Monday, October 7, 2024

वृत्त क्र. 912

शासकीय जमिनीवर बेकायदेशीर ताबा दाखवाल तर गंभीर कारवाई करू : जिल्हाधिकारी


 चावडीवर, तहसीलमध्ये व सार्वजनिक ठिकाणी शासकीय जमिनीची यादी प्रसिद्ध करा


नांदेड, दि ७ ऑक्टोबर : नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये शासकीय अर्थात सरकारी जमिनीची बनावट खरेदी विक्री करून गैरव्यवहार केल्याचे काही ठिकाणी पुढे येत आहे.अशा प्रकारे गैरव्यवहार सहन केले जाणार नाही. नांदेड जिल्ह्यात अशा शासकीय जमिनीची यादी सर्व संबंधित कार्यालयात दर्शनी भागात प्रसिद्ध करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
     
 नांदेड जिल्ह्यामध्ये तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये सातबारा अधिकार अभिलेखात महाराष्ट्र शासनाच्या नावे नोंद असलेल्या शासकीय जमिनी, गायरान जमिनीची बेकायदेशीर खरेदी विक्री होत असल्याचे पुढे आले आहे. खोटे कागदपत्र तयार करून ग्रामपंचायतच्या नमुना नंबर आठ अ ला बेकायदेशीर नोंद होत असल्याच्याही काही तक्रारी आहेत. तालुका व जिल्हा कार्यालयात अशा तक्रारी येत असल्याने त्याची गंभीर नोंद जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली आहे.

काही प्रकरणात तपास करण्याचे आदेशही देण्यात आले असून अशा प्रकारे खरेदी विक्रीवर निर्बंध आणण्याचे सर्व यंत्रणेला सुचित करण्यात आले आहे.तालुक्याच्या गावांमधील शासकीय जमिनीची सर्वे गट नंबर निहाय माहिती गावातील गाव चावडीवर तसेच तालुक्याच्या फलकावर सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्धी करण्याबाबत सूचना केल्या आहेत.

तसेच जी व्यक्ती शासकीय जमीन किंवा गायरान जमिनीची बेकायदेशीररित्या खरेदी - विक्री करेल किंवा करण्यास भाग पाडेल अशा सर्व व्यक्ती कायदेशीर कारवाईस पात्र आहेत. त्यामुळे अशा सर्वांवर संबंधित यंत्रणेने कारवाई करावी, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. अशा प्रकारच्या फसवणूक व गैरव्यवहाराला कुठेही थारा दिला जाऊ नये, असे यंत्रणेलाही त्यांनी सुचित केले असून या संदर्भातील सर्व माहिती दर्शनी भागात लावण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 954 राजकीय पक्षानी निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे -           जिल्हाधिकारी अभिजीत राऊत • राजकीय पक्षांचे प्...