Thursday, September 2, 2021

 वायुवेग पथकाच्या ताफ्यात दोन अत्याधुनिक वाहनांचा समावेश

मर्यादेपेक्षा जास्त वेगाने चालणाऱ्या वाहनांवर होणार कारवाई   

नांदेड (जिमाका) दि. 2 :-  प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाच्या ताफ्यात दोन नव्या इंटरसेप्टर वाहने नव्याने दाखल झाली आहेत. नांदेड कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात दोन वायुवेग पथके कार्यरत असून या अत्याधुनिक वाहनांचा वापर हे पथक करणार आहे. या वाहना ब्रीद विश्लेषक Analyser, स्पीडगन टिंटमिटर आदी अत्याधुनिक उपकरणाचा समावेश आहे. यामुळे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यास अधिक सोईचे होईल. वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने चालणाऱ्या वाहनावर मद्य प्राशन करुन वाहन चालवणाऱ्यावर कारवाई करणे शक्य होणार आहे.   

शासनाकडून वाहन क्र. एमएच 04-केआर-6426 व एमएच 04-केआर-6459 ही दोन इंटरसेप्टर वाहने गुरुवार 2 सप्टेंबरला प्रादेशिक परिवहन कार्यालयात दाखल झाली असून त्याच्या कामकाजाची सुरुवात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांच्या हस्ते करण्यात आली. या वाहनांच्या समावेशामुळे रस्ता सुरक्षा विषयक उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. यावेळी सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले, मोटार वाहन निरीक्षक प्रमोद घाटोळ, मेघल अनासने, सुनिल पायघन, पंकज यादव, मनोज चव्हाण, पद्माकर भालेकर, राघवेंद्र पाटील, सहा.मोटार वाहन निरीक्षक चेतन अडकटलवार, लिपीक गाजूलवाड, शिंदे, कंधारकर, पवळे आदी कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

0000



 

 नांदेड जिल्ह्यात 3 व्यक्ती कोरोना बाधित तर एक कोरोना बाधित झाला बरा 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 913 अहवालापैकी 3 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 746 एवढी झाली असून यातील 88 हजार 61 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 24 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 661 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, नांदेड ग्रामीण 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे बिलोली तालुक्यांतर्गत 1 असे एकुण 3 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील एका कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. यात मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 1 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 24 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 7, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 8, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 8, खाजगी रुग्णालय 1 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 128, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 12 हजार 865

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 9 हजार 832

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 743

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 61

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 661

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-20

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-24

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

00000

 जिल्ह्यातील 101 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 101 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. शुक्रवार 3 सप्टेंबर 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पौर्णिमा नगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, रेल्वे हॉस्पिटल या 17 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पौर्णिमा नगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर या 16 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस तर रेल्वे हॉस्पिटल येथे 50 लस उपलब्ध करुन दिले आहेत. 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 15 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 14 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस डोस उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात 68 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 1 सप्टेंबर 2021 पर्यंत एकुण 10 लाख 34 हजार 482 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 2 सप्टेंबरपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 8 लाख 45 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 2 लाख 65 हजार 640 डोस याप्रमाणे एकुण 11 लाख 10 हजार 670 डोस प्राप्त झाले आहेत.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणी सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 7.8 मि.मी. पाऊस 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- जिल्ह्यात 2 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 7.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून एकूण 12.3 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 109.8 टक्के एवढा पाऊस झाला आहे. 

जिल्ह्यात 2 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 16.7 (17.9), बिलोली 6.2 (6.2) मुखेड- 5.2 (5.7) कंधार 1.2 (1.5), लोहा- 12.6 (14.1),हदगाव 3 (11.8),भोकर 8 (18.9) देगलूर 16.9(17) किनवट- 7.1 (27.8), मुदखेड 5.4 (6.1) हिमायतनगर 1.1 (20.9) माहूर- 2.2 (5.5), धर्माबाद- 2.6 (4.1), उमरी 18.3 (19.7) अर्धापूर 11.8 (12.8) नायगाव- 0.8 (0.9) याप्रमाणे आहे.

0000

 वेतन देयकासाठी कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांची ऑनलाईन अज्ञावलीमध्ये माहिती नोंदविणे आवश्यक 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- कर्मचारी सर्वंकष माहितीकोष-2021 तयार करण्याचे काम जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत सुरू आहे. राज्य शासकीय कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयाची व आस्थापनेवरील नियमित, नियमितेत्तर, रोजंदारीवरील, अंशकालीन, मानसेवी व तदर्थतत्वावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची 1 जुलै 2021 या संदर्भ दिनांकाची माहिती ऑनलाईन आज्ञावलीमध्ये नोंदविणे आवश्यक आहे. 

ही माहिती ऑनलाईन नोंदवून जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे प्रमाणपत्र-1 जोडल्याशिवाय वेतन देयके कोषागार कार्यालयाकडुन स्विकारण्यात येणार नाहीत. याची सर्व राज्यशासकीय आहरण व संवितरण अधिकारी यांनी नोंद घ्यावी. तसेच ज्या शासकीय कार्यालयांची वेतनदेयके कोषागारात सादर होत नाहीत. अशा सर्व कार्यालयानी सुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांची व रिक्त पदांची माहिती ऑनलाईन आज्ञावलीद्वारे नोंदणी करावी. कर्मचारी सर्वंकष माहितीकोष 2021 बाबत ऑनलाईन आज्ञावलीमध्ये माहिती नोंदवावी. अधिक माहितीसाठी सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, नांदेड व त्यांचा दुरध्वनी क्रमांक 02462-252775 व कार्यालयाचा ई-मेल dso.nanded@hotmail.com येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी निखील बासटवार यांनी केले आहे.

00000

 

जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी कोरोना लसीकरण शिबीरासाठी पुढाकार घ्यावा  

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका), दि. 2 :-  कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करुन याही वर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबतचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. या मार्गदर्शक तत्वानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांना कोरोना लसीकरण शिबीर, मलेरीया, डेंग्यू आदी साथीच्या आजारांबाबत जनजागृती सारखे उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. गणेशोत्सवासंदर्भात आज त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत आमदार राजेश पवार, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, उपविभागीय अधिकारी माने, तहसिलदार किरण अंबेकर, नायब तहसिलदार राजेश लांडगे आदी उपस्थित होते. 

जिल्ह्यातील सर्व तालुकापातळीवर आणि नांदेड महानगरपालिका क्षेत्रासाठी लसीकरण आयोजित करण्यासाठी संबंधित यंत्रणांना या बैठकीत निर्देश देण्यात आले. यात नांदेड महानगरपालिका क्षेत्रासाठी मनपा आरोग्य विभाग, संबंधित विभागातील पोलीस निरीक्षक, महानगरपालिका इतर विभाग यांच्या मार्फत सर्व गणेश मंडळांच्या यादीनुसार मोठ्या गणेश मंडळाने 18 वर्षावरील किमान 1 हजार 100 नागरीकांच्या लसीकरणासाठी पुढाकार घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक ते सहकार्य मनपा करेल. नगरपालिका क्षेत्रात संबंधित उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, नगरपरिषद मुख्याधिकारी, संबंधित पोलीस निरीक्षक हे त्यांच्या कार्यक्षेत्रात गणेश मंडळांना लसीरकण शिबिरासाठी मदत करतील. ग्रामीण क्षेत्रासाठी संबंधित  तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथील वैद्यकिय अधिकारी, पोलीस पाटील यांच्यामार्फत गणेश मंडळांना लसीकरण शिबिरासाठी योग्य ते सहाय्य केले जाईल. जिल्हा आरोग्य अधिकारी हे लस उपलब्धतेबाबत मागणी प्रमाणे नियोजन करतील. तर मनपा उपायुक्त, जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका प्रशासन) व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांच्यामार्फत लसीकरण शिबिराचा आढावा व त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले. 

समाजाला उपयोगी असलेल्या उपक्रमांचे आयोजन करण्याचा वारसा महाराष्ट्राला गणेशोत्सवाने दिलेला आहे. कोविड-19 सारख्या आव्हानात्मक काळात जिल्ह्यातील विविध गणेश मंडळे गतवर्षी प्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव  हा दिलेल्या नियमानुसार, निर्देशानुसार सुचनांचे काटेकोर पालन करुन लसीकरणासाठी पुढाकार घेतील, अशा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला.

00000




महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...