Saturday, June 4, 2022

 नांदेड जिल्ह्यात दोन व्यक्ती कोरोना बाधित 

तर एक कोरोना बाधित झाला बरा

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 176 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे  2 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 803 एवढी झाली असून यातील 1 लाख 109 रुग्णांना उपचारा नंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 2 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, देगलूर 1 असे एकुण 2 कोरोना बाधित आढळले आहे. आज नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील एका कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 1, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणात 1 असे एकुण 2 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

 

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 3 हजार 443

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 83 हजार 359

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 803

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 109

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-2

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-2

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000

 भोकर येथील रेल्‍वे भुयारी पुलावरील

कामांमुळे वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- भोकर येथील रेल्‍वेच्या भुयारी पुलाच्या काम करण्‍यासाठी आंबेडकर चौक (भोकर) -प्रफुल्‍ल नगर (मुदखेड रोड) दरम्‍यानचा रेल्‍वे गेट नं. 3 मधुन जाणारा रस्‍ता सर्व प्रकारच्‍या वाहतूकीस प्रतिबंधीत केला आहे. यासाठी पर्यायी मार्ग (जाण्या-येण्यासाठी) आंबेडकर चौक (भोकर)- प्रफुल्‍लनगर (मुदखेड रोड) दरम्‍यानच्‍या नव्‍याने तयार झालेल्‍या उड्डान पुलावरुन वळविण्यात आला आहे.

 

मोटार वाहन  कायदा 1988  चे कलम 115 मधील  तरतुदीनुसार जिल्‍हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी  दिनांक 4  ते 13 जून 2022 या कालावधी पर्यंत वर नमुद केलेल्‍या पर्यायी मार्गाने सर्व प्रकारची वाहने वळविण्‍यास मान्‍यता दिली आहे. संबधीत विभागाने पुढील उपाययोजना कराव्यात. पोलीस निरीक्षक भोकर यांनी कायदा व  सुव्‍यवस्‍थेच्‍या अनुषंगाने आवश्‍यक ती उपाययोजना करावी. उपमुख्‍य  अभियंता, दक्षिण मध्‍य रेल्‍वे नांदेड यांनी रस्‍ता वाहतूक प्रतिबंध व पर्यायी रस्‍त्‍यासाठी आवश्‍यक असलेले बोर्ड चिन्‍ह लावणे इत्‍यादी बाबतची कार्यवाही करावी, असे अधिसूचनेत स्पष्ट केले आहे.

000000

 जेंव्हा गोलंदाज फलंदाज व यष्टिरक्षकाला विचारून चेंडू टाकतो !

 

श्री गुरूगोबिंद सिंघजी स्टेडियम येथे विभागीय अंधांच्या क्रिकेट स्पर्धांना प्रारंभ

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- येथील श्री गुरूगोबिंद सिंघजी स्टेडियमला अपरिचित नसणारी पाऊले आज पडली आहेत. प्रत्येक स्पर्धक हा टिमच्यापलीकडे जाऊन विचार करीत प्रतीस्पर्धी संघातील खेळाडुंच्या हाता-हात घालून मैदानाचा अंदाज घेत आहेत. प्रत्येक पाऊले त्यांचे जमिनीत कुठे चढउतार आहेत का याचा अंदाज घेत आहेत. मैदानाचा संपूर्ण आवाका लक्षात घेऊन आता ते आप-आपल्या संघाच्या लाइनमध्ये शिस्तीत उभे झाले आहेत. बॉलमधील छऱ्यांचा आवाज त्यांना खुणावतो आहे. हे सारे खेळाडू अंध आहेत याची उद्घाटनासाठी आलेल्या अपरिचितांना त्यांच्या जवळ गेल्याशिवाय जराशीही कल्पनाही बांधता येत नाही.

 

अशा खेळाडुंच्या माध्यमातून कोणालाही प्रेरणा व आत्मविश्वास देणाऱ्या मराठवाडा विभागीय पातळीवरील अंध क्रिकेट स्पर्धेचे आज येथील श्री गुरूगोबिंद सिंघजी स्टेडियम येथे शुभारंभ झाला. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून मनपाचे उपायुक्त कदमसामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण संगेवारक्रिकेट प्रशिक्षक राजू किवळेकरनांदेड जिल्ह्याचे भूमिपूत्र अंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करणारा अंध क्रिकेटपटू दिलीप मुंडेकोषाध्यक्ष दादाभाऊ कुटेप्रशिक्षक मंगेश कामठेकर, सीएबीएमचे माजी अध्यक्ष रवी वाघगणेश काळे, डॉ. माधव गोरे, स्टेडियम व्यवस्थापक चवरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी एकुण 4 संघ सहभागी झाले आहेत.

 

आंतरराष्ट्रीय पातळीवर सन 2010 पर्यंत महाराष्ट्रातला एकही अंध क्रिकेटपटू पोहचवू शकला नाही. ही खंत मनात घेऊन क्रिकेट असोसिएशन फॉर ब्लाइंड ऑफ महाराष्ट्राने निर्धारपूर्वक यात उतरायचे ठरविले. आणि पहिल्याच वर्षी सन 2011 मध्ये नांदेड जिल्ह्यातील किनवटचा दिलीप मुंडे हा अंध खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचला. त्याच्या पाठोपाठ इतर खेळाडूंनी आपला आत्मविश्वास वाढवित ही संख्या 10 खेळाडूंवर नेऊन  पोहोचविली. नांदेड येथे आयोजित या स्पर्धेतूनही आता आणखी चांगल्या खेळाडूंची भर पडेल असा आत्मविश्वास क्रिकेट असोसिएशन फॉर ब्लाइंडचे माजी अध्यक्ष रवी वाघ यांनी व्यक्त केला. या स्पर्धेसाठी नांदेड वाघाळा महानगरपालिकेने क्रिडांगण मोफत उपलब्ध करून दिल्यामुळे या स्पर्धा नांदेड येथे घेणे शक्य झाल्याची माहिती उपाध्यक्ष गणेश काळे यांनी सांगितले.

 

स्पर्धकांची बी-1 ते बी-3 असते वर्गवारी

आपल्या क्रिकेट स्पर्धे सारखेच अंधांच्या क्रिकेट स्पर्धाचे नियम असतात. फक्त फरक एवढाच असतो तो म्हणजे चेंडू जमिनीलाच टाकून फेकायचा. फलंदाजांना दृष्टि नसल्यामुळे त्यांना चेंडू नेमका कुठे आहे याचा अंदाज येण्यासाठी त्यात छर्रे टाकले जातात. प्रत्येक संघात 11 खेळाडू असतात. सर्व अंध. परंतू यात वर्गवारी केली गेली आहे. पूर्णत: दृष्टि नसणारे चार खेळाडू यांना बी-1 म्हटले जाते. तीन मीटर पर्यंत ज्यांना अंधूक दृष्टि आहे त्यांना बी-2 म्हटले जाते.  बी-2 वर्गवारीतील तीन खेळाडू असतात तर ज्यांना 6 मीटर पर्यंतच दृष्टि आहे असा खेळाडूंना बी-3 वर्गवारीत गणल्या जातेअसे 4 खेळाडू संघात असतात. बी-1 (पूर्णत: अंध) फलंदाजासाठी धावपटू दिले जातात. एकुण 14 खेळाडूंपैकी प्रत्यक्ष 11 खेळाडूंना खेळविले जाते.

00000












 6 जून रोजी नांदेड जिल्ह्यात "शिवस्वराज्य दिन" होणार साजरा

 

पालकमंत्री अशोक चव्हाण साधणार दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगडावर झाला होता. या महापुरुषांनी महाराष्ट्राला लोककल्याणकारी राज्याचा समृद्ध वारसा दिला. स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन म्हणून 6 जून हा दिवस कायम स्मरणात रहावा व या दिवसापासून प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रेरणा घेता यावी या उद्देशाने 6 जून हा शिवराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्राने घेतला आहे. या निर्णयानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये "शिवस्वराज्य दिन" येत्या सोमवारी साजरा केला जाणार आहे. यादृष्टिने नांदेड जिल्हा परिषदेतर्फे जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून पालकमंत्री अशोक चव्हाण यानिमित्ताने दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्वांशी संवाद साधणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी दिली.

 

सोमवार 6 जून रोजी जिल्हा परिषदेतर्फे शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन केले जाईल. यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात येईल. सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...