Friday, August 18, 2017

अतिवृष्‍टीच्या प्रसंगी नागरिकांनी
सावधगिरी बाळगावी ; जिल्हा प्रशासाचे आवाहन  
नांदेड दि. 18 :- विदर्भ, उत्‍तर महाराष्ट्र, कोकण, मध्‍य महाराष्ट्रासह मराठवाडयात काही ठिकाणी 19 ते 23 ऑगस्ट 2017 या कालावधीत अतिवृष्‍टी होण्‍याची शक्‍यता भारतीय हवामान खात्यानी दिली आहे. जिल्‍हयात नागरिकांनी पुरापासून सावधगिरी बाळगावी तसेच नदीकाठाच्‍या गावांनी सावधानता ठेवावी, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाने केले आहे.
या कालावधीत वादळी विजा कोसळण्‍याची शक्‍यता आहे. नागरीकांनी झाडाच्‍या आसऱ्याला न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे. अतिवृष्‍टीच्‍या काळात पावसाळी पाण्‍याचा येवा वाढत राहिल्‍यास अतिरिक्‍त जलसाठा विसर्ग करण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्‍यामुळे नागरीक, विद्यार्थ्यांनी पाण्‍याच्या स्‍त्रोतापासुन दुर राहावे. नदीकाठच्‍या गावांना अतिसावधतेचा इशारा देण्‍यात आला आहे. आपतकालीन प्रसंग उदभवल्‍यास नागरिकांनी सतर्क रहावे. याबाबत वेळोवेळी कुठल्‍याही प्रकारची गरज पडल्‍यास जिल्‍हा प्रशासनाच्या वरीष्‍ठ कार्यालयास त्वरीत माहिती दयावी. आपतकालीन दुरध्‍वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. जिल्‍हा पुर नियंत्रण कक्ष, सिंचन भवन, नांदेड 02462 - 263870, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नियंत्रण कक्ष 02462 - 234461, जिल्‍हा पोलिस नियंत्रण कक्ष 02462 - 234720 जिल्‍हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष 02462- 235077, फॅक्‍स 238500 टोल फ्री 1077, अग्निशमन विभाग 02462- 252555 या दुरध्वनी नंबरवर संपर्क साधावा, असेही आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाने केले आहे.
0000000
विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून होणार प्रक्षेपण
मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमात
घर विषयक प्रश्नांना उत्तरे रविवारी

नांदेड, दि. १८ : राज्यातील जनतेला थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या मी मुख्यमंत्री बोलतोयकार्यक्रमाच्या सर्वांसाठी परवडणारी घरेया विषयावरील पहिल्या भागाचे येत्या रविवारी म्हणजे २० ऑगस्ट २०१७ रोजी विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारण होणार आहे.
            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे निर्मित या कार्यक्रमाचे प्रसारण रविवार २० ऑगस्ट २०१७ रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी, झी चोवीस तास आणि साम टीव्ही या वाहिन्यांवरून सकाळी दहा वाजता होईल. याच कार्यक्रमाचे पुन:प्रसारण  सोमवार दि. २१ ऑगस्ट २०१७ रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून सायंकाळी साडेपाच वाजता होईल. आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून सोमवार दि. २१ ऑगस्ट आणि मंगळवार दि. २२ ऑगस्ट रोजी सकाळी  ७ वाजून २५ मिनिटांनी प्रसारण होईल.                               
प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ कसा मिळेल? संक्रमण शिबिरात राहणाऱ्या कुटुंबांचे कायम स्वरूपी पुनर्वसन होईल का? भोगवटा प्रमाणपत्राच्या अडचणी व पद्धती सुलभ करणार का? पंतप्रधान आवास योजनेच्या घरांसाठी पात्रता काय? भूमिहीनांना घरकुलाचा लाभ कसा मिळेल? शबरी योजनेचे स्वरूप कसे आहे? अनधिकृत बांधकामे नियमित होणार का? खासगी इमारतींसाठी वाढीव एफएसआय मिळणार का?, अशा राज्याच्या विविध भागातून आलेल्या प्रश्नांबाबत राज्य शासन करीत असलेल्या व्यापक योजनांची माहिती मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विविध प्रश्नांना उत्तरे देताना या कार्यक्रमात दिली आहे.
          या कार्यक्रमाच्या चित्रिकरणाआधी ई-मेल आणि एसएमएसवरून लोकांकडून सर्वांसाठी परवडणारी घरे या विषयावर प्रश्न मागविण्यात आले होते. त्याला राज्याच्या विविध भागातील साधारण दहा हजाराहून अधिक लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई, शबरी योजना, महारेरा, संक्रमण शिबिरे, म्हाडाची घरे, इमारतींचा पुनर्विकास, भोगवटा प्रमाणपत्र, धारावी पुनर्वसन प्रकल्प, बीडीडी चाळींचा पुनर्विकास अशा गृहनिर्माण विषयक मुद्द्यांच्या अनुषंगाने प्रश्न विचारले होते. यातील निवडक प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे दिली आहेत.

000000
सुक्ष्म सिंचन संचासाठी शेतकऱ्यांनी
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन  
            नांदेड दि. 18 :- प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेंतर्गत केंद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजना 2017-18 या वर्षासाठी सुक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी शेतकऱ्यांऑनलाईन नोंदणी करण्यास शेतकऱ्यांकडुन अर्ज स्वीकृती करण्यासाठी ई-ठिबक अज्ञावली दिनांक 1 मे 2017 ते दिनांक 31 डिसेंबर 2017 या कालावधीत सुरु राहणार आहे.  विहित पध्दतीत शेतक-यांनी प्रस्ताव सादर करावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. टी. एस. मोटे यांनी केले आहे.
त्यानुसार शेतक-यांचे अर्ज ई-ठिबक अज्ञावलीमध्ये ऑनलाईन प्रणालीव्दारे स्वीकारण्यात येत आहेत. शेतकऱ्यांकडुन अर्ज फक्त ई-ठिबक आज्ञावली www.mahaethibak.gov.in यासंकेतस्थळावर ऑनलाईन प्रणालीव्दारे स्विकारण्यात येतील. 
            सन 2017-18 मधील ज्या लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहे. स्वंयचलित संगणकीय प्रणालीव्दारे शेतक-यांना उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात ऑनलाईन पुर्वसंमती देण्यात आलेली असुन ज्या लाभार्थ्यांना पुर्वसंमती मिळालेली आहे, असे लाभार्थ्यांनी सुक्ष्म सिंचन संच उत्पादक अथवा त्यांचे प्राधिकृत विक्रेते / वितरकाकडुन त्यांच्या संतीच्या कंपनीचा संच खरेदी करावा प्रत्यक्षात त्यांचे क्षेत्रावर कार्यान्वीत करुन बिल ईनव्हाईस ऑनलाईन प्रणालीव्दारे नोंदवावे. अनुदान मागणीचा प्रस्ताव आवश्यक कागदपत्रासह तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावा.
            लाभार्थी शेतक-यांने पुर्वमान्यता मिळाल्यानंतर सुक्ष्म सिंचन संचाची उभारणी करुन 30 दिवसाचे आत बिल ईनव्हाईस ऑनलाईन प्रणालीमध्ये भरल्यास लाभार्थीची पुर्वमान्यता संगणकीय प्रणालीव्दारे आपोआप रद्द होईल. त्यास पुन्हा नव्याने अर्ज करण्याची संधी उपलब्ध राहील.
अधिक माहितीसाठी संबंधीत कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क करावा किंवा कृषि विभागाचे अधिकृत स्थळ  www.mahaethibak.gov.in वर माहिती उपलब्ध आहे.

00000
शेतकऱ्यांनी कर्ज योजनेचा लाभ घ्यावा
जिल्हा उपनिबंधकाचे आवाहन  
नांदेड दि. 18 :- शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली "छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017" च्या पार्श्वभुमीवर राज्य शासनाने 30 जून 2016 रोजी थकीत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना शासन हमीवर कृषि निविष्ठा खरेदीसाठी 10 हजार रुपये तातडीचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. थकीत असलेल्या शेतकऱ्यांना संबंधित बँकांनी 10 हजार रुपये पर्यंत शासन हमीवरील कर्ज गुरुवार 31 ऑगस्ट 2017 पुर्वी देण्याबाबत सर्व राष्ट्रीयकृत, ग्रामीण, खाजगी व सहकारी बँकांना सूचना दिलेल्या आहेत. तसेच शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी महाऑनलाईन, -सेवा केंद्र व सीएससी केंद्रावर नि:शुल्क कर्जमाफी अर्ज ऑनलाईन भरावीत, असे आवाहन  जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांनी केले आहे.   
राष्ट्रीयकृत बँकांना रिझर्व बँकेने शासन हमीवर 10 हजार रुपये कर्ज वाटप करण्यास मान्यता दिली आहे. थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखेमध्ये आवश्यक कागदपत्रासह गुरुवार 31 ऑगस्ट पर्यंत शासन हमीवरील तातडीचे 10 हजार रुपये कर्ज योजनेचा लाभ घ्यावा.
तसेच शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. अर्ज जिल्ह्यातील सर्व महाऑनलाईन, -सेवा केंद्र व सीएससी केंद्रावर नि:शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. कर्जमाफी अर्ज भरण्यासाठी संबंधित पात्र शेतकऱ्यांनी केंद्रावर आधार कार्ड, बँक कर्ज खाते उतारा किंवा कर्ज खाते पासबुक, बचत खाते पासबुक व आधार कार्डशी लिंक केलेला भ्रमणध्वनी घेऊन जावे. तसेच पती, पत्नी व 18 वर्षाखालील कर्जदार अपत्यांनी सोबत जाणे आवश्यक आहे. काहीवेळा बायमेट्रीक मशीनवर अंगठ्याचा ठसा उमटत नसल्यास हाताच्या दहा बोटांपैकी कोणत्याही बोटाचा ठसा उमटवून माहिती भरता येऊ शकते.

00000
पिण्याच्या पाण्यासाठी  
भुजल उपशावर तात्पुरती बंदी   
नांदेड दि. 18 :- पर्जन्यमान कमी असल्याने जिल्ह्यातील धरणातील सद्य:स्थितीचा पाणीसाठा सरासरी तुलनेत कमी आहे. जिल्ह्यातील विविध, गावे, वाड्या, तांड्यांना सन 2017-18 उन्हाळी हंगामात टंचाई कालावधीत पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जिल्हाधिकारी नांदेड यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या परिपत्रकान्वये नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम 2009 मधील कलम 26 नुसार सार्वजनिक पिण्याचे पाण्याच्या स्त्रोतापासून 1 किमी अंतरावरील धरण, विहिरी व अन्य स्त्रोताद्वारे भुजल उपशावर तात्पुरती बंद करुन पुढील आदेशापर्यंत पाणी हे पिण्याच्या प्रयोजनासाठी राखून ठेवण्याचे आदेश काढले आहेत.  

000000
महिला लोकशाही दिनी
अर्ज करण्याचे आवाहन 
नांदेड, दि. 18 :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी सोमवार 21 ऑगस्ट 2017 रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमुद संबंधीत विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000
सोयाबीन, कपाशीवरील
किडीपासून संरक्षणासाठी संदेश
नांदेड, दि. 18 :- जिल्हयात  सोयाबीन, कापुस पिकासाठी किड रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे.  शेतकऱ्यांसाठी किडीपासुन संरक्षणासाठी कृषि संदेश देण्यात आला आहे.
सोयाबीनवरील उंटअळी , पाने खाणारी अळीच्या नियंत्रणासाठी निबोंळी अर्क 5 टक्के  + प्रोफेनोफॉस  50 .सी 20 मिली  प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. किंवा अळीच्या नियंत्रणासाठी इन्डोक्झीकार्ब 15.8 इ.सी. 7 मि.ली. किंवा स्पिनेटोरम 11.7 एस.सी 9 मि.ली.  प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
कपाशीवरील गुलाबी  बोंडअळीच्या नियंत्रणासाठी फेरोमनट्रप्स एकरी 5 लावावेत.  फेनप्रोपॅथ्रीन 10 ईसी सी 10 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी. कपाशीवरील रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी  थायमिथाक्झाम 12.6 + लॅमडा सायलोथ्रिन 9.5 झेडसी 3 ग्रॅम  प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी, असे आवाहन  नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

00000
राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन
खेळाडू गौरवासाठी नोंदणी करावी
नांदेड दि. 18 :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार 29 ऑगस्ट 2017 रोजी खालसा हायस्कुल नांदेड येथे राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडुंचा गौरव करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी व राज्यस्तरावर प्राविण्य प्राप्त खेळाडुंनी नावे नोंदविण्यासाठी प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतीसह गुरुवार 24 ऑगस्ट 2017 पर्यंत जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड येथे नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव यांनी केले आहे.
क्रीडामय वातावरण निर्माण व्हावे, खेळाडुंना प्रेरणा मिळावी या उद्देशाने हॉकीचे महान खेळाडू स्व. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. जिल्ह्यातील शाळांनी क्रीडा दिन साजरा करुन शालेयस्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करावे. मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर व्याख्याने ठेवावीत. त्याबाबतचा अहवाल जिल्हा क्रीडा कार्यालयास सादर करावा, असेही आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयाने केले आहे.

000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...