Wednesday, October 30, 2024

 आज महत्वाचे  वृत्त क्र. 1008

उमेदवारांनो ! खर्चाचा हिशोब ठेवा, आयोगाची करडी नजर 

बैठक 4 नोव्हेंबरला ; प्रथम तपासणी 7 नोव्हेंबरला 

नांदेड दि. 30 ऑक्टोबर : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सहभागी असणाऱ्या उमेदवारांनी आपल्या खर्चाच्या हिशोबाबाबत दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भातील पहिली बैठक ही दिनांक 4 नोव्हेंबर रोजी डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे पहिल्या माळयावर सायंकाळी ४ वाजता होणार आहे.

आचाससंहितेप्रमाणेच निवडणुकीच्या खर्चाचा ताळमेळ व त्या बैठकांना आवर्जून उपस्थित राहणे अनिवार्य आहे. याकडे गंभीरतेने बघावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशेब ठेवणे व निवडणूक खर्चाच्या तपासणीबाबत दक्ष राहणे यासंदर्भात आयोगाचे सक्त निर्देश आहेत. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम ७७ नुसार निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवार एकतर तो स्वत: किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीद्वारे नामनिर्देशित करण्यात आले आहे. त्या दिनांकापासून निवडणुकीच्या निकाल लागण्याच्या दिनांकापर्यत दोन्ही दिनांक धरुन , निवडणूक प्रतिनिधीने केलेला किंवा प्राधिकृत केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे आवश्यक आहे. 

भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशेब ठेवण्याच्या अनुषंगाने खर्च निरीक्षकांच्या उपस्थितीत, वेळापत्रकानुसार डॉ. शंकरराव चव्हाण, नियोजन भवन, कॅबिनेट कक्ष, तळ मजला, जिल्हाधिकारी परिसर, नांदेड येथे उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाच्या नोंदवहीची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीसाठी उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी तपासणीच्या दिवसापर्यत केलेल्या खर्चाचा हिशोब खर्च निरीक्षक यांचेसमोर सादर करणे आवश्यक आहे. 

तपासणी वेळापत्रक 

उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाच्या नोंदवहीची तपासणी वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. प्रथम तपासणी गुरुवार ७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते ५ या कालावधीत होईल. द्वितीय तपासणी बुधवार १३ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते ५ या कालावधीत होईल. तृतीय तपासणी रविवार १७ नोव्हेंबर २०२४ रोजी रविवार सकाळी १० ते ५ या कालावधीत होईल. उमेदवारांनी यांची नोंद घ्यावी, व जबाबदार सहकाऱ्याची यासाठी नेमणूक करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.  

वेळापत्रकानुसार अनुपस्थित राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार कार्यवाहीस पात्र असतील. तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशेब ठेवणे व दाखल करण्याच्या कायद्याच्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांने कसूर केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ च्या कलम १० क अन्वये तो निवडणूक आयोगाकडून तीन वर्षाच्या कालावधीसाठी निरर्ह ठरविण्यास पात्र असेल याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. 

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...