Wednesday, January 27, 2021

 

मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्य

शासकीय जिल्हा ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन 

   नांदेड, (जिमाका), दि. 27 :- संपुर्ण महाराष्ट्रात दिनांक 14 ते 28 जानेवारी 2021 या कालावाधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा होत आहे. त्यानिमीत्य आज दिनांक 27 जानेवारी रोजी  जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजीत  ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन प्रफुल कर्नेवार, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी, एन.आय.सी. नांदेड यांच्या हस्ते करण्यात आले. 

 या वेळी श्री कर्नेवार यांनी उपस्थीतांना मार्गदर्शन करतांना माहिती व तंत्रज्ञान युगात संगणक व मोबाईल माध्यमाद्वारे क्षणात माहिती प्राप्त्‍ होत असुन सुध्दा पुस्तकांच्या सहवासात राहुन प्रत्यक्ष पुस्तके वाचण्यामध्ये अधिक आनंद प्राप्त होतो असे नमुद केले. तसेच नुकतीच जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे प्रस्थापीत करण्यात आलेली e-Granthlaya 4.0 क्लाऊड बेस प्रणाली (NIC मार्फत डेव्हलप करण्यात आलेली)  कामकाजाची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. सदर उदघाटनाप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, के.एम.गाडेवाड, संजय पाटील, गजानन कळके  यांची प्रमुख उपस्थिती होती. 

सदरचे ग्रंथ प्रदर्शन पुढील देान दिवसांकरिता खुले असुन सर्वांनी या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.

00000



 

 

 

शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी

 जागा उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्नशील

      - पालकमंत्री अशोक चव्हाण 

शेतकरी ते ग्राहक थेट विक्री अभियानाचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन  


नांदेड, (जिमाका), दि. 27 :-शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विकेल ते पिकेल धोरणाअंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान हे अत्यंत दिशादर्शक आहे. ज्याची मागणी आहे ते आपल्या शेतात पिकवून बाजारपेठेत त्या शेतमालाच्या विक्रीचे कसब शेतकऱ्यांनी अंगीकारल्यास निश्चितच अधिकचा लाभ होईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

 

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कृषी विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय रयत बाजाराचे उद्घाटन पालकमंत्री  अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन अण्णा हंबर्डे, आमदार बालाजीराव कल्याणकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ मंगाराणी अंबुलगेकर, सभापती कृषी बाळासाहेब रावणगावकर,माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर,जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर,मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे, यांच्यासह अधिकारी कर्मचारी शेतकरी ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात रयत बाजारासाठी जवळपास 60 स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे.जिल्ह्यातील विविध तालुक्यातील यशस्वी शेतकऱ्यांची तसेच रयत बाजारात सहभागी शेतकऱ्यांचा यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची यशोगाथेची पुस्तिकेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. 

यावेळी विविध स्टॉलला मान्यवरांनी भेटी देऊन शेतकऱ्याची आणि त्याच्या शेतमालाची आस्थेवाईकपणे पाहणी करून व चर्चा करून त्यांनी समाधान व्यक्त केले. या  समारंभात जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील मालासह मोठ्या प्रमाणावर उपस्थिती नोंदवली. या शेतीमालाव्यतिरिक्त रेशीम उद्योग, मत्स्यव्यवसाय, गांडूळ खत, महिला बचत गट यांच्यामार्फत उत्पादीत उत्पादने  मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आली आहेत. तसेच फळे, भाजीपाला विविध प्रकारचे धान्य, डाळी, मध, गूळ, ओल्या भुईमूग शेंगा, रसवंती असे अनेक शेती उत्पादने त्याचबरोबर सफेद मूसळी, ड्रॅगन फ्रुट, स्ट्रॉबेरी, अशी नाविन्यपूर्ण उत्पादने  विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 

या उपक्रमास अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणावर या सर्व शेतीमालाची विक्री झाली. ग्राहकांना ताजा माल मिळाला आणि थेट विक्रीमुळे शेतकऱ्यांनासुद्धा अधिकचा दर मिळून फायदा झाला. 

हा उपक्रम या पुढेही दिनांक 29 जानेवारीपर्यंत हा बाजार जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवीशंकर चलवदे यांनी सांगितले. या उपक्रमाला आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार राजेश पवार, सौ. पवार यांनीही भेट दिली.

0000

नांदेड येथे आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या

अधिक्षक आणि कार्यकारी अभियंता विद्युत कार्यालयाची भर

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण 

नांदेड, (जिमाका), दि. 27 :- नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असलेली शासकिय कार्यालय नांदेड येथेच असावीत यासाठी माझा कायम आग्रह राहिलेला आहे. मागील काही वर्षात निर्माण झालेला अनुशेष पूर्ण करण्याच्यादृष्टिने सर्व विभागाशी समन्वय साधत नांदेडसाठी कोणतेही कमतरता पडणार नाही असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून त्यांच्या हस्ते स्नेहनगर नांदेड येथे सार्वजनिक बांधकाम, विद्युत शाखेच्या अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता कार्यालयाचे लोकार्पण आणि शासकिय विश्रामगृह नांदेड येथील मिनी सह्याद्री विश्रामगृहाची सुधारणा, नुतनीकरण व श्रेणीवर्धन कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, महापौर रोहिनी येवनकर, माजी आमदार हणमंतराव बेटमोगरेकर, हरिहरराव भोसीकर, मुख्य अभियंता (विद्युत) संदिप पाटील, अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, कार्यकारी अभियंता चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती. 

नांदेड येथे पूर्वी जलसंपदा विभागाचे विश्रामगृह होते. हे विश्रामगृह नादुरुस्त व बंद असल्यामुळे स्वाभाविकच विविध अभ्यागतांची गर्दी सध्या उपलब्ध असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागांच्या विश्रामगृहावर वाढली आहे. जिल्ह्यातील 16 तालुके, याचबरोबर बाहेरुन येणाऱ्या अभ्यागतांची संख्या लक्षात घेता नांदेड येथे विश्रामगृहाची अत्यंत आवश्यकता होती. सर्व बाबींचा विचार करुन आता आपण मिनी सह्याद्री विश्रामगृह व तपोवन विश्रामगृहाची सुधारणा, नुतनीकरण, श्रेणीवर्धन करीत असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत होणाऱ्या इमारत विकास कामांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाचाही तेवढाच महत्वाचा सहभाग असतो. यापूर्वी नांदेड येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत कार्यकारी अभियंत्याचे कार्यालय उस्मानाबाद तर अधिक्षक अभियंत्यांचे कार्यालय पुणे येथे होते. यामुळे येथील विकास कामात विलंब होण्यासमवेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इतर विभागांना सारखे उस्मानाबाद व पुणे येथे जाणे जीक्रीचे झाले होते. जिल्ह्याची ही निकड लक्षात घेऊन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रजासत्ताक दिनी कार्यकारी अभियंता व मुख्य अभियंता विद्युत शाखेच्या कार्यालयाचे लोकार्पण करुन नांदेडच्या विकासात एक नवी भर घातली आहे.

0000 





महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...