Friday, October 17, 2025

वृत्त क्रमांक  1113

दिवाळी पहाट कार्यक्रमात यावर्षीही नांदेडच्या रसिकांना संगीत मेजवानी, 

तीन दिवस सादर होणार्‍या कार्यक्रमात प्रमुख आकर्षण-प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल

नांदेड, दि.१७ ऑक्टोबर:- गेल्या तेरा वर्षापासून जिल्हा प्रशासन, गुरुद्वारा बोर्ड,नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका आणि नागरी सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील बंदाघाट येथे दिवाळी पहाट हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यावर्षी देखील दि.२० ऑक्टोंबर ते २२ ऑक्टोबर दरम्यान दिवाळी पहाटचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम हे यावर्षीचे दिवाळी पहाटचे आकर्षण असणार आहे.

दि.२० ऑक्टोंबर सकाळी साडेपाच वाजेपासून प्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांचे सुश्राव्यगायन होणार आहे. यात भावगिते, भक्तीगिते, चित्रपट गिते त्या सादर करणार आहेत. 

प्रख्यात निवेदक डॉ.नंदकुमार मुलमुले यांची संकल्पना असलेला हा कार्यक्रम असून ते स्वतः या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. सह गायक म्हणून रविंद्र आहिरे मुंबई हे देखील यात सहभागी होणार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजता संकल्पना व निवेदन बापू दासरी यांच्या पुढाकारातून रागरंग हा विविध वाद्य आणि गझल यांचे फ्युजन असलेला आगळावेगळा कार्यक्रम सादर होणार आहे. यात मिलिंद तुळणकर-पुणे, कल्याणी देशपांडे-पुणे, प्रकाश सोनकांबळे, ऐनोद्दीन वासरी, डॉ.गुंजन शिरभाते, सौ.आसावरी जोशी (रवंदे), बालासाहेब पाटील हे मान्यवर कलावंत सहभागी होतील. 

२० ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजता प्रख्यात नृत्य दिग्दर्शिका डॉ.सान्वी जेठवानी यांच्या संचाचा नृत्य झंकार हा कार्यक्रम सादर होणार आहे. शुभंम बिरकुरे व स्थानिक कलावंत यात सहभागी होतील. 

दि.२१  ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाच वाजता प्रख्यात निवेदक प्रा.सुनिल नेरलकर यांच्या पुढाकारातून पं.जसराज यांच्या शिष्योत्तमा अंकिता जोशी यांचा शास्त्रीय संगीतावरील आधारीत स्वर सरिता हा कार्यक्रम होणार आहे. यात अभिनय रवंदे, प्रशांत गाजरे, विश्वजित कोलंबीकर, अनहद वारसी, चिन्मय मठपती, अदिती रवंदे व ईश्वरी जोशी हे सहकारी कलावंत सहभागी होतील. 

बुधवार दि.२२ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेपाच वाजता संकल्पना व निवेदन अ‍ॅड.गजानन पिंपरखेडे यांच्या पुढाकारातून व पत्रकार विजय जोशी यांच्या निर्मितीतून १९६० ते १९८० या काळातील मराठी चित्रपटांच्या सुवर्णकाळात गाजलेल्या मराठी गितांचा रुपेरी सोनसळा हा कलांगण प्रतिष्ठाण प्रस्तूत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात प्रख्यात गायिका पौर्णिमा आडगावकर, किर्ती पंढरपूरकर, सौ.कांचन अंबेकर, स्वरांजली पांचाळ, मिताली सातोनकर, गायक सच्चिदानंद डाकोरे, शंकर सोनतोडे, विजय जोशी आदी मान्यवर गायक सहभागी होणार असून, या कार्यक्रमात वाद्यवृंदाची साथ राज लामटिळे, स्वप्नील धुळे, भगवानराव देशमुख, रविकुमार भद्रे, रतन चित्ते आदी करणार आहेत.

सायंकाळी साडेपाच वाजता नांदेडकरांना एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे.  जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या संकल्पनेतून व सुरेश जोंधळे व मकरंद दिवाकर यांच्या सहकार्यातून काफीला, कोल्हापूर निर्मित जियारत हा मराठी,हिंदी,उर्दू प्रेम साहित्यांची संगीतमय प्रेमयात्रा हा कार्यक्रम सादर होणार आहे. सतीश तांदळे यांचे दिग्दर्शन, संकलन व लेखन असलेला हा कार्यक्रम संगीतकार ऋषिकेश देशमाने यांच्या साह्याने रंगणार आहे. या कार्यक्रमाचे सादरीकरण निखिल पुजारी आणि सतीश तांदळे हे करणार आहेत. तर कार्यक्रमात ओंकार पाटील, सुरज कांबळे, कौस्तुभ शिंदे आणि संपदा माने यांचे गायन होणार आहे. सर्व कार्यक्रम वेळेवर सुरु होणार असून, नांदेडच्या रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, गुरुव्दारा बोर्ड आणि नागरी सांस्कृतिक समिती नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

उपस्थितांना नम्र विनंती व आवाहन

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने या कार्यक्रमात अतिवृष्टीग्रस्तांसाठी भरीव मदत करण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कार्यक्रम स्थळी ठेवण्यात आलेल्या मदत पेटीत आपण सढळ हाताने मदत करावी, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

००००००

वृत्त क्रमांक  1112

मागासवर्गीय मुलीचे शासकीय वसतिगृह गांधीनगर नांदेड येथे पालक मेळावा संपन्न

नांदेड, दि. 17 ऑक्टोबर : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत कार्यरत 125 मागासवर्गीय मुलीचे शासकीय वसतिगृह गांधीनगर नांदेड येथे गुरूवार 16 ऑक्टोबर रोजी पालक मेळावा घेण्यात आला. या पालक मेळाव्याचे उद्घाटन प्रमुख मार्गदर्शक प्रा. बाळासाहेब लोनवडे यांच्या हस्ते संपन्न झाले. 

कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले प्रा. बाळासाहेब लोनवडे यांनी अभ्यासामध्ये सातत्य ठेवा, करिअर कसे निवडावे, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर मर्यादित व उपयोगात्मक करून आपल्या आई-वडिलाचे स्वप्न पूर्ण करावीत यावर प्रकाश टाकला. श्रीमती एल. एस. गायके यांनी मुलीशी सवांद साधावा, त्यांना शेक्षणिक प्रगतीमध्ये प्रोत्साहन द्यावे यासह वसतिगृहामध्ये मिळणाऱ्या सोयी-सुविधांबाबत थोडक्यात माहिती दिली.

कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन श्री नागेश व पालक प्रतिनिधी, वसतिगृहाच्या प्रभारी गृहपाल श्रीमती एल. एस. गायके यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. धुर्पता गायकवाड या विद्यार्थीनीने केले तर आभार कु. सुषमा अस्वलमारे हिने मानले.  

0000

वृत्त क्रमांक  1111

“हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या  350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमाचा आढावा 

16 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन  

जिल्हा प्रशासन आणि क्षेत्रीय समितीच्या  समन्वयातून कार्यक्रमाचे होणार यशस्वी आयोजन : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, दि. 17 ऑक्टोबर :- “हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त येत्या 16 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने  जिल्हा प्रशासन व क्षेत्रीय समितीच्या समन्वयाने कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनावर भर देण्यात येणार असल्याचे  जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आढावा बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. 

बैठकीस मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईक, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुरज गुरव, मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक हरजितसिंग कडेवाले, कार्याध्यक्ष सरजित सिंग गील, क्षेत्रीय आयोजन समितीचे अध्यक्ष व सचिव, विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदीची उपस्थिती होती.

नांदेड येथील या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, जालना, लातूर, धाराशीव, हिंगोली, बीड, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यातील भाविकांचा समावेश राहणार आहे. या जिल्ह्यातून श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड शहरात सुमारे 3 ते पाच लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारच्या गैरसोय होवू नये तसेच योग्य नियोजनाप्रमाणे कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व्हावे यासाठी विविध समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांच्या नोडल अधिकाऱ्यांनी त्यांना सोपविलेली जबाबदारी योग्यरितीने पार पाडावी, याबाबत वारंवार आढावा घेण्यात येईल अशी माहिती रामेश्वर नाईक यांनी दिली. तसेच त्यांनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने निर्गमित आदेशानुसार करण्यात येणाऱ्या तयारीच्या कामाचा आढावा घेतला.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन व व्यवस्थापनासाठी अप्पर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर यांच्या संनियंत्रणात शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. यात जागरण व्यवस्थापन समिती, मैदान व्यवस्थापन समिती, मंडप व्यवस्थापन समिती, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापन समिती, सुरक्षा व्यवस्थापन समिती, स्वयंसेवक व्यवस्थापन समिती, अतिथी स्वागत व्यवस्थापन समिती, लंगर,भोजन व्यवस्थापन समिती, स्वच्छता व्यवस्थापन समिती, वैद्यकिय सेवा व्यवस्थापन समिती, विद्युत आणि ध्वनी व्यवस्थापन समिती, प्रसिद्धी व मीडिया व्यवस्थापन समिती, कार्यक्रम सादरीकरण व्यवस्थापन समिती, ध्वज व सजावट व्यवस्थापन समिती, आर्थिक व्यवस्थापन समिती, शासकीय परवानगी व्यवस्थापन समिती, जुताघर व्यवस्थापन समिती, जल आपूर्ती व्यवस्थापन समिती, महिला सेवा व्यवस्थापन समिती, ज्येष्ठ नागरिक मार्गदर्शन समिती, जिल्हा समन्वय समिती, स्वरुपा व्यवस्थापन समिती, सुरक्षा आणि तपासणी व्यवस्थापन समिती, निवास व्यवस्थापन समिती, राखीव आदी समित्यांच्या यात समावेश आहे.

मुख्य सचिव राजेश कुमार यांनी व्हीसीद्वारे घेतला कार्यक्रमाच्या पूर्व तयारीचा  आढावा

आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी नांदेड, नागपूर, नवी मुंबई, जि. ठाणे येथे “हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाचा व्हीसीद्वारे आढावा घेतला. यावेळी त्यांनी नांदेड येथे 16 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या भव्य कार्यक्रमाची पार्श्वभूमी व आढावा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडून घेतला. यावेळी त्यांनी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने असलेले प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या. 

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नांदेड येथे विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार असून यादृष्टीने योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ, कार्याध्यक्ष सरजीत सिंघ गील, तसेच विविध विभागाचे  वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

00000










वृत्त क्रमांक  1110

माळेगाव यात्रेच्या वैभवात भर पडण्यासाठी योग्य नियोजन करावे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर

नांदेड, दि. १७ ऑक्टोबर:- दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र माळेगाव येथील श्री खंडोबाच्या यात्रेचे आयोजन उत्कृष्ट व उत्तम पद्धतीने पार पडावे, यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे. त्यामुळे यात्रेच्या वैभवात आणखी भर पडेल, असे प्रतिपादन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.

माळेगाव यात्रा नियोजनासंदर्भात आज माळेगाव येथील जिल्हा परिषद भंडारगृहात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, यात्रा सचिव डी. बी. गिरी, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप, उपविभागीय अधिकारी रामेश्वर गोरे, तहसीलदार विठ्ठलराव परळीकर, कृषी संवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त राजकुमार पडीले, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, बांधकाम कार्यकारी अभियंता संजय शिंदे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. अनिलकुमार ऐतवडे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता अशोक भोजराज, गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी, लोहा पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव पाटील, सचिन पाटील चिखलीकर, चंद्रमणी मस्के, शंकरराव ढगे, भगवानराव हाके, गीते महाराज, बोरगावकर, दत्ता वाले, माळेगाव सरपंच हनमंतराव धुळगंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी आमदार चिखलीकर म्हणाले, माळेगाव यात्रेच्या वैभवात भर पडावी, यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. यात्रा चांगली पार पाडण्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. ही यात्रा कलावंतांची आहे. अनेक नामवंत कलाकार माळेगाव यात्रेतून घडले आहेत. त्यामुळे यात्रेत सहभागी कलाकारांचे संरक्षण व सन्मान करण्यात यावा,असे त्यांनी निर्देश दिले.

शेतकऱ्यांठी कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने भव्य कृषी प्रदर्शन आणि पशुस्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच यात्रेदरम्यान पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, वीजपुरवठा, आरोग्य सेवा आणि इतर भौतिक सुविधा यांची प्रभावी व्यवस्था करण्याचेही निर्देश आमदार चिखलीकर यांनी संबंधित विभागांना दिले. यावेळी त्यांनी सर्व विभागांचा आढावा घेतला.

 माळेगाव यात्रेतील श्री खंडोबारायांच्या पालखीचे पूजन शासकीय पूजा म्हणून व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेने शासनाकडे प्रस्ताव सादर करावा. मी देखील या आशयाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करणार आहे,असे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली म्हणाल्या की, जिल्हा परिषदेच्या वतीने यात्रेचे योग्य नियोजन करण्यात येत आहे. आमदार महोदयांनी दिलेल्या सूचनेनुसार सर्व अधिकारी यात्रेदरम्यान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतील. यात्रा शांततेत व सुरळीत पार पडावी, यासाठी प्रशासन दक्ष राहील. तसेच सर्व माध्यम प्रतिनिधी व ग्रामस्थांनीही प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, श्री खंडोबाच्या माळेगाव यात्रेला 18 डिसेंबर 2025 रोजी देवस्वारी व पालखी पूजन होणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेदरम्यान जिल्हा परिषदेच्या वतीने विविध स्पर्धा, कुस्त्यांची प्रचंड दंगल, लावणी महोत्सव, पारंपारिक लोककला महोत्सव आणि अन्य आकर्षक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा यात्रा सचिव डी. बी. गिरी यांनी केले.

००००००





वृत्त क्रमांक  1109

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी महिलांची पतसंस्था स्थापन करणे बाबतचा घेतला आढावा   

नांदेड, दि. 17 - जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज महिला व बालविकास राज्यमंत्री  मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली महिलांची पतसंस्था स्थापन करण्याबाबत विविध विभागांची आढावा बैठक घेण्यात आली.

याप्रसंगी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी  गणेश वाघ यांनी जिल्ह्यात महिलांची पतसंस्था स्थापन करण्यासंदर्भात ची सद्यस्थिती सांगितली. याप्रसंगी  आमदार श्रीजया चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर,  उमेद,NRULM, महिला बचत गट ,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ,बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय तसेच खाजगी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते . त्यांनी त्यांच्या स्तरावर महिलांची पतसंस्था स्थापन करण्याबाबतच्या कार्यवाहीचा आढावा सदरील सभेत दिला. श्रीमती बोर्डीकर यांनी संबंधितांना संस्था स्थापन करण्याबाबत अधिक वेगवान गतीने काम करण्यास निर्देशित केले  १५ नोव्हेंबर तारखेपर्यंत संबंधित पतसंस्था स्थापन करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

याप्रसंगी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नांदेड शहर यांनी 28 व्या राष्ट्रीय पोषण महादरम्यान राबविलेल्या उपक्रमांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर व  आमदार श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

0000000







 वृत्त क्रमांक  1108

नांदेड मुख्य डाक कार्यालयात दिवाळी फराळ परदेशात पाठवण्यासाठी विशेष सेवा उपलब्ध

नांदेड, दि. 17 ऑक्टोबर  :-  दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नांदेड मुख्य डाक कार्यालयाने परदेशात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना घरगुती फराळ पाठवण्यासाठी विशेष सेवा सुरू केली आहे. भारतीय पोस्ट खात्याने यासाठी पूर्ण सज्जता केली असून, सुरक्षित पॅकेजिंगसह विविध सुविधा पुरविण्यात येत आहेत.

दिवाळीचा फराळ हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. तो दूरदेशी असलेल्या प्रियजनांपर्यंत पोहोचवणे हा एक भावनिक आणि आनंददायी अनुभव ठरतो. यासाठी नांदेड मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये फराळ पाठवण्यासाठी लागणाऱ्या बॉक्स पॅकिंगची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

या सेवेमुळे नागरिकांना आंतरराष्ट्रीय मानकांनुसार पॅकिंग करून 150 हून अधिक देशांमध्ये फराळ पाठवता येणार आहे. विशेष बुकिंग काउंटरद्वारे ही सेवा सुलभ करण्यात आली आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि आपल्या प्रियजनांना दिवाळी फराळ पाठवून सणाच्या आनंदात सहभागी करावे, असे आवाहन नांदेड विभागाचे डाक अधीक्षक  सतीश रघुनाथराव पाठक यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्रमांक  1107

समस्याग्रस्त व पीडित महिलांसाठी 20 ऑक्टोबर रोजी महिला लोकशाही दिन   

नांदेड, दि. 17 ऑक्टोबर  :-  समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार 20 ऑक्टोबर 2025 रोजी महिला लोकशाही दिन आयोजित केला आहे. या लोकशाही दिनात समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.   

दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 20 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली महसूल प्रबोधनी प्रशिक्षण केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमूद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक  1106

संयुक्त राष्ट्रसंघ दिनी संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज राष्ट्रध्वजा समवेत उभारावा  

नांदेड दि. 17 ऑक्टोबर :- संयुक्त राष्ट्रसंघ दिन 24 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज राष्ट्र ध्वजा समवेत उभारण्याबाबत शासन परिपत्रकानुसार निर्देश दिले आहेत. ज्या शासकीय कार्यालयात दररोज राष्ट्रध्वज उभारण्यात येतो त्या कार्यालयावर 24 ऑक्टोबर 2025 या संयुक्त राष्ट्रसंघदिनी संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज भारतीय ध्वजसंहिता 2002 च्या परि. 3.6 मध्ये नमूद केल्याप्रमाणे राष्ट्रध्वजाच्या बरोबर उभारण्यात यावा.

संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज राष्ट्रध्वजाच्या कोणत्याही बाजुला फडकविता येतो. सामान्यत: ध्वज स्तंभाच्यासमोर उभ्या असलेल्या प्रेक्षकांच्यादृष्टीने त्यांच्या अगदी डावीकडे राष्ट्रध्वज असावा असे निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...