Wednesday, December 21, 2016

ग्राम विकासाच्या संकल्पनांना मुर्त रुप देण्यासाठी प्रयत्नशील
- ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे
माळाकोळी पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन संपन्न

नांदेड, दि. 21 :- रस्ते, पाणी यांच्यासह ग्रामीण विकासाच्या संकल्पनाशी दृढ आहोत. या संकल्पनांना मुर्त रुप देण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. माळाकोळी येथे आयोजित लिंबोटी (माळेगाव) ते माळाकाळी पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन आणि विविध विकास कामांचे भुमिपूजन मंत्री मुंडे यांच्या हस्ते मंगळवार 20 डिसेंबर रोजी झाले. त्यानिमित्ताने आयोजित समारंभात त्या बोलत होत्या. माळाकोळी पोलीस कवायत मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रताप पाटील-चिखलीकर होते.
याप्रसंगी व्यासपीठावार जिल्हा परीषद सदस्य प्रवीण पाटील-चिखलीकर, कावेरीताई भालेराव, पंचायत समिती सभापती सोनाली ढगे, माळाकोळीचे सरपंच जालिंदर कागणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे,  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचे कार्यकारी अभियंता एम. एस. बोडके, उपअभियंता डी. बी. राठोड तसेच पंचक्रोशीतील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गोविंद केंद्रे, गणेश हाके, मुक्तेश्र्वर धोंडगे, देविदास राठोड आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील रस्ते, पाणी यांच्यासह ग्रामीण भागातील विकास संकल्पनांबाबत आम्ही दृढ आहोत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी ग्रामीण भागातील आशा-आकांक्षांच्या पुर्तीसाठी काम केले. ग्रामीण भागातील सामान्यांच्या स्वनपुर्तीसाठीच त्यांनी काम केले. त्याच उर्मीने आम्हीही कार्यरत आहोत. ग्रामीण भागातील रस्ते आणि पाणी पुरवठ्याच्या सुविधांसाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात आला. त्यातूनच मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, जलयुक्त शिवार योजनांची आखणी करण्यात आली आहे. माळाकोळी आणि परिसरातील वाडी-तांडे यांच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्य संतुलित जलकुंभाद्वारे पाणी पुरवठा योजनेत माळाकोळी, विठोबा तांडा, हरीचा तांडा, सितारामा तांडा, परशुराम तांडा, रुपला तांडा, भिल्लू नाईक तांडा, खिरू तांडा, नागदरवाडी व कामजळगेवाडी यांचा समावेश आहे. सुमारे 28 हजार 790 लोकसंख्या गृहीत धरून तयार करण्यात आलेल्या योजनेसाठी 2 कोटी 30 लाख 60 हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली होती. या योजनेतून दैनंदिन 1.355 दशलक्ष लिटर्स पाणी मागणी पुर्ण करण्यात येणार आहे.
माळाकोळी येथे मंत्री मुंडे यांच्या हस्ते जलपूजन झाले, तसेच विकास कामाचे भुमीपूजन करण्यात आले. कार्यक्रमात दिपप्रज्वलन तसेच संत गाडगेबाबा आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमांचे पूजन झाले. माळाकोळी ग्रामपंचायतीच्यावतीने मंत्री मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच श्री .कागणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मुक्तेश्र्वर धोंडगे,गोविंद केंद्रे, तसेच आमदार प्रताप-पाटील चिखलीकर यांचेही समयोचित भाषणे झाले. कार्यक्रमास माळाकोळीसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

No comments:

Post a Comment

  ​ वृत्त क्रमांक 38   ​ उमरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिनाचे रविवारी आयोजन   नांदेड दि.   10   जानेवारी :- उमर...