचणी करीता विक्री केंद्रावर भरारी पथकाचे तसेच खत खरेदीसाठी आधारकार्ड आवश्यक असल्याबाबतचे फ्लेक्स लावणे, बियाणे, खते विक्री केंद्रावर कृषि सहाय्यक ग्रामसेवक यांची नियुक्ती करुन बियाणे, खते उपलब्धता तसेच मार्गदर्शन दी कामे करण्यात येणार आहेत. ई-पॉश मशिनद्वारे खत विक्री करण्यासाठी खत विक्रेते तसेच खत कंपनी प्रतिनिधी यांनी सहकार्य करावे, असे आवाहन कृषि विकास अधिकारी  श्री. मोरे यांनी केले.
            बैठकीस मोहीम अधिकारी अनंत हंडे, कृषि अधिकारी विश्वास अधापूरे, मोनसॅन्टो कंपनीचे प्रतापसिंह काळे तसेच रासायनिक खत विक्री कंपनी प्रतिनिधी तालुकास्तरीय कृषि अधिकारी उपस्थित होते.

0000000
जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त कार्यशाळा संपन्न
नांदेड दि. 31 :- जागतिक तंबाखू नकार दिन व साप्ताह निमित्त आज नांदेड जिल्हा रुग्णालयाकडून जनजागृतीपर रॅली तसेच यादिनानिमित्त कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी व नर्सिंग स्कूल येथील विद्यार्थ्यासाठी तंबाखू मुक्तीसाठी  कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेच्या माध्यमातून उपस्थित अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांना तंबाखूच्या सेवनामुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेच्या अनुषंगाने अध्यक्षीय भाषणात  बोलतेवेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर यांनी मानवाच्या सदृढ व निरोगी जीवनासाठी प्रत्येक व्यक्तीने तंबाखू सारख्या निकोटीन युक्त घातक आशा पदार्थापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. 

या कार्यक्रमास जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक हजारी, नेत्ररोग तज्ञ डॉ. संतोष शिर्शिकर, डॉ. एच. के. साखरे, दंत शल्य चिकीत्सक डॉ. किरण घोडजकर, डॉ. प्रदीप बोरसे तसेच  अधिकारी, कर्मचारी व नर्सिंग स्कूल येथील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
बेटमोगरामध्ये ..चला गावाकडे जाऊ कार्यक्रम संपन्न
नांदेड, दि. 31 :- अधिकारी व कर्मचारी यांनी पल्या गावी जाऊन दोन दिवस तेथील नागरिकांसह श्रमदान करावे. त्यात एक दिवस सुट्टीचा व एक दिवस कार्यालयीन असे नियोजन करावे असे विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी नांदेड व तहसिलदार नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय नांदेड येथील नायब तहसिलदार स्नेहलता स्वामी यांनी बेटमोगरा या आपल्या गावी चला गावाकडे जाऊ ध्यास विकासाचा धरू हे अभियान 28 29 मे असे दोन दिवस राबविले.
यात पहिल्या दिवशी ग्रामस्वच्छता करण्यात आली. यास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. सिद्धदयाळ शिवाचार्य यांच्या हस्ते परिसर स्वच्छता कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यांनी भौतिक स्वच्छतेसोबत मने ही स्वच्छ ठेवा, एकीने गावाचा विकास करा असा संदेश गावकऱ्यांना दिला.
ग्रामसभेचे आयोजन करून नागरिकांना जनकल्याण समृद्ध योजनेच्या 11 कलमी कार्यक्रमाची माहिती तलाठी  ग्रामसेवक  व कृषी सहाय्यक  यांच्या मार्फत देण्यात आली. अॅड. उदय संगारेड्डीकर यांचे ग्रामविकासवर व्याख्यान आयोजन करण्यात आले. त्यांनी गावाचे वैभव पुन्हा गावात आणण्यासाठी व गावाची अवकळा जाऊन समृद्ध गाव कसे होईल यावर मार्गदर्शन केले.
 दुसऱ्या दिवशी सकाळी अंगणात सडा, रांगोळ्या टाकून समता दिंडी काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू यांचेसह संविधान व ग्रामगीताचे पुज करुन ग्रंथ डोक्यावर घेऊन समता दिंडी काढण्यात आली. सरपंचामार्फत गावकरी यांना स्वच्छता व विकासाची शपथ देण्यात आली.  सातबाराचे चावडी वाचन झाले. गावकरी यांनी शंभर झाडे लावून जगविण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमात सरपंच पद्मजा पाटील, पंचायत समिती उपसभापती व महिलांसह गावकरी ,प्रतिष्ठीत नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसेवक गायकवाड, तलाठी कापसे, मुख्याध्यापक भैरवाडसह गावकरी यांनी यासाठी परिश्रम घेतले.

000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...