Wednesday, September 13, 2017

कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी
ई-सेवा केंद्र दोन दिवस 24 तास सुरु राहणार
                                                          - जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड दि. 13 :- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत शुक्रवार 15 सप्टेंबर 2017 आहे. त्यासाठी जिल्ह्यातील महा ई-सेवा, आपले सरकार, सीएससी केंद्र हे दोन दिवस 24 तास सुरु ठेवण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज 15 सप्टेंबर 2017 या मुदतीच्या आतच भरावेत. या तारखेनंतर मुदतवाढ मिळणार नाही, असे शासनाचे निर्देश आहेत. म्हणून जिल्ह्यातील ही ई-सेवा केंद्रे येत्या दोन दिवस 24 तास सुरु ठेवण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. 1 एप्रिल 2009 नंतर पूर्नरचना झालेल्या कर्जाचा समावेश कर्जमाफी योजनेत करण्यात आलेला आहे. जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 2 लाख 59 हजार 259 शेतकरी कुटुंबांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुका, विभाग, जिल्हा पातळीवर समित्या गठीत केलेल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अडचणी येत असल्यास त्यांनी तहसिलदार व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन श्री. डोंगरे यांनी केले.
शासनाने आपले सरकार पोर्टलवर अर्ज भरणा केलेल्या शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. कर्जमाफीमध्ये आपले नाव ऑनलाईन यादीत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी लिंक http://csmssy.in या संकेतस्थळावर जाऊन खात्री करावी. संकेतस्थळ मराठी सर्वांना समजेल असे आहे. संकेतस्थळाच्या खालील बाजूस अर्जदाराची यादी अशा विभाग आहे. हा विभाग निवडावा आणि संकेतस्थळ उघडल्यावर आपला जिल्हा, त्यानंतर तालुका व गाव निवडावे. आपल्या गावाची यादी आपल्या समोर येईल. आपल्या नावाची खात्री करुन घ्यावी आणि नाव नसेल तर परत ऑनलाईन अर्ज भरावा, असेही श्री. डोंगरे यांनी सांगितले.
0000
निवडणूक आचारसंहितेची
प्रभावी अंमलबजावणी करावी
                              - राज्य निवडणूक आयुक्त सहारिया
           मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी
नांदेड दि. 13 :- ग्रामपंचायत व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडणेसाठी निवडणूक आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, असे आदेश राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज येथे दिले.

नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन सभागृहात ग्रामपंचायत व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणूक संदर्भात आढावा बैठक राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त गणेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर अधिकाऱ्यांनी भर द्यावा, असा सक्त सुचना देण्यात आलेल्या आहेत. या निवडणुका संदर्भात आयोगाने दिलेल्या सूचना नुसार कार्यवाही करावी. निवडणूक संदर्भातील कामात निष्काळजीपणा व कुचराई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.
          कायदा व सुव्यवस्थेसंबंधी आढावा घेताना वस्तू अथवा पैसाच्या स्वरुपातील प्रलोभनाला आळा घालणे, अवैध दारु वाहतुकीवर व वाटपावर नजर ठेवणे, असे सांगून श्री. सहारिया म्हणाले की मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी व्यापक प्रमाणात मतदार जागृती मोहिम हाती घ्यावी. थेट सरपंच पदासाठी पहिल्यांदा मतदान होत आहे. बहुसदस्यीय पद्धतीनुसार आवश्यक तेवढे मते देणे याबाबत देखील मतदार जागृती करण्यात यावी. दिव्यांग मतदारांना मतदान करता यावे यासाठी व्हीलचेअर, रॅमची व्यवस्था करणे, मतदान केंद्रे सर्व सुविधेने अद्यावत व अधुनिक असावेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पद्धतीनेच या निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यावर भर दिला पाहिजे, अशा सूचनाही श्री. सहारिया यांनी यावेळी दिल्या.  
यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने म्हणाले की, निवडणुकीशी संबंधीत यंत्रणांनी अधिक सतर्क राहून निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडाव्यात. मतदार जागृती बरोबर मतदारांना व्होटर स्लीपचे वाटप करावे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरावयाचे असल्याने त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दयाव्यात. सिंगल विंडो सिस्टीम सुरु करुन उमेदवारांना आवश्यक परवानगी देण्यात याव्यात. यासारख्या विविध सुचना त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका संदर्भातील माहिती देतांना मतदान केंद्रे निश्चित केले आहे, मतदान यंत्रेही पुरेसे आहेत, निवडणुकीसाठी अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अवैध मद्यविक्री व मद्यवाहतुकीस आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मतदान जनजागृती करण्यात येत आहे. ग्रामपंचायती निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन कटीबद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले. तर मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुक संदर्भात माहिती  दिली. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी निवडणूक विषयी आपल्या विभागाची माहिती दिली.
प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सौ. अनुराधा ढालकरी यांनी प्रास्ताविक केले तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी आभार मानले.
या बैठकीस ग्रामपंचायत व नांदेड वाघाळा शहर महापालिकेचे निवडणुक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक निरीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, राज्य उत्पादन शुल्क, बॅक, आयकर विभाग, पोलीस, वस्तु व सेवाकर विभाग, महावितरण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.  

000000
मंडप / पेंडाल तपासणी समिती
सदस्य बदलाचे आदेश
नांदेड दि. 13 :- उच्च न्यायालयाचे दिलेल्या निर्देशाप्रमाणे प्रभावी अंमलबजावणीसाठी महानगरपालिका क्षेत्रासाठी मंडप / पेंडाल तपासणी सनियंत्रण समितीत नांदेड मनपाचे उपआयुक्त संतोष कंदेवाड ऐवजी नांदेड मनपाचे उपआयुक्त (प्रशासन) संभाजी वाघमारे यांच्या नियुक्तीचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी काढले आहेत.  

00000
राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास
सक्त मनाई , ध्वजसंहितेचे पालन व्हावे
 नांदेड दि. 13 :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदीसह नागरीकांनी दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात  17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी  विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे ध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी  इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच  कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये उल्लेख नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.
प्लास्टिक व कागदी  राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी  तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.  

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...