Wednesday, December 21, 2016

विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेला
आजपासून नांदेड येथे प्रारंभ; बाराशे खेळाडुंचा सहभाग
           
नांदेड , दि. 21 :-  औरंगाबाद विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन नांदेड येथे करण्याचा मान जिल्ह्यास मिळाला आहे. या स्पर्धेचे उद्घाटन गुरुवार 22 डिसेंबर रोजी सकाळी 8 वा. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगलाताई गुंडले यांच्या हस्ते होणार आहेत. अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट हे असतील. या स्पर्धा सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पाडल्या जातील असा विश्वास जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज व्यक्त केला. जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, तहसिलदार अरविंद नरसीकर आदी उपस्थित होते.  
            पत्रकार परिषदेत देण्यात आलेली माहिती अशी, या स्पर्धा 22 ते 24 डिसेंबर 2016 या कालावधीत यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहेत. तर सांस्कृतिक कार्यक्रम 22 ते 23 डिसेंबर रोजी डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे होणार आहे. स्पर्धेत औरंगाबाद विभागातील 8 जिल्ह्यातील सुमारे 1 हजार 200 खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेत 49 प्रकारच्या खेळांचा समावेश आहे. क्रीडा प्रकारनिहाय यशवंत महाविद्यालयाचे मैदान तसेच पिपल्स कॉलेज तर जलतरण स्पर्धा नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या जलतरण तलावात घेण्यात येणार आहेत.
            या स्पर्धेचा समारोप समारंभ व पारितोषीक वितरण शनिवार 24 डिसेंबर 2016 रोजी सायंकाळी 6 वा. यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्सविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त डॉ. उमकांत दांगट असतील. या स्पर्धांच्या उद्घाटन व समारोपासाठी खासदार अशोक चव्हाण, खासदार राजीव सातव, खासदार डॉ. सुनिल गायकवाड, नांदेड वाघाळा महापालिकेच्या महापौर शैलजा स्वामी, विधानपरिषदेचे सदस्य सर्वश्री अमरनाथ राजूरकर, सतीश चव्हाण, विधानसभा सदस्य सर्वश्री आमदार डी. पी. सावंत, प्रदीप नाईक, वसंतराव चव्हाण, प्रताप पाटील चिखलीकर, सुभाष साबणे, हेमंत पाटील, नागेश पाटील आष्टीकर, डॉ. तुषार राठोड, श्रीमती अमिता चव्हाण यांनाही विशेष निमंत्रीत करण्यात आले आहे.
            या क्रीडा स्पर्धांना नांदेड जिल्हा व शहरातील क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहून खेळाडुंना प्रोत्साहन दयावे, असे आवाहनही पत्रकार परिषदेत करण्यात आले.

0000000
अरबी समुद्रातील छत्रपतींच्या भव्य स्मारकाचे
 प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 24 डिसेंबरला भूमिपूजन
सोहळ्यास उपस्थित राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन
            नांदेड , दि. 21 :- मुंबईजवळच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे जलपूजन व भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 डिसेंबरला होत आहे. या भूमिपूजन सोहळ्यासाठी राज्यातील जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे दिली. याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे हे उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत देण्यात आलेली माहिती अशी की, राजभवनापासून जवळच असणाऱ्या समुद्रातील  बेटावर जगातील सर्वात उंच असे हे स्मारक असेल. हा कार्यक्रम अधिक संस्मरणीय ठरावा यासाठी राज्यातील सुमारे 70 हून अधिक प्रमुख नद्यांचे जल आणि गड किल्ल्यांवरची पवित्र माती या ठिकाणी आणली जाणार आहे. नांदेड येथूनही पवित्र पाणी व माती मुंबईला पाठविण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी काकाणी यांनी सांगितले.
 राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबई लगत अरबी समुद्रात उभारण्याचा निर्णय 2002 मध्ये घेतला. मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने याबाबत कार्यवाही पूर्ण करून स्मारकाच्या कामास गती दिली. त्यानंतर सर्व परवानग्या तातडीने प्राप्त करण्यात आल्या. या स्मारकास राज्य व केंद्र शासनासह महापालिकेच्या विविध विभागाच्या परवानग्या आवश्यक होत्या. यामध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, नौदल पश्चिम विभाग, तटरक्षक दल, सागरी किनारा अधिनियम, मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका, बेस्ट, मुंबई पोर्ट ट्रस्ट, बी.एन.एच.एस.इंडिया, मत्स्यव्यवसाय विभाग, राष्ट्रीय सुरक्षा दल, दिल्ली, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण अशा बारा विभागांची ना हरकत प्रमाणपत्रे शासनास प्राप्त झाली आहेत.
आपल्या असामान्य कामगिरीने महाराष्ट्राची पताका जगभरात फडकवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राच्या वतीने हे अनोखे वंदन असेल. महाराष्ट्राच्या तेजस्वी आणि गौरवशाली इतिहासाचे प्रतिबिंब या स्मारकाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे.  त्यामुळे प्रकल्पाचे अनोखे व विशिष्ट स्वरुप लक्षात घेऊन प्रकल्पाचा आराखडा, निविदा कागदपत्रे तयार करणे, प्रकल्पावर देखरेख करणे यासाठी दिनांक 11 एप्रिल 2016 रोजी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करून त्यानंतर प्रकल्प आराखडा मंजूर करण्यात आला आहे. 
या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 2300 कोटी रूपयांची  कामे प्रस्तावित आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 192 मीटर उंचीचा पुतळा उभारण्याचे प्रारंभी नियोजन होते. आता या पुतळ्याची उंची 210 मीटर इतकी वाढविण्यासाठी पर्यावरण विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.  या स्मारकात  महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित कला दालन, प्रदर्शन गॅलरी, महाराजांच्या चरित्रावर आधारित पुस्तकांचे सुसज्ज वाचनालय, प्रेक्षक गॅलरी, उद्यान, हेलीपॅड, अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी व जनतेसाठी जेट्टी (धक्का), सुरक्षाविषयक व्यवस्थेचा समावेश आहे.
प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक निविदा मागविण्यात आल्या असून 30 जानेवारीपर्यंत त्यांची स्वीकृती केली जाईल. त्यानंतर  19 फेब्रुवारीपर्यंत कार्यादेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. काम सुरु झाल्यानंतर 36 महिन्यातच स्मारक पूर्ण करण्याचे सरकारचे नियोजन असून ते भावी पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. महाराजांची जीवनमूल्ये प्रदर्शित करणारे देशभक्तीपर माहिती केंद्रही या स्मारकात असेल. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी पर्यटनस्थळ असणार आहे.

----०००-----
अवैध दारु निर्मिती विक्री केंद्रांवरील
 कारवाईत 1 लाख 86 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
नांदेड, दि. 21 :- जिल्ह्यातील अवैध दारु निर्मिती, विक्री केंद्राविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने पोलीस दलाच्या मदतीने विशेष मोहिम राबवून 86 गुन्हे नोंदवले आहेत. यात  हातभट्टी दारु, रसायन आदी सुमारे 1 लाख 86 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. 
जिल्हाधिकारी सुरेश काकाणी , पोलीस अधीक्षक संजय येनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच ही विशेष मोहिम राबविण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील यांनी म्हटले आहे. या मोहिमेत 86 गुन्हे नोंदविले त्यापैकी 58 वारस गुन्हे व 28 बेवारस गुन्हे नोंदविले आहेत. या कारवाईत 215 लीटर देशीदारु जप्त केली. तसेच 169 लीटर हातभट्टी दारु, 3 हजार 470 लीटर रसायन, 2 हजार 192 लीटर ताडी जप्त करुन नाश केली.  यात 1 लाख 86 हजार 830 रुपयाचा मुद्देमाल जप्त व नाश केला आहे.
हे गुन्हे चिकाळा तांडा, बोधडी, किनवट, मांडवी, देगलूर, लोहा, कंधार, बिलोली, मुदखेड व नांदेड शहर परिसरात नोंदविण्यात आले आहेत. या कार्यवाहीत पोलीस विभाग, महसूल विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांनी संयुक्तपणे मोहिम राबवून अवैध दारु निर्मिती , विक्री करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे नोंदवून कडक कारवाई केली आहे. यापुढेही पोलिस विभाग व महसूल विभागाच्या समन्वयाने विशेष मोहिम राबविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

000000
ग्राम विकासाच्या संकल्पनांना मुर्त रुप देण्यासाठी प्रयत्नशील
- ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे
माळाकोळी पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन संपन्न

नांदेड, दि. 21 :- रस्ते, पाणी यांच्यासह ग्रामीण विकासाच्या संकल्पनाशी दृढ आहोत. या संकल्पनांना मुर्त रुप देण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. माळाकोळी येथे आयोजित लिंबोटी (माळेगाव) ते माळाकाळी पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन आणि विविध विकास कामांचे भुमिपूजन मंत्री मुंडे यांच्या हस्ते मंगळवार 20 डिसेंबर रोजी झाले. त्यानिमित्ताने आयोजित समारंभात त्या बोलत होत्या. माळाकोळी पोलीस कवायत मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रताप पाटील-चिखलीकर होते.
याप्रसंगी व्यासपीठावार जिल्हा परीषद सदस्य प्रवीण पाटील-चिखलीकर, कावेरीताई भालेराव, पंचायत समिती सभापती सोनाली ढगे, माळाकोळीचे सरपंच जालिंदर कागणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे,  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचे कार्यकारी अभियंता एम. एस. बोडके, उपअभियंता डी. बी. राठोड तसेच पंचक्रोशीतील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गोविंद केंद्रे, गणेश हाके, मुक्तेश्र्वर धोंडगे, देविदास राठोड आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील रस्ते, पाणी यांच्यासह ग्रामीण भागातील विकास संकल्पनांबाबत आम्ही दृढ आहोत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी ग्रामीण भागातील आशा-आकांक्षांच्या पुर्तीसाठी काम केले. ग्रामीण भागातील सामान्यांच्या स्वनपुर्तीसाठीच त्यांनी काम केले. त्याच उर्मीने आम्हीही कार्यरत आहोत. ग्रामीण भागातील रस्ते आणि पाणी पुरवठ्याच्या सुविधांसाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात आला. त्यातूनच मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, जलयुक्त शिवार योजनांची आखणी करण्यात आली आहे. माळाकोळी आणि परिसरातील वाडी-तांडे यांच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्य संतुलित जलकुंभाद्वारे पाणी पुरवठा योजनेत माळाकोळी, विठोबा तांडा, हरीचा तांडा, सितारामा तांडा, परशुराम तांडा, रुपला तांडा, भिल्लू नाईक तांडा, खिरू तांडा, नागदरवाडी व कामजळगेवाडी यांचा समावेश आहे. सुमारे 28 हजार 790 लोकसंख्या गृहीत धरून तयार करण्यात आलेल्या योजनेसाठी 2 कोटी 30 लाख 60 हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली होती. या योजनेतून दैनंदिन 1.355 दशलक्ष लिटर्स पाणी मागणी पुर्ण करण्यात येणार आहे.
माळाकोळी येथे मंत्री मुंडे यांच्या हस्ते जलपूजन झाले, तसेच विकास कामाचे भुमीपूजन करण्यात आले. कार्यक्रमात दिपप्रज्वलन तसेच संत गाडगेबाबा आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमांचे पूजन झाले. माळाकोळी ग्रामपंचायतीच्यावतीने मंत्री मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच श्री .कागणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मुक्तेश्र्वर धोंडगे,गोविंद केंद्रे, तसेच आमदार प्रताप-पाटील चिखलीकर यांचेही समयोचित भाषणे झाले. कार्यक्रमास माळाकोळीसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...