Wednesday, December 21, 2016

विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेला
आजपासून नांदेड येथे प्रारंभ; बाराशे खेळाडुंचा सहभाग
           
नांदेड , दि. 21 :-  औरंगाबाद विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन नांदेड येथे करण्याचा मान जिल्ह्यास मिळाला आहे. या स्पर्धेचे उद्घाटन गुरुवार 22 डिसेंबर रोजी सकाळी 8 वा. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगलाताई गुंडले यांच्या हस्ते होणार आहेत. अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट हे असतील. या स्पर्धा सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पाडल्या जातील असा विश्वास जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज व्यक्त केला. जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, तहसिलदार अरविंद नरसीकर आदी उपस्थित होते.  
            पत्रकार परिषदेत देण्यात आलेली माहिती अशी, या स्पर्धा 22 ते 24 डिसेंबर 2016 या कालावधीत यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहेत. तर सांस्कृतिक कार्यक्रम 22 ते 23 डिसेंबर रोजी डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे होणार आहे. स्पर्धेत औरंगाबाद विभागातील 8 जिल्ह्यातील सुमारे 1 हजार 200 खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेत 49 प्रकारच्या खेळांचा समावेश आहे. क्रीडा प्रकारनिहाय यशवंत महाविद्यालयाचे मैदान तसेच पिपल्स कॉलेज तर जलतरण स्पर्धा नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या जलतरण तलावात घेण्यात येणार आहेत.
            या स्पर्धेचा समारोप समारंभ व पारितोषीक वितरण शनिवार 24 डिसेंबर 2016 रोजी सायंकाळी 6 वा. यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्सविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त डॉ. उमकांत दांगट असतील. या स्पर्धांच्या उद्घाटन व समारोपासाठी खासदार अशोक चव्हाण, खासदार राजीव सातव, खासदार डॉ. सुनिल गायकवाड, नांदेड वाघाळा महापालिकेच्या महापौर शैलजा स्वामी, विधानपरिषदेचे सदस्य सर्वश्री अमरनाथ राजूरकर, सतीश चव्हाण, विधानसभा सदस्य सर्वश्री आमदार डी. पी. सावंत, प्रदीप नाईक, वसंतराव चव्हाण, प्रताप पाटील चिखलीकर, सुभाष साबणे, हेमंत पाटील, नागेश पाटील आष्टीकर, डॉ. तुषार राठोड, श्रीमती अमिता चव्हाण यांनाही विशेष निमंत्रीत करण्यात आले आहे.
            या क्रीडा स्पर्धांना नांदेड जिल्हा व शहरातील क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहून खेळाडुंना प्रोत्साहन दयावे, असे आवाहनही पत्रकार परिषदेत करण्यात आले.

0000000

No comments:

Post a Comment

  ​ वृत्त क्रमांक 38   ​ उमरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिनाचे रविवारी आयोजन   नांदेड दि.   10   जानेवारी :- उमर...