Monday, October 7, 2024

वृत्त क्र. 912

शासकीय जमिनीवर बेकायदेशीर ताबा दाखवाल तर गंभीर कारवाई करू : जिल्हाधिकारी


 चावडीवर, तहसीलमध्ये व सार्वजनिक ठिकाणी शासकीय जमिनीची यादी प्रसिद्ध करा


नांदेड, दि ७ ऑक्टोबर : नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये शासकीय अर्थात सरकारी जमिनीची बनावट खरेदी विक्री करून गैरव्यवहार केल्याचे काही ठिकाणी पुढे येत आहे.अशा प्रकारे गैरव्यवहार सहन केले जाणार नाही. नांदेड जिल्ह्यात अशा शासकीय जमिनीची यादी सर्व संबंधित कार्यालयात दर्शनी भागात प्रसिद्ध करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
     
 नांदेड जिल्ह्यामध्ये तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये सातबारा अधिकार अभिलेखात महाराष्ट्र शासनाच्या नावे नोंद असलेल्या शासकीय जमिनी, गायरान जमिनीची बेकायदेशीर खरेदी विक्री होत असल्याचे पुढे आले आहे. खोटे कागदपत्र तयार करून ग्रामपंचायतच्या नमुना नंबर आठ अ ला बेकायदेशीर नोंद होत असल्याच्याही काही तक्रारी आहेत. तालुका व जिल्हा कार्यालयात अशा तक्रारी येत असल्याने त्याची गंभीर नोंद जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली आहे.

काही प्रकरणात तपास करण्याचे आदेशही देण्यात आले असून अशा प्रकारे खरेदी विक्रीवर निर्बंध आणण्याचे सर्व यंत्रणेला सुचित करण्यात आले आहे.तालुक्याच्या गावांमधील शासकीय जमिनीची सर्वे गट नंबर निहाय माहिती गावातील गाव चावडीवर तसेच तालुक्याच्या फलकावर सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्धी करण्याबाबत सूचना केल्या आहेत.

तसेच जी व्यक्ती शासकीय जमीन किंवा गायरान जमिनीची बेकायदेशीररित्या खरेदी - विक्री करेल किंवा करण्यास भाग पाडेल अशा सर्व व्यक्ती कायदेशीर कारवाईस पात्र आहेत. त्यामुळे अशा सर्वांवर संबंधित यंत्रणेने कारवाई करावी, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. अशा प्रकारच्या फसवणूक व गैरव्यवहाराला कुठेही थारा दिला जाऊ नये, असे यंत्रणेलाही त्यांनी सुचित केले असून या संदर्भातील सर्व माहिती दर्शनी भागात लावण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
00000

वृत्त क्र. 911

नवा मोंढा मैदानावर १० ऑक्टोबरला महिला सशक्तिकरण अभियान मेळावा


 नांदेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांची उपस्थिती

 जिल्हा प्रशासनाकडून  तयारी सुरु ; हजारो लाडकी बहिणींची उपस्थिती राहणार


नांदेड दि. ७ सप्टेंबर : महिला सक्षमीकरणाचा नांदेड जिल्हयाचा महिला आनंद मेळावा आता १० ऑक्टोबरला होणार आहे.जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी आज कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान  नवा मोंढा मैदानावर भेट देऊन त्याच ठिकाणी बैठक घेतली.

 मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील हजारो महिला सहभागी होणार असून प्रशासन या दृष्टीने तयारीला लागले आहे.

राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाचे हे आयोजन आहे.मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान सुरू केले असून या संकल्पनेतून सर्व जिल्ह्यांमध्ये राज्य शासनाच्या पथदर्शी योजनांमधील लाभार्थ्यांची संवाद साधने व त्यांना प्रत्यक्ष या योजनाचा कार्यक्रमांमध्ये लाभ देणे सुरू आहे. ७ ऑक्टोबरला हा मेळावा होणार होता. मात्र तो पुढे गेला असून १० ऑक्टोंबरला होत आहे.

     आज या संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, नांदेड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, महिला व बालकल्याण अधिकारी रूपाली रंगारी  यांच्यासह जिल्हा जिल्हा परिषद व महानगरपालिकेतील सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यामध्ये विविध विभाग प्रमुखांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
   
      आज नवा मोंढा मैदानावर आमदार कल्याणकर यांनीही भेट दिली. सर्व समिती प्रमुखांना त्यांच्या कामाची जबाबदारी सोपवण्यात आली. पुढील आढावा बैठक ९ ऑक्टोंबरला होणार आहे.

 नवा मोंढा येथील मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन ,महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित राहणार आहे.

     जिल्ह्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे त्यामुळे हजारोच्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहे जिल्हा प्रशासन या मोठ्या कार्यक्रमाच्या तयारीला लागले आहे.




 वृत्त क्र. 910

निवडणूक विषयक सोपविलेली कामे गांभीर्याने करा : जिल्हाधिकारी


75 टक्के मतदानाचे उदिष्ट ; स्वीपच्या माध्यमातून जनजागृती

निवडणूक कामकाज व प्रशिक्षणात हलगर्जी केल्यास कारवाई


नांदेड दि. 7 ऑक्टोबर : विधानसभा निवडणूक 2024 कामकाजासाठी विविध कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षात नोडल अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक कामासाठी नियुक्त्या करण्यात आल्या असून नियुक्त अधिकारी -कर्मचारी यांनी निवडणूक विषयक सोपविलेली कामे गांभीर्याने पार पाडावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवनात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 विषयक अधिकारी-कर्मचारी यांचे प्रशिक्षण आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, नियुक्त नोडल अधिकारी, कर्मचारी आदीची उपस्थिती होती.

विधानसभा निवडणूक 2024 कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्वीपच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने उदिष्ट पूर्ण करणे आवश्यक असून यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत ,असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. तसेच निवडणूक कालावधीत पोलीस, वस्तु व सेवा कर विभाग, आयकर विभाग, एसएसटी व एफएसटी पथकांनी निवडणूक कालावधीत करण्यात येणाऱ्या कारवायाबाबत सर्वांनी मिळून काम करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. निवडणूक विषयक कामकाजात प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी नेमून दिलेली कामे गांभीर्याने करावीत तसेच प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्यांची गंभीर दखल घेण्यात येईल असेही निर्देश त्यांनी दिले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी पाडुरंग बोरगावकर यांनी विधानसभा निवडणूक 2024 बाबत निर्गमित आदेशात नमूद अधिकारी-कर्मचारी यांनी पार पाडावयाच्या जबाबदाऱ्यांची माहिती यावेळी दिली. तसेच स्वीप, प्रशिक्षण, निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था, मतदार यादीत नाव नोंदविणे, नाव काढणे, अवैध दारु वाटप नियंत्रण, ईव्हीएम कक्षाचे कामकाज, निवडणूक कामासाठी अधिकारी-कर्मचारी निवड करणे, टपाली मतदान, एसएसटी व एफएसटी पथकाला प्रशिक्षण घेणे याबाबतच्या कामाचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.

निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी राजकुमार माने यांनी निवडणूक आदेशाप्रमाणे करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती दिली.
00000



 वृत्त क्र. 909

सफाई कर्मचाऱ्याना कायदेशीर सर्व सोयी -सुविधा पुरवा : पी.पी.वावा


राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग सदस्यांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांचा आढावा


नांदेड दि. 7 ऑक्टोबर : सफाई कामगारांसंदर्भात असणारे कायदे, त्यांच्या सुविधा, शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणारे निर्देश यांचे काटेकोर पालन नांदेड महानगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये झाले पाहिजे. त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी अधिनस्त अधिकाऱ्यांना संबधित कायद्याचे पालन करण्याचे निर्देश द्यावे, असे आवाहन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य पी.पी.वावा यांनी आज येथे केले.

    राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य पी.पी.वावा सध्या नांदेड दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे आज बैठक संपन्न झाली. या बैठकीत नांदेड महानगरपालिकेतील व जिल्ह्यातील इतर नगरपालिकेमध्ये कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या सद्यस्थितीचा आढावा आयोगाच्या सदस्यांनी घेतला.
या बैठकीस मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपआयुक्त कारभारी दिवेकर, जिल्हा प्रशासन अधिकारी गंगाधर ईरलोड, सहाय्यक आयुक्त मो.गुलाम सादेक, शहर अभियंता सुमंत पाटील तसेच जिल्ह्यातील इतर नगरपालिकेच्या मुख्यधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

सर्वप्रथम राष्ट्रीय कर्मचारी आयोगाचे सदस्य पी.पी.वावा यांचे व त्यांच्या सहकारी वर्गाचे मनपा आयुक्तांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. बैठकीच्या सुरुवातीस मनपाचे उपआयुक्त कारभारी दिवेकर यांनी महानगरपालिकेतील कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सादरीकरण केले. ज्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रात एकूण ०६ झोन असून त्यातील २० प्रभागामध्ये संपूर्ण शहराच्या साफ-सफाईचे कामे कायम व कंत्राटदारामार्फत नेमलेल्या सफाई कामगारांमार्फत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

महानगरपालिकेच्या मंजूर आकृतीबंधानुसार सफाई कामगारांची एकूण मंजुर पदसंख्या ८०५ असुन त्यापैकी आजमितीस ५३१ कायम कामगार कार्यरत आहेत. तर २७४ कायम सफाई कागारांची पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे कंत्राटदारामार्फत एकुण ४०६ सफाई कर्मचारी कार्यरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

महानगरपालिकेत महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना वारसा हक्काने नियुक्त्या दिल्या जातात. तसेच मनपा आस्थापनेवर स्थापनेपासून सफाई कर्मचाऱ्यांना वाहन चालक, लिपीक, इत्यादी गट-क मधील पदावर पदोन्नत्या देण्यात येत असतात मागील दोन वर्षाच्या कालावधीत्त एकूण ५५ सफाई कामगारांना पदोन्नती देण्यात आल्याचे यावेळी उप आयुक्तांनी सांगितले.

महानगरपालिकेत सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य निरोगी रहावे यासाठी दरवर्षी आरोग्य शिबिराचे आयोजन करुन आरोग्य विषयक तपासण्या करुन उपचार केल्या जातात. तसेच महानगरपालिकेच्या सफाई कामगारांना मास्क, हँडग्लोज, एप्रॉन, नाली फावडा, टोपले, नारळी झाडु, रेनकोट, गमबुट इत्यादी स्वच्छता विषयक साहित्य देण्यात येते. त्याचप्रमाणे ड्रेनेज विभागा अंतर्गत वॉटरप्रुफ बुट, रिचार्जेबल बॅटरी, सेफ्टी बेल्ट, सेफ्टी ग्लोज, सर्च लाईट, सेफ्टी गमबुट, नायलॉन लॉडर, नॉर्मल फेस मास्क, सेफ्टी हेल्मेट इत्यादी साहित्य पुरविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

महानगरपालिकेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात सफाई आयोगाच्या सदस्यांनी विचारणा केली असता कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन अदाई केल्या जात आहे. तसेच ईपीएफ व इएसआयसी, ५ टक्के घरभाडे भत्ता अदाई करण्यात येत असल्याचे मनपा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. तसेच सफाई कामगारांना सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामाचा आर्थिक मोबदला सुध्दा दिल्या जातो असे नमुद करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रम-साफल्य योजने अंतर्गत ८१ सफाई कामागारांना मोफत सदनिकेचा ताबा दिला असल्याचे यावेळी मनपाच्यावतीने सांगण्यात आले.
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्यांनी यावेळी कामगार नेत्यांनाही आपली भुमिका मांडण्याचे आवाहन केल्यानंतर महापालिका कर्मचारी युनियनचे संस्थापक अध्यक्ष कॉ.गणेश शिंगे यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. तसेच सफाई कामगारांसाठी स्वतंत्र वसाहत स्थापण करण्याची मागणी केली. त्यावर राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन मनपा आयुक्तांना या विषयात लक्ष घालण्याचे निर्देश दिले. एकंदरीत बैठकीच्या समारोपास आयोगाच्या सदस्यांनी महानगरपालिकेच्या कामावर समाधान व्यक्त करुन बैठकीची सांगता करण्यात आली. बैठक संपल्यानंतर आयोगाच्या सदस्यांना जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी सुद्धा भेट दिली. या बैठकीचे सुत्रसंचालन मनपाच्या जनसंपर्क विभागाचे सुमेध बनसोडे यांनी तर आभार प्रदर्शन अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी केले.
00000







वृत्त क्र. 908

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील ज्येष्ठ नागरिकांनी

12 ऑक्टोबरला अयोध्या धाम येथे जाण्यासाठी तयार रहावे

·         पात्र लाभार्थ्यांची रेल्वे 12 ऑक्टोबरला नांदेडहून होणार रवाना

नांदेड दि. 7 ऑक्टोबर :- राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या आहेत त्यांना राज्य आणि देशातील तीर्थक्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना शासनाने सुरु केली आहे. या योजनेतील लाभार्थ्यांची पहिली रेल्वे अयोध्या धाम येथे जाण्यासाठी नांदेड येथून 12 ऑक्टोबर रोजी रवाना होणार आहे. तरी या योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी अयोध्या धाम येथे जाण्यासाठी तयार रहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

राज्यातील नागरिकांना देशातील मोठया तीर्थस्थळांना जाऊन मनशांती तसेच आध्यामिक पातळी गाठणे सुकर व्हावे, यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या आहेत, त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थ क्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घेवून शनिवार 12 ऑक्टोबर 2024 रोजी पहिली ट्रेन नांदेड येथून अयोध्या धाम येथे निघणार आहे.

अध्योध्या धाम तीर्थ क्षेत्रासाठी अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांची निवड यादी समाज कल्याण कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली  आहे. तसेच संबंधिताना फोनद्वारे संपर्क करण्यात येत आहेत. तरी या योजनेतील अध्योध्या धाम तीर्थ अंतर्गत लाभार्थ्यांनी आपले नाव पात्र यादीत आहे किंवा कसे याची खात्री 10 ऑक्टोबर 2024 पर्यत कार्यालयीन वेळेत करुन घ्यावी. तसेच अयोध्या धाम येथे जाण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी तयार रहावे, असे समाज कल्याण कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

  वृत्त क्र. 954 राजकीय पक्षानी निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे -           जिल्हाधिकारी अभिजीत राऊत • राजकीय पक्षांचे प्...