Tuesday, April 16, 2019


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक
मतदानाच्या दिवशी गुरुवारी
भरणारे आठवडी बाजार बंद राहणार
नांदेड, दि. 16 :-  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी गुरुवार 18 एप्रिल 2019 रोजी जिल्ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश मार्केट ॲड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 5 अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हदंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी निर्गमीत केले आहेत.  
जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी नांदेड, हिंगोली व लातूर या लोकसभा मतदारसंघातील किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, लोहा, नायगाव, देगलूर व मुखेड या नऊ विधानसभा मतदारसंघात गुरुवार 18 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी मतदान दिनांकास जिल्ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्यास परवानगी दिली आहे. 
गुरुवार 18 एप्रिल 2019 रोजी आठवडी बाजार भरणाऱ्या गावांची ठिकाणाची नावे पुढील प्रमाणे आहेत. अर्धापूर तालुका – मालेगाव, नायगाव खै.- नायगाव (बा.), भोकर, हदगाव- वाळकी खु, ल्याहारी (वाळकी फाटा), तळणी. किनवट- उमरी बा., बेल्लोरी (धा.). देगलूर- लोणी, बिलोली, मुखेड- बेटमोगरा, राजुरा बु, नांदेड- सिडको, कंधार- कुरुळा, मंगलसांगवी या ठिकाणची आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार 19 एप्रिल 2019 रोजी भरविण्यात यावेत, असे आदेशात म्हटले आहे.
0000



लोकसभा सार्वत्रिक निवडणूक
जिल्ह्यात दारु दुकाने बंद     
नांदेड, दि. 16 :- जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान 18 एप्रिल 2019 रोजी तर मतमोजणी 23 मे 2019 रोजी होणार आहे. यावेळी निवडणुकीसंदर्भात होत असलेल्या मतदानाची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी व शांतता, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी नांदेड जिल्हा हद्दीतील सर्व मतदान व मतमोजणी होत असलेल्या ठिकाणी सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष) एफएल / बीआर- 2 व ताडी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
हा आदेश नांदेड जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक 2019 साठी मतदान होत असलेल्या ठिकाणी मतदान संपण्यापूर्वी 48 तास अगोदर म्हणजे 16 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून ते 17 एप्रिल 2019 रोजी संपूर्ण दिवस, मतदानाचा दिवशी 18 एप्रिल रोजी संपूर्ण दिवस तसेच मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी होत असलेल्या ठिकाणी 23 मे 2019 रोजी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील.
या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.
00000


गुरुवारी मतदानाच्या दिवशी 
मतदान केंद्र परिसरात 144 कलम लागू   
नांदेड दि. 16 :- लोकसभेचा सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पाडण्‍याच्‍या दृष्‍टीकोणातून तसेच निवडणूकीचे कामे हाताळतांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये  विविध निर्बंधाबाबत आज आदेश निर्गमीत केले आहेत.
जिल्‍ह्यात ज्या मतदान केंद्रावर मतदान होणार आहे त्‍याठिकाणी 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे, निवडणुकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्‍हेंचे प्रदर्शन व निवडणूकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त व्‍यक्‍तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्‍यात आले आहे. हा आदेश 18 एप्रिल 2019 रोजी मतदान सुरु झाल्‍यापासुन मतदान होईपर्यंत अंमलात राहील.
000000


हरवलेल्या मुलीचा शोध
नांदेड, दि. 16 :- कांकाडी येथील कु. गोदावरी नारायण पवार (वय 19) ही घरकाम व शिक्षण घेणारी मुलगी 24 मार्च 2019 रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास राहते घर कांकडी येथून कोणास न सांगता निघुन गेली आहे. तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही.
मुलीचे वडिल नारायण पवार (वय 55) यांचे तक्रारीवरुन या मुलीचा रंग गोरा, उंची 5 फुट, केस काळे लांब, पोशाख पंजाबी ड्रेस काळ्या रंगाचा असून त्यावर लाल टिपके, भाषा मराठी हिंदी येते, बांधा मजबुत, डोळे पाणीदार मोठे आहेत. या वर्णनाची मुलगी दिसल्यास पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे मो. 95 52  54 23 29 संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.
00000


शासकीय अध्यापक महाविद्यालयात
बीएड द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षणार्थ्यांना निरोप
नांदेड, दि. 16 :- शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे बीएड द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रथम वर्षाच्या प्रशिक्षणार्थ्यांकडून निरोप देण्यात आला. अध्यक्षस्थानावरुन प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे यांनी विद्यार्थ्यांना परिक्षेच्या शुभेच्छा देऊन सध्या तापमानात वाढ होत असल्याने स्वत:चा बचाव करुन परिक्षेत यश संपादन करावे, असा सल्ला दिला.
यावेळी मागील वर्षात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक / मार्गदर्शक डॉ. उमेश मुरुमकर हे होते. निरोप समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सुकेशना नरवाडे तर आभार प्रशिक्षणार्थी सोनाली जोगदंड हिने केले.
000000


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक   
मतदारांना मतदान करण्यासाठी गुरुवारी सुट्टी   
नांदेड, दि. 16 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी सदर क्षेत्रातील मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता गुरुवार 18 एप्रिल 2019 रोजी मतदारांना मतदानासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्यात यावी, अशी अधिसूचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी काढली आहे.
याबाबत उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग 15 मार्च 2019 आणि सामान्य प्रशासन विभागाचे राजपत्र 27 मार्च 2019 च्या अधिसुचनेनुसार तसेच निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्या लोक पत्रानुसार व लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 135 (ब) अन्वये 16-नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदार असलेल्या शासकीय / निमशासकीय कर्मचारी, विविध आस्थापना, दुकाने आस्थापना निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, रिटेलर्स इत्यादी येथील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पगारी सुट्टी देण्यात यावी किंवा शक्य नसेल तर किमान दोन-तीन तासाची सवलत देण्याबाबत आदेश निर्गमीत केले असून मतदानाच्या दिवशी मतदार मतदानापासून वंचित राहून नाही. जर मतदाराकडून मतदानासाठी योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्यास तक्रार आल्यास संबंधीत आस्थापना, व्यावसायिकाविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल याची गांर्भीयपूर्वक नोंद घ्यावी, असेही अधिसुचनेत नमूद केले आहे.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...