Wednesday, October 30, 2024

नांदेड जिल्ह्यातील ९ विधानसभेसाठी अवैध ठरलेले ५५ उमेदवार 

83-किनवट : निरंजन बाबाराव केशवे व भिमराव काशिनाथ पाटील हे उमेदवार अवैध ठरले आहेत.

84-हदगाव : हदगावमधून नेहा माधवराव पवार, व्यंकटेश मारोतराव पाटील, उमेश सिद्धराम धोटे हे उमेदवार अवैध ठरले आहेत.

85-भोकर : सपना तिरुपती कदम, माधवराव किशनराव धुळे, उत्तम रामा गायकवाड व प्रसन्नजित राजेश लोणे हे उमेदवार अवैध ठरले आहेत.

86-नांदेड उत्तर : डॉ. शामराव बळीराम पवार, साजिद अहेमद जाहगीरदार, विकास पि. मालोजी वाघमारे, गोपाल जगदेवराव इंगोले, रविंद्र बजरंग भानावत, सय्यद अनसार सय्यद इब्राहिम, शेख रियाज शेख इब्राहिम व विठ्ठल गंगाधर पावडे हे उमेदवार अवैध ठरले आहेत.

87-नांदेड दक्षिण : माधव गणपतराव वडजे, सय्यद हैदर सय्यद रहमत अली, लक्ष्मण यमलवार व विनय विश्वंबर पाटील हे उमेदवार अवैध ठरले आहेत.

88-लोहा : चिखलीकर प्रदिप लक्ष्मणराव पवळे व प्रकाश बळीराम तारू हे उमेदवार अवैध ठरले आहेत.

89-नायगाव : गजानन तानाजी श्रीरामवार, मोतीराम उत्तमराव कुऱ्हाडे, उमेश सिद्राम धोटे, रावसाहेब गंगाराम पवार, शिवेंद्र किशनराव दुगावकर, हनुमंतराव मारोती वनाळे, इरन्ना रावसाहेब सुर्यकार, अविनाष पुंडलीकराव ईटकापल्ले, जळबा विठ्ठलराव गवळे हे उमेदवार अवैध ठरले आहेत.

90-देगलूर : सुजित रामचंद्र कांबळे, विठ्ठलराव माणिकराव वनंजे, दिगांबर तुकाराम गवळे, सदाशिव राजाराम भुयारे, जेठे भिमराव मरीबा, लक्ष्मण देवकरे, सिद्धार्थ नामदेवराव पांडवे, उत्तमकुमार रामचंद्र कांबळे, निवृत्ती गंगाराम कांबळे, अंकुश गोविंदराव गवळे, रुमाले आनंदराव मरीबा, मिनाक्षी सुरेश भोसीकर, संग्राम गंगाराम सुर्यवंशी, पुजा सचिन गायकवाड, सौ. सावित्रीबाई भ्र. श्रीहरी कांबळे व नागेश रावसाहेब गायवाड हे उमेदवार अवैध ठरले आहेत.

91-मुखेड : दशरथ मंगाजी लोहबंदे, सचिन गोवर्धन चव्हाण, यादव बळीराम कांबळे, प्रदीप धर्माजी इंगोले, खंडेराव हैबतराव हसनाळकर, मस्तान पाशुमिया पिंजारी, हरिदास संतुका दिंडे हे उमेदवार अवैध ठरले आहेत.

00000

 वृत्त क्र. 1011

सामान्य, खर्च व पोलीस विभागाचे निरीक्षकांचे दूरध्वनी जाहीर   

नागरिकांनी आवश्यकतेनुसार संपर्क साधण्याचे आवाहन   

नांदेड दि. 30 ऑक्टोबर : भारत निवडणूक आयोगाने 16-नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा मतदारसंघासाठी सामान्य, खर्च, पोलीस निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षकासह सामान्य व पोलीस विभागाचे निरीक्षक दाखल झाले असून नागरिकांना आपापल्या विधानसभा क्षेत्राच्या संदर्भातील काही माहिती किंवा तक्रार असेल तर त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. कार्यालयीन वेळेमध्ये या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटताही येणार आहे. ते सर्व नांदेड विश्रामगृहात थांबले आहेत. 

सामान्य निवडणूक निरीक्षक 

सामान्य निवडणूक निरीक्षक शेलेंद्रकुमार (भाप्रसे) यांची 83-किनवट व 84-हदगाव या विधानसभा क्षेत्राची जबाबदारी दिली आहे. त्यांचा निवडणूक काळात संपर्क मेाबाईल क्र. 7499127265 हा आहे. तर 85-भोकर व 86-नांदेड उत्तर मतदारसंघासाठी श्रीमती बी. बाला माया देवी (भाप्रसे) यांचा संपर्क क्रमांक 8483990380 असा आहे. 87-नांदेड दक्षिण व 88-लोहा मतदार क्षेत्रासाठी श्रीमती पल्लवी आकृती (भाप्रसे) यांचा संपर्क क्रमांक 8237960955 असा आहे.  तर 89-नायगाव, 90-देगलूर व 91-मुखेड मतदारसंघासाठी रण विजय यादव (भाप्रसे) यांचा संपर्क क्रमांक 7385842084 असा आहे. सामान्य निवडणूक निरीक्षक शासकीय विश्रामगृहात निवडणूक काळात कार्यालयीन वेळेमध्ये सामान्य जनतेसाठी उपलब्ध असतील.

निवडणूक निरीक्षक कालु राम रावत

विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय पोलीस सेवेचे वरिष्ठ अधिकारी कालु राम रावत हे नांदेड येथे दाखल झाले आहेत. त्यांचा निवडणूक काळातील स्थानिक संपर्क क्रमांक 8180830699 आहे.  

मयंक पांडे किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर व दक्षिणसाठी निरीक्षक  

आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी मयंक पांडे यांच्याकडे भारत निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण या विधानसभा क्षेत्राचे खर्च निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपविली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक विधानसभा मतदारसंघासाठी 8483845220 हा आहे.  

ए गोविंदराज लोहा, नायगाव, देगलूर, मुखेडसाठी खर्च निरीक्षक 

तामिळनाडू कॅडरचे चेन्नई येथील ए गोविंदराज यांच्याकडे भारत निवडणूक आयोगाने नायगाव, देगलूर, मुखेड, लोहा या विधानसभा क्षेत्राच्या खर्च निरीक्षणाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांचा स्थानिक संपर्क क्रमांक 7249048040 आहे.  

लोकसभा मतदारसंघासाठी मृणालकुमार दास 

लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून मृणालकुमार दास आयआरएस यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. त्यांचा मोबाईल क्रमांक 8626095922 असा आहे. या भ्रमणध्वनी क्रमांकावर काही तक्रार किंवा माहिती द्यायची असेल तर कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल. 

00000

वृत्त क्र. 1010

छाननीनंतर नांदेड लोकसभेसाठी 39 उमेदवार वैध
तर विधानसभा निवडणुकीसाठी 460 उमेदवार वैध


* लोकसभेसाठी 2 तर विधानसभेसाठी 55 उमेदवार अवैध
* 4 नोव्हेंबर पर्यंत अर्ज परत घेता येणार
 
नांदेड, दि. 30 ऑक्टोबर :- नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत आज दिनांक 30 ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी झाल्यानंतर लोकसभेसाठी 2 तर विधानसभेसाठी 55 अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे नांदेड लोकसभेसाठी तूर्तास 39 तर जिल्ह्यातील 9 विधानसभेसाठी 460 उमेदवार वैध ठरले आहेत. अंतिम फेरीतील उमेदवारांची आकडेवारी येत्या 4 नोव्हेंबरला ठरणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील 83-किनवट मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 31 उमेदवारांपैकी आज 29 अर्ज वैध ठरले तर 2 अर्ज अवैध ठरले. 84-हदगाव मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 66 उमेदवारांपैकी आज 63 अर्ज वैध ठरले तर 3 अर्ज अवैध ठरले. 85-भोकर मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 144 उमेदवारांपैकी आज 140 अर्ज वैध ठरले तर 4 अर्ज अवैध ठरले. 86-नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 81 उमेदवारांपैकी आज 73 अर्ज वैध ठरले तर 8 अर्ज अवैध ठरले. 87-नांदेड दक्षिण मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 56 उमेदवारांपैकी आज 52 अर्ज वैध ठरले तर 4 अर्ज अवैध ठरले. 88-लोहा मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 35 उमेदवारांपैकी आज 33 अर्ज वैध ठरले तर 2 अर्ज अवैध ठरले. 89-नायगाव मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 35 उमेदवारांपैकी आज 26 अर्ज वैध ठरले तर 9 अर्ज अवैध ठरले. 90-देगलूर मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 43 उमेदवारांपैकी आज 27 अर्ज वैध ठरले तर 16 अर्ज अवैध ठरले. तर 91-मुखेड मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 24 उमेदवारांपैकी आज 17 अर्ज वैध ठरले तर 7 अर्ज अवैध ठरले आहेत.

असा आहे निवडणुकीचा पुढील कार्यक्रम :
नामांकन मागे घेण्याची अंतीम तारीख  : 4 नोव्हेंबर
मतदान तारीख.                              :  20 नोव्हेंबर
मतमोजणी तारीख.                         : 23 नोव्हेंबर 2024.
00000

 वृत्त क्र. 1009

बारावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ 

 

नांदेड, दि. 30 ऑक्टोबर :-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी  परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 31 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाचे आहेत. नियमित विद्यार्थ्यांची अर्ज सरल डाटाबेसवरुन ऑनलाईन पद्धतीने त्यांचे उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरावयाची आहेत.

 

नियमित शुल्क मुदतवाढ तारखा व विलंब शुल्क तारखा तसेच शुल्क, कागदपत्रे जमा करावयाचा कालावधी पुढीलप्रमाणे आहे. उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी आरटीजीएस/एनइएफटीद्वारे पावती/चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट बुधवार 27 नोव्हेंबर 2024 पर्यंत जमा करावयाची आहे. 

 

व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेवून परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा अर्ज नियमित शुल्कासह 31 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर पर्यंत तर विलंब शुल्कासह 15 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर 2024 पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी अर्ज भरण्यापूर्वी कॉलेज प्रोफाईल मध्ये कॉलेज, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरून मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन सबमीट केल्यानंतर अर्ज भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज लॉगीनमधून प्रिलिस्ट उपलब्ध करुन दिलेली असेल. कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टर नुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्ट वर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केल्याबाबत उच्च माध्यमिक शाळा प्रमुख/ प्राचार्य यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.

 

इयत्ता बारावी परीक्षेची अर्ज ही ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी पुढील महत्त्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी वेबसाईटद्वारे प्राप्त ऑनलाइन चलनावर नमूद केलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या Virtual Account मध्ये कोणत्याही बँकेमधून आरटीजीएस/एनईएफटीद्वारे चलनाप्रमाणे अचूक शुल्क रकमेचा भरणा करण्यात यावा. यापूर्वी वापरात असणाऱ्या बँक ऑफ इंडिया/एचडीएफसी बँक/Axis बॅकच्या जुन्या चलनांचा वापर करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे मंडळात रोख स्वरूपात शुल्क स्विकारले जाणार नाही. उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी सादर केलेल्या सर्व अर्जाचे विहित परीक्षा शुल्क भरल्याशिवाय संबंधितांची प्रवेशपत्र उपलब्ध करून दिली जाणार नाहीत. विलंब शुल्काने अर्ज सादर करण्याच्या तारखांना मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. अतिविलंब शुल्काने अर्ज भरण्याच्या तारखा यथावकाश कळविण्यात येतील, असेही राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी कळविले आहे.

0000

 आज महत्वाचे  वृत्त क्र. 1008

उमेदवारांनो ! खर्चाचा हिशोब ठेवा, आयोगाची करडी नजर 

बैठक 4 नोव्हेंबरला ; प्रथम तपासणी 7 नोव्हेंबरला 

नांदेड दि. 30 ऑक्टोबर : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सहभागी असणाऱ्या उमेदवारांनी आपल्या खर्चाच्या हिशोबाबाबत दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भातील पहिली बैठक ही दिनांक 4 नोव्हेंबर रोजी डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे पहिल्या माळयावर सायंकाळी ४ वाजता होणार आहे.

आचाससंहितेप्रमाणेच निवडणुकीच्या खर्चाचा ताळमेळ व त्या बैठकांना आवर्जून उपस्थित राहणे अनिवार्य आहे. याकडे गंभीरतेने बघावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशेब ठेवणे व निवडणूक खर्चाच्या तपासणीबाबत दक्ष राहणे यासंदर्भात आयोगाचे सक्त निर्देश आहेत. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम ७७ नुसार निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवार एकतर तो स्वत: किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीद्वारे नामनिर्देशित करण्यात आले आहे. त्या दिनांकापासून निवडणुकीच्या निकाल लागण्याच्या दिनांकापर्यत दोन्ही दिनांक धरुन , निवडणूक प्रतिनिधीने केलेला किंवा प्राधिकृत केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे आवश्यक आहे. 

भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशेब ठेवण्याच्या अनुषंगाने खर्च निरीक्षकांच्या उपस्थितीत, वेळापत्रकानुसार डॉ. शंकरराव चव्हाण, नियोजन भवन, कॅबिनेट कक्ष, तळ मजला, जिल्हाधिकारी परिसर, नांदेड येथे उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाच्या नोंदवहीची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीसाठी उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी तपासणीच्या दिवसापर्यत केलेल्या खर्चाचा हिशोब खर्च निरीक्षक यांचेसमोर सादर करणे आवश्यक आहे. 

तपासणी वेळापत्रक 

उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाच्या नोंदवहीची तपासणी वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. प्रथम तपासणी गुरुवार ७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते ५ या कालावधीत होईल. द्वितीय तपासणी बुधवार १३ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते ५ या कालावधीत होईल. तृतीय तपासणी रविवार १७ नोव्हेंबर २०२४ रोजी रविवार सकाळी १० ते ५ या कालावधीत होईल. उमेदवारांनी यांची नोंद घ्यावी, व जबाबदार सहकाऱ्याची यासाठी नेमणूक करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.  

वेळापत्रकानुसार अनुपस्थित राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार कार्यवाहीस पात्र असतील. तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशेब ठेवणे व दाखल करण्याच्या कायद्याच्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांने कसूर केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ च्या कलम १० क अन्वये तो निवडणूक आयोगाकडून तीन वर्षाच्या कालावधीसाठी निरर्ह ठरविण्यास पात्र असेल याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. 

00000

 वृत्त क्र. 1007

विभाग प्रमुखांच्‍या गाड्यावर आता मतदान जनजागृती 

सीईओनी लावले गाड्यांवर जनजागृती स्टिकर 

नांदेड दि. ३० ऑक्टोबर : मतदानाविषयी जनजागृती करण्‍यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विविध उप‍क्रम राबविण्‍यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आज मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते आज सकाळी 11 वाजता मतदान करण्‍याबाबत आवाहन असलेले स्टिकर्स विविध विभाग प्रमुखांच्‍या वाहनांवर लावण्यात आले.         

 यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, ग्राम पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीण घुले, गट विकास अधिकारी शेखर देशमुख, बळवंत, डॉ. पुरी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शुभम तेलेवार, प्रलोभ कुलकर्णी यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

0000






 वृत्त क्र. 1006

निवृत्तीवेतन धारकांनी आयकर बचतीचा तपशील सादर करावा 

नांदेड दि. 30 ऑक्टोबर : सर्व निवृत्तीवेतन धारकांनी वित्तीय वर्ष 2024-25 करीता केंद्रशासनाच्या निर्देशानुसार नवीन कर प्रणाली ही मुळ करप्रणाली (Default) लागु करण्यात आली आहे. नवीन आयकर प्रणालीनुसार नुसार 7 लक्ष 75 हजार पर्यंत आयकर लागु राहणार नाही. निवृत्तीवेतनधारकांनी आयकर बचतीचा तपशील 20 डिसेंबर 2024 पर्यंत सादर करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

आयकर परिगणना जुन्या करप्रणालीने करण्याकरीता निवृत्तीवेतन धारकांनी त्या आशयाचे विनंती अर्ज व त्यासोबत बचतीचा तपशील, अनुषंगीक सहपत्रे कोषागार कार्यालयात दाखल करणे आवश्यक आहे. असा अर्ज प्राप्त न झाल्यास शासनाच्या निर्देशानुसार नवीन कर प्रणालीद्वारे परिगणना करुन आयकर कपात करण्यात येईल. निवृत्तीवेतनधारकांनी आयकर बचतीचा तपशील 20 डिसेंबर पर्यंत सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

 वृत्त क्र. 1005

निवृत्तीवेतनधारकांनी बँकेत उपस्थित राहून

हयातीच्या यादीवर स्वाक्षरी करावी    

नांदेड दि. 30 ऑक्टोबर : नांदेड जिल्हा कोषागाराअंतर्गत निवृत्तीवेतन घेणारे सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटूंब निवृत्तीवेतन धारकांनी निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांच्या बँकेत अद्याक्षर निहाय यादी कोषागार कार्यालयाकडून पाठविण्यात आलेली आहे. निवृत्तीवेतन चालू ठेवण्यासाठी 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीत निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी प्रत्यक्ष बँकेत हजर राहुन यादीतील त्यांच्या नावासमोर स्वाक्षरीच्या रकान्यात शाखा व्यवस्थापकासमोर स्वाक्षरी करावी किंवा अंगठयाचा ठसा उमटवावा. पुर्नविवाह तसेच पुर्ननियुक्तीबाबत माहिती लागु असल्यास ती नोंदवावी, असे आवाहन कोषागार अधिकारी नांदेड 

या पद्धतीशिवाय बायोमॅट्रीक्स पध्दतीने जीवन प्रमाण दाखला देण्याकरिता http://Jeevanpraman.gov.in या संकेत स्थळावर दिनांक 1 ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधीत सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. सदरील यादीत ज्यांनी स्वाक्षरी अथवा अंगठा उमटविलेला नसेल अथवा ऑनलाइन जीवन प्रमाण दाखला सादर केलेला नसेल त्यांचे डिसेंबर 2024 चे निवृत्तीवेतन अदा केले जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे कोषागार अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...