Wednesday, November 13, 2024

 वृत्त क्र. 1082

निरीक्षक बनले प्रशिक्षणार्थी

नांदेड दक्षिणचे दुसरे प्रशिक्षण संपन्न

नांदेड, दि. १३ नोव्हेंबर:- 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे दुसरे प्रशिक्षण नागार्जुना पब्लिक स्कूल, कौठा,नांदेड येथे संपन्न झाले. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष नांदेड दक्षिणच्या निवडणूक निरीक्षक(सामान्य) पल्लवी आकृती यांनी या प्रशिक्षण वर्गात प्रशिक्षणार्थी होवून प्रशिक्षण घेतले. 

मार्गदर्शन करण्यापेक्षा मुळ प्रशिक्षण कशाप्रकारे दिल्या जात आहे,यावर निरीक्षक पल्लवी यांनी भर देवून समक्ष अनुभव घेतला. यावेळी त्यांनी प्रशिक्षण रुम क्रमांक 56 मधील क्षेत्रिय अधिकारी सचिन गेडेवार यांना काही प्रश्न विचारुन आपल्या शंकांचे समाधान करुन घेतले. अनोख्या पध्दतीने मर्यादित संख्येस तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करुन प्रशिक्षण दिल्या जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. नंतर प्रशिक्षणार्थांशी संवाद साधून परिपूर्ण प्रशिक्षण घेण्याचे आवाहन केले. 

यावेळी सहायक जिल्हाधिकारी अनुष्का शर्मा, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ, तहसीलदार प्रविण पांडे,नायब तहसीलदार नितेशकुमार बोलोलु,संपर्क अधिकारी सबुरी डोंगळीकर,डॉ संगनवार, प्रशिक्षण  टिम सदस्य संजय भालके,डॉ सचिन नरंगले आणि बालासाहेब कच्छवे  यांची उपस्थिती होती.

००००००




 वृत्त क्र. 1081

मतदानाच्या दिवशी नियोजित मासिक शिबिराच्या तारखेत बदल

नांदेड, दि. 13 नोव्हेंबर :- प्रादेशिक परिवहन विभागातर्फे हदगाव तालुका येथे 20 नोव्हेंबर 2024 रोजी मासिक शिबिर घेण्याचे नियोजित होते. परंतु दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा निवडणूक 2024 निमित्त मतदानाचा दिवस असल्याने या तारखेचे शिबिर 21 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे यांची सर्वानी नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसे यांनी केले आहे.
0000

  वृत्त क्र. 1080

जिल्ह्यातील सर्व न्यायालयात 14 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन 

नांदेड, दि. 13 नोव्हेंबर :-  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांच्यावतीने 14 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा न्यायालयात व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय नांदेड येथे ही राष्ट्रीय लोकअदालत संपन्न होईल. सर्व संबंधित पक्षकारांनी या राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष सुरेखा कोसमकर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायाधीश  दलजीत कौर जज यांनी केले आहे. 

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाईचे प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, धनादेश अनादरीत झाल्याबाबतची प्रकरणे तसेच कौंटुबीक न्यायालयातील तडजोड होण्यायोग्य प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण मंच, सहकार न्यायालय व कामगार न्यायालयातील प्रकरणे इत्यादी प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय या लोकअदालतीत  दाखलपूर्व प्रकरणे जसे थकीत मालमत्ता कर, थकीत विद्युत बिल, थकीत टेलीफोन बिल, विविध बॅंकांचे कर्ज वसुलीचे प्रकरण, थकीत पाणी बिल इत्यादी प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढल्या जातील. 

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये झालेल्या निवाडयाविरुद्ध अपील नाही. प्रलंबीत प्रकरणात भरलेली कोर्ट शुल्काची रक्कम शंभर टक्के परत मिळते. नातेसंबंधात कटुता निर्माण होत नाही अशा प्रकारे लोकन्यायालयाच्या माध्यमातून सुलभ, जलद व मोफत न्याय मिळतो. पक्षकारांनी येतांना आपले अधिकृत ओळखपत्र घेवून यावे. या लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

  वृत्त क्र. 1079

शुक्रवारी नांदेड उत्तर मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची तृतीय तपासणी                                                      

नांदेड, दि. 13 नोव्हेंबर :-  86 नांदेड उत्तर मतदारसंघातील उमेदवारांची  निवडणूक खर्चाची तीसरी तपासणी कै. डॉ. शंकरराव चव्हाण, नियोजन भवन, कॅबिनेट हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, परिसर नांदेड येथे शुक्रवार 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते 5 या कालावधीत होणार आहे. या तपासणीसाठी उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या खर्चाचा हिशोब खर्च निरीक्षकासमोर सादर करणे आवश्यक आहे.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम , 1951 च्या कलम 77 नुसार निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवार एकतर तो स्वत: किंवा त्याच्या, तीच्या निवडणूक प्रतिनिधीद्वारे त्याला, तीला नामनिर्देशित करण्यात आले आहे. त्या दिनांकापासून निवडणुकीच्या निकाल लागण्याच्या दिनांकापर्यत दोन्ही दिनांक धरुन, त्याने किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेला किंवा प्राधिकृत केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे आवश्यक आहे. 

तपासणीस अनुपस्थित राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार कार्यवाहीस पात्र असतील तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशोब ठेवणे व दाखल करण्याच्या कायद्याच्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने कसूर केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 10 क अन्वये तो निवडणूक आयोगाकडून तीन वर्षाच्या कालावधीसाठी निरर्ह ठरविण्यास पात्र असेल यांची नोंद घ्यावी असे 86 नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

00000

 वृत्त क्र. 1078

स्वीपअंतर्गत आज सकाळी सात वाजता भव्य मॅराथॉनचे आयोजन

जास्तीत जास्त युवक-युवतीनी सहभाग नोंदवावा जिल्हा प्रशासनाचे आवाहन

२० नोव्हेंबरला विक्रमी मतदानाचे आवाहन

नांदेड, दि. 13 नोव्हेंबर :-  मतदार जागरुकतेसाठी स्थानिक पातळीवर मतदानासाठी धावुया व मतदानाचे आवाहन असा संदेश देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने उद्या भव्य मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात या जिल्हास्तर मॅरेथॉनला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात येणार आहे. मतदान जनजागृतीसाठी या मॅरेथॉनमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतीं व खेळाडुंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

लोकसभा पोटनिवडणूक व 9 विधानसभा मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होत आहे. सर्व मतदार संघात जास्तीत जास्त मतदान होण्याच्या दृष्टीने स्वीपअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने उद्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून या मॅरेथॉन रॅलीस प्रारंभ होणार आहे. ही मॅरेथॉन रॅली छ. शिवाजी महाराज पुतळा, वजीराबाद चौक, कलामंदिर, बसस्टॅड ओव्हरब्रीज मार्गे शिवाजीनगर, महात्मा फुले चौक, आयटीआय कार्नर येथून आयटीएम कॉलेज मार्गे, श्री गुरुगोबिदसिंघजी स्टेडियम मुख्यद्वार येथे समारोप होईल. 

00000

 वृत्त क्र. 1077

मतदान केंद्रावरील सुविधा सुनिश्चित करा 

प्रशासनाच्या सर्व शाळा व आस्थापनांना सूचना 

नांदेड, दि. 13 नोव्हेंबर :- शासकीय असो वा खासगी शाळा व अन्य कार्यालय ज्या ठिकाणी मतदान केंद्रे निश्चित झाली आहेत त्याठिकाणी मुलभूत सुविधा उपलब्ध करणे हे मुख्याध्यापक व संस्थाप्रमुखांची जबाबदारी आहे. १९ नोव्हेंबरला पोलिंग पाटर्याच्या आगमनापासून तर २० नोव्हेंबरला मतदान होईपर्यंत सर्व सुविधा निश्चित करण्यात याव्यात, असे निर्देश प्रशासनाच्यावतीने देण्यात आले आहेत. 

हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे जिल्हाभरातील सर्व ठिकाणच्या शाळा, महाविद्यालय, खासगी संस्था याठिकाणी मतदान केंद्र निश्चित झाली आहेत. या सर्व ठिकाणी पायाभूत सुविधांसोबतच रात्रीची प्रकाश व्यवस्था सर्वात महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे पुरेशा दिवाबत्तीची व्यवस्था आहे, अथवा नाही याची खातरजमा करणे संस्थेच्याप्रमुखांची जबाबदारी असून त्यासाठी कोणतीही अडचण असेल तर प्रशासनाशी चर्चा करावी, असेही आज स्पष्ट करण्यात आले आहे. 

यासंदर्भात आज नांदेड शहरातील 87 नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांसंदर्भात बैठक झाली. मात्र जिल्हाभरात ही व्यवस्था डोळ्यात तेल घालून दुरूस्त झाली पाहिजे याबाबत प्रशासनाने निर्देश दिले आहेत. 

येत्या 20 नोव्हेंबर 87-नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीकरिता निश्चित करण्यात आलेल्या मतदान केंद्रावर आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्याच्या अनुषंगाने खाजगी शाळांचे सर्व मुख्याध्यापक, प्रतिनिधी, यांची बैठक आज उपविभागीय कार्यालय, नांदेड येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार प्रवीण पांडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. 

सदर बैठकीस गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, मनपा शिक्षणाधिकारी, नायब तहसिलदार व सर्व संबंधित खाजगी शाळांचे मुख्याध्यापक, प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी शहरी व ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर लाईट, पाणी, रॅम्प, स्वच्छता गृहे आदि व्यवस्था तसेच मतदान केंद्राच्या मोडकळीस आलेल्या खिडक्या, दरवाजे दुरुस्त करुन घ्याव्यात तसेच शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात यावा, अशा सूचना संबंधितास केल्या.

0000

 वृत्त क्र. 1076

मतदान वाढीसाठी ज्येष्ठ नागरिकांसोबत मनपा आयुक्तांची सहविचारसभा

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...