Wednesday, October 29, 2025

 वृत्त क्रमांक  1138

हिंदु खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाच्या

विविध योजनेंतर्गत कर्ज योजना ; अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड, दि. 29 ऑक्टोबर :- हिंदु खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्यादित (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची उपकंपनी ) जिल्हा कार्यालय नांदेड यांच्यामार्फत सन 2025-26 या आर्थिक वर्षातील राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनेंतर्गत कर्ज योजना राबविण्यासाठी योजनानिहाय उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. गरजू लाभार्थ्यांनी कर्ज मागणी अर्ज करण्यासाठी जिल्हा कार्यालयास भेटुन लागणाऱ्या कागदपत्रासह महामंडळाच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.   

हिंदू खाटीक समाजाच्या उन्नतीसाठी व आर्थिक विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने महामंडळाची स्थापना 5 जुन 2025 रोजी केली आहे. याअंतर्गत अनुदान योजना, बीजभांडवल योजना, थेट कर्ज योजना, एनएसएफडीसी कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. अशा विविध योजना महामंडळाकडुन राबविण्यात येतात. या योजनेचे उदिष्ट मुख्यालय मुंबई यांच्याकडून प्राप्त झाले आहे. 

अनुदान योजना

या योजनेअंतर्गत 50 हजार रुपयापर्यंत कर्जासाठी अर्ज करता येतील. यात 25 हजार रुपये महामंडळाचे अनुदान व 25 हजार रुपये बँकचे कर्ज दिले जाते. 

बीज भांडवल योजना

या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयापर्यंत कर्जासाठी अर्ज करता येतील. यामध्ये महामंडळाचे अनुदानसह 20 टक्के कर्ज व बँकेचा सहभाग 75 टक्के कर्ज व अर्जदाराचा सहभाग 5 टक्के असे एकूण 5 लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जाते. 

थेट कर्ज योजना

या योजनेंतर्गत 1 लाख रुपयापर्यंत महामंडळाकडून 50 हजार रुपये अनुदान व 45 हजार रुपये कर्ज व्याज दर द.स 4 टक्के व अर्जदाराचा सहभाग 5 हजार रुपये असे एकुण 1 लाखापर्यंत कर्ज दिले जाते. 

एनएसएफडीसी कर्ज योजना

याअंतर्गत 5 लाख रुपयापर्यंत त्यामध्ये एन.एस.एफ.डी.सी. महामंडळाकडुन 75 टक्के बीजभांडवल अनुदानासह 20 टक्के व अर्जदाराचा सहभाग 5 टक्के कर्ज दिले जाते. 

या योजनेंतर्गत लाभार्थी हा हिंदु खाटीक जातीचा असावा या समाजातील गरजु व्यक्तींना स्वत:चा उदरनिर्वाह व स्वयंरोजगार मिळविण्यासाठी छोटे-मोठे लघुउद्योग जसे किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, ब्युटी पार्लर, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, रेडिमेट गारमेंट इत्यादी व्यवसायासाठी महामंडळामार्फत कर्ज व अनुदान दिले जाते. 

प्राप्त उद्दिष्ट

अनुदान योजना 50 हजार पर्यंत 25 हजार रुपये बँकेचे कर्ज व 25 हजार रुपये अनुदान या योजनेसाठी भौतिक उद्दिष्ट 10 असून आर्थिक उद्दिष्ट अनुदान 5 व बीजभांडवल कर्ज निरंक आहे. 

बीज भांडवल योजनेत 50 हजार ते 5 लाखापर्यंत योजनेसाठी भौतिक उद्दिष्ट 10 असून आर्थिक उद्दिष्ट अनुदान 5 व बीजभांडवल कर्ज 4.50 आहे. 

थेट कर्ज योजना 1 लाखापर्यंत योजनेसाठी भौतिक उद्दिष्ट 5 असून आर्थिक उद्दिष्ट अनुदान 2.50 व बीजभांडवल कर्ज 2.25 राहील. 

एनएसएफडीसी 1 लाख 40 हजार ते 5 लाख रुपयापर्यंत योजनेत भौतिक उद्दिष्ट 12 असून आर्थिक उद्दिष्ट अनुदान व बीजभांडवल कर्ज निरंक याप्रमाणे आहे.

0000

वृत्त क्रमांक  1137

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा 

नांदेड, दि. 29 ऑक्टोबर :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरूवार 30 ऑक्टोबर 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

गुरूवार 30 ऑक्टोबर रोजी बेलोरा विमानतळ जि. अमरावती येथून विमानाने सायंकाळी 5.30 वा. श्री गुरू गोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथे आगमन. सायं.5.35 वा. मोटारीने उदगीरकडे प्रयाण. उदयगिरी औद्योगिक वसाहत लोणी नांदेड रोड उदगीर जिल्हा लातूर येथून रात्री 11.25 वा. श्री गुरू गोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथे आगमन. रात्री 11.30 वा. विमानाने आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणेकडे प्रयाण करतील.

00000

वृत्त क्रमांक  1135

अवैध रेती उत्खनन करणारे साहित्य नष्ट नांदेड महसूल पथकाची कारवाई

63 लाख किंमतीचा मुद्देमाल नष्ट

नांदेड, दि. 29 ऑक्टोबर :  आज 29 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले  यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड, नायब तहसीलदार स्वप्निल  दिगलवार, मंडळ अधिकारी  कुणाल जगताप, अनिरुद्ध जोंधळे, मोहसीन सय्यद, ग्राम महसूल अधिकारी, मनोज जाधव, माधव भिसे, बरोडा श्रीरामे, जमदाडे,  मनोज सरपे, महेश जोशी, महसूल सेवक बालाजी सोनटक्के, शिवा तेलंगे या महसूल पथकाने  विष्णुपुरी  परिसरामध्ये पहाटे 5 वाजता अवैध रेती उत्खनन प्रतिबंधासाठी गस्तीवर असताना रेती उत्खनन करणारे 2 मोठ्या बोटी,   एक छोटी बोट व 4 इंजिन आढळून आले. 

या पथकाने मजुरांच्या साह्याने 3 बोटी व  4 इंजिन जिलेटीने स्फोट करून नष्ट केले. तसेच 30 तराफे जाळून नष्ट केले, असे एकूण 63 लाख किंमतीचा मुद्देमाल जाग्यावरच स्फोट करून नष्ट केला.  एक अवैध वाहतूक करणारी हायवा एमएच 26 बीसी 4892 जप्त करून तहसील कार्यालय परिसरामध्ये लावण्यात आला आहे. सदर हायवावर दंडात्मक फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची तजवीच करण्यात आली आहे.

या कारवाई दरम्यान पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस  उपनिरीक्षक ज्ञानेश्वर भोसले व पोलीस जमादार शिंदे, श्री. घुगे व श्री. जाधव यांचे पोलीस पथक उपलब्ध करून दिले. अवैध उत्खननासंदर्भात नांदेड महसूल प्रशासन सक्तीने कारवाई करेल असा इशारा नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन  खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे. 

00000











 वृत्त क्रमांक  1136

दक्षता जनजागृती सप्ताहाच्या अनुषंगाने नांदेड पोलीस क्लब व महापालिकेत जनजागृती 

नांदेड, दि. 29 ऑक्टोबर :  महाराष्ट्र राज्य शासनाकडून 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत "दक्षता जनजागृती 2025" दक्षता आपली सामायिक जबाबदारी" आयोजित करण्यात आला आहे. या अनुषंगाने आज पोलीस अधीक्षक संदिप पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस क्लब, नांदेड येथे नागरीकांच्या प्रत्यक्ष भेटी घेवून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कामकाजाची माहिती दिली. तसेच दर्शनी भागावर दक्षता जनजागृती सप्ताहचे फलक व स्टिकर लावून नागरीकांना पॉम्पलेट वाटप करुन जनजागृती करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी पोलीस अधिक्षक संदिप पालवे, पोलीस उपअधिक्षक प्रशांत पवार, पोलीस उपअधिक्षक राहुल तरकसे, पोलीस निरिक्षक साईप्रकाश चन्ना, श्रीमती अनिता दिनकर, श्रीमती अर्चना करपूडे व ला.प्र.वि. चे सर्व पोलीस अंमलदार हाजर होते.

दक्षता जनजागृती सप्ताह 2025 च्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदिप पालवे यांनी नांदेड शहर महानगरपालिका नांदेड येथे महापालिका आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपआयुक्त तथा विधी अधिकारी अजितपालसिंग संधु, सहाय्यक आयुक्त गुलाम सादिक व सर्व अधिकारी यांच्यासोबत दक्षता जनजागृती संबंधाने बैठक घेवून भ्रष्ट्राचार निर्मुलनासाठी विविध उपाययोजना बाबत मार्गदर्शन करण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी महानगरपालिकेच्या नोटीस बोर्डावर व दर्शनी भागावर दक्षता जनजागृतीचे फलक व स्टिकर लावून तेथे उपस्थित असलेल्या नागरीकांना जनजागृती संबंधाने प्रचार साहित्य वाटप केले. तसेच भ्रष्टाचाराबाबत काही तक्रार असल्यास तक्रार कशी करावी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यात आली.

संपूर्ण नांदेड जिल्हयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन नागरीकांच्या भेटी घेवून सर्व शासकीय इमारतीमध्ये तसेच सार्वजनीक ठिकाणी दर्शनी भागावर भ्रष्टाचार विरोधी जनजागृतीबाबत तयार करण्यात आलेल्या पोस्टर, बॅनर व स्टिकर लावून जनजागृती मोहिम राबविली जात आहे.

पोलीस अधीक्षक संदीप पालवे : 02462-255811, मो. नंबर 9226484699.

अपर पोलीस अधीक्षक अशोक कदम : 02462-255811

पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार : मो नंबर 9359056840.

टोल फ्रि : 1064.

ला.प्र.वि. नांदेड दुरध्वनी क्रमांक : 02462-253512.

वेबसाईट : www.acbmaharashtra.gov.in

मोबाईल ॲप : www.acbmaharashtra.net

फेसबुक पेज : www.facebook.com/maharashtraACB

टिव्टर : @ACBnanded

इन्स्ट्राग्राम :  acb_nanded

युट्यूब : @Anti Corruption BureauNanded.

000000




 वृत्त क्रमांक  1134

सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त ‘सरदार @150 एकता अभियानात सहभागी व्हावे

- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

31 ऑक्टोबर व 7 नोव्हेंबर रोजी भव्य पदयात्रेचे आयोजन

नांदेड, दि. 29 ऑक्टोबर : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ‘सरदार @ 150 एकता अभियान’ अंतर्गत 31 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात जिल्ह्यात 31 ऑक्टोबर व 7 नोव्हेंबर 2025 रोजी भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर, तसेच विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

या अभियानांतर्गत भारत सरकारच्या माय भारतच्या नेतृत्वाखाली ‘सरदार@150 युनिटी मार्च’ या देशव्यापी उपक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे. याचे उद्दिष्ट देशातील युवकांमध्ये एकता, देशभक्ती आणि नागरी जबाबदारीची भावना जागृत करणे हे आहे. या मोहिमेद्वारे युवकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात आणि नागरी सहभागातून ‘एक भारत, आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेची अंमलबजावणी करण्यास प्रोत्साहित केले जाईल.

या कालावधीत पदयात्रा, विविध स्पर्धा आणि प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये डिजिटल फेसवर सोशल मीडिया रील स्पर्धा, निबंध स्पर्धा, सरदार @यंग लीडर्स प्रोग्राम अंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा, आरोग्य शिबिरे, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर व्याख्याने, ड्रग्जमुक्त भारत प्रतिज्ञा इ. उपक्रमांचा समावेश आहे. 

जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी सांगितले की, “युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना बळकट करणे, तसेच विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत युवा पिढीला सक्रिय योगदान देण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.” यावेळी जिल्हास्तरीय पदयात्रा पोस्टरचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

नांदेड येथे 31 ऑक्टोबर व 7 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. 31 ऑक्टोबर रोजी ही पदयात्रा जुना मोंढा ते जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनापर्यत काढण्यात येणार आहे. तरी या पदयात्रेत सर्व विद्यार्थी, नागरिक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व विभाग, महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी या राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. 

000000






वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...